डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दीक्षाभूमीवरील ऐतिहासिक भाषण (15 ऑक्टोबर 1956)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. दुसऱ्या दिवशी 15 ऑक्टोबर रोजी त्यांनी तेथेच लाखो बौद्ध उपासकांसमोर अतिशय उद्बोधक भाषण केले. बाबासाहेबांचे दीक्षाभूमीवरील ते ऐतिहासिक भाषण या लेखामध्ये उपलब्ध करण्यात आले आहे, आवर्जून वाचावे.

Dr. Babasaheb Ambedkar's speech at Diksha Bhoomi  - दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण
Dr. Babasaheb Ambedkar’s speech at Diksha Bhoomi  – दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण

14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे हिंदू धर्माचा त्याग करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली व नंतर उपस्थित 5 लाख अनुयानांना त्यांनी दिक्षा दिली. दुसर्‍या दिवशी 15 ऑक्टोबर 1956 रोजी सकाळी 10 ते 12 पर्यंत त्यांनी बौद्धधम्माचे विवेचन व समाजबांधवांना मार्गदर्शन करणारे अत्यंत उद्बोधक, स्फुर्तिदायक व ओजस्वी भाषण दिले. या घटनेला 65 वर्षे लोटून गेलीत. 

तीन गोष्टींचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केले होते. पहिली गोष्ट – त्यांनी धम्मदीक्षेसाठी नागपूरची निवड केली ती बौद्धधर्म-प्रसारक नाग लोकांची भूमी होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट – त्यांनी धम्मदीक्षेसाठी अशोक विजयादशमीचा दिवस निवडला, ज्या दिवशी सम्राट अशोकाने बौद्ध धम्म स्वीकारला होता. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट – त्यांनी धम्मदीक्षेसाठी 2500वे बौद्धवर्ष निवडले म्हणजे इ.स. 1956 मध्ये 2500वे बौद्धवर्ष (बुद्धाब्ध) सुरु होते. बुद्धांचे निर्वाण होऊन दोन हजार पाचशे वर्षे झाली होती, तसेच हे बुद्धांचे 2580वे जयंतीवर्ष होते.

15 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दीक्षाभूमीवरील ऐतिहासिक भाषण खालीलप्रमाणे आहे.

 

बौद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे.

सर्व बौद्धजनहो आणि उपस्थित पाहुणे मंडळी, काल आणि आज सकाळी जो बौद्ध दीक्षा घेण्याचा व देण्याचा विधी समारंभ या ठिकाणी घडून आला त्याचे स्थान, विचारवंत लोकांना कदाचित अवघड वाटत असेल. त्यांच्या व माझ्याही मताने कालचा समारंभ आज व आजचा समारंभ काल व्हावयास पाहिजे होता.

आपण हे कार्य अंगावर का घेतले, त्याची जरूरी काय व त्याने काय होईल, याची छाननी करून घेणे आवश्यक आहे. ते समजून घेण्यानेच आपल्या कार्याचा पाया मजबूत होईल. हे समजून घेण्याचे कार्य आधी व्हावयास हवे होते.

परंतु काही गोष्टी अशा अनिश्चित असतात की त्या आपोआपच घडत असतात. आता या विधीबाबत व्हावयाचे तसे घडले आहे खरे, तथापि अशी दिवसांची अदलाबदल झाली तरी मोठेसे काही बिघडत नाही. 

पुष्कळसे लोक मला असा प्रश्न करतात की या कार्याकरिता तुम्ही नागपूर हेच शहर का ठरविले? अन्य ठिकाणी हे कार्य का केले नाही? काही लोक असे म्हणतात की आरएसएसची – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी पलटण नागपूर येथे असल्यामुळे त्यांच्या उरावरती म्हणून आम्ही ही सभा शहरात घेतली आहे. हे मुळीच खरे नाही. त्यासाठी नागपूर येथे हे कार्य घेतलेले नाही. आमचे कार्य इतके मोठे आहे की आयुष्यातील एक-एक मिनिट देखील कमी पडतो. आपले नाक खाजवून दुसऱ्याला अपशकुन करण्यासाठी मजजवळ वेळ नाही.

