बौद्ध राजकारण : महाराष्ट्रात 8.5 टक्के बौद्धांची लोकसंख्या, पण मावळत्या विधानसभेत होते फक्त 9 बौद्ध आमदार

महाराष्ट्र राज्यात 8.5 ते 9 टक्के बौद्धांची लोकसंख्या आहे, पण मावळत्या विधानसभेत फक्त 9 बौद्ध आमदार होते. 2024 च्या आगामी विधानसभेत किती बौद्ध आमदार असतील हे निकालानंतर स्पष्ट होईलच! महाराष्ट्रातील बौद्ध राजकारण कसे आहे ते थोडक्यात जाणून घेऊया.

Buddhist Community and Maharashtra Legislative Assembly 2024
महाराष्ट्रातील बौद्ध राजकारण आणि महाराष्ट्र विधानसभा 2024

2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्र राज्यात 8.53 टक्के महार व बौद्ध समाजाची लोकसंख्या आहे. मात्र त्यांना तुलनेने पुरसे प्रतिनिधित्व मिळत नाही. [2019-24 च्या] मावळत्या विधानसभेत 9 आमदार बौद्ध होते. मात्र, लोकसंख्येच्या योग्य प्रमाणानुसार बौद्ध समाजाचे 25 आमदार विधानसभेत असायला हवे.

2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, यंदा वंचित बहुजन आघाडीने सर्वाधिक 94 बौद्ध उमेदवार दिले आहेत. तसेच महायुतीने 9 तर महाविकास आघाडीने 15 बौद्ध उमेदवार दिलेत. (युती-आघाडीच्या बौद्ध उमेदवारांची यादीयेथे‘ पाहा)

महाराष्ट्रातील एकूण 288 पैकी 62 विधानसभा मतदारसंघांमध्ये बौद्ध महार समाजाचा प्रभाव आहे. तर 30 पेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये बौद्ध समाजाचे थेट वर्चस्व असल्याचे दिसून येते.

महायुती आणि महाविकास आघाडीने दिलेल्या एकूण 24 बौद्ध उमेदवारांमध्ये 5 उमेदवार हे थेट एकमेकांविरोधात उभे आहेत‌. त्यामुळे युती-आघाडीचे कमाल 19 बौद्ध उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकरांच्या वंबआने 94 बौद्ध उमेदवार दिले असले तरी त्यापैकी एकही निवडून येण्याची शक्यता खूपच नगण्य आहे.

2011 च्या जनगणनेत महाराष्ट्रात महारांसह बौद्धांची लोकसंख्या 95 लाख 93 हजार 439 होती. आता 13 वर्षांपासून जनगणना झाली नाही. त्यामुळे साधारणतः अर्ध्या टक्क्याची वाढ होऊन 9 टक्क्यांपर्यंत बौद्ध समाज असेल, त्यामुळे 2024 मध्ये 1.10 कोटी (8.5%) ते 1.15 कोटी (9%) बौद्ध लोकसंख्येचा अंदाज आहे. 

2024 मधील लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीने प्रत्येकी दोन बौद्ध उमेदवार दिले होते. 48 पैकी फक्त महाविकास आघाडीचेच दोन्ही बौद्ध खासदार झाले. (महाराष्ट्रातील बौद्ध खासदार यांची यादी ‘येथे‘ पहा) विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मात्र जगन्नाथ अभ्यंकर या बौद्ध नेत्याची विधान परिषदेवर वर्णी लावली.

 

मावळत्या विधानसभेतील बौद्ध आमदार (2019-24)

1. बळवंत वानखेडे (दर्यापूर) – काँग्रेस
2. वर्षा गायकवाड (धारावी) – काँग्रेस
3. नितीन राऊत (नागपूर उत्तर) – काँग्रेस
4. संजय बनसोडे (उदगीर) – राष्ट्रवादी (अ.प.)
5. संजय शिरसाट (औरंगाबाद पश्चिम) – शिवसेना (शिंदे)
6. बालाजी किनीकर (अंबरनाथ) – शिवसेना (शिंदे)
7. अण्णा बनसोडे (पिंपरी) – राष्ट्रवादी (श.प.)
8. मनोहर चंद्रिकापुरे (अर्जुनी-मोरगाव) – राष्ट्रवादी
9. यामिनी जाधव (भायखळा) – शिवसेना (शिंदे)

वरील 9 बौद्ध आमदारांपैकी केवळ यामिनी जाधव या सर्वसाधारण खुल्या मतदारसंघातून निवडून आल्या तर उर्वरित 8 बौद्ध आमदार हे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसघांमधून निवडून आले होते. याच विधानसभेत चांभार समाजाचे 11 आमदार तर मातंग समाजाचे 4 आमदार होते. (बातमी)

याच्या आधीच्या विधानसभेत (2004-09) अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात त्यावेळी 16 आमदार चर्मकार, 9 बौद्ध, 3 मातंग आणि एक खाटीक समाजातून निवडून आले आहेत. (बातमी)

 

महाराष्ट्रातील बौद्ध राजकारण : मावळत्या विधानसभेत, जिचा कार्यकाळ 2019 ते 2024 होता, वरील 9 बौद्ध आमदार होते. 9 आमदार हे विधानसभेच्या एकूण 288 आमदारांच्या फक्त 3 टक्के आहे. तथापि बौद्धांची लोकसंख्या 8.5 टक्के ते 9 टक्के इतकी आहे.

वरील बौद्ध आमदारांपैकी बळवंत वानखेडे, वर्षा गायकवाड आणि मनोहर चंद्रिकापुरे हे तिघे सोडून इतर सर्व आमदार यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उभे आहेत.

बळवंत वानखेडे आणि वर्षा गायकवाड हे दोघे खासदार झाले आहेत, तर मनोहर चंद्रिकापुरे यांनी पक्षांतर करून महायुतीचा घटक पक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पार्टी मध्ये प्रवेश केला आहे. या निवडणुकीत चंद्रिकापुरे यांचा मुलगा सुगत चंद्रिकापुरे हा प्रहार जनशक्ती पार्टीच्या तिकीटावर अर्जुनी-मोरगाव मतदारसंघातून उभा आहे.

मात्र अर्जुनी-मोरगाव मतदारसंघात प्रमुख लढत ही राजकुमार बडोले (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि दिलीप बनसोडे (काँग्रेस) यांच्यात होणार आहे. दुसरीकडे, वर्षा वानखेडे यांच्या धारावी मतदारसंघातून त्यांची बहीण ज्योती गायकवाड उभी आहे.

Mahars and neo-Buddhists have the highest proportion of Dalits
दलितांमध्ये सर्वाधिक प्रमाण महार अन् नवबौद्धांचे – Mahars and neo-Buddhists have the highest proportion of Dalits

एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा बौद्ध-महारांवरील परिणाम

2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील महारांची लोकसंख्या 80 लाख होती. सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय दिला आहे, त्यामुळे आगामी 2025 च्या जनगणनेत महार लोकसंख्या जास्त वाढण्याची शक्यता आहे.

कारण स्वतःला बौद्ध म्हणवणारे लाखो महार लोक  जनगणनेमध्ये आपल्या मूळ महार जातीची नोंद करीत नव्हते. एससी आरक्षणासाठी राज्यातील 59 अनुसूचित जातींची लोकसंख्या विचारात घेतली जाईल त्यामुळे महार जात नोंदवणाऱ्या बौद्धांची लोकसंख्या सुद्धा वाढेल.

2011 मध्ये अनुसूचित जातीमध्ये सुमारे 60.31% महार होते, जे 2025-26 मध्ये एससी लोकसंख्येच्या 65% ते 70% पर्यंत जाऊ शकतात.

लोकसंख्येचे समीकरण : 6,531,200 बौद्ध + 3,062,239 [अबौद्ध] महार = 9,593,439

Neo-Buddhists vs Hindu Dalits population in Maharashtra - महाराष्ट्रातील अनुसूचित जातींचे दोन धार्मिक गट – नवबौद्ध (एससी बौद्ध) आणि हिंदू दलित (एससी हिंदू).
महाराष्ट्रातील अनुसूचित जातींचे दोन धार्मिक गट – नवबौद्ध (एससी बौद्ध) आणि हिंदू दलित (एससी हिंदू). Neo-Buddhists vs Hindu Dalits population in Maharashtra

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तसेच तुमच्या काही सूचना किंवा प्रश्न असतील तर कृपया कॉमेंट बॉक्समध्ये किंवा ई-मेलद्वारे लिहून आवर्जून कळवावे. धन्यवाद.


हे ही वाचलंत का?


धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इंस्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी ई-मेल करु शकता.


मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!