आधुनिक भारताच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण आशिया, उत्तर अमेरिका आणि युरोप अशा तीन खंडांत झाले आहे. प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंतचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण शैक्षणिक प्रवास आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षण
प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण अतिशय संघर्षमय आहे आणि ते सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला सर्वोच्च मानले आणि ते स्वतः देखील आजन्म विद्यार्थी होते. आजच्या लेखामध्ये आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण शैक्षणिक प्रवास जाणून घेणार आहोत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या विद्यार्थी जीवनात दररोज 18 तास अभ्यास करत असत. ते परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते परदेशातून दोन डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती मानले जाते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण किती होते ? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नोव्हेंबर 1896 ते नोव्हेंबर 1923 अशा 27 वर्षांच्या कालावधीमध्ये सातारा व मुंबईच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. या दरम्यान त्यांनी बी.ए., दोनदा एम.ए., पी.एचडी., एम.एस्सी., बार-ॲट-लॉ आणि डी.एस्सी. या पदव्या मिळवल्या. 1950 च्या दशकात त्यांना एलएल.डी. आणि डी.लिट. या दोन सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या.
जगातील सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्तींमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले जाते. याखेरीज ते भारतातील विख्यात शिक्षणतज्ज्ञ सुद्धा होते, आणि त्यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देखील आहे. अशावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण विषयक विचार महत्त्वपूर्ण ठरतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक प्रवास जाणून घेण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी आणि त्यांचे सुरुवातीचे जीवन जाणून घेणे गरजेचे आहे.
पार्श्वभूमी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रीय असले तरी त्यांचा जन्म (मध्य प्रदेश) आणि मृत्यू (दिल्ली) महाराष्ट्रात झालेला नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे हे बाबासाहेबांचे मूळ गाव होते. बाबासाहेब आंबेडकरांचे प्राथमिक माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण महाराष्ट्रातील गावांमध्ये वा शहरांमध्ये झालेले आहे.
हेही पहा : आंबडवे – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. मालोजींना तीन मुलगे व एक मुलगी अशी चार अपत्ये होती. दोन मुलांनंतरच्या तिसऱ्या मिराबाई तर 1848 च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजींचे चौथे अपत्य होय. मालोजींचा पहिला मुलगा संन्यासी, दुसरा मुलगा सैनिक व तिसरा मुलगा सुद्धा रामजींनी सैनिक होता.
रामजी 1866 च्या सुमारात वयाच्या 18व्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या 106 सॅपर्स ॲन्ड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. ते 19 वर्षांचे असताना त्यांचा विवाह 13 वर्षीय भीमाबाईंशी झाला. पुढे ते सैनिकी शाळेत म्हणजेच ‘नॉर्मल स्कूल’मध्ये शिक्षक बनले. अखेरच्या टप्प्यात त्यांना सुभेदारपदाचीही बढती मिळाली. रामजींनी मराठी व इंग्रजी भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते.
रामजी सकपाळ यांची पलटण 1888 मध्ये मध्य प्रदेशातील महू येथील लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते. या काळात 14 एप्रिल 1891 रोजी महू (आताचे डॉ. आंबेडकर नगर) या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.
रामजी व भीमाबाई या दांपत्याला 1891 पर्यंत चौदा अपत्ये झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या चार मुली जगल्या. मुलांपैकी बाळाराम, आनंदराव व भीमराव (भिवा) ही तीन मुले हयात होती. भीमराव हा त्यांचे सर्वात लहान व चौदावे अपत्य होता, जो आज ‘बाबासाहेब’ म्हणून ओळखला जातो.
बाळाचे नाव भिवा असे ठेवण्यात आले, त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. आंबेडकरांचे कुटुंब हे अस्पृश्य महार जातीचे आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील ‘आंबडवे’ या गावचे होते. अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी धार्मिक, सामाजिक व आर्थिक भेदभाव केला गेला.
1894 मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळील दापोली या गावातील कॅम्प दापोली वस्तीत परिवारासह राहू लागले. भीमराव वयाने लहान असल्यामुळे कॅम्प दापोली येथील शाळेत त्यास प्रवेश मिळाला नाही व भीमरावास घरीच अक्षर ओळख करून द्यावी लागली.
प्राथमिक शिक्षण
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण कोठे झाले ? 1896 मध्ये रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडले व ते साताऱ्याला जाऊन तेथे राहिले. यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. रामजींनी 1896 च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.
या वर्षीच रामजींनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. त्यांच्या या स्थानांतरानंतर थोड्या कालावधीत 1896 मधे मस्तकशूल या आजाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आई भीमाबाईंचे निधन झाले. 1898 साली रामजींनी जीजाबाई नावाच्या विधवेसोबत दुसरे लग्न केले.
साताऱ्यातील कॅम्प स्कूलमधील मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर 7 नोव्हेंबर 1900 रोजी साताऱ्यातीलच गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल) या इंग्रजी हायस्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले गेले. 2017 पासून महाराष्ट्र सरकार 7 नोव्हेंबर ला ‘विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा करीत आहे.
कोकणासह महाराष्ट्रातील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असत व त्यात शेवटी ‘कर’ शब्द जोडण्याचा प्रघात आहे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव “सकपाळ” असतांना त्यांचे वडील रामजी यांनी या हायस्कूलमध्ये त्यांचे ‘आंबडवेकर’ असे आडनाव नोंदवले.
‘आंबडवेकर’ हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडनिडे वाटत असे म्हणून ‘आंबेडकर’ हे नाव शाळेत नोंदवले. नोव्हेंबर 1904 मध्ये भीमरावांनी इंग्रजी चौथीची परीक्षा उत्तीर्ण केली व डिसेंबर 1904 मध्ये रामजी सकपाळ मुंबईला सहपरिवार गेले व तेथील लोअर परळ भागातील डबक चाळीत राहू लागले. मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूल या सरकारी शाळेत भीमराव जाऊ लागले. एल्फिन्स्टन हायस्कूलमधे जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते.
इतर जातीतील लोकांच्या विरोधामुळे रामजींनी मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर केला. शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना वर्गातील स्पृश्य जातींच्या विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य देखील मिळत नसे. हायस्कूलमधील अनेक शिक्षक त्यांच्याशी तिरस्काराने वागत असत. त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती. अनेकदा त्यांना वर्गाच्या बाहेर बसून शिकावे लागले.
जेव्हा त्यांना तहान लागत असे, तेव्हा शाळेतील पाणी पिण्याच्या भांड्याला किंवा पेल्याला स्पर्श करण्याची त्यांना परवानगी नव्हती. तेव्हा एखादा उच्च जातीतील व्यक्ती उंचीवरून त्यांच्या ओंजळीवर पाणी ओतत असे, तेव्हाच ते पाणी पिऊ शकत असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी हे काम बहुधा शाळेतील शिपाई करीत. पण जर शिपाई गैरहजर असला तर त्यांना दिवसभर पाण्याविनाच रहावे लागत असे; नंतर त्यांनी आपल्या लेखनात या घटनेचे “शिपाई नाही, तर पाणी नाही” असे वर्णन केले आहे.
शाळेत असतानाच 1906 मध्ये 15 वर्षीय भीमरावांचे लग्न दापोलीच्या भिकू वलंगकर यांची 9 वर्षीय रमाबाई यांच्याशी झाले. 1907 साली भीमराव एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भीमराव आंबेडकरांच्या जातबांधवांनी कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी यांच्या अध्यक्षेखाली सभा भरवून भिवा रामजी आंबेडकरांचे कौतुक केले. एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहीर सभा भरवण्यात आली होती.
यावेळी केळुसकर गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या मराठी बुद्धचरित्राची एक प्रत भीमरावांना भेट म्हणून दिली. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच बुद्धांच्या शिकवणुकींची माहिती मिळाली व ते बुद्धाप्रती आकर्षित झाले. आर्थिक अडचणीमुळे रामजी सकपाळ भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षण देऊ शकतील, अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली.
एल्फिन्स्टन महाविद्यालय – मुंबई विद्यापीठ
भीमरावांची हुशारी पाहून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांना दरमहा रु. 25 ची शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. त्यानंतर 3 जानेवारी, 1908 रोजी भीमरावांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रीव्हियसच्या वर्गात प्रवेश घेतला. येथे भीमराव नियमित अभ्यास करत असे.
याच काळात 12 जानेवारी 1912 रोजी त्यांना पहिला मुलगा यशवंत झाला. एल्फिन्स्टन महाविद्यालयात इंग्लिशचे प्राध्यापक मुलर व फारसीचे प्राध्यापक के.बी. इराणी हे आंबेडकरांचे शिक्षक होते. भीमरावांना इंग्लिश व फारसी या दोन्ही विषयांत शेकडा 75 पेक्षा जास्त गुण मिळत असे.
आंबेडकर राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे मुख्य विषय घेऊन जानेवारी 1913 मध्ये बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. ते मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची पदवी संपादन करणारे अस्पृश्य वर्गातील पहिले विद्यार्थी होते.
महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहकार्यातून मुक्त व्हावे, असा विचार करून आंबेडकरांनी बडोदा संस्थानात 23 जानेवारी 1913 रोजी नोकरीवर रूजू झाले. पण नवव्या दिवशीच मुंबईत वडील आजारी असल्याची तार त्यांना मिळाली व दोन दिवसांनी ते परत मुंबईत आले.
भीमरावांची वडिलांशी भेट झाल्यावर 3 फेब्रुवारी 1913 रोजी रामजींचे निधन झाले. यानंतर ते बडोद्यातील नोकरीवर पुन्हा वेळेवर हजर होऊ शकले नाहीत. दरम्यान त्यांना पुढचे पदव्युत्तर शिक्षण घेण्याची व त्याकरिता अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली.
कोलंबिया विद्यापीठ
बी.ए. उत्तीर्ण झाल्यावर भीमराव रामजी आंबेडकरांसमोर नोकरी करून घरची आर्थिक स्थिती सुधारणे, किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणे आणि आपली शैक्षणिक पात्रता आणखी वाढवणे, असे पर्याय होते. वडिलांच्या निधनानंतर पुढे चार महिन्यांनी बडोदा नरेशांकडून प्रति महिने साडे 11 पाऊंड शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रयाण केले.
महाराज सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याच्या विचारात होते. त्याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराजांना भेटले व बडोदा येथे आपल्याला बरोबर होत असलेला सामाजिक अन्याय महाराजांना सांगितला; त्यावर महाराजांनी काही प्रतिक्रिया दिली नाही परंतु त्यांनी भीमराव आंबेडकरांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देउन अमेरिकेत पाठविणे पसंत केल्याचे सांगितले.
4 एप्रिल, 1913 रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी चार विद्यार्थी निवडले, यात आंबेडकर एक होते. या प्रत्येकास दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे. व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी 18 एप्रिल, 1913 रोजी सह्या केल्या. या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत 15 जून 1913 ते 14 जून 1916 पर्यंत एकूण तीन वर्षांची होती.
त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला जाण्यासाठी मुंबईच्या बंदरातून एस.एस. अंकोना बोटीने प्रवास करून 21 जुलै, 1913 रोजी दुपारी 12 वाजता अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरात पोचले. या शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र शाखेत त्यांनी जुलै 1913 ते जून 1916 या तीन वर्षांसाठी प्रवेश मिळवला.
भीमरावांनी ‘अर्थशास्त्र’ हा प्रमुख विषय आणि जोडीला समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय निवडले. त्यांनी अर्थशास्त्र व समाजशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला तसेच ते विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन आर. के. सेलिग्मन यांचे आवडते विद्यार्थी झाले.
दरम्यानच्या काळात कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात लाला लजपतराय यांनी स्वतः भीमरावांशी ओळख करून घेतली. भीमराव आंबेडकर या ग्रंथालयात सर्वांच्या अगोदर हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत, याची माहिती लजपतराय यांना झाली होती. त्या अनुषंगानेही त्यांची ओळख झाली. राष्ट्रीय नेत्यांमध्ये डॉ. आंबेडकरांना लाला लजपतराय त्यांच्या अगदी जवळचे वाटत असे.
एकदा लजपतराय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्थशास्त्र व समाजशास्त्र संबंधित विषयांवर संवाद सुरू असताना प्राध्यापक एडविन सेलिग्मन तेथे आले व तेही संवादात सहभागी झाले. प्रा. सेलिग्मन लजपतराय यांचे मित्र होते, आणि आंबेडकरांचे राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचे सखोल ज्ञान जानून होते. लजपतराय यांनी आंबेडकरांच्या ज्ञानाची स्तुती केली. त्याचवेळी सेलिग्मन यांनी आंबेडकरांबद्दल म्हणाले की, “कोलंबिया विद्यापीठात, भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत.”
एम.ए.च्या पदवीसाठी भीमरावांनी एन्शंट इंडियन कॉमर्स (प्राचीन भारतीय व्यापार) या विषयावर प्रबंध लिहून तो 15 मे 1915 रोजी कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. 2 जून 1915 रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना विद्यापीठाने एम.ए.ची पदवी प्रदान केली. हा प्रबंध नंतर ‘अॅडमिशन अँड फायनान्स ऑफ इस्ट इंडिया’ कंपनी नावाचे प्रकाशित करण्यात आला.
त्यानंतर आंबेडकरांनी पीएच.डी. पदवीसाठी द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया: अ हिस्टॉरीकल अँड ॲनलाटिकल स्टडी (भारताचा राष्ट्रीय लाभांश: इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन) नावाचा प्रबंध लिहिणे सुरू केले.
1917 मध्ये विद्यापीठाने त्यांचा प्रबंध स्वीकारून त्यांना पीएच.डी. (डॉक्टर ऑफ फिलॉसफी)ची पदवी देण्याचे मान्य केले मात्र यासोबत एक अटही घातली की ज्यावेळी हा प्रबंध छापून त्याच्या काही प्रती विद्यापीठात सादर केल्या जातील तेव्हाच आंबेडकरांना पीएच.डी. पदवी रीतसर दिली जाईल.
मात्र प्रबंध स्वीकारल्यामुळे 1917 मध्येच विद्यापीठाने आंबेडकरांनाना त्यांच्या नावापुढे ‘डॉक्टर’ (डॉ.) हा शब्द लावण्याची अनुमती दिली. आंबेडकरांनी आपल्या पीएच.डी. प्रबंधामध्ये, ब्रिटिश साम्राज्यशाहीचे भारत सरकार हजारो मैल दूर असलेल्या ब्रिटिश संसदेमधील सेक्रेटरी ऑफ स्टेट (भारतमंत्री) यांच्यामार्फत कसा कारभार करत होते आणि त्यामुळे चाललेली सरकारी उधळपट्टी आणि बेजबाबदारपणा भारतीय जनतेस कसा पिळून काढत होता यावर प्रकाश टाकला तसेच अंदाजपत्रक प्रथम कधी आले, प्रांतिक अर्थव्यवस्था केव्हापासून सुरू झाली, अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा झाला याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले.
जगात निरनिराळ्या देशातील नागरिकांना ज्या अनेक प्रकारच्या करांचे ओझे वहावे लागते त्याचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यशाही केंद्र सरकारचे कर, स्थानिक स्वराज्यसंस्थांचे कर तसेच प्रांतिक सरकारचे कर याची छाननी त्यावेळच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून केली.
त्यानंतर आठ वर्षांनी (1925 मध्ये) आंबेडकरांचा पीएच.डी.चा प्रबंध ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती या नावाने लंडनच्या पी.एस. किंग अँड कंपनीने ग्रंथरूपात प्रकाशित केला. आंबेडकरांनी प्रबंधाच्या प्रती कोलंबिया विद्यापीठात सादर केल्या, त्यानंतर 8 जून 1927 रोजी आंबेडकरांना पीएच.डी. ही डॉक्टरेट पदवी रीतसर प्रदान करण्यात आली.
आंबेडकरांचे पीएच.डी. पदवीसाठीचे मार्गदर्शक प्रा. सेलिग्मन यांनी ग्रंथाची प्रस्तावना लिहिली होती. कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यानंतरही अनेक वर्षं सेलिग्मन यांच्याशी आंबेडकरांनी घनिष्ठ संबंध जोपासला होता. डॉ. आंबेडकरांनी आपला हा ग्रंथ महाराज सयाजीराव गायकवाड यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण केला.
9 मे 1916 रोजी कोलंबिया विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. ए.ए. गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र विषयाच्या चर्चासत्रात कास्ट्स इन इंडिया : देअर मेकनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट (भारतातील जाती : त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी) नावाचा आपला एक नवीन शोधलेख वाचला. शास्त्रीय विवेचन केलेला हा शोधलेख मे 1917 इंडियन अँटीक्वेरी नावाच्या मासिकात प्रकाशित झाला. नंतर हाच शोधलेख पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झाला. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होते.
कोलंबिया विद्यापिठामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना जॉन ड्युई यांचेही मार्गदर्शन मिळाले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी डेव्ही सुद्धा प्रभावित झाले होते. आंबेडकरांनी या विद्यापीठात प्रथमच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता तत्त्वांचा अनुभव घेतला होता.
“कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेव्ही, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र येथे मिळाले”, असे डॉ. आंबेडकरांनी एका मुलाखतीत म्हटले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 3 वर्षांसाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर करून अमेरिकेतील अभ्यासक्रम केवळ 3 वर्षांच्या आधी पूर्ण केला होता.
लंडनला जाऊन अर्थशास्त्रामध्ये संशोधन करून अन्य पदव्या मिळवाव्यात ह्या विचाराने त्यांनी फेब्रुवारी 1916 मध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांना दोन-तीन वर्ष शिष्यवृत्तीची मुदतवाढ मिळविण्यासाठी विनंतीपत्र पाठवले. मात्र ती विनंती अमान्य करण्यात आली. त्यानंतर डॉ. आंबेडकरांनी प्राध्यापक सेलिग्मन यांच्या शिफारसपत्रासह गायकवाडांना दुसरे विनंती पत्र पाठवले, मात्र यावेळी त्यांना केवळ एका वर्षाकरिता शिष्यवृत्तीची मुदत वाढवून देण्यात आली, मग मे 1916 मध्ये ते लंडनला गेले.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील आपल्या अभ्यासक्रम संपल्यावर पुढील शिक्षण लंडनमध्ये करण्याचे ठरवले. 1916 च्या जून महिन्यात ते लिव्हरपूल बंदरात उतरले व पुढचा प्रवास रेल्वेने करत लंडनला पोहोचले. कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक सीगर यांनी लंडन विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन कॅनन यांना डॉ. आंबेडकरांसाठी परिचयपत्र दिले होते.
“डॉ. भीमराव आंबेडकरांची अर्थशास्त्रातील प्रगती एखाद्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकापेक्षाही जास्त आहे” असे त्या परिचयपत्रात प्राध्यापक सीगर यांनी लिहिले होते. तसेच प्रा. सेलिग्मन यांनीही अर्थशास्त्रज्ञ सिडने वेब यांच्या नावे परिचयपत्र डॉ. आंबेडकरांजवळ दिले होते, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्थशास्त्राच्या विविध ग्रंथांचा अभ्यास करता यावा म्हणून लंडन येथील विविध ग्रंथालयात प्रवेश मिळवून द्यावा असे सांगितले होते. त्यानुसार वेब यांनी लंडनमधील इंडिया हाऊसच्या ग्रंथालयात डॉ. आंबेडकरांना अभ्यास करता येईल अशी सोय उपलब्ध करून दिली.
अर्थशास्त्रामध्ये पदव्या घेण्याच्या हेतूने 1916 च्या ऑक्टोबर महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये (LSE) प्रवेश घेतला. कोलंबिया विद्यापीठात एम.ए. व पीएच.डी. या पदव्यांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता, त्यामुळे बी.एस्सी.ची परीक्षा न देता थेट एम.एस्सी. साठी प्रवेश मिळावा, अशी प्रा. कॅनन यांच्या शिफारशीसह असलेली विनंती लंडन विद्यापीठाने मान्य केली.
हा अभ्यास सुरू असतानाच समांतर ‘बॅरिस्टर’ होण्यासाठी 11 नोव्हेंबर 1916 रोजी लंडनमधील ग्रेज इन मध्ये प्रवेश घेतला. एम.एस्सी. पदवी मिळवण्याकरिता प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स (भारतीय शाही अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) विषयावर प्रबंध लिहिणे सुरू केले.
परंतु त्यांच्या एक वर्ष शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपल्यामुळे अभ्यास अर्धवट सोडून त्यांना भारतात परतावे लागले. मात्र लंडन सोडण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील चार वर्षांच्या कालमर्यादेत म्हणजे ऑक्टोबर 1917 ते सप्टेंबर 1921 पर्यंत कोणत्याही वेळी लंडन येऊन आपला अपूर्ण राहिलेला अभ्यास करण्यासाठी पुन्हा प्रवेश घ्यावा, अशी लंडन विद्यापीठाकडून परवानगी मिळवली होती.
मुंबईत अर्थार्जन (जुलै 1917 – जुलै 1920)
जुलै 1917 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडनहून मुंबईला परत आले. बडोदा संस्थानच्या करारान्वये त्यांनी बडोद्यात दरमहा एकशे पन्नास रुपयांची नोकरी सुरु केली. डॉक्टर आंबेडकरांना महाराजांचे मिलिटरी सेक्रेटरी म्हणून नेमण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य असल्याने त्यांच्या कार्यालयात त्यांचे अन्य सहकारी व कर्मचारी त्यांचा सतत अपमान करीत असत. डॉ. आंबेडकरांनी महाराज गायकवाडांना याबाबतचे निवेदन दिले होते. परंतु यावर कार्यवाही झाली नाही.
बडोद्यात जातिवाद आणि अस्पृश्यता शिगेला पोहोचली होती. अस्पृश्य असल्यामुळे बडोद्यात राहण्यासाठी डॉ. आंबेडकरांना जागा मिळाली नाही. त्यामुळे नोकरी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला व 1917 च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईला परतले. त्यांना दोन पारशी विद्यार्थांना त्यांच्या घरी जाऊन शिकविण्याची दरमहा ₹100 मिळणारी शिकवणी त्यांनी घेतली. जोडीला त्यांनी व्यापाऱ्यांना आणि व्यापारी संस्थांना सल्ले देणारी स्टॉक्स अँड शेअर्स ॲडव्हायझर्स नावाची कंपनी सुरू केली.
मात्र ही कंपनी महार व्यक्तीची आहे असे समजल्यावर लोकांचे सल्ले घेण्यास येणे बंद झाले व डॉ. आंबेडकरांना आपली कंपनी बंद करावी लागली. दावर्स कॉलेज ऑफ कॉमर्स या व्यापारविषय शिक्षण सल्ले देणाऱ्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र, बँकेचे व्यवहार आणि व्यापारी कायदे हे विषय शिकवण्यासाठी प्राध्यापक म्हणून डॉ. आंबेडकरांना दरमहा पन्नास रुपये वेतनावर नियुक्त करण्यात आले.
डॉ. आंबेडकरांची दरमहा दीडशे रुपयांची ही आवक घरखर्च व शिक्षण पूर्ण करण्यासाठी साठवणूकीसाठी तोकडी होती. ते अर्थशास्त्रीय प्रश्नांवर लेख लिहून वर्तमानपत्रांकडे प्रसिद्धीसाठी पाठवत यातून त्यांना थोडी आर्थिक मदत होई. याखेरीज डॉ. आंबेडकरांनी कास्ट्स इन इंडिया व स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमिडीज हे आपले दोन प्रबंध पुस्तकस्वरूपाने प्रसिद्ध केले. यातूनही त्यांना पैसा जमा करण्याइतपत अर्थ प्राप्ती झाली नाही.
या दरम्यान ते मुंबईतील विविध ग्रंथालयात जात आणि लंडनच्या अभ्यासास उपयुक्त अशा ग्रंथांचे वाचन करत व टिपणे काढत. पुढे सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स या मुंबईतील सरकारी महाविद्यालयात राजकीय अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापकाची जागा दोन वर्षांकरीता रिकामी झालेल्या जागेवर शासनाने 10 नोव्हेंबर 1918 रोजी डॉ. आंबेडकरांची नेमणूक केली. त्यांना या नोकरीचा पगार दरमहा 450 रुपये मिळत असे.
याचदरम्यान 1918 मध्ये त्यांचे मोठे भाऊ आनंदराव यांचे निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबाची घरखर्चाची जबाबदारी एकट्या भीमरावांवर आली.
डॉ. आंबेडकरांच्या अर्थशास्त्रावरील व्याख्यानांनी त्यांचे विद्यार्थी प्रभावित होत असत. ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक बनले. त्यांचे लेक्चर्स ऐकण्यासाठी अन्य महाविद्यालयांचेही विद्यार्थी वर्गात येऊन बसत असत. डॉ. आंबेडकर सिडनहॅम महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील प्रामुख्याने अर्थशास्त्रावरील ग्रंथ वाचत असत व टिपणे काढत असत. डॉ. आंबेडकर घरखर्चासाठी शंभर रुपये देउन बाकीचे पैसे पुढील शिक्षणासाठी जमा करून ठेवत असत.
11 मार्च 1920 रोजी त्यांची प्राध्यापकाची नोकरी संपली. सामाजिक कार्याच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कोल्हापूर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज यांच्याशी परिचय झाला होता. त्यामुळे जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला जाण्याच्या तयारीला लागले तेव्हा त्यांना छत्रपती शाहू महाराजांनी दीड हजार रुपये सहकार्य म्हणून दिले. 5 जुलै 1920 रोजी ‘सिटी ऑफ एक्टिटर’ या बोटीने डॉ. भीमराव रामजी आंबेडकर लंडनकडे रवाना झाले.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज-इन (सप्टेंबर 1920 – मार्च 1923)
30 सप्टेंबर 1920 रोजी डॉ. आंबेडकरांनी लंडन स्कूल इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स आणि ग्रेज-इन मध्ये पुन्हा प्रवेश घेतला. ते सकाळी सहा वाजता ग्रंथालयात जात, ग्रंथालयात सर्वप्रथम त्यांचाच प्रवेश होई. दिवसभर पुरेल इतके साहित्य घेउन ते एकाबैठकी अखंड अखंड अभ्यास करीत. दुपारच्या वेळी खाण्यासाठीच ते जागेवरून थोडा वेळ आपल्या जागेवरून उठत असत.
ग्रंथालय सायंकाळी बंद होत असताना ते सर्वात शेवटी बाहेर पडत असत. राहण्याच्या ठिकाणीही ते जेवणानंतर रात्री मध्यरात्रीपर्यंत अभ्यास करत असत. खाणे, आराम करणे, झोप घेणे किंवा मनोरंजनासाठी वेळे देणे; हे सर्व त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे नसून सतत अभ्यास करणे, हे त्यांचे ध्येय होते.
वर्षभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा शोधप्रबंध प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया (ब्रिटिश भारतातील साम्राज्यीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) तयार केला आणि जून 1921 मध्ये एम.एस्सी.च्या पदवीसाठी लंडन विद्यापीठात सादर केला. विद्यापीठाने प्रंबंध स्वीकारून 20 जून 1921 रोजी त्यांना अर्थशास्त्रातील एम.एस्सी. ही पदवी प्रदान केली.
28 जून 1922 रोजी ग्रेज-इन संस्थेने त्यांना बॅरिस्टर-ॲट-लॉ (बार-ॲट-लॉ) ही कायद्याची उच्चतम पदवी प्रदान केली. त्यानंतर ‘द प्रोब्लम ऑफ रुपी’ (रुपयाचा प्रश्न) हा अर्थशास्त्रीय प्रबंध तयार करून ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (डी.एस्सी.)च्या पदवीसाठी ऑक्टोबर 1922 मध्ये लंडन विद्यापीठात सादर केला.
त्यांनतर, अर्थशास्त्रावर संशोधनात्मक लेखन करून जर्मनीच्या बॉन विद्यापीठाचीही डॉक्टरेट पदवी मिळवावी हा विचार करून बाबासाहेब आंबेडकर जर्मनीला गेले आणि बॉन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. ते जर्मन भाषाही शिकलेले होते. तेथे तीन महिने राहून त्यांनी प्रबंधलेखनाची तयारी केली. त्याचवेळी शिक्षक एडविन कॅनन यांनी डी.एस्सी. पदवी संदर्भात लंडनला येण्यासंबंधीचे पत्र त्यांना पाठवल्यामुळे ते लगेच लंडनला परतले.
प्रबंधात डॉ. आंबेडकरांनी भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या धोरणांवर टीका केलेली असल्यामुळे मार्च 1923 मध्ये परीक्षकांनी स्वतःच्या प्रबंधाचे त्यांच्या धोरणानुसार पुनर्लेखन करण्याचे सांगितले. यासाठी तीन-चार महिन्यांचा कालावधी लागणार होता. यादरम्यान त्यांच्याजवळील पैसे संपत चालले होते म्हणून त्यांनी भारतात जाऊन तेथे प्रबंध पूर्ण करण्याचे ठरवले.
त्यांनी बॉन विद्यापीठाचा प्रबंध सोडून दिला. डॉक्टर आंबेडकर लंडनहून बोटीने भारताकडे निघाले व 3 एप्रिल 1923 रोजी ते मुंबईला पोहोचले. ऑगस्ट 1923 मध्ये डॉ. भीमराव आंबेडकरांनी आपले निष्कर्ष न बदलता लिखाणाची पद्धत बदलून प्रबंध लंडन विद्यापीठाला पुन्हा एकदा पाठवला. विद्यापीठाने तो प्रबंध मान्य करत नोव्हेंबर 1923 मध्ये त्यांना डी.एस्सी.ची पदवी प्रदान केली.
लंडनच्या पी.एस. किंग अँड कंपनी प्रकाशन संस्थेने ‘द प्रोब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध 1923 च्या डिसेंबर मध्ये ग्रंथरूपाने प्रसिद्ध केला. या ग्रंथाला त्यांचे मार्गदर्शक अर्थशास्त्रज्ञ डॉ. कॅनन यांनी प्रस्तावना लिहिली होती. हा प्रबंध डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आई-वडिलांस अर्पण केला होता. या संशोधनांमुळे तसेच ग्रंथलेखनामुळे अर्थशास्त्र व राज्यशास्त्र ज्ञानशाखांतील तज्ज्ञ व्यक्ती तसेच निष्णात कायदेपंडित म्हणून डॉ. आंबेडकर ओळखले जाऊ लागले.
इंग्लंडमध्ये शिकत असताना ज्या अभ्यासक्रमाला 8 वर्षे लागतात तो डॉ. आंबेडकरांनी 2 वर्षे 3 महिन्यांत यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला होता. यासाठी त्यांना दररोज 24 तासांपैकी 21-21 तास अभ्यास करावा लागला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वकिली सुरू केली. ते प्राध्यापक देखील बनले आणि नंतर ते अस्पृश्यता व जातीभेद निर्मूलन चळवळीमध्ये सक्रिय झाले. 1920 पासून बाबासाहेब आंबेडकर सामाजिक कार्याबरोबरच ते राजकारणामध्ये सक्रिय झाले. आज आपण बाबासाहेब आंबेडकर यांना ‘आदर्श विद्यार्थी’ मानतो, ज्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये शिक्षण घेत आधुनिक भारताचा पाया रचला आणि भारतातील कोट्यवधी अस्पृश्य बांधवांचा उद्धार केला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक सन्मान
भारतीय इतिहासातील आजपर्यंतच्या सर्वात बुद्धिवान व्यक्तींमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव पहिल्या क्रमांकावर घेतले जाते.
5 जून 1952 रोजी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर ऑफ लॉज (एलएलडी) ही सन्माननीय पदवी प्रदान केली. ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मंत्रिमंडळाचे सदस्य आणि राज्यसभेचे सदस्य, भारताच्या प्रमुख नागरिकांपैकी एक, एक महान समाजसुधारक आणि मानवी हक्कांचा शूर समर्थक’ असे कोलंबिया विद्यापीठाने त्यांना दिलेल्या मानपत्रात संबोधण्यात आले आहे.
12 जानेवारी 1953 रोजी तेलंगाणा राज्यातील हैदराबादमधील उस्मानिया विद्यापीठाने बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी.लिट.) ही सन्माननीय पदवी प्रदान केली.
2017 पासून, महाराष्ट्र राज्यात 7 नोव्हेंबर हा दिवस बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
2004 मध्ये कोलंबिया विद्यापीठाला अडीचशे वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्ताने कोलंबिया विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात शिकून गेलेल्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये 100 सर्वात प्रभावशाली आणि बुद्धिमान विद्वानांची यादी तयार केली. ‘कोलंबियन अहेड ऑफ देअर टाईम’ नावाने प्रसिद्ध झालेल्या या जगभरातील 100 बुद्धिमान व्यक्तींच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव होते. यावेळी ‘फाऊंडिंग फादर ऑफ मॉडर्न इंडिया’ अर्थात ‘आधुनिक भारताचे जनक’ असे बाबासाहेब आंबेडकरांचे वर्णन कोलंबिया विद्यापीठ केले.
सारांश
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण अतिशय उच्च दर्जाचे होते, त्यामुळे ते भारतातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती ठरले. आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक प्रवास जाणून घेतला. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा.
तुमच्या काही सूचना किंवा प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये किंवा ई-मेलद्वारे लिहून आवर्जून कळवावे. धन्यवाद.
टीप : विकिपीडिया संपादक या नात्याने, मी मराठी विकिपीडिया वरील ‘बाबासाहेब आंबेडकर’ या लेखामध्ये सुद्धा त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीविषयी सविस्तर लिखाण केलेले आहे. त्यामुळे विकिपीडिया आणि येथील मजकुरांमध्ये साधर्म्य आपल्याला आढळेल.
हे ही वाचलंत का?
- डॉ. आंबेडकर यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती
- 2022 मध्ये ‘मराठी विकिपीडिया’वर सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती कोण? जाणून घ्या…
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- ‘धम्म भारत’चे अन्य लेख वाचा
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह |
जीवनचरित्र |
पुस्तके |
पुतळे |
सुविचार / Quotes |
दृष्टिकोन/ विचार |
कार्य आणि योगदान |
विकिपीडिया |
रंजक तथ्ये |
धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा. |