2024 च्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत अनुसूचित जातीचे अर्थात दलित समाजाचे 29 आमदार निवडून आले आहेत. महाराष्ट्रातील 29 दलित आमदार हे कोणत्या SC जातीचे आहेत? म्हणजेच दलित आमदारांमध्ये बौद्ध, चर्मकार, मातंग, खाटीक, बुरूड इ. आमदारांची संख्या किती आहे याविषयीची माहिती या लेखात देण्यात आली आहे. – List of Dalit MLAs in Maharashtra by SC caste
2024 च्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जनतेने मोठ्या मताधिक्क्याने महायुतीला कौल दिला आहे, तर महाविकास आघाडीला जोरदार फटका बसला आहे.
राज्यातील 288 जागांपैकी महायुतीने तब्बल 230 आणि महाविकास आघाडीने 50 जागा जिंकल्या आहेत, तर इतरांना 8 जागा मिळाल्या.
राज्यातील विधानसभेच्या 288 पैकी 29 जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. आणि या निवडणुकीत सर्वपक्षीय एकूण 29 दलित आमदार अर्थात अनुसूचित जातीचे आमदार निवडून आले आहेत.
महाराष्ट्रात अनुसूचित जातींची संख्या 59 असून त्यांची एकूण लोकसंख्या 1,32,75,898 आहे. महार, मांग आणि चांभार या अनुक्रमे सर्वात मोठ्या अनुसूचित जाती आहेत, ज्यांची एकत्रितपणे अनुसूचित जातीमध्ये 90 टक्के लोकसंख्या आहे. (लोकसंख्येसह 59 अनुसूचित जातींची यादी पाहा).
15व्या महाराष्ट्राच्या विधानसभेत (2024-29) अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघांतून खालीलप्रमाणे 29 एससी समाजातील आमदार निवडून आले आहेत. हे 29 दलित आमदार केवळ 7 अनुसूचित जातींचे आहेत.
- 10 बौद्ध (महार)
- 9 चर्मकार (चांभार)
- 3 खाटीक
- 2 मातंग (मांग)
- 2 बुरुड
- 1 ढोर (कक्कय्या)
- 1 बुडगा जंगम
- 1 अन्य
महाराष्ट्रातील बौद्ध आमदार (2024-29)
1. संजय मेश्राम (उमरेड) – काँग्रेस
2. डॉ. ज्योती गायकवाड (धारावी) – काँग्रेस
3. डॉ. नितीन राऊत (नागपूर उत्तर) – काँग्रेस
4. सिद्धार्थ खरात (मेहकर) – शिवसेना (ठाकरे)
5. संजय शिरसाट (औरंगाबाद पश्चिम) – शिवसेना (शिंदे)
6. डॉ. बालाजी किणीकर (अंबरनाथ) – शिवसेना (शिंदे)
7. अण्णा बनसोडे (पिंपरी) – राष्ट्रवादी (अ.प.)
8. राजू खरे (मोहोळ) – राष्ट्रवादी (श.प.)
9. संजय बनसोडे (उदगीर) – राष्ट्रवादी (अ.प.)
10. राजकुमार बडोले (अर्जुनी-मोरगाव) – राष्ट्रवादी (अ.प.)
सविस्तरपणे वाचा : विधानसभा 2024 : महाराष्ट्रातील नवनिर्वाचित 10 बौद्ध आमदार
पंधराव्या महाराष्ट्र विधानसभेतील बौद्ध समाजातील दहा आमदार हे महार या अनुसूचित जातीचे आहेत. राज्यातील 59 अनुसूचित जातींच्या यादीमध्ये ‘महार, मेहर, तराळ, ढेगू-मेगू’ हा महार जातीसमूह 37 व्या क्रमांकावर आहे.
2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील महार जातीची लोकसंख्या 80,06,060 होती, जी अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या 60.31 टक्के आणि राज्याच्या लोकसंख्येच्या 7.12 टक्के आहे.
परंतु राज्याच्या विधानसभेतील 29 अनुसूचित जातीच्या राखीव जागांपैकी महार जातीला केवळ 34.48 टक्के प्रतिनिधित्व मिळाले आहे.
या निवडणुकीत महाविकास आघाडीने 15 तर महायुतीने 7 असे एकूण 22 बौद्ध उमेदवार दिले होते. त्यांपैकी या दोन्ही आघाड्यांचे प्रत्येकी 5 बौद्ध उमेदवार निवडून आले.
काँग्रेस आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रत्येकी तीन बौद्ध आमदार आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन बौद्ध आमदार आहेत, तर ठाकरे यांच्या शिवसेनेचा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक बौद्ध आमदार आहे. भारतीय जनता पक्षाचा यंदा एकही बौद्ध आमदार नाही.
महाराष्ट्रातील विद्यमान 6 अनुसूचित जातीच्या खासदारांमध्ये दोन बौद्ध समाजाचे आहेत — बळवंत वानखेडे (अमरावती) आणि वर्षा गायकवाड (मुंबई उत्तर मध्य).
महाराष्ट्रातील चर्मकार आमदार (2024-29)
1. संजय वामन सावकारे (भुसावळ) – भाजप
2. श्याम रामचरण खोडे (वाशिम) – भाजप
3. नमिता अक्षय मुंदडा (केज) – भाजप
4. किसन मारोती वानखेडे (उमरखेड) – भाजप
5. नारायण तिलकचंद कुचे (बदनापूर) – भाजप
6. नरेंद्र भोजराज भोंडेकर (भंडारा) – शिवसेना (शिंदे)
7. मंगेश कुदळकर (कुर्ला) – शिवसेना (शिंदे)
8. सरोज बाबूलाल अहिरे (देवलाली) – राष्ट्रवादी (अ.प.)
9. डॉ. अशोक माने (हातकणंगले) – जनसुराज्य शक्ती
या निवडणुकीत महायुतीने 12 तर महाविकास आघाडीने 3 असे एकूण 15 चांभार उमेदवार दिले होते. त्यांपैकी फक्त महायुतीचे 9 चांभार उमेदवार निवडून आले.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक 5 चांभार आमदार निवडून आले आहेत. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे दोन, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचा प्रत्येकी एक चर्मकार आमदार निवडून आला आहे. यंदा महाविकास आघाडीत कोणत्याही पक्षाचा एकही चांभार आमदार नाही.
चर्मकार (चांभार) समाजातील 9 आमदारांचा जातसमूह हा राज्यातील अनुसूचित जातींच्या यादीत 11 व्या क्रमांकावर आहे. ‘भांबी, भांभी, असादरु, असोदी, चामडिया, चमार, चमारी, चांभार, चमगार, हरळय्या, हराळी, खालपा, माचीगार, मोचीगार, मादर, मादिग, मोची, तेलगू मोची, कामाटी मोची, राणीगार, रोहिदास, नोना, रामनामी, रोहित, समगार, सतनामी, सूरज्यबंशी, सूरज्यरामनामी, समगारा, चर्मकार, परदेशी चमार’ हा चांभार जातसमूह आहे.
महार आणि मातंग नंतर महाराष्ट्रातील तिसरी सर्वात मोठी अनुसूचित जाती म्हणजे चर्मकार होय. 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील चांभार जातीसमूहाची लोकसंख्या 14,11,072 होती, जी अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या 10.63 टक्के आणि राज्याच्या लोकसंख्येच्या 1.26 टक्के होती.
परंतु राज्यातील अनुसूचित जातीच्या राखीव जागांपैकी चांभार जातीला 31.03 टक्के प्रतिनिधित्व मिळाले आहे. तसेच विधानसभेच्या 288 जागांपैकी 3.13% जागा चांभार समाजाला मिळालेल्या आहेत.
महाराष्ट्रातील विद्यमान 6 अनुसूचित जातीच्या खासदारांमध्ये दोन चर्मकार समाजाचे आहेत — भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी) आणि श्यामकुमार बर्वे (रामटेक).
हेही पाहा : महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी आणि प्रत्येक SC जातीची लोकसंख्या
महाराष्ट्रातील खाटीक आमदार (2024-29)
1. गजानन मोतीराम लवटे (दर्यापूर) – शिवसेना (ठाकरे)
2. उत्तम शिवदास जानकर (माळशिरस) – राष्ट्रवादी (श.प.)
3. सचिन पाटील (फलटण) – राष्ट्रवादी (अ.प.)
महार आणि चांभार यांच्यानंतर खाटीक या अनुसूचित जातीतून सर्वाधिक 3 आमदार विधानसभेवर निवडून आले आहेत. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींनी प्रत्येकी 2 खाटीक उमेदवार उभे केले होते.
महायुतीचा एक आणि महाविकास आघाडीचे दोन्ही खाटीक उमेदवार आमदार झाले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येकी एक खाटीक आमदार निवडून आला आहे.
‘खाटीक, चिकवा, चिकवी’ हा खाटीक जातसमूह अनुसूचित जातींच्या यादीत 31 व्या क्रमांकावर आहे.
खाटीक ही 8वी सर्वात मोठी अनुसूचित जाती होय. 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील खाटीक जातसमूहाची लोकसंख्या 1,08,491 होती, जी एकूण अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या 0.82 टक्के आणि महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 0.10 टक्के आहे.
राज्यातील अनुसूचित जातीच्या राखीव जागांपैकी 10.34 टक्के प्रतिनिधित्व खाटीक जातीला मिळाले आहे. तसेच विधानसभेच्या 288 जागांपैकी 1.04% जागा खाटीक समाजाला मिळालेल्या आहेत.
हेही वाचा : 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुती-मविआचे SC उमेदवार
महाराष्ट्रातील मातंग आमदार (2024-29)
1. जितेश रावसाहेब अंतापुरकर (देगलूर) – भाजप
2. सुनील ज्ञानदेव कांबळे (पुणे छावणी) – भाजप
युती-आघाडीने, महार आणि चांभार यांच्यानंतर सर्वाधिक (6) उमेदवारी मातंग समाजाला दिली होती. यंदाच्या निवडणुकीत महायुतीने 2 तर महाविकास आघाडीने 4 मातंग उमेदवार उभे केले, परंतु त्यांपैकी फक्त महायुतीचे-भाजपचे दोन्ही उमेदवार आमदार झाले.
महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या यादीत 46व्या क्रमांकावर ‘मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग’ हा मांग जातसमूह आहे.
मातंग (मांग) ही महार नंतर दुसरी सर्वात मोठी अनुसूचित जाती आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील मांग जातसमूहाची लोकसंख्या 24,88,531 होती, जी अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या 18.74 टक्के आणि राज्याच्या लोकसंख्येच्या 2.21 टक्के आहे.
राज्यातील विधानसभेच्या 29 अनुसूचित जातीच्या राखीव जागांपैकी 6.90 टक्के (2 आमदार) प्रतिनिधित्व मातंग जातीला मिळाले आहे. तसेच राज्याच्या एकूण विधानसभेच्या जागांपैकी केवळ 0.69% जागा मातंग समाजाला मिळालेल्या आहेत.
हेही बघा : SC-ST आरक्षणाचे उपवर्गीकरण केले तर कोणत्या जातीला किती आरक्षण मिळेल?
महाराष्ट्रातील बुरुड आमदार (2024-29)
1. हरीश मारोतीअप्पा पिंपळे (मूर्तिजापूर) – भाजप
2. किशोर गजानन जोरगेवार (चंद्रपूर) – भाजप
महायुतीने-भारतीय जनता पक्षाने दोन बुरुड जातीचे उमेदवार दिले होते, जे दोन्ही विजयी झाले. महाविकास आघाडीने बुरुड व्यक्तीला उमेदवारी दिली नव्हती.
महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या यादीत 8व्या क्रमांकावर ‘बसोर, बुरुड, बांसोर, बांसोडी’ हा बुरुड (बसोर) जातसमूह आहे.
बसोड (बुरुड) ही 9वी सर्वात मोठी अनुसूचित जाती आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील बुरुड जातसमूहाची लोकसंख्या 55,564 होती, जी एकूण अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या 0.42 टक्के आहे.
मातंग समाजाप्रमाणेच, बुरुड जातीला देखील विधानसभेच्या 6.90 टक्के एससी राखीव जागा मिळाल्या आहेत.
महाराष्ट्रातील ढोर / कक्कय्या आमदार (2024-29)
1. डॉ. सुरेश दगडू खाडे (मिरज) – भाजप
2024 च्या विधानसभा निवडणुकीत ढोर व कक्कय्या जातीचे तीन उमेदवार महायुतीने दिले होते. त्यापैकी केवळ एक भाजपचा उमेदवार निवडून आला. ढोर जातीला चर्मकार जातीची पोटजात समजले जाते परंतु या दोन्ही जातींची नोंद अनुसूचित जातीच्या यादीमध्ये स्वतंत्रपणे करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या यादीत 18व्या क्रमांकावर ‘ढोर, कक्कय्या, कंकय्या, डोहोर’ हा ढोर (कक्कय्या) जातसमूह आहे. ढोर जातीला विधानसभेच्या 3.45 टक्के एससी राखीव जागा मिळाल्या आहेत.
ढोर (कक्कय्या) ही 5वी सर्वात मोठी अनुसूचित जाती आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील बुरुड जातसमूहाची लोकसंख्या 1,16,287 होती, जी एकूण अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या 0.88 टक्के आहे.
सोलापूरच्या विद्यमान खासदार प्रणिती शिंदे देखील ढोर समाजाच्या आहेत.
- हेही वाचा : सर्व आरक्षण रद्द केले तर काय होईल?
महाराष्ट्रातील बुडगा जंगम आमदार (2024-29)
1. प्रवीण वीरभद्र स्वामी (उमरगा) – शिवसेना (ठाकरे)
2024 च्या निवडणुकीत बुडगा जंगम जातीचा एकमेव उमेदवार महाविकास आघाडीने – ठाकरेंच्या शिवसेनेने दिला होता, जो निवडून देखील आला. बुडगा जातीला विधानसभेच्या एससी राखीव जागांमध्ये 3.45 टक्के हिस्सा मिळाला आहेत.
महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या यादीत 9व्या क्रमांकावर ‘बेडा जंगम, बुडगा जंगम’ हा बेडा जातसमूह आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील बुडगा जंगम जातसमूहाची लोकसंख्या 27,168 होती, जी एकूण अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या 0.02 टक्के आहे.
लातूरचे विद्यमान खासदार डॉ. शिवाजी काळगे देखील बेडा जंगम समाजाचे आहेत.
महाराष्ट्रातील इतर दलित आमदार (2024-29)
1. हेमंत भुजंगराव ओगले (श्रीरामपूर) – काँग्रेस
टीप : हेमंत ओगले (श्रीरामपूर-काँग्रेस) या विजयी उमेदवाराची, तसेच प्रवीणा मारोजकर (कुर्ला-शिवसेना (उबाठा)), राजेश खंदारे (धारावी-शिवसेना) व दीपक चव्हाण (फलटण-राष्ट्रवादी-श.प.) या पराभूत उमेदवारांच्या SC जातींची माहिती मिळू शकली नाही. तुम्हाला याची माहिती असेल तर कृपया आम्हाला ई-मेल करावा.
29 दलित आमदारांचे पक्षनिहाय वर्गीकरण
महायुतीने 30 अनुसूचित जातीचे उमेदवार उभे केले, त्यापैकी 20 निवडून आले. तर महाविकास आघाडीने 29 अनुसूचित जातीचे उमेदवार उभे केले होते, त्यापैकी फक्त 9 विजयी झाले.
2024 च्या विधानसभा निवडणुकीतील दलित आमदारांचे पक्षनिहाय वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे.
महायुती – 20 दलित आमदार
- भाजप – 10
- शिवसेना (शिंदे) – 4
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – 5
- जनसुराज्य शक्ती – 1
महाविकास आघाडी – 9 दलित आमदार
- काँग्रेस – 4
- शिवसेना (ठाकरे) – 3
- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – 2
15व्या महाराष्ट्राच्या विधानसभेत (2024-29) अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघांतून 10 बौद्ध (महार), 9 चर्मकार (चांभार), 3 खाटीक, 2 मातंग (मांग), 2 बुरुड, 1 ढोर (कक्कय्या), 1 बुडगा जंगम आणि 1 अन्य असे एकूण 29 एससी समाजातील आमदार आहेत.
19 हिंदू दलित आणि 10 नवबौद्ध आमदार
यंदाच्या निवडणुकीत ‘नवबौद्ध’ आणि ‘हिंदू दलित’ यांची लोकसंख्या आणि त्यांना विधानसभेत मिळणारे प्रतिनिधित्व यात पूर्णत: विरोधाभास आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत, महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातींमध्ये 38 टक्के प्रमाण असणाऱ्या हिंदू दलित समाजातून 19 आमदार (आरक्षित जागांच्या 66%) निवडून आले, तर अनुसूचित जातींमध्ये 62 टक्के प्रमाण असणाऱ्या नवबौद्ध समाजातून फक्त 10 आमदार (आरक्षित जागांच्या 34%) निवडून आले.
हेही पाहा : महाराष्ट्रातील 59 अनुसूचित जातींची धर्मनिहाय लोकसंख्या (धर्मनिहाय)
सर्वाधिक 112 आमदार मराठा समाजाचे
अखिल भारतीय मराठा महासंघाने केलेल्या अभ्यासानुसार, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मराठा आणि मराठा-कुणबी समाजाचे 112 आमदार निवडून आले आहेत, जे एकूण 288 विधानसभा जागांपैकी 38.89 टक्के तर 234 सर्वसाधारण खुल्या जागांपैकी 47.86 टक्के आहेत. (बातमी पाहा)
महाराष्ट्रात मराठा समाजानंतर दुसरा सर्वात मोठा समाज म्हणजे महार (बौद्ध). माळी, कुणबी, धनगर समाजाची लोकसंख्या महार समाजाच्या तुलनेत कमी आहे. महार समाज महाराष्ट्राच्या लोकसंख्येत सात टक्के ते नऊ टक्के इतका जास्त आहे, पण राजकारणात कमी प्रतिनिधित्व आहे.
हे ही वाचलंत का?
- महाराष्ट्रात 8.5 टक्के बौद्धांची लोकसंख्या, पण 14व्या विधानसभेत होते फक्त 9 बौद्ध आमदार
- जगातील 10 बौद्ध महिला राष्ट्रपती आणि पंतप्रधान
मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इंस्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी ई-मेल करु शकता.