डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सारनाथ येथील भाषण (24 नोव्हेंबर 1954)

भगवान बुद्धांनी आपला पहिला उपदेश अडीच हजार वर्षांपूर्वी सारनाथमध्ये दिला होता. 24 नोव्हेंबर 1954 रोजी सारनाथ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्मावर महत्त्वपूर्ण भाषण केले. या लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सारनाथ येथे केलेले संपूर्ण भाषण दिले आहे.

Speech of Dr. Babasaheb Ambedkar at Sarnath
Speech of Dr. Babasaheb Ambedkar at Sarnath – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सारनाथ येथील भाषण (24 नोव्हेंबर 1954)

बोधगया, सारनाथ, लुंबिनी व कुशीनगर ही बौद्ध धर्मामधील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत. सारनाथ हे उत्तर प्रदेश राज्यामधील एक ऐतिहासिक स्थान आहे, जे वाराणसी शहरापासून अवघे 13 किमी अंतरावर गंगा व गोमती नद्यांच्या संगमावर स्थित आहे. सारनाथ येथे भगवान गौतम बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केले होते.

ख्रिस्त पूर्व 528 मध्ये, वयाच्या 35व्या वर्षी, गौतम बुद्धांनी बोधगया येथे संबोधी (आत्मज्ञान) प्राप्त केल्यानंतर त्यांनी सारनाथ या ठिकाणी आपला पहिला धम्म उपदेश दिला. यावेळी त्यांच्या पहिल्या पाच शिष्यांच्या (कौंदिन्य, आशाजी, भडिया, वाप्पा आणि महानमा) ज्ञान ग्रहणातून भिक्खू संघ प्रथम अस्तित्वात आला. येथूनच बौद्ध धर्माचा उदय झाला असे मानता येईल.

बौद्ध धर्माची अधिकृतपणे दीक्षा घेण्याच्या दोन वर्षे आधी, 24 नोव्हेंबर 1954 रोजी सारनाथ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण दिले. या भाषणात त्यांनी बौद्ध धर्माबद्दल आपले विचार मांडले. नोव्हेंबर 1954 हे 2,498वे बौद्ध वर्ष होते.

 

Speech of Dr. Babasaheb Ambedkar at Sarnath on 24 November 1954

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 24 नोव्हेंबर 1954 ला सारनाथ येथे केलेले भाषण खालीलप्रमाणे आहे.

बंधु आणि भगिनींनो,

जनतेने आता गंभीरतेने विचार केला पाहिजे. आमच्या धर्मग्रंथात जे जीवन वर्णन केलेले आहे त्याचे व आम्ही तयार केलेल्या राज्यघटनेत काही साम्य आहे काय? जर साम्य नसेल तर त्याचे कारण काय? आमचा धर्म व राज्यघटना या दोहोंपैकी एक गोष्ट आम्ही स्वीकारली पाहिजे. एक तर धर्माला जिवंत ठेवले पाहिजे किंवा राज्यघटनेलाच जगवले पाहिजे. दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी राहू शकत नाही. दोहोंत मेळ बसू शकत नाही.

हिंदू धर्मात अनेक मते आहेत. त्या सर्वांत शंकराचार्यांचेच मत चांगले समजले जाते. शंकराचार्यांचा ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ (ब्रह्म वास्तविक आहे, ब्रह्मांड मिथ्या आहे) हा सिद्धान्त सर्वात अधिक महत्त्वपूर्ण समजला जातो. परंतु बौद्ध धर्माच्या उच्च सिद्धान्तासमोर तो अगदी तुच्छ व निरर्थक आहे.

नवीन झालेल्या बौद्धांचे आद्य कर्तव्य आहे की, त्यांनी दर रविवारी बौद्ध मंदिरात गेले पाहिजे. असे जर झाले नाही तर नवीन बौद्धांना बौद्धधर्माचा परिचय होणार नाही. यासाठी ठिकठिकाणी बुद्ध मंदिरे निर्माण झाली पाहिजेत. मंदिरात सभा घ्यायला जागा असावी. श्रीलंका, बर्मा (म्यानमार), तिबेट, चीन आदी देशांतील बौद्ध भिक्खुंनी पुढाकार घेऊन पैसा गोळा करावा व हिंदुस्थानातील बौद्ध लोकांना मदत करावी.

आज सकाळी उत्तर प्रदेशचे माजी सभाप्रमुख श्री. द्वारकाप्रसाद मला भेटले होते. त्यांनी मला डिसेंबरमध्ये जोनपूरला येण्याबद्दल आग्रह केला. मी त्यांना येण्याचे आश्वासन दिले, परंतु तारीख अजून ठरलेली नाही. जोनपूरमध्ये विराट सामुदायिक धर्मान्तराच्या कार्यक्रमाची तयारी सुरू झालेली आहे.

याप्रसंगी उत्तर प्रदेशातील पुर्कीय जिल्ह्यातील लाखो मागासलेले लोक दीक्षा घेतील. या मागासलेल्या लोकांचे सवर्ण हिंदूंकडून शोषण आजही सुरू आहे. बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन ते आपल्या पूर्वजांचा मार्ग पुन्हा स्वीकारतील.

14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथील धम्मदीक्षा सोहळ्यामध्ये भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या बाजूला डॉ. सविता आंबेडकर दिसत आहेत.

बौद्ध धर्म हा मानवधर्म आहे.

बौद्ध धर्माचा प्रारंभ पक्क्या पायावर झालेला आहे. हा धर्म मानवधर्म आहे. या धर्माशिवाय मानवाच्या कल्याणाचा दुसरा कोणताही उपयुक्त धर्म नाही. आपण भारताचा प्राचीन इतिहास समजून घेतला पाहिजे. हिंदुस्थानात सर्वात प्रथम आर्य आणि नाग लोकांचे युद्ध जुंपले. आर्यांजवळ युद्धास घोडे होते. त्या बळावर त्यांनी नाग लोकांवर विजय मिळविला. हेच नाग आज हिंदू आहेत.

नागांनी सर्वांत प्रथम बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यांना बौद्ध धर्माचा प्रसार करण्यात सफलता मिळाली, परंतु या नागांचा नायनाट करण्याकरिता आर्यांनी वेळोवेळी प्रयत्न केले. याचे पुरावे महाभारतात अनेक ठिकाणी आढळून येतात. पुढे आर्यांनी ब्राह्मण धर्माला व्यापक बनविले. त्यात अनेक दोष निर्माण झाले.

चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा उदय हा ब्राह्मणांनीच केला. भगवान बुद्धाने चातुर्वर्ण्याला घोर विरोध केला. त्यांनी चातुर्वर्ण्य नष्ट करून समतेचा प्रचार केला व याच आधारावर बौद्ध धर्माची स्थापना केली. भगवान बुद्धाने ब्राह्मणांच्या यज्ञांना अमान्य केले व त्यांना तिलांजली दिली. ब्राह्मणांनी हिंसेची प्रथा सुरू केली होती ती नष्ट करून भगवंताने अहिंसेचा प्रचार केला.

भगवंताने म्हटले आहे की, बौद्ध धर्म महासागराप्रमाणे आहे. यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. भगवान बुद्धाने करुणेचा प्रचार करून त्या काळातील पददलित लोकांची मने आकर्षित केली व त्यांना योग्य मार्ग दाखविला.

अस्पृश्यतेचा कलंक

हिंदू धर्माच्या मुळात रोग झालेला आहे. याच कारणामुळे आम्हाला वेगळा धर्म ग्रहण केला पाहिजे.

माझ्या समजुतीप्रमाणे बौद्धधर्म हाच योग्य धर्म आहे. यात उच्च-नीच, श्रीमंत-गरीब, जाती-पाती आदी भावना नाहीत. अस्पृश्यांचे कल्याण बौद्ध धर्म स्वीकारल्यानेच होण्याची शक्यता आहे. हिंदू समाजात असलेली असमानता, भेदाभेद, अन्याय व कु-प्रथा बौद्ध धर्म स्वीकार केल्याने दूर होऊ शकतात.

भारतातील अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यावर बर्मा, चीन, जपान, लंका आदी सर्व बौद्ध देशांची सहानुभूती आमच्या करुण दशेवर होईल व आम्ही नेहमी करिता हिंदू धर्माच्या जाचातून मुक्त होऊ शकू. वरील देशांनी आमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध का आवाज उठविला नाही याचे कारण म्हणजे त्यांचा समज होता की, हिंदूंचे घरगुती भांडण आहे. जर बौद्ध धर्म स्वीकार केल्यानंतरही हिंदू लोक आम्हाला समता, स्वतंत्रता आणि बंधुत्वापासून दूर ठेवतील तर आम्ही वरील बौद्ध राष्ट्रांच्या सहयोगाने ते मिळविल्याशिवाय राहणार नाही.

हिंदू धर्माच्या कपाळावर अस्पृश्यता हा एक भयंकर कलंक लागला आहे. याचमुळे हिंदू जातीच्या हृदयातील दुष्टता दिसून येते. अस्पृश्य पवित्र व शुद्ध होऊन देवदर्शनासाठी जातात तरी त्यांच्यासाठी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. शिवाशिव, भेदाभेद, जातपात यांना समूळ नष्ट करणे हे सवर्ण हिंदूंचे कर्तव्य आहे. आम्ही त्यांचा मुर्दा आपल्या खांद्यावर का वाहावा ?

आज मी अस्पृश्यांना आवाहन करतो की, त्यांनी अशाच धर्माचा स्वीकार करावा की, ज्या धर्मात मनुष्यमात्रात भेदाभेद नाही, सारखेपणा आहे व मित्रत्त्वाच्या नात्याने ते एकत्र येऊ शकतात. हाच उच्च आदर्श बौद्ध धर्मात आहे.

ज्याप्रमाणे अनेक नद्या समुद्राला येऊन मिळतात व आपले अस्तित्व विसरतात, त्याच प्रमाणे बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर सर्व लोक समान होतात. कोणत्याही प्रकारची विषमता त्यांच्यात राहात नाही. बौद्ध धर्म अस्पृश्यांनाच नव्हे तर अखिल मानवांना देखील कल्याणकारक आहे. सवर्ण हिंदूंनी या धर्माचा अवश्य स्वीकार करावा.

Dr Ambedkar And the Buddha
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध (डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण सारनाथ)

इतर धर्मात सृष्टी निर्माता ईश्वर समजला जातो व जे दोष राहिले त्याबद्दल ईश्वराला जबाबदार पकडले जाते. तशी विचारसरणी बौद्ध धर्मात नाही. बौद्धधर्मात जगात दुःख आहे असे म्हटले आहे. त्या दुःखाचे निरोधन (नाश) होऊ शकते व त्याकरिता कोणते मार्ग आहेत ह्याचा विचार केला आहे. हिंदूधर्मात रुढीवर सारी विचारसरणी आधारित आहे. ही रुढी चातुर्वर्ण्य पद्धतीतून जन्माला आली. बौद्ध धर्मात अनेक भिक्खू व भिक्खुणी झाल्या त्यांच्याबद्दलची माहिती थेरंगाथा व थेरागाथा यांच्यात सापडते.

हिंदूंना न्याय करण्याचा अधिकार होता पण त्यांनी आजवर अस्पृश्यांवर अन्यायच केला आहे. हिंदूंपासून आपण पृथक होऊन भगवान बुद्धाच्या चरणावर नम्र झाले पाहिजे.

मला काठमांडू येथील पशुपतिनाथाच्या मंदिरात जाऊ दिले नाही, असे खोटेच वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्याचे मी ऐकले. मी कोणत्याच हिंदू मंदिरात जात नाही. मला शंभर वेळा प्रार्थना केली असती तरी मी त्या देवळात जाणे शक्य नव्हते.

माझ्या खाजगी सेक्रेटरीला नेपाळच्या महाराजाने आदले दिवशी बोलावून डॉक्टर साहेबास मंदिरात न जाऊ देण्याबद्दलची सूचना केली होती व म्हटले होते की, बौद्धांना हिंदू मंदिरात जाऊ देण्याइतपत आजची परिस्थिती नाही.

नेपाळचे, श्रीलंकेचे व भारतीय भिक्खू हिंदू मंदिरात जात होते. त्यांना मनाई करण्यात आली. जी व्यक्ती देवावर विश्वास करीत नाही, तिने तसे करणे म्हणजे स्वतःच्याच मनाची फसवणूक करणे होय व हिंदूंच्या देवाचा अपमान करणे होय. बौद्धांनी कधीही हिंदूच्या देवळात जाऊ नये. बौद्ध मंदिरात सर्व समान आहेत. कोणाचाही तेथे निषेध करू नये.

जे अस्पृश्य हिंदू धर्मात राहून मंदिर प्रवेश करू इच्छितात त्यांचा नुसता दुराग्रह आहे. त्यांना अन्याय, अपमान व विटंबना करून घ्यायची असेल तर याबाबतीत मला बोलायचे नाही. पण बौद्धांनी या भानगडीत पडू नये.

आपल्या रोजच्या प्रार्थनेत आपण म्हणतो, ‘नत्थिमे सरणं अञ्ञं बुद्धों में सरणं वरं‘ मी बुद्धाशिवाय इतर कोणाला शरण जाणार नाही, असे म्हणणाऱ्यांनी हिंदू मंदिरात जाण्याचा हट्ट का धरावा?

काशी येथील मंदिर प्रवेश हा राजकीय स्टंट आहे. त्यापासून दलितांना कसलाच फायदा व्हावयाचा नाही. म्हणून बौद्ध धर्माचा स्वीकार करूनच बंधुत्वाचा व समतेचा दर्जा प्राप्त करणे एवढेच आपले मुख्य कर्तव्य आहे.


हे ही वाचलंत का?


धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.


‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!