डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 4 आद्यचरित्रे

आजरोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शेकडो जीवनचरित्रे उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्या महापरिनिर्वाणापूर्वी त्यांची 4 जीवनचरित्रे प्रकाशित झाली होती, ज्यांना आपण ‘बाबासाहेबांची आद्यचरित्रे’ म्हणू शकतो. या लेखामध्ये आपण याच आद्यचरित्रांविषयी जाणून घेणार आहोत.

Early biographies of Dr. Babasaheb Ambedkar
बाबासाहेबांची आद्यचरित्रे – Early biographies of Dr. Babasaheb Ambedkar

बाबासाहेबांची आद्यचरित्रे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः एक श्रेष्ठ लेखक होते आणि त्यांनी 32 पुस्तके लिहिली आहेत. याशिवाय त्यांचे इतर लेखनही प्रचंड आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर एक लाखाहून अधिक पुस्तके लिहिण्यात आली आहेत.

ही पुस्तके वेगवेगळ्या भाषेतील आणि वेगवेगळे देशातील लेखकांनी लिहिली आहेत. बाबासाहेबांच्या लहान मोठ्या जीवनचरित्रांचा विचार केला तर ती संख्या हजारात जाईल, परंतु उत्कृष्ट जीवनचरित्रे विचारात घेतल्यास ती शेकडो असतील.

बाबासाहेबांच्या हयातीत म्हणजेच 1956 पूर्वीच त्यांची चार जीवनचरित्रे प्रकाशित झाली होते, यापैकी दोन जीवनचरित्रे अत्यंत विश्वसनीय मानली जातात. चला तर जाणून घेऊया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आद्यचरित्रांविषयी…

 

डॉ. आंबेडकर का जीवन संघर्ष (1946)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले जीवन चरित्र हिंदीमध्ये लिहिले गेले होते आणि त्याचे नाव होते ‘डॉ. आंबेडकर का जीवन संघर्ष’. बाबासाहेबांचे हे पहिले चरित्र रामचंद्र बनौधा (Ramchandra Banaudha) यांनी लिहिलं होते. 1946 (किंवा 1947) मध्ये हे पुस्तक प्रकाशित झालेलं होतं, त्यावेळी बाबासाहेब हयात होते. जोगेंद्रनाथ मंडल यांनी पुस्तकाची प्रस्तावना लिहिली.

लेखक रामचंद्र बनौधा हे एसपी म्हणून निवृत्त झालेले एक पोलिस अधिकारी होते आणि ते बाबासाहेबांच्या विचारांमुळे ते खूप प्रभावित झाले होते. रामचंद्र बनौधा अमराठी होते, पण ते दलित समाजातील व्यक्ती होते.

एसपी म्हणून निवृत्त झाल्यानंतर रामचंद्र बनौधा यांनी बाबासाहेबांसोबत संपर्क साधायला सुरुवात केली. यासाठी त्यांनी पत्रव्यवहार सुरू केला. या पत्रव्यवहारानंतर शेवटी बाबासाहेबांनी त्यांना रेल्वेमध्ये भेटण्याची वेळ दिली. ठरल्याप्रमाणे दोघांची भेट झाली आणि त्या भेटीत बनौधा यांनी सोबत आणलेल्या 50 लेखी प्रश्नांची उत्तरे बाबासाहेबांनी दिली. या 50 प्रश्नांच्या उत्तरावरूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले चरित्र तयार झाले. बाबासाहेबांची आद्यचरित्रे

 

डॉ. आंबेडकर (1946)

रामचंद्र बनौधा यांनी बाबासाहेंबाचे पहिले चरित्र हिंदीमध्ये लिहिले तर दुसरे चरित्र मराठीमध्ये लिहिले ते म्हणजे तानाजी बाळाजी खरावतेकर या 25 वर्षीय तरुणाने. तानाजी बाळाजी खरावतेकर हे कोकणातले शिक्षण आटोपून मुंबईला आले. 1942-44 ला ते इंटर सायन्सला होते. त्यानंतर भारतापासून पाकिस्तानची फाळणी होण्यापूर्वी कराची बंदराच्या शहरामध्ये (सध्याचे पाकिस्तान) व्यापार-उदीमासह उदरनिर्वासाठी कोकणातून लेखक तानाजी खरावतेकर यांचे कुटुंब कराचीमध्ये वास्तव्याला गेले होते.