हे ठिकाण निवडण्याचे कारण निराळे आहे. ज्यांनी बौद्ध इतिहासाचे वाचन केले असेल, त्यांना हे कळून येईल की भारतात बौद्धधर्म प्रसार जर कोणी केला असेल तर तो नाग लोकांनी केला. नाग लोक आर्यांचे भयंकर शत्रू होते. आर्य व अनार्य यांच्यामध्ये लढाया व तुंबल युद्धे झाली. 

र्य लोकांनी नागांना जाळून टाकल्याचे दाखले पुराणात सापडतात. अगस्ती मुनीने त्यातून फक्त एक नाग मनुष्य वाचविला. त्याचेच आपण वंशज आहोत. ज्या नाग लोकांना एवढा छळ सोसावा लागला, त्यांना वर येण्यास कोणीतरी महापुरुष हवा होता; त्यांना तो महापुरुष, गौतम बुद्ध भेटला. 

भगवान बुद्धाचा उपदेश नाग लोकांनी सर्व भारतामध्ये पसरविला. असे आपण नाग लोक आहोत. नाग लोकांची मुख्य वस्ती नागपूर येथे व आसपास होती असे दिसते. म्हणून या शहराला ‘नाग-पूर’ म्हणजे नागांचे गाव असे म्हणतात.

येथून सुमारे 27 मैलांवर नागार्जुनाची टेकडी आहे. नजीकच वाहणारी जी नदी आहे, ती नाग नदी आहे. अर्थातच या नदीचे नाव येथे राहणाऱ्या लोकांवरून पडले आहे. नागांच्या वस्तीमध्ये वाहणारी जी नदी ती नाग नदी आहे. हे स्थळ निवडण्याचे हे मुख्य कारण आहे. नागपूर यामुळे निवडले आहे. यामध्ये कोणालाही खिजविण्याचा कोठेच प्रश्न नाही, तशी भावनाही नाही. आरएसएसचे कारण माझ्या मनाला शिवलेही नाही. तसा कोणी त्याचा अर्थ करून घेऊ नये.

इतर कारणांवरून कदाचित विरोध वाटू शकेल. हे ठिकाण विरोधासाठी पसंत केलेले नाही, हे आता मी सांगितलेच आहे. मी हे जे कार्य आरंभले आहे त्यासाठी माझ्यावर अनेक लोकांनी व वृत्तपत्रांनी टीका केलेली आहे. काहींची टीका कडक आहे.

14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथील धम्मदीक्षा सोहळ्यामध्ये भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या बाजूला डॉ. सविता आंबेडकर दिसत आहेत.

त्यांच्या मते मी माझ्या गरीब बिचार्‍या अस्पृश्य लोकांना भलतीकडेच नेत आहे. आज जे अस्पृश्य आहेत ते तसेच अस्पृश्य राहतील व जे हक्क अस्पृश्यांना मिळाले आहेत ते मात्र नष्ट होतील, असे सांगून आमच्यातील काही लोकांना ते बहकवीत आहेत.

आमच्यातील अज्ञ लोकांला ‘पगदंडीने जा’ असे ते म्हणतात. आमच्यातील काही तरुण व वयोवृद्ध लोकांवर कदाचित त्याचा परिणाम होत असेल. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण झाले असतील, तर त्या संशयाची निवृत्ती करणे हे आपले कर्तव्य आहे आणि अशा संशयाची निवृत्ती करणे म्हणजे आपल्या या चळवळीचा पाया मजबूत करणे आहे.

मागे आपण लोकांनी मांस खाऊ नये म्हणून चळवळ केली होती. त्यामुळे स्पृश्य लोकांवर मोठी गदा आल्याप्रमाणे त्यांना वाटत होते. त्यांनी जिवंत म्हशीचे दूध प्यावयाचे आणि ती म्हैस मेल्यानंतर मात्र आम्ही मृत म्हशीला खांद्यावर घेऊन जावयाचे, हा प्रकार विचित्र नव्हे काय? आम्ही त्यांना म्हणतो की तुमची म्हातारी मेली तर तिला आम्हाला का नेऊ देत नाही? त्यांनी मेलेली म्हैस द्यावी, तशी म्हातारीही द्यावी.

