विधानसभा निवडणूक 2024 : युती-आघाडीच्या 59 दलित आणि बौद्ध उमेदवारांची संपूर्ण यादी; बौद्ध, चांभार, मातंग उमेदवार किती?

2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीने उभे केलेले अनुसूचित जातीचे आणि बौद्ध उमेदवार तसेच त्यांच्या SC जाती याविषयाची माहिती या लेखामध्ये देण्यात आली आहे. 

महायुती आणि मविआचे 59 दलित व बौद्ध उमेदवार !
2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आणि मविआचे 59 अनुसूचित जातीचे आणि बौद्ध उमेदवार कोणते?

2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांवर विविध जाती-धर्माचे उमेदवार उभे होते. या लेखामध्ये आपण केवळ महायुती आणि महाविकास आघाडीने दिलेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांची तसेच बौद्ध धर्मीय उमेदवारांची माहिती जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी 29 जागा ह्या अनुसूचित जातीसाठी (SC) तर 25 जागा अनुसूचित जमातीसाठी (ST) राखीव असतात.

29 राखीव जागेवर सर्वच पक्षांनी अनुसूचित जातीचे उमेदवार दिले होते. तथापि आपण येथे केवळ महाविकास आघाडी आणि महायुतीने दिलेल्या उमेदवारांच्या जातीची माहिती (SC caste) जाणून घेऊ.

महाराष्ट्राची लढाई ही दोन आघाड्यांमध्ये झाली आहे, सत्ताधारी महायुती – ज्यामध्ये भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – आणि महाविकास आघाडी – ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस यांचा समावेश आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीने राखीव मतदारसंघांमध्ये दिलेल्या एकूण 58 एससी उमेदवारांमध्ये 37 हिंदू दलित (64%) आणि 21 नवबौद्ध (36%) उमेदवार आहेत. याशिवाय महायुतीने एका सर्वसाधारण खुल्या जागेतून नवबौद्ध उमेदवार दिला होता.

 

अनु. जातीच्या आणि बौद्ध उमेदवारांची संपूर्ण यादी 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुती आणि महाविकास आघाडीने दिलेले अनुसूचित जातीचे व बौद्ध उमेदवार यांची यादी खालीलप्रमाणे आहे. 

हिरव्या रंगात विजयी उमेदवारांची नावे दर्शवली आहेत.

राखीव जागा 

1) भुसावळ 12

संजय वामन सावकारे (भाजप) – चांभार
डॉ. राजेश तुकाराम मानवतकर (काँग्रेस) – बौद्ध

 

2) मेहकर 25

संजय भास्कर रायमुलकर (शिवसेना) – बलाई
सिद्धार्थ रामभाऊ खरात (शिवसेना (उबाठा)) – बौद्ध

 

3) मूर्तिजापूर 32

हरीश मारोतीअप्पा पिंपळे (भाजप) – बुरुड
सम्राट डोंगरदिवे (राष्ट्रवादी काँग्रेस-श.प.) – बौद्ध

 

4) वाशिम 34

श्याम रामचरण खोडे (भाजप) – चांभार
सिद्धार्थ आकरमजी देवळे (शिवसेना (उबाठा)) – बौद्ध

 

5) दर्यापूर 40

अभिजीत आनंद अडसूळ (शिवसेना) – चांभार
गजानन मोतीराम लवटे (शिवसेना (उबाठा)) – खाटीक

 

6) उमरेड 51 (बातमी)

सुधीर लक्ष्मण पारवे (भाजप) – खाटीक
संजय नारायण मेश्राम (काँग्रेस) – बौद्ध

 

7) नागपूर उत्तर 57

डॉ. मिलिंद माने (भाजप) – बौद्ध
डॉ. नितीन काशिनाथ राऊत (काँग्रेस) – बौद्ध

 

8) भंडारा 61 (बातमी)

नरेंद्र भोजराज भोंडेकर (शिवसेना) – चांभार
पूजा गणेश ठवकर (काँग्रेस) – चांभार ?

 

9) अर्जुनी मोरगाव 63

राजकुमार सुदाम बडोले (राष्ट्रवादी काँग्रेस) – बौद्ध
दिलीप वामन बनसोडे (काँग्रेस) – बौद्ध

 

10) चंद्रपूर 71

किशोर गजानन जोरगेवार (भाजप) – बुरुड
प्रवीण नानाजी पाडवेकर (काँग्रेस) – बौद्ध

 

11) उमरखेड 82

किसन मारोती वानखेडे (भाजप) – चांभार
साहेबराव दत्ता कांबळे (काँग्रेस) – बौद्ध

 

12) देगलूर 90

जितेश रावसाहेब अंतापुरकर (भाजप) – मांग
निवृत्ती कोंडीबा कांबळे (काँग्रेस) – बौद्ध

 

13) बदनापूर 102

नारायण तिलकचंद कुचे (भाजप) – चांभार
रूपकुमार नेहरूलाल चौधरी (राष्ट्रवादी काँग्रेस-श.प.) – भंगी ?

 

14) औरंगाबाद पश्चिम 108

संजय पांडुरंग शिरसाठ (शिवसेना) – बौद्ध
राजू रामराव शिंदे (शिवसेना (उबाठा)) – बौद्ध

 

15) देवलाली 126

सरोज बाबूलाल अहिरे (राष्ट्रवादी काँग्रेस) – चांभार
योगेश बबनराव घोलप (शिवसेना (उबाठा)) – चांभार

 

16) अंबरनाथ 140

डॉ. बालाजी प्रल्हाद किणीकर (शिवसेना) – बौद्ध
राजेश देवेंद्र वानखेडे (शिवसेना (उबाठा)) – बौद्ध

 

17) कुर्ला 174

मंगेश कुदळकर (शिवसेना) – चांभार
प्रवीणा मनीष मोरजकर (शिवसेना (उबाठा)) – ???

 

18) धारावी 178

राजेश शिवदास खंदारे (शिवसेना) – ???
डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड (काँग्रेस) – बौद्ध

 

19) पिंपरी 206

अण्णा दादू बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस) – बौद्ध
डॉ. सुलक्षणा शीलवंत (राष्ट्रवादी काँग्रेस-श.प.) – बौद्ध

 

20) पुणे छावणी 214

सुनील ज्ञानदेव कांबळे (भाजप) – मांग 
रमेश आनंदराव बागवे (काँग्रेस) – मांग

 

21) श्रीरामपूर 220

भाऊसाहेब मल्हारी कांबळे (शिवसेना) – चांभार
हेमंत भुजंगराव ओगले (काँग्रेस) – ???

 

22) केज 232

नमिता अक्षय मुंदडा (भाजप) – चांभार
पृथ्वीराज शिवाजी साठे (राष्ट्रवादी काँग्रेस-श.प.) – मांग

 

23) उदगीर 237

संजय बाबुराव बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस) – बौद्ध
सुधाकर संग्राम भालेराव (राष्ट्रवादी काँग्रेस-श.प.) – मांग

 

24) उमरगा 240

ज्ञानराज धोंडीराम चौगुले (शिवसेना) – कक्कय्या/ढोर
प्रवीण वीरभद्र स्वामी (शिवसेना (उबाठा)) – बुडगा जंगम

 

25) मोहोळ 247

यशवंत विठ्ठल माने (राष्ट्रवादी काँग्रेस) – कक्कय्या/ढोर
राजू ज्ञानू खरे (राष्ट्रवादी काँग्रेस-श.प.) – बौद्ध

 

26) माळशिरस 254

राम विठ्ठल सातपुते (भाजप) – चांभार
उत्तम शिवदास जानकर (राष्ट्रवादी काँग्रेस-श.प.) – खाटीक (धनगर)

 

27) फलटण 255

सचिन पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) – खाटीक
दीपक प्रल्हाद चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस-श.प.) – ???

 

28) हातकणंगले 278

डॉ. अशोक माने (जनसुराज्य शक्ती) – चांभार
राजू जयवंत आवळे (काँग्रेस) – मांग

 

29) मिरज 281

डॉ. सुरेश दगडू खाडे (भाजप) – ढोर/ कक्कय्या
तानाजी आनंद सातपुते (शिवसेना (उबाठा)) – चांभार

 

सर्वसाधारण जागा

30) भायखळा 184

यामिनी यशवंत जाधव (शिवसेना) – बौद्ध


टीप : (1) प्रत्येक विधानसभा मतदारसंघासमोर त्याचा “क्रमांक” दिला आहे; (2) ज्या उमेदवाराची जात माहिती नाही, जातीच्या जागी “???” चिन्ह वापरले आहे; (3) उमेदवाराची जात माहिती आहे, पण त्याचा ठोस पुरावा नाही, अशावेळी जातीसोबत “?” चिन्ह वापरले आहे, आणि (4) ‘बौद्ध‘ म्हणून नोंद केलेले उमेदवार हे महार या अनुसूचित जातीचे आहेत.


पक्षनिहाय अनु. जातीचे आणि बौद्ध उमेदवार

महाविकास आघाडी आणि महायुतीने दिलेल्या अनु. जातीच्या उमेदवारांची संख्या, त्यांपैकी बौद्धांची संख्या ही माहिती खालीलप्रमाणे आहे :

महायुती – 30 SCs (7 Buddhists)

भाजप – 13 SCs (1 Buddhists)
शिवसेना – 10 SCs (3 Buddhists)
राष्ट्रवादी काँग्रेस – 6 SCs (3 Buddhists)
जनसुराज्य शक्ती – 1 SC (0 Buddhist)

(शिंदेंच्या शिवसेनेचा एक एससी बौद्ध उमेदवार खुल्या मतदारसंघातील होता.)

महाविकास आघाडी – 29 SCs (15 Buddhists)

काँग्रेस – 12 SCs (8 Buddhists)
शिवसेना (उबाठा) – 9 SCs (4 Buddhists)
राष्ट्रवादी काँग्रेस-श.प. – 8 SCs (3 Buddhists)

 

वंचित बहुजन आघाडी – 99 SCs (94 Buddhists)

 

‘वंचित’चे निम्मे उमेदवार बौद्ध – प्रकाश आंबेडकर यांनी या वेळेच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच सर्वाधिक म्हणजे तब्बल 94 बौद्ध उमेदवार (47 टक्के) दिले होते. प्रत्यक्षात वंचित बहुजन आघाडीचे 200 उमेदवार विधानसभेच्या रिंगणात होते, त्यांमध्ये 99 उमेदवार हे अनुसूचित जातीचे आणि त्यांतही 94 उमेदवार हे बौद्ध दिले होते. मात्र वंचितचे सर्व 200 उमेदवार पराभूत झालेत. (बातमी पाहा)

 

कोणत्या जातीचे किती उमेदवार ?

सर्वाधिक एससी आणि बौद्ध उमेदवार वंचित बहुजन आघाडी दिले होते परंतु निवडून येण्याची सर्वाधिक शक्यता महायुती व मविआच्या उमेदवारांची होती.

महायुती आणि महाविकास आघाडीने एकूण 59 अनुसूचित जातीचे उमेदवार निवडणुकीत उतरवले होते, ज्यांमध्ये 58 उमेदवार (29 x 2) राखीव मतदारसंघांतून आणि तर एक उमेदवार हा सर्वसाधारण मतदारसंघातून (भायखळा येथून) उभा होता.

22 महार (बौद्ध), 15 चांभार, 6 मांग, 4 खाटीक, 3 ढोर-कक्कय्या, 2 बुरुड, तर प्रत्येकी 1 बलाई, भंगी व बुडगा जंगम उमेदवार होते. (उर्वरित 4 उमेदवारांच्या जाती अज्ञात आहेत.)

प्रवीणा मारोजकर (कुर्ला), राजेश खंदारे (धारावी), हेमंत ओगले (श्रीरामपूर) व दीपक चव्हाण (फलटण) या पाच एससी उमेदवारांच्या जातींची माहिती मिळू शकली नाही. 

महाराष्ट्रातील अनुसूचित जातींचे दोन धार्मिक गट – नवबौद्ध (एससी बौद्ध) आणि हिंदू दलित (एससी हिंदू). Neo-Buddhists vs Hindu Dalits population in Maharashtra
महाराष्ट्रातील अनुसूचित जातींचे दोन धार्मिक गट – नवबौद्ध (एससी बौद्ध) आणि हिंदू दलित (एससी हिंदू). 2011 च्या जनगणनेनुसार, अनुसूचित जातींमध्ये महारांसह नवबौद्धांचे प्रमाण 62% आणि हिंदू दलितांचे प्रमाण 38% आहे. (62% नवबौद्धांमध्ये एकट्या महार समाजाचे प्रमाण 60% तर उर्वरित 2 टक्क्यांमध्ये इतर 58 अनुसूचित जातींमधील बौद्धांचा समावेश होतो.)

पक्षनिहाय अनुसूचित जातीचे उमेदवार

22 बौद्ध उमेदवार (10 विजयी) : काँग्रेसने सर्वाधिक बौद्ध उमेदवार दिले होते. 22 बौद्ध उमेदवारांमध्ये महायुतीचे 7 तर महाविकास आघाडीचे 15 उमेदवार होते.

काँग्रेसचे 8, ठाकरे गटाचे शिवसेनेचे 4, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे प्रत्येकी 3 बौद्ध उमेदवार होते. भाजपने एक बौद्ध उमेदवार दिला होता.

अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसघांमध्ये युती-आघाडीच्या बौद्ध उमेदवारांची संख्या 21 आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेने एक बौद्ध उमेदवार सर्वसाधारण खुल्या मतदारसंघातून दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत एकूण बौद्ध उमेदवारांची संख्या 22 आहे.

 

15 चांभार उमेदवार (9 विजयी): एकूण 15 उमेदवारांपैकी, सर्वाधिक 12 चांभार उमेदवार हे महायुतीने दिले. भाजपने 6, शिंदेंच्या शिवसेनेचे 4, ठाकरेंच्या शिवसेनेचे 2, तर काँग्रेस, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि जनसुराज्य शक्ती यांनी प्रत्येकी एक चांभार उमेदवार दिला.

6 मांग उमेदवार (2 विजयी): या निवडणुकीत महायुतीने 2 तर महाविकास आघाडीने 4 मांग व्यक्तींना उमेदवारी दिली होती. भाजप, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन उमेदवार मातंग समाजाचे दिले होते.

 

4 खाटीक उमेदवार (3 विजयी): युती-आघाडीचे प्रत्येकी दोन असे एकूण चार खाटीक उमेदवार या निवडणुकीत उभे होते. भाजप, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) या पक्षांनी प्रत्येकी एक उमेदवार खाटीक समाजातील दिला होता.

राष्ट्रवादीने दिलेला उमेदवार हा मूळचा “धनगर” समाजाचा असून त्याने “खाटीक” या अनुसूचित जातीचे खोटे जात प्रमाणपत्र काढले असल्याचा आरोप आहे. 

धनगर समाजाला स्वतंत्रपणे एनटी-सी (ओबीसी) अंतर्गत 3.5 टक्के आरक्षण आहे, मात्र तरी उत्तम जानकर या धनगर नेत्याने अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र काढून त्याचा लाभ घेणे अत्यंत धक्कादायक आहे.

 

3 ढोर – कक्कय्या उमेदवार (1 विजयी): ढोर / कक्कय्या जातीचे तीनही उमेदवार महायुतीने (भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस) दिले होते.

2 बुरुड उमेदवार (2 विजयी): भाजपने दोन बुरुड जातीच्या व्यक्तींना उमेदवारी दिली होती.  

प्रत्येकी 1 बलाई, बुडगा जंगम व भंगी उमेदवार (1 बुडगा जंगम उमेदवार विजयी) : शिंदेंच्या शिवसेनेने 1 बलाई, ठाकरेंच्या शिवसेनेने 1 बुडगा जंगम, आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 1 भंगी उमेदवार दिला होता.

इतर 4 उमेदवार : 4 एससी उमेदवारांच्या जातींची माहिती मिळू शकली नाही. या उमेदवारांच्या जातींची माहिती मिळाल्यानंतर वरील समीकरणांमध्ये सुद्धा बदल होईल.)

 

कोणाची किती जिंकण्याची शक्यता?

महायुती आणि महाविकास आघाडीने दिलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध उमेदवारांमध्ये कोणत्या जातीचे कमाल किती उमेदवार उमेदवार निवडणुकीत जिंकू शकत होते, त्याची शक्यता खालीलप्रमाणे आहे.

22 बौद्ध (महार) उमेदवारांपैकी कमाल 17 उमेदवार जिंकू शकत होते. कारण 5 ठिकाणी एकमेकांविरुद्ध लढत होती. पण प्रत्यक्षात 10 बौद्ध उमेदवार जिंकले.

15 चांभार उमेदवारांपैकी कमाल 12 उमेदवार जिंकू शकत होते. (3 ठिकाणी एकमेकांविरुद्ध लढत होती.) प्रत्यक्षात 9 चर्मकार विजयी झाले.

6 मांग उमेदवारांपैकी कमाल कमाल 5 उमेदवार जिंकू शकत होते. (एकाच ठिकाणी एकमेकांविरुद्ध लढत होते.) प्रत्यक्षात 2 मांग उमेदवार जिंकले.

4 खाटीक, 3 ढोर – कक्कया, 2 बुरुड, 1 बलाई, 1 भंगी आणि 1 बुडगा जंगम हे सर्व एससी उमेदवार जिंकू शकत होते. कारण या जातीचे उमेदवार एकमेकांविरोधात लढत नव्हते. प्रत्यक्षात 3 खाटीक, 2 बुरुड, 1 ढोर – कक्कया आणि 1 बुडगा जंगम उमेदवार विजयी झाले.

Three Largest Scheduled Castes in Maharashtra
2011 ची जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील 59 अनुसूचित जातींमध्ये एकट्या महार (बौद्ध) समाजाचे प्रमाण 60 टक्क्यांहून थोडीसे अधिक आहे, उर्वरित 58 जातींची लोकसंख्या सुमारे 40% आहे.

हिंदू दलित आणि नव-बौद्ध उमेदवार!

महायुती आणि महाविकास आघाडीने अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या 29 मतदारसंघात किती हिंदू दलित आणि नवबौद्धांना उमेदवारी दिली ते जाणून घेऊया.

29 राखीव मतदारसंघांमध्ये, महायुतीने 23 हिंदू दलित उमेदवार (राखीव जागांच्या 79%) आणि 6 बौद्ध दलित अर्थात नव-बौद्ध उमेदवार (21%) उभे केले होते. याशिवाय महायुतीने – शिंदेसेनेने सर्वसाधारण खुल्या मतदारसंघातून आणखी एक अनुसूचित जातीचा बौद्ध उमेदवार दिला होता.

दुसरीकडे, 29 राखीव मतदारसंघात महाविकास आघाडीने 14 हिंदू दलित उमेदवार (राखीव जागांच्या 48%) आणि 15 नवबौद्ध उमेदवार (52%) उभे केले होते. 

 

29 राखीव मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीने एकत्रितपणे उभे केलेल्या एकूण 58 SC उमेदवारांपैकी 37 हिंदू दलित (64%) आणि 21 नव-बौद्ध (36%) उमेदवार होते.

उमेदवारी : राज्यातील अनुसूचित जातींमध्ये, हिंदू दलित समाज, ज्याची संख्या साधारणपणे 38-40 टक्के आहे, त्यांना 79% उमेदवारी दिली गेली; तर नव-बौद्ध (प्रामुख्याने महार) समाज, ज्यांचे प्रमाण 60-62 टक्के आहे, त्यांना केवळ 21 टक्के उमेदवारी मिळाली होती.

आमदारकी 2024 : राज्यातील अनुसूचित जातींमध्ये, 38-40 टक्के असलेल्या हिंदू दलित समाजाचे 19 आमदार (राखीव जागांच्या 66%) निवडून आले; तर 60-62 टक्के असलेल्या नवबौद्ध समाजाचे 10 आमदार (राखीव जागांच्या 34%) निवडून आले. 

 

विधानसभेत दलितांना-बौद्धांना प्रतिनिधित्व किती?

2019-24 कार्यकाळातील 14व्या विधानसभेतील 288 आमदारांमध्ये 9 बौद्ध आमदार (एकूण आमदारांच्या 3.1%) होते. महाराष्ट्रात महारांसह बौद्धांची लोकसंख्या 8.5 टक्के आहे, पण विधानसभेत प्रतिनिधित्व 3 टक्के आहे.

14व्या महाराष्ट्र विधानसभेत 29 राखीव जागांपैकी 8 बौद्ध आमदार (एकूण एससी आमदारांच्या 27.59%) होते. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या लोकसंख्येमध्ये महार आणि नवबौद्धांची अर्थात एससी बौद्धांची लोकसंख्या 62 टक्के आहे, पण विधानसभेत त्यांना अवघे 28 टक्के प्रतिनिधित्व मिळाले होते. (15व्या महाराष्ट्राच्या विधानसभेत 10 बौद्ध आमदार असून त्यांना अनुसूचित जातीसाठी राखीव जागांच्या 34 टक्के प्रतिनिधित्व मिळाले आहे.)

मग विधिमंडळात बौद्धांचे प्रश्न कोण मांडणार? एका बाजूला आर्थिक भ्रांत, संधीचा शोध आणि दुसरीकडे जातीय तेढीच्या राजकारणात अडकणं ही महाराष्ट्राच्या बौद्धांची शोकांतिका आहे.

23 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला. 15व्या विधानसभेत 10 एससी बौद्ध उमेदवार निवडून आले. बौद्धांना विधानसभेतील प्रतिनिधित्वात 3.5% हिस्सा मिळाला.

महाराष्ट्र एकूण 59 अनुसूचित जाती (आणि उपजाती) आहेत. तथापि त्यांचे दोन प्रमुख गट करायचे झाले तर ते ‘दलित हिंदू’ आणि ‘नवबौद्ध’ असे आहेत.

दलित हिंदू म्हणजेच अनुसूचित जातीची हिंदू धर्मीय व्यक्ती (SC Hindu) आणि नवबौद्ध म्हणजेच अनुसूचित जातीची बौद्ध धर्मीय व्यक्ती (SC Buddhist) होय. महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमध्ये हिंदू दलितांची लोकसंख्या 38 टक्के आणि महारांसह नवबौद्धांची संख्या 62 टक्के आहे. पण बौद्धांना मिळणारे राजकीय प्रतिनिधित्व कमी आहे.

महाराष्ट्रात अनुसूचित जातीची लोकसंख्या सुमारे 13 टक्के आहे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार अनुसूचित जातीचे 37 आमदार विधानसभेत असायला हवे. पण सद्यस्थितीत अनुसूचित जातींसाठी 29 राखीव जागा आहेत, जर एखाद्या सर्वसाधारण जागेवर एससी उमेदवार निवडून आलाच तर विधानसभेत फक्त 30 जागांवर अनुसूचित जातीचे आमदार असू शकतात, जे की प्रतिधित्वानुसार कमी आहे.

केवळ महार + बौद्ध या दोन समूहांचा विचार केला तर त्यांना (8.5%) लोकसंख्येच्या प्रमाणानुसार विधानसभेत 24 ते 25 जागा मिळायला हव्यात. पण या समूहासाठी मिळणाऱ्या जागा 10 च्या आसपास असतात. 

खुल्या गटातील 13 लाख बौद्ध : 2011 च्या जनगणनेत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 एक 33 लाख (11.8%) होती, तर एससी-एसटी म्हणून नोंद झाली नाही अशा बौद्धांची लोकसंख्या सुमारे 13 लाख होती. अनुसूचित जातीच्या लोकसंख्येमध्ये जर या 13 लाख बौद्धांपैकी 10 लाख जरी समाविष्ट केले तरी राज्यातील एससी लोकसंख्या 13% पर्यंत जाते.

10 लाख बौद्ध = महार मूळच्या लाखो लोकांनी जनगणनेत त्यांची [59 पैकी एक] ‘अनुसूचित जात’ नोंदवली नाही तर केवळ ‘धर्म’ कॉलममध्ये बुद्धिस्ट नोंदवले. (2011 च्या जनगणनेनुसार, राज्यात एकूण बौद्ध लोकसंख्या 65 लाख होती, त्यांपैकी एससी बौद्ध 52 लाख, आणि एसटी बौद्ध 21 हजार होते. उर्वरित 13 लाख बौद्ध हे सर्वसाधारण प्रवर्गात गणले गेले होते.)

 

दलित-बौद्ध मतपेढीची ताकद किती?

महाराष्ट्रातील एकूण 288 पैकी 60 विधानसभा मतदारसंघांमध्ये बौद्ध महार समाजाचा प्रभाव आहे, त्यांमधील 20 पेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये बौद्ध समाजाचे थेट वर्चस्व असल्याचे दिसून येते.

महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 13 टक्के असलेल्या दलित समाजाची लोकसंख्या पुणे, नागपूर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये अधिक आहे. विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी 29 जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत आणि सुमारे 60 जागा अशा आहेत जिथे दलित बौद्ध मतदारांची संख्या 15 टक्क्यांहून अधिक आहे. (बातमी पाहा)

13 कोटींच्या महाराष्ट्रात दलितांची लोकसंख्या 1.95 कोटी आहे. राज्यात 288 पैकी 29 विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव आहेत. पण या राखीव जागांच्या खेरीज 19 विधानसभा मतदासंघांवर दलित बौद्ध समाजाची छाप आहे.

विशेषतः विदर्भातील संपूर्ण 11 जिल्ह्यांतील 62 मतदारसंघात कुणबी – मराठा समाजानंतर दुसऱ्या क्रमांकावर दलितांचे – बौद्धांचे मतदान आहे. मुंबईतील 36 आणि ठाण्यातील 18 अशा 54 विधानसभा मतदारसंघांतही दलित मते महत्त्वाची आहेत.

विदर्भ आणि मुंबईनंतर राज्यात दलितांचे प्राबल्य मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांत आहे. येथील 46 विधानसभांमध्ये दलित मते आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सर्व पक्ष करतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ वगळता इतर सर्वच 7 ठिकाणी दलित मतांच्या आधारे मविआचे उमेदवार विजयी झाले आहेत. अर्थात दलित मतदा‌न विविध राजकीय पक्षांमध्ये बऱ्यापैकी विभागले गेले आहे. त्यामुळे 19 मतदारसंघात ते अधिक प्रभावी आहे. (बातमी पाहा)


टिप : बौद्ध, नवबौद्ध व महार या शब्दप्रयोगाबद्दल :

या लेखामध्ये जाणीवपूर्वक “अनुसूचित जातीच्या बौद्धांसाठी” ‘नवबौद्ध‘ शब्द वापरण्यात आला आहे, कारण येथे ‘बौद्ध‘ शब्द अनुचित ठरला असता. ज्याप्रमाणे ‘दलित हिंदू‘ किंवा ‘हिंदू दलित‘ या शब्दांतून “अनुसूचित जातीची हिंदू व्यक्ती” (एससी हिंदू) असा अर्थ निघतो, त्याचप्रमाणे “अनुसूचित जातीची बौद्ध व्यक्ती” (एससी बौद्ध) यासाठी ‘नवबौद्ध‘ हा शब्दप्रयोग वापरला जातो.

दलित बौद्ध‘ किंवा ‘बौद्ध दलित‘ ऐवजी ‘नवबौद्ध‘ शब्दप्रयोग करणे अधिक श्रेयस्कर आहे. “बौद्ध व्यक्ती” या शब्दातून ती व्यक्ती ‘अनुसूचित जाती‘ची आहे किंवा नाही तसेच ती व्यक्ती ‘महार‘ जातीची आहे किंवा नाही हे स्पष्ट होत नाही.

खरंतर ‘नवबौद्ध‘ ही अनुसूचित जात नाही, तर तो 59 अनुसूचित जातीतल्या बौद्ध धर्मीय व्यक्तींसाठी समूहवाचक शब्द आहे. ‘महार’ ही अनुसूचित जात आहे, त्यामुळे येथे नवबौद्ध, बौद्ध, आणि महार असे तीनही शब्दप्रयोग आवश्यकतेनुसार करण्यात आले आहेत.


वाचकांसाठी : हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला लेखातील एससी उमेदवारांच्या जाती माहिती असल्यास तसेच तुमच्या काही सूचना किंवा प्रश्न असतील तर कृपया कॉमेंट बॉक्समध्ये किंवा ई-मेलद्वारे लिहून आवर्जून कळवावे. धन्यवाद.


हे ही वाचलंत का?


मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इंस्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी ई-मेल करु शकता.

One thought on “विधानसभा निवडणूक 2024 : युती-आघाडीच्या 59 दलित आणि बौद्ध उमेदवारांची संपूर्ण यादी; बौद्ध, चांभार, मातंग उमेदवार किती?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!