त्याकाळी तानाजी खरावतेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना एक भावनाप्रधान पत्र लिहिले, त्यात त्यांनी लिहिले होते की, “प्रिय बाबासाहेब, मी कोकणातला असून शिक्षणासाठी मुंबईत आलेलो आहे. मी इंटर सायन्सच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत आहे आणि आता लष्करामध्ये भरती चालू आहे. लष्करात नोकरी करायला गेलो तर माझे आर्थिक प्रश्न सुटतील लवकर नोकरी लागेल आणि पुन्हा अशी भरती कधी होईल हे माहीत नाही.”

“मी एका पेचप्रसंगात सापडलेलो आहे की, मी नोकरी करू की शिक्षण घेऊ?” असे हे पंधरा ओळींचे पत्र होते. कुठलीच ओळख नसलेल्या या पत्राची दखल सुद्धा बाबासाहेबांनी घेतली आणि पत्राला उत्तर देताना बाबासाहेब म्हणाले की,

“मला 21 तारखेला तुमचे पत्र मिळाले आहे ज्यात तुम्ही तुमच्या करिअरबाबत माझा सल्ला मागितला आहे. माझा सल्ला असा आहे की तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवावा आणि तुमची शैक्षणिक महत्त्वाकांक्षा पूर्ण होईपर्यंत नोकरीचा विचार करू नये..”

त्यांनी बाबासाहेबांचा हा सल्ला मान्य केला. त्यांनी बीएचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि 1945 मध्ये इतिहासात ते बीए झाले. बाबासाहेबानंतरचे ते कोकणातील पहिले पदवीधर. ते स्वत: पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजातील होते.

तानाजी खरावतेकर यांनी शिकता-शिकताच बाबासाहेबांचे एक छोटेखानी चरित्र लिहिले. इकडून तिकडून निधी गोळा करून त्यांनी 1946 मध्ये ‘डॉक्टर आंबेडकरनावाचे पुस्तक प्रकाशित केले. हे चरित्र कराचीत (पाकिस्तानात) प्रसिद्ध झाले होते. परंतु पुस्तक प्रकाशनाच्या पाच महिन्यानंतर मुंबईतील केईएम रुग्णालयात वयाच्या 26 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

‘डॉक्टर आंबेडकर’ या पुस्तकाची मूळ प्रत सध्या दुर्मिळ झाली असून, त्याचे मुंबई-कराची फ्रेंडशिप फोरम या व्यासपीठाअंतर्गत ऑब्झव्‍‌र्हर रिसर्च फाऊंडेशनने पुर्नमुद्रण केले आहे. प्रा. रमाकांत यादव व त्यांचे सहकारी रमेश हरळकर यांनी हे पुस्तक 2010 साली पुनर्प्रकाशित केले होते. त्यानंतर ते पुस्तक नव्या रूपात ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे सुधींद्र कुलक​र्णी यांनी प्रकाशित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंती वर्षांचे औचित्य साधून त्याचे प्रकाशन मुंबईत विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते करण्यात आले. बाबासाहेबांची आद्यचरित्रे

 

डॉ. भीमराव रामजी आंबेडकरचरित्रखंड 1 (1952)

चांगदेव भवानराव खैरमोडे (1904 ते 1971) हे मराठी चरित्रकार, लेखक, अनुवादक आणि कवी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सानिध्यात राहुन त्यांचा आयुष्य क्रम, जीवन चरित्र आणि लेखनाची सविस्तर नोंद ठेवून 9000 पृष्ठांचे ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर‘ या नावाने 15 चरित्रखंड प्रकाशित चरित्र लेखनासाठी विशेष परिचीत होते. खैरमोडेंचे आंबेडकर चरित्र अत्यंत विश्वसनीय मानले जाते.

1929 मध्ये चांगदेव खैरमोडे बी.ए. झाले. एम.ए. आाणि एलएल.बी.चे शिक्षण त्यांनी घेतले, परंतु सचिवालयात नोकरी मिळाल्याने ते परीक्षेस बसले नाहीत. खैरमोडे यांनी बाबासाहेबांच्या  ‘शूद्र पूर्वी कोण होते?’,  ‘हिन्दू स्त्रियांची उन्नती व अवनती’  या लेखांचे अनुवाद केले. चरित्रकार खैरमोडे यांचे सर्वांत मोठे व महत्त्वपूर्ण लेखन आहे ते डॉ. आंबेडकर यांचे ‘बृहद्चरित्र’ लेखन. यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. नोकरीनिमित्त मुंबईमध्ये आल्यावर खैरमोडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास घडला. तो त्यांच्या वैचारिक जडणघडणीस आणि वैयक्तिक विकासास देखील पोषक ठरला.

चांगदेव खैरमोडे यांनी लिहीलेल्या ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर‘ चरित्राचा पहिला खंड 1952 साली बाबासाहेबांच्या हयातीतच प्रकाशीत झाला. नंतरचे चार खंड 1971 च्या आधी म्हणजेच चांगदेव खैरमोडे यांच्या हयातीत प्रकाशित झाले. 1952 पासून 1968 पर्यंत पाच खंड प्रसिद्ध झाले, आणि सहावा खंड छापत असतानाच म्हणजे 18 नोव्हेंबर 1971 रोजी त्यांचा मृत्यू झाला. उर्वरीत 10 खंडांचे प्रकाशनाचे काम त्यांच्या पत्नी द्वारकाबाई खैरमोडे आणि खंड महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने हाती घेतल्याने पूर्ण झाले.

खैरमोडे यांनी प्रचंड सामग्री जमा करून बाबासाहेबांच्या चरित्राचे अठरा खंड प्रसिद्ध करण्याचा संकल्प केला होता. यांपैकी 6, 7, 8 हे खंड अत्यंत महत्त्वाचे असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या कार्याविषयी महत्त्वाची माहिती या खंडात आहे तर 9 ते 15 या अप्रकाशित भागांत बाबासाहेबांचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व व त्यांचे प्रचंड कार्य यांचा सविस्तर आढावा आहे. अस्पृश्यांच्या उद्धारासाठी डॉ. बाबासाहेबांनी दिलेला राजकीय व सामाजिक लढा, त्यासाठी उभी केलेली व्यापक चळवळ पुराव्यांनिशी जगापुढे मांडण्यासाठी 9000 पृष्ठांचे एक दस्तऐवज स्वरूपातील हे चरित्र लिहिण्याचे फार मोठे कार्य खैरमोडे यांनी केले आहे.

 

डॉ. आंबेडकर: लाईफ अँड मिशन (1954)

धनंजय कीर यांनी 1954 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंग्रजी चरित्र “डॉ. आंबेडकर: लाईफ अँड मिशन” लिहिले. हे आंबेडकरांचे चौथे चरित्र आणि पहिले इंग्रजी चरित्र होय. धनंजय कीर यांनी लिहिलेल्या आंबेडकर चरित्राला देखील अत्यंत विश्वसनीय आंबेडकर चरित्र मानले गेले आहे.

धनंजय कीर यांनी विनायक दामोदर सावरकरांचे पहिले चरित्र लिहिले जे 1950 मध्ये प्रकाशित झाले. सावरकरवाद्यांमध्ये या चरित्राला महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. पुढे त्यांनी बाबासाहेबांचे प्रसिद्ध चरित्र लिहिले. हे चरित्र लिहिताना कीर यांनी बाबासाहेबांची भेट घेऊन त्यांची मुलाखतही घेतली. कीर यांनी हे चरित्र पूर्ण केल्यावर ते बाबासाहेबांना पाठवले. चरितग्रंथाची प्रत वाचल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचे कौतुक केले. या पुस्तकाची पहिले आवृत्ती बघा