त्यावेळी कोणीतरी मनुष्य ‘केसरी’ मधून पत्रव्यवहार करून, अमुक अमुक गावी दर वर्षाला 50 ढोरे मरतात, त्यांच्या कातड्यांची, शिगांची, हाडांची, मांसाची, शेपटीची, खुरांची मिळून 500 रुपयांइतकी किंमत होईल; व मृत मांस सोडल्यामुळे एवढ्या प्राप्तीला हे लोक मुकतील, असा प्रचार त्यावेळी केसरी मधून होत असे. त्यांच्या प्रचाराला उत्तर द्यावयाची आवश्यकता खरे म्हणजे काय होती? पण आमच्या लोकांना असे वाटे, या गोष्टीला आमचा साहेब उत्तर देत नाही, तर साहेब करतो तरी काय?

एकदा मी संगमनेरला सभेला गेलो होतो. सभा झाल्यानंतर संध्याकाळी जेवणाची व्यवस्था केली होती. त्यावेळी मजकडे एक चिठ्ठी केसरीच्या त्या बातमीदाराने पाठविली व मला विचारले, “अहो, तुम्ही तर तुमच्या लोकांना मेलेली ढोरे ओढू नका म्हणून सांगता. त्यांची हलाखी किती आहे? त्यांच्या बायकांना लुगडे चोळी नाही, त्यांना अन्न नाही, त्यांना शेतीवाडी नाही, अशी त्यांची अत्यंत बिकट परिस्थिती असता, दरवर्षी त्यांना मिळणारे कातड्यांचे, शिंगांचे, मांसाचे 500 रुपयांचे उत्पन्न फेकून द्या म्हणून सांगता, यात तुमच्या लोकांचा तोटाच नाही काय?”

मी म्हणालो, तुम्हाला याचे उत्तर कोठे देऊ? ते येथे पडवीत देऊ की सभेत देऊ? लोकांच्या समोरच सवालपट्टी झालेली बरी. मी त्या गृहस्थांना विचारले, तुमचे म्हणणे एवढेच की आणखी काही आहे? ते गृहस्थ म्हणाले, “एवढेच म्हणणे आहे व एवढ्याचेच उत्तर द्या.” मी त्या गृहस्थाला विचारले, “तुम्हाला मुले, माणसे किती आहेत?” त्यांनी सांगितले मला पाच मुलगे आहेत, भावालाही 5/7 मुले आहेत.

मी म्हणालो, “तर तुमचे कुटुंब मोठे आहे. तेव्हा तुम्ही व तुमच्या नातेवाईकांनी त्या गावची मेलेली सर्व ढोरे ओढावीत; आणि 500 रुपयांचे उत्पन्न घ्यावे. हा फायदा तुम्ही अवश्य घ्यावा, शिवाय दरवर्षी मी स्वतः तुम्हाला 500 रुपये वर देण्याची व्यवस्था करतो.

माझ्या लोकांचे काय होईल, त्यांना अन्न-वस्त्र मिळेल की नाही ते माझे मी पाहीन, मग एवढी फायद्याची गोष्ट तुम्ही का सोडून देता? तुम्ही का हे करीत नाही? आम्ही हे काम केले म्हणजे फायदा होतो, आणि तुम्ही केले म्हणजे फायदा नाही? ओढा ना तुम्ही मेलेली ढोरे!”

काल एक ब्राह्मणाचा मुलगा मजकडे येऊन म्हणाला, “पार्लमेंट, असेंबल्यांमध्ये तुमच्या लोकांना राखीव जागा दिल्या आहेत, त्या तुम्ही का सोडता?” मी त्यास म्हणालो, तुम्ही महार व्हा व त्या जागा पार्लमेंट, असेंबल्यांमध्ये भरा. नोकरी खाली असली की त्या जागा भरतात. त्यासाठी कोणा ब्राह्मणांचे, कोणा इतरांचे किती अर्ज येतात! मग नोकऱ्यांच्या जागा भरतात, तशा या राखीव जागा तुम्ही ब्राह्मण लोक महार बनून का भरत नाही?

आमचे नुकसान झाले तर तुम्ही का रडता, असा माझा त्यांना सवाल आहे. खरे म्हणजे मनुष्यमात्राला इज्जत प्यारी असते, लाभ प्यारा नसतो. सद्गुणी व सदाचारी बाईला व्यभिचारामध्ये किती फायदा असतो हे माहीत असते. आमच्या मुंबईत, व्यभिचारी बायांची एक वस्ती आहे.

त्या बाया सकाळी 8 ला उठल्या की न्याहारीसाठी शेजारच्या हॉटेलात वर्दी देतात आणि म्हणतात, (डॉक्टरसाहेबांनी यावेळी आवाजात फरक करून नक्कल करून सांगितले) “सुलेमान, अरे खिम्याची प्लेट व पावरोटी घेऊन ये.” तो सुलेमान ते घेऊन येतो; शिवाय चहा, पाव, केक वगैरेही आणतो. पण माझ्या दलितवर्गीय भगिनींना साधी चटणीभाकरी देखील मिळत नाही; मात्र त्या इज्जतीने राहातात. त्या सदाचारानेच राहातात.

आम्ही झगडतो आहोत ते इज्जतीकरिता! मनुष्यमात्राला पूर्णावस्थेत नेण्याकरिता आम्ही तयारी करीत आहोत, त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आमची तयारी आहे. हे वृत्तपत्राचे लोक (त्यांच्याकडे वळून) माझ्या मागे गेली 40 वर्षे हात धुवून लागले आहेत. माझ्यावर केवढी टीका त्यांनी आजवर केली! मी त्यांना म्हणतो, “अजून तरी विचार करा, आतातरी पोरकटपणाची भाषा सोडून काही प्रौढ भाषा वापरा.”

आम्ही बौद्ध धर्मीय झालो, तरी राजकीय हक्क मी मिळवीन याची मला बालंबाल खात्री आहे. (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष व प्रचंड टाळ्या) मी मेल्यावर काय होईल हे सांगता येणार नाही. या चळवळीसाठी फार मोठे काम करावे लागेल. आम्ही बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे काय होईल, अडचणी आल्याच तर त्या कशा टाळता येतील, त्यासाठी काय युक्तिवाद व खटाटोप करावा लागेल, याचा मी पूर्ण विचार केला आहे.

माझ्या पोतडीत सर्व काही भरलेले आहे. ते काय प्रकाराने भरले आहे ते मला पूर्ण माहीत आहे. हे जे हक्क मिळविले ते मीच माझ्या लोकांच्यासाठी मिळविले. ज्याने हे हक्क मिळविले ते तो पुन्हा मिळवून देईलच! हे हक्क व सवलती मिळवून देणारा मीच आहे; आणि मी पुन्हा या सवलती मिळवून देईल अशी मला खात्री आहे. म्हणून सध्या तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून चालले पाहिजे. विरोधी प्रचारात काही तथ्य नाही, हे मी सिद्ध करून देईन.

मला एका गोष्टीचे मात्र आश्चर्य वाटते. एवढा वादविवाद सर्वत्र होतो आहे, पण एकाही माणसाने ‘मी बौद्ध धर्मच का स्वीकारला’ हा प्रश्न मला विचारला नाही. कोणताही दुसरा धर्म न स्वीकारता हाच धर्म का स्वीकारला, हा कोणत्याही धर्मांतराच्या चळवळीतील मुख्य आणि महत्त्वाचा प्रश्न असतो. धर्मांतर करताना धर्म कोणता व का घ्यावयाचा, हे तावून सुलाखून पाहिले पाहिजे.

आम्ही हिंदू धर्मत्यागाची चळवळ 1935 पासून येवले येथे एक ठराव करून हाती घेतली. “मी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही” अशी प्रतिज्ञा मी मागेच केली होती आणि काल मी ती खरी करून दाखविली. मला इतका आनंद झाला आहे, हर्षवायूच झाला आहे. नरकातून सुटलो असे मला वाटते. मला कोणी अंधभक्त नको आहेत. ज्यांना बौद्ध धर्मात यावयाचे आहे, त्यांनी जाणिवेने आले पाहिजे. त्यांना तो धर्म पटला पाहिजे.

डॉ. आंबेडकर यांची धर्मांतराची घोषणा
डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतराची वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी.

मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला धर्म ही अत्यंत आवश्यक वस्तू आहे. मला माहीत आहे की कार्ल मार्क्सच्या वाचनामुळे एक पंथ निघाला आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे धर्म म्हणजे काहीच नाही. त्यांना धर्माचे महत्त्व नाही. त्यांना सकाळी ब्रेकफास्ट (न्याहारी) मिळाली; त्यात पाव, मलई, लोणी, कोंबडीची टांग वगैरे असली, पोटभर जेवण मिळाले, निवांत झोप मिळाली, सिनेमा पाहावयास मिळाला की सगळे संपले. हे त्यांचे तत्त्वज्ञान! मी त्या मताचा नाही.

माझे वडील गरीब होते, म्हणून मला या प्रकारचे सुख काही मिळालेले नाही. माझ्याइतके कष्टमय जीवन कोणीही आयुष्यात काढलेले नाही. म्हणून माणसाचे जीवन सुखसमाधानाच्या अभावी कसे कष्टमय होते याची मला जाणीव आहे. आर्थिक उन्नतीची चळवळ आवश्यक आहे, हे मी मानतो. त्या चळवळीविरुद्ध मी नाही. माणसाची आर्थिक उन्नती व्हावयास पाहिजेच.

पण मी याबाबत एक महत्त्वाचा फरक करतो. रेडा, बैल व माणूस यांमध्ये फरक आहे. रेडा व बैल यांना रोज वैरण लागते. माणसासही अन्न लागते. मात्र दोहोत फरक आहे की रेडा व बैल यांना मन नाही. मनुष्याला शरीराबरोबर मनही आहे. म्हणून दोन्हीचाही विचार करावयास हवा.

मनाचा विकास झाला पाहिजे. मन सुसंस्कृत झाले पाहिजे. ते सुसंस्कृत बनविले पाहिजे. ज्या देशातील लोक अन्नाशिवाय माणसाचा सुसंस्कृत मनाशी संबंध नाही असे म्हणतात, त्या देशाशी अगर लोकांशी संबंध ठेवण्याचे मला काहीच प्रयोजन नाही. जनतेशी संबंध ठेवताना माणसाचे शरीर जसे निरोगी पाहिजे, तसे शरीर सदृढ होण्याबरोबरच मनही सुसंस्कृत झाले पाहिजे. एरवी मानव जातीचा उत्कर्ष झाला असे म्हणता येणार नाही.

मनुष्याचे शरीर अथवा मन हे रोगी का असते? त्याची कारणे ही की त्यास एकतर शारीरिक पीडा असते किंवा मनात उत्साह नसतो. मनात उत्साह नसेल, तर अभ्युदयही नाही. हा उत्साह का राहात नाही? त्याचे पहिले कारण हे की मनुष्यास अशा रीतीने ठेवण्यात आले आहे की त्याला वर येण्याची संधी मिळत नाही; अगर आशा राहात नाही. त्यावेळी त्यास उत्साह कोठून असणार? तो रोगीच असतो.

ज्या माणसाला आपल्या कृतीचे फळ मिळू शकते, त्यास उत्साह प्राप्त होतो. नाही तर शाळेत शिक्षक असे म्हणू लागला की, कोण रे हा? हा तर महार! आणि हा महारडा पहिल्या वर्गात पास होणार? याला प्रथम श्रेणी कशाला पाहिजे? तू आपला तृतीय श्रेणीतच राहा – पहिल्या वर्गात येणे हे ब्राह्मणाचे काम! अशा व्यवस्थेत त्या मुलाला काय उत्साह मिळणार? त्याची उन्नती ती काय होणार? 

उत्साह निर्माण करण्याचे मूळ मनात आहे, ज्याचे शरीर व मनही धडधाकट असेल, जो हिम्मतबाज असेल, मी कोणत्याही परिस्थितीतून झगडून बाहेर पडेल असा ज्यास विश्वास वाटतो, त्याच्यामध्येच उत्साह निर्माण होतो व त्याचाच उत्कर्ष होतो. हिंदू धर्मात अशी काही विलक्षण तत्त्वप्रणाली ग्रंथीत केलेली आहे की त्यापासून उत्साहच वाटत नाही.

माणसाला निरुत्साही करून टाकणारी परिस्थिती हजारो वर्षे टिकली, तर जास्तीत जास्त कारकुनी करून पोटे भरणारे लोक तयार होतील. या पलीकडे दुसरे काय होणार? या कारकुनांचे रक्षण करावयास मोठा कारकून पाहिजे.

मनुष्याच्या उत्साहाला काही कारण असेल तर मन! तुम्हाला मिलचे मालक माहीत आहेत. ते गिरण्यावर मैनेजर नेमतात व त्यांच्याकरवी मिलमधील काम करवून घेतात. हे मिलचे मालक कसल्या ना कसल्या व्यसनात असतात. त्यांच्या मनाचा सुसंस्कृत असा विकास झालेला नसतो. आपल्या मनाला उत्साह वाटावा म्हणून आपण चळवळ केली, तेव्हा कोठे शिक्षण सुरू झाले.

मी लंगोटी घालून शिक्षणाला सुरुवात केली. शाळेमध्ये मला प्यावयास पाणी सुद्धा मिळाले नाही. पाण्याशिवाय शाळेत मी किती तरी दिवस काढले! मुंबईसारख्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये देखील अशीच परिस्थिती होती. अशी परिस्थिती असेल तर दुसरी काय अवस्था निर्माण होणार? कारकुनीच निर्माण होईल!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध (डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण दीक्षाभूमी)

मी दिल्लीच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये [मजूरमंत्री] असताना लॉर्ड लि‌नलिथगो व्हाईसरॉय होते. मी त्यांना म्हणालो, तुम्ही सर्वसामान्य खर्च तर करताच, पण मुसलमानांकरता अलिगड युनिवर्सिटीस तीन लाख रुपये शिक्षणाकरता खर्च करता. त्याचप्रमाणे बनारसच्या हिंदू विद्यापीठासही तुम्ही तीन लाख रुपये देता. मात्र आम्ही हिंदू नाही की मुसलमान नाही.

आमच्यासाठी काही करावयाचे म्हटले तर त्यांच्या हजारो पटीने जास्त करावयास हवे. निदान आमच्यासाठी मुसलमानांइतके तरी करा. तेव्हा लिनलिथगोने सांगितले, तुम्हाला याबाबत काय लिहून आणावयाचे ते आणा! त्याप्रमाणे मी एक मेमोरँडम लिहिले. ते चोपडे अजून मजजवळ आहे.

यूरोपियन लोक मोठे सहानुभूतीचे होते. त्यांनी माझे मागणे मान्य केले. पण घोडे जे पेंड खाऊ लागले ते, हे पैसे कोणत्या गोष्टीवर खर्च करावयाचे त्यावर! त्यांना वाटत होते, आमच्यातील मुली शिकलेल्या नाहीत, त्यांना शिक्षण द्यावे, त्यांची बोर्डिंग्ज काढावीत व त्यावर ते पैसे खर्च करावेत.

आमच्यातील मुलींना शिकविले व सुशिक्षित केले, तरी त्यांना वेगवेगळ्या पक्वानांचे पदार्थ करावयास घरी सामान कोठे आहे? त्यांच्या शिक्षणाचा शेवटी परिणाम काय? इतर गोष्टींवरील रक्कम सरकारने खर्च केली व शिक्षणावरील अडवून ठेवली.

म्हणून एके दिवशी मी लिनलिथगोकडे गेलो आणि या शिक्षणावरील खर्चाबाबत म्हणालो, तुम्हाला राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारतो. मी एकटा 50 ग्रॅज्युएटच्या समान आहे की नाही? ते त्यांना मान्य करावे लागले. नंतर मी पुन्हा विचारले, याचे कारण काय? ते म्हणाले, ते कारण आम्हास माहीत नाही. मी म्हणालो की माझी विद्वता एवढी मोठी आहे की मी राजवाड्याच्या टोकावर जाऊन बसू शकतो.

मला अशी माणसे हवी आहेत. कारण तेथून सर्वत्र टेहळणी करता येते. आमच्या लोकांचे संरक्षण करावयाचे असेल तर अशी पारध करणारी माणसे निर्माण झाली पाहिजेत. कारकून काय करणार? त्यासरशी लिनलिथगोस माझे म्हणणे पटले व त्या वर्षी 16 विद्यार्थ्यांना विलायतेस उच्च शिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आले.

त्या 16 जणांपैकी काही मडकी जशी कच्ची काही पक्की असतात त्याप्रमाणे काही कच्ची काही पक्की निघाली, ही गोष्ट निराळी! पुढे राजगोपालाचारी यