Buddhist Community चे राजकीय प्रतिनिधित्व कमी का? सध्या, राज्यसभा वगळता लोकसभा, महाराष्ट्र विधानसभा आणि विधानपरिषद या तिन्ही सभागृहांत महाराष्ट्रीय बौद्ध समाजाचे प्रतिनिधित्व कमी आहे. या लेखात आपण महाराष्ट्रातील बौद्धांच्या राजकीय प्रतिनिधित्वाविषयी जाणून घेऊया. म्हणजेच महाराष्ट्रात बौद्ध आमदार आणि बौद्ध खासदार यांची संख्या किती आहे आणि ती किती असावी याविषयीची विश्लेषणात्मक माहिती आपण बघणार आहोत.
बौद्ध समाज हा महाराष्ट्रातील एक प्रमुख धार्मिक समूह आहे. राज्यात हिंदू आणि मुस्लिमांनंतर बौद्धांची सर्वाधिक लोकसंख्या आहे. 2024 मध्ये, महाराष्ट्रात बौद्धांची लोकसंख्या 1 कोटी 10 लाख (किंवा 8.5 टक्के) इतकी असावी. या लेखामध्ये जनगणनेच्या अधिकृत आकडेवारीसह आपण महाराष्ट्रातील बौद्धांच्या लोकसंख्येचे प्रमाण आणि महाराष्ट्र विधिमंडळ व भारतीय संसद यांमध्ये बौद्धांचे प्रमाण यामधील फरक समजून घेणार आहोत.
महाराष्ट्रातील बौद्ध समाजाची लोकसंख्या
महाराष्ट्र राज्यातील बौद्धांचे राजकीय प्रतिनिधित्व जाणून घेण्यापूर्वी आपण त्यांची लोकसंख्या विविधांगी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. याशिवाय ‘बौद्ध लोकसंख्या’ आणि ‘महार लोकसंख्या’ यांच्यातील फरक आणि त्यांची एकत्रित जुळवणी सुद्धा समजून घेणे महत्त्वाचे आहे.
महाराष्ट्राच्या लोकसंख्येतील बौद्धांचे प्रमाण : 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील बौद्ध लोकसंख्या 65.31 लाख होती, जी राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 6 टक्के (5.8%) होती. या बौद्ध लोकसंख्येमध्ये 49.44 लाख ‘बौद्ध महारां’चा समावेश होता. या बौद्ध लोकसंख्येत 30.54 लाख ‘हिंदू महार’ समाविष्ट नव्हते.
99 टक्क्यांहून अधिक [हिंदू] महार, ज्यांचा धर्म जनगणनेत ‘हिंदू’ म्हणून नोंदवला गेला, ते स्वतःला ‘बौद्ध’ मानतात, आणि बौद्धधर्माचे पालनही करतात. त्यामुळे ‘सर्व महार आणि बौद्ध’ यांची एकत्रित लोकसंख्या ‘बौद्ध समाज’ म्हणून मानली आहे.
2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात महारांसह बौद्ध समाजाची लोकसंख्या 95.85 लाख (किंवा 8.5 टक्के) आहे. 2024 मध्ये ही बौद्ध लोकसंख्या अंदाजे 1 कोटी 10 लाखांपर्यंत वाढली.
महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमध्ये बौद्धांचे प्रमाण : अनुसूचित जातींच्या लोकसंख्येमध्ये एकट्या महार समाजाचे प्रमाण 60% आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील महार समाजाची लोकसंख्या 80,06,060 होती; त्यांपैकी 49,43,821 बौद्ध महार, 30,54,158 हिंदू महार आणि उर्वरित 8,081 शीख महार होते. महार जातसमूह वगळता उर्वरित 58 अनुसूचित जातींमध्ये 2,60,453 बौद्ध (SC बौद्ध) आढळले. 2011 च्या जनगणनेनुसार, अनुसूचित जातीच्या बौद्धांची संख्या 52,04,284 आहे. याच अनुसूचित जातीतील बौद्धांसाठी सरकार ‘नवबौद्ध’ संज्ञा वापरते.
2011 मधील, 65 लाख बौद्ध (6%) आणि 80 लाख महार (7%) यांची एकत्रित लोकसंख्या 1 कोटी 45 लाख (13%) वाटत असली तरी ती प्रत्यक्षात सुमारे 96 लाख (8.5%) होती.
कारण, 49.44 लाख बौद्ध महारांचा समावेश दोन्ही लोकसंख्येमध्ये झालेला आहे. 2024 मध्ये, हीच 96 लाख बौद्ध लोकसंख्या वाढून 1 कोटी 10 लाख (8.5%) इतकी झाली आहे.
महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचे महार (80.08 लाख) आणि उर्वरित अनुसूचित जातीचे बौद्ध (2.60 लाख) यांची एकत्रित लोकसंख्या 82,66,513 होती. अशाप्रकारे, महाराष्ट्रातील एकूण अनुसूचित जातीच्या लोकसंख्येमध्ये एससी बौद्धांची संख्या 62% (किंवा 82.67 लाख) होती. अर्थात हे आकडे आजचे नसून दहा वर्षांहून अधिक पूर्वीचे (2011चे) आहेत.
लोकसभा आणि विधानसभा यांमध्ये अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या राखीव जागांपैकी 62% जागा एससी बौद्धांसाठी असायला हव्यात.
- बौद्धांना महाराष्ट्रातील एकूण राजकीय जागांवर 8.5 टक्के प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे.
- बौद्धांना महाराष्ट्रातील एकूण अनुसूचित जातीच्या राखीव जागांवर 62 टक्के प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे.
आता आपण बौद्धांना मिळालेले राजकीय प्रतिनिधित्व बघू.
बौद्ध आमदार : महाराष्ट्र विधानमंडळात बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व
विधिमंडळ, विधानसभा आणि विधान परिषद म्हणजे काय?
महाराष्ट्र राज्य विधिमंडळातील बौद्धांचे प्रतिनिधित्व जाणून घेण्यापूर्वी आपण विधिमंडळ म्हणजे काय ते थोडक्यात समजून घेऊया.
राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद यांना एकत्रितपणे ‘राज्य विधिमंडळ‘ म्हटले जाते. राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह हे विधानपरिषद असते तर विधानसभा हे कनिष्ठ सभागृह असते. भारतातील बहुतांश राज्यांमध्ये विधानपरिषद नाही, तेव्हा तेथील विधिमंडळात केवळ राज्यपाल व विधानसभा असतात. तथापि महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषद ही दोन्ही सभागृहे आहेत. विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांना सामान्यपणे ‘आमदार‘ म्हणतात.
इंग्रजीत विधानसभेच्या सदस्यांना ‘मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंबली’ (एमएलए) तर विधान परिषदेच्या सदस्यांना ‘मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह कौन्सिल’ (एमएलसी) म्हणतात. विधानसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा तर विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा असतो. विधानसभेतील आमदार थेट लोकांच्या मतदानाद्वारे निवडले जातात.
महाराष्ट्र विधानसभेत बौद्ध आमदार किती ?
महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 288 जागा (आमदार) असतात. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार, बौद्धांना महाराष्ट्र विधानसभेत 24 ते 25 जागा (8.5%) मिळायला हव्यात. परंतु 2019 च्या विधानसभा निवडणुकीत केवळ 9 बौद्ध आमदार (3.1%) विधानसभेवर निवडून गेले होते. यावरून लक्षात येते की महाराष्ट्राच्या विधानसभेत बौद्धांचे प्रतिनिधित्व फारच कमी आहे.
एससी साठी राखीव असलेल्या विधानसभा मतदारसंघांत बौद्ध प्रतिनिधित्व
महाराष्ट्रातील 288 पैकी 29 विधानसभा मतदारसंघ हे अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. 29 पैकी 19 राखीव मतदारसंघ (65%) हे अनुसूचित जातीच्या बौद्धांसाठी (60% महार + 2% इतर एससी बौद्ध + 3% इतर बौद्ध) असायला पाहिजे, जे अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या 65% आहे. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत फक्त 8 एससी बौद्ध (27.6%) उमेदवार निवडून आले होते. (आणखी एक बौद्ध आमदार खुल्या मतदारसंघातून निवडून आला.)
बौद्ध समाज आणि महार समाज यांच्यात स्पष्ट भेद करणे आवश्यक आहे. स्वतःला हिंदू किंवा ख्रिश्चन म्हणवून घेणारे महार अत्यल्प आहेत. जवळजवळ सर्व महार बौद्ध धर्माच्या अंतर्गत येतात. असे असले तरी सर्वच बौद्ध धर्मीय हे महार नाहीत.
म्हणून, अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या जागांवर सरसकट सर्व (95.85 लाख) बौद्ध लोकसंख्येचा विचार न करता केवळ (82.67 लाख) अनुसूचित जातीच्या बौद्धांचा विचार केला आहे. येथे ‘एससी असलेले बौद्ध’ आणि ‘एससी नसलेले बौद्ध’ यांच्यात स्पष्ट फरक केला आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेत बौद्ध आमदार किती ?
महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण 78 सभासद असतात, त्यापैकी 6 ते 7 आमदार (8.5%) हे बौद्ध असायला हवेत. मात्र सध्या विधान परिषदेत फक्त एकच बौद्ध आमदार आहे. म्हणजेच बौद्ध समाजाला विधान परिषदेत अवघे 1.3 टक्के प्रतिनिधित्व मिळाले आहे. बौद्धांना विधानसभेपेक्षा कमी प्रतिनिधित्व विधान परिषदेत आहे.
महाराष्ट्र विधिमंडळात बौद्ध आमदार किती ?
महाराष्ट्र राज्याची विधानसभा (288) आणि विधानपरिषद (78) या दोन्ही सभागृहात आमदारांची एकत्रित संख्या 366 आहे. त्यामध्ये 31 ते 32 सभासद हे बौद्ध समाजाचे असावेत, पण या दोन्ही सभागृहांत फक्त 10 बौद्ध (2.7%) आमदार आहेत. विधिमंडळात आणखी 22 ते 23 बौद्ध आमदार असायला पाहिजे.
महाराष्ट्र विधिमंडळात (दोन्ही सभागृह) बौद्धांचे प्रतिनिधी फारच कमी आहे. आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आणि बौद्ध मतदारांनी यावर जरूर विचार करायला हवा.
8.5 टक्के लोकसंख्या असणाऱ्या बौद्ध समाजाला महाराष्ट्राच्या विधिमंडळात अवघे 2.7 टक्के प्रतिनिधित्व मिळाले आहे.
बौद्ध खासदार : संसदेत महाराष्ट्रातील बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व
संसद (पार्लमेंट) म्हणजेच केंद्रीय विधिमंडळ होय. राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा या तिघांचे मिळून ‘संसद’ तयार होते. लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सदनांमधील सदस्यांना ‘खासदार’ (संसद सदस्य किंवा मेंबर ऑफ पार्लमेंट) म्हणतात. लोकसभेतील उमेदवार थेट जनतेद्वारे निवडले जातात. भारतातील सर्व राज्यांतून खासदार येतात. मात्र येथे आपण केवळ महाराष्ट्रातील खासदारांचा विचार करूयात.
लोकसभेत बौद्ध खासदार किती ?
लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सदन आहे. लोकसभेतील सदस्यांची संख्या 543 आहे. त्यांपैकी 48 खासदार महाराष्ट्रातून निवडून येतात. 48 पैकी 4 (म्हणजेच 8.5 टक्के) जागांवर बौद्ध खासदार असावेत.
परंतु 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 2 बौद्ध खासदार (4 टक्के) निवडून आले आहेत. याआधी, 2019 च्या निवडणुकीत लोकसभेत तर फक्त 1 बौद्ध खासदार (2 टक्के) निवडून आला होता.
लोकसभेत मराठी बौद्धांना फार कमी प्रतिनिधित्व मिळाले आहे. लोकसंख्येच्या योग्य प्रमाणानुसार, बौद्ध समाजाचे अजून 2 खासदार लोकसभेत असायला हवे होते.
अनुसूचित जातींसाठी राखीव लोकसभा मतदारसंघात बौद्ध प्रतिनिधित्व
2024 मधील स्थिति :
अनुसूचित जातीच्या लोकसंख्येत बौद्धांचे प्रमाण 62 टक्के असल्याचे आपण आधीच जाणून घेतले आहे. महाराष्ट्रात 48 पैकी 5 लोकसभा मतदारसंघ हे अनुसूचित जातींसाठी राखीव असतात. पाच पैकी 3 जागा (60%) ह्या एससी बौद्धांसाठी असाव्यात.
पण 2019 प्रमाणेच 2024 मध्ये देखील, केवळ एक जागा (20 टक्के) एससी बौद्ध उमेदवाराला मिळाली आणि निवडूनही आला. (दुसरा एक बौद्ध उमेदवार खुल्या मतदारसंघातून निवडून आला आहे).
तर अनुसूचित जातीमध्ये साडे 10 टक्के प्रमाण असणाऱ्या चांभार जातसमूहाला 40% प्रतिनिधीत्व अर्थात 2 खासदार मिळाले. (2019 मध्ये चांभार समाजाला राखीव जागेवर 60% प्रतिनिधीत्व (3 खासदार) मिळाले होते.)
2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या रामटेक (श्यामकुमार बर्वे) आणि शिर्डी (भाऊसाहेब वाकचौरे) या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये चांभार समाजाचे खासदार निवडून आले आहेत. सोलापूर (प्रणिती शिंदे) मतदारसंघामध्ये ढोर जातीचा, अमरावती (बळवंत वानखेडे) मतदारसंघामध्ये महार (बौद्ध) समाजाचा तर लातूर (डॉ. शिवाजी काळगे) मतदारसंघामध्ये माला जंगम जातीचा उमेदवार निवडून आला आहे.
अनुसूचित जातीच्या लोकसंख्येत 10.30% प्रमाण असणाऱ्या चांभार समाजाला अनुसूचित जातीच्या राखीव मतदारसंघांमध्ये 40 टक्के प्रतिनिधित्व मिळाले; तर 0.06 टक्के प्रमाण असणाऱ्या माला जंगम जातीला 20 टक्के, 0.88 टक्के प्रमाण असणाऱ्या ढोर जातीला 20 टक्के, आणि 60% प्रमाण असणाऱ्या महार समाजाला अवघे 20% प्रतिनिधित्व मिळाले.
अनुसूचित जातीमध्ये 19 टक्के प्रमाण (25 लाख) असणाऱ्या मांग समाजाचा यंदाही खासदार नाही. महार / बौद्ध समाजावर इतर 58 अनुसूचित जातींचे राजकीय आरक्षण लाटल्याचा जो आरोप केला जातो तो 2024च्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे चुकीचा असल्याचे दिसत आहे.
2024 मध्ये, या पाच राखीव मतदार संघांखेरीज मुंबई उत्तर-मध्य या खुल्या मतदारसंघातून सहावा अनुसूचित जातीचा (वर्षा गायकवाड – बौद्ध) उमेदवार निवडून आला आहे. या आधीही, 2019 मध्ये अनुसूचित जातीचे सहा उमेदवार निवडून आले होते.
2019 मधील स्थिति :
2019 च्या लोकसभा निवडणुकीत, महाराष्ट्रात अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या अमरावती (नवनीत राणा), रामटेक (कृपाल तुमाने) आणि शिर्डी (सदाशिव लोखंडे) या तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये चांभार समाजाचे खासदार निवडून आले होते. सोलापूर (सिद्धेश्वर स्वामी) मतदारसंघामध्ये बेड जंगम जातीचा तर लातूर (सुधाकर शृंगारे) मतदारसंघामध्ये महार (बौद्ध) समाजाचा उमेदवार निवडून आला होता.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत, अनुसूचित जातीच्या लोकसंख्येत 10.30% प्रमाण असणाऱ्या चांभार समाजाला अनुसूचित जातीच्या राखीव मतदारसंघांमध्ये 60 टक्के प्रतिनिधित्व मिळाले होते; तर 0.2 टक्के प्रमाण असणाऱ्या जंगम जातीला 20 टक्के, आणि 60% प्रमाण असणाऱ्या महार समाजाला अवघे 20% प्रतिनिधित्व मिळाले होते. अनुसूचित जातीमध्ये 19 टक्के प्रमाण (25 लाख) असणाऱ्या मांग समाजाचा मात्र एकही खासदार झाला नव्हता. बौद्ध समाजावर इतर अनुसूचित जातींचे राजकीय आरक्षण लाटल्याचा जो आरोप केला जातो तो पूर्णपणे चुकीचा असल्याचे आढळून आले.
2019 मध्ये, पाच राखीव मतदार संघांखेरीज मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघांमध्ये सहावा अनुसूचित जातीचा (राहुल शेवाळे – चांभार) उमेदवार निवडून आला होता. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत अवघे 1.2 टक्के (14 लाख) प्रमाण असणाऱ्या चांभार समाजाचे लोकसभेत तब्बल 4 खासदार (8.3 टक्के) निवडून आले होते. ब्राह्मण समाजाचे सुद्धा चार खासदार निवडून आले होते. या दोन्ही समाजाची लोकसंख्या कमी असून त्यांना मिळालेले राजकीय प्रतिनिधित्व खूप जास्त होते.
राज्यसभेत बौद्ध खासदार किती ?
राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. राज्यसभेतील सदस्यांची संख्या 245 आहे आणि त्यांपैकी 19 खासदार हे महाराष्ट्रातून दिले जातात. 19 पैकी 2 जागांवर (8.5 टक्के) बौद्ध खासदार असायला पाहिजे, आणि सध्या राज्यसभेत 2 बौद्ध खासदार आहेत (पाहा). सद्यस्थितीत, फक्त राज्यसभेत महाराष्ट्रीय बौद्ध समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळालेले असल्याचे दिसत आहे.
- हेही वाचा : ‘हे’ आहेत महाराष्ट्रातील विद्यमान बौद्ध खासदार!
संसदेत एकूण बौद्ध खासदार किती ?
संसदेतील बौद्ध खासदार : भारतीय संसदेत अर्थात लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामधील खासदारांची एकत्रित संख्या 788 आहे. यांमध्ये महाराष्ट्रातील खासदारांची एकूण संख्या 67 आहे. महाराष्ट्रातील 67 पैकी 6 खासदार (8.5%) हे बौद्ध समाजाचे असायला पाहिजे.
पण आता 2024 मध्ये फक्त 4 बौद्ध खासदार (6%) आहेत. अजून 2 बौद्ध खासदार (3%) संसदेत असायला पाहिजे. महाराष्ट्रात 8.5 टक्के लोकसंख्या असणाऱ्या बौद्ध समाजाला भारतीय संसदेत अवघे 6 टक्के प्रतिनिधित्व मिळाले आहे.
तक्ता : बौद्ध समाजाला राजकीय प्रतिनिधित्व
खालील तक्त्याच्या माध्यमातून, भारतीय संसद (राज्यसभा आणि लोकसभा) तसेच महाराष्ट्र विधिमंडळ (विधानपरिषद आणि विधानसभा) यांमध्ये बौद्ध सभासद किती असावेत आणि बौद्ध सभासद किती किती आहेत, याची आकडेवारी दर्शवली आहे.
एकूण सदस्य बौद्ध असावे बौद्ध आहेत संसद 67 06 04 — राज्यसभा 19 02 02 — लोकसभा 48 04 02 —— राखीव 05 03 01 महाराष्ट्र विधिमंडळ 366 32 10 — विधान परिषद 78 07 01 — विधानसभा 288 25 09 —— राखीव 33 20 08
2024 च्या लोकसभा निवडणुकीत अनुसूचित जातीचे तसेच बौद्ध उमेदवार कोणते?
2024 च्या लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि निकालही लागले. महाराष्ट्रातील दोन्ही आघाड्यांनी तसेच वंचितने विविध जाती-धर्मांचे उमेदवार दिले होते. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार दोन्ही आघाड्यांनी प्रत्येकी चार बौद्ध उमेदवार द्यायला हवे होते, पण प्रत्येकी दोन बौद्ध उमेदवार दिले होते.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये देखील बौद्ध उमेदवारांना डावलले गेले असल्याचे दिसले. राखीव मतदारसंघातून महाविकास आघाडीने आणि महायुतीने प्रत्येकी एक बौद्ध उमेदवार दिला होता.
आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांनी उभे केलेले अनुसूचित जातीचे [SC] उमेदवार खालीलप्रमाणे आहेत. या उमेदवारांचा मतदारसंघ, त्यांचा पक्ष, त्यांची अनुसूचित जात व तिचा अनुक्रमांक, आणि शेवटी त्यांचा धर्म नोंदवला आहे.
2024 लोकसभा निवडणूक: महायुतीने दिलेले अनुसूचित जातीचे उमेदवार (सर्व पराभूत) :
- लातूर – सुधाकर शृंगारे [भाजप] (37-महार – बौद्ध)
- सोलापूर – राम सातपुते [भाजप] (11-चांभार – हिंदू)
- अमरावती – नवनीत कौर राणा [भाजप] (11-मोची/शीख चमार – हिंदू/शीख)
- रामटेक – राजू पारवे [शिवसेना] (31- खाटीक – हिंदू)
- शिर्डी – सदाशिव लोखंडे [शिवसेना] (11-चांभार – हिंदू)
- मुंबई दक्षिण मध्य (खुला) – राहुल शेवाळे [शिवसेना] (11-चांभार – हिंदू)
- मुंबई दक्षिण (खुला) – यामिनी यशवंत जाधव [शिवसेना] (37-महार – बौद्ध)
महायुतीमधील भाजपने तीन आणि शिवसेनेने चार असे एकूण सात अनुसूचित जातीचे उमेदवार दिले होते. त्यापैकी एक उमेदवार हा खुल्या मतदारसंघातून (मुंबई दक्षिण) लढला होता. तथापि महायुतीने दिलेले हे सातही एससी उमेदवार 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले.
जातीनिहाय बघायचे झाले तर चार चांभार, एक खाटीक आणि दोन महार बौद्ध असे हे सात अनुसूचित जातीचे उमेदवार होते. महायुतीमध्ये उमेदवारीमध्ये बौद्ध समाजाला राजकीय प्रतिनिधित्व – 4% दिले होते.
2024 लोकसभा निवडणूक : महाविकास आघाडीने दिलेले अनुसूचित जातीचे उमेदवार (सर्व विजयी) :
- लातूर – शिवाजी काळगे [काँग्रेस] (42-माला जंगम – लिंगायत/ हिंदू)
- सोलापूर – प्रणिती शिंदे [काँग्रेस] (18-ढोर – हिंदू)
- अमरावती – बळवंत वानखेडे [काँग्रेस] (37-महार – बौद्ध)
- रामटेक – श्मामकुमार बर्वे [काँग्रेस] (11-चांभार – हिंदू)
- शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे [शिवसेना (उबाठा)] (11-चांभार – हिंदू)
- मुंबई उत्तर मध्य (खुला) – वर्षा गायकवाड [काँग्रेस] (37-महार – बौद्ध)
इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीमधील काँग्रेसने पाच आणि ठाकरेंच्या शिवसेनेने एक असे एकूण सहा अनुसूचित जातीचे उमेदवार दिले होते. दक्षिण उत्तर मध्य या खुल्या मतदारसंघातून एक उमेदवार लढला. आणि शेवटी महाविकास आघाडीचे हे सहाही उमेदवार निवडणुकीमध्ये जिंकले.
महाविकास आघाडीने दोन चांभार, दोन महार – बौद्ध, एक ढोर आणि एक माला जंगम असे हे सहा एससी उमेदवार होते. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा बौद्ध समाजाला राजकीय प्रतिनिधित्व हे 4% मिळाले होते.
2024 लोकसभा निवडणूक : वंचित बहुजन आघाडीने दिलेले अनुसूचित जातीचे उमेदवार (सर्व पराभूत) :
- लातूर – नरसिंहराव उदगीरकर [वंबआ] (46-मांग – हिंदू)
- * सोलापूर – अतिश मोहन बनसोडे [अपक्ष] (37-महार – बौद्ध)
- * अमरावती – आनंदराज आंबेडकर [रिपब्लिकन सेना] (37-महार – बौद्ध)
- शिर्डी – उत्कर्षा रुपवते [वंबआ] (37-महार – बौद्ध)
- अकोला (खुला) – प्रकाश आंबेडकर [वंबआ] (37-महार – बौद्ध)
- रावेर (खुला) – संजय ब्राह्मणे [वंबआ] (37-महार – बौद्ध)
- जळगाव (खुला) – युवराज भीमराव जाधव [वंबआ] (37-महार – बौद्ध)
- वायव्य मुंबई (खुला) – परमेश्वर अशोक रणसूर [वंबआ] (37-महार – बौद्ध)
- उत्तर मुंबई (खुला) – सोनल दिवाकर गोंदणे [वंबआ] (37-महार – बौद्ध)
- उत्तर मध्य मुंबई (खुला) – संतोष गणपत अंबुलगे [वंबआ] (37-महार – बौद्ध)
वंचित बहुजन आघाडीने 8 अनुसूचित जातीचे उमेदवार दिले होते – 7 महार बौद्ध आणि एक मांग. तसेच वंचितने इतर दोन बौद्ध धर्मीय उमेदवारांना (अमरावती, रामटेक व सोलापूर) पाठिंबा दिला होता. शेवटी असे म्हणता येईल की वंचित बहुजन आघाडी ही एकूण 10 अनुसूचित जातीच्या उमेदवारांच्या मागे होती, त्यांपैकी एक मांग आणि 9 महार – बौद्ध होते. वंचित बहुजन आघाडीने बौद्ध समाजाला राजकीय प्रतिनिधित्व 14.6% (पुरस्कृतांसह 20%) दिले.
- * वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलेले उमेदवार (वंचित पुरस्कृत). सोलापूर मतदारसंघातून वंचितच्या राहुल गायकवाड या बौद्ध उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर वंचितने अपक्ष उमेदवार अतिश बनसोडे यास पाठिंबा दिला.
टीप : लातूर, सोलापूर, अमरावती, रामटेक आणि शिर्डी हे महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी (SC) राखीव आहेत. तर नंदुरबार, गडचिरोली-चिमूर, दिंडोरी आणि पालघर हे चार लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी (ST) राखीव आहेत. उर्वरित 39 मतदारसंघ हे खुले किंवा सामान्य आहेत.
- 2024 च्या लोकसभा निवडणुकीविषयी पाहा → 2024 Indian general election in Maharashtra (Wikipedia)
- ‘हे’ आहेत महाराष्ट्रातील विद्यमान बौद्ध खासदार!
- महाराष्ट्रातील विद्यमान बौद्ध आमदार
- भारतातील 30 सर्वात प्रसिद्ध बौद्ध व्यक्ती
- हे आहेत 40 मराठी बौद्ध कलाकार
- भारतातील बौद्ध अभिनेते आणि अभिनेत्रींची यादी
- महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी
- महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची धर्मनिहाय लोकसंख्या
- बौद्ध, महार आणि दलित यांची लोकसंख्या
- सर्व आरक्षण रद्द केले तर काय होईल?
- महाराष्ट्रातील जातीनिहाय लोकसंख्या
- भारतातील बौद्ध लोकसंख्या 1 कोटी की 7 कोटी?
- बौद्ध आरक्षण – बौद्ध धर्म किस कैटेगरी में आता है?
- व्हॉट्सॲपवर धम्म भारत चॅनल फॉलो करा
धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.