पुढे 1966 मध्ये, लेखक धनंजय कीर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठी चरित्र देखील लिहिले. हे पुस्तक आंबेडकर जयंतीदिनी 14 एप्रिल 1966 रोजी मुंबईतील पॉप्युलर प्रकाशनाद्वारे पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे एक उल्लेखनीय चरित्र आहे. डॉ. आंबेडकरांच्या लेखनाची यादी, डॉ. आंबेडकरांवरील लेखनाची यादी तसेच डॉ. आंबेडकरांचा थोडक्यात जीवनपट या बाबींही पुस्तकात समाविष्ट आहेत. या पुस्तकाचे इंग्रजी, हिंदी, जपानी आणि इतर अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. बाबासाहेबांची आद्यचरित्रे


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणापूर्वी प्रकाशित झालेल्या या चार आद्यचरित्रांपैकी तिघांचे लेखक हे दलित होते, केवळ धनंजय कीर हे दलित नव्हते. धनंजय कीर हे सावरकरवादी तर इतर तिघे हे आंबेडकरवादी होते. तसेच रामचंद्र बनौधा वगळता तीनही लेखक मराठी होते.

या चार पुस्तकांपैकी दोन मराठीत, एक हिंदीत आणि एक इंग्रजीत लिहिली गेली आहेत. चार पैकी तीन पुस्तकांच्या नावांत ही “डॉ. आंबेडकर” नाव आहे तर केवळ एका पुस्तकाचे “डॉ. भीमराव रामजी आंबेडकर” असे संपूर्ण नाव आहे. खैरमोडे आणि कीर यांच्या आंबेडकर चरित्रांना आजही दर्जेदार आणि विश्वसनीय मानले जाते.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकांसाठी काही दशके यासाठी आणखी काही प्रयत्न झाले, पण त्यांचा प्रसार फक्त दलित विचारवंतांपुरता मर्यादित होता. 1970 मध्ये आंबेडकरांच्या योगदानाचे महत्त्व वाढले आणि महाराष्ट्र सरकारने बाबासाहेब आंबेडकरांचे अप्रकाशित लेखन आणि भाषणे मूळ इंग्रजीत प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. 1991 मध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या 100 व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने डॉ. आंबेडकरांच्या त्या संकलनाचे हिंदीसह 13 भाषांमध्ये भाषांतर करण्याचा निर्णय घेतला. मात्र कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी प्रकाशनाने ते लेखन प्रकाशित केले नाही. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागानेही हे संकलन प्रकाशित करण्यात रस दाखविला नाही.

सामाजिक न्याय मंत्रालयाने ते प्रकाशित करण्याचे काम हाती घेतले आणि 1990 च्या मध्यात “डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे” (Dr. Babasaheb Ambedkar : Writings And Speeches) याचे पहिले संकलन प्रकाशित झाले. प्रकाशित झालेल्या संग्रहाला ग्रंथालयात किंवा पुस्तकांच्या दुकानात स्थान मिळाले नाही. ग्रंथपाल आणि पुस्तक विक्रेते अशा ठिकाणी पुस्तकांची साठवणूक करत असत, जिथे कोणी पाहू शकत नाही. अशाप्रकारे वाचक आणि विक्री लेखापरीक्षणातून ही पुस्तके कोणीही वाचत नसल्याचा संदेश मिळतो आणि त्या आधारे प्रकाशित खंड परत मागवले जातात आणि पुन्हा प्रकाशित केले जात नाहीत.


सारांश

महापरिनिर्वाणापूर्वी प्रकाशित झालेली डॉक्टर बाबासाहेबांची आद्यचरित्रे आपण जाणून घेतली. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. 

तुमच्या काही सूचना किंवा प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये किंवा ई-मेलद्वारे लिहून आवर्जून कळवावे. धन्यवाद.

टीप : विकिपीडिया संपादक या नात्याने, मी मराठी विकिपीडिया वर ‘बाबासाहेब आंबेडकर’ यांच्या लेखन व पुस्तकांशी संबंधित अनेक लेख लिहिले आहे.


हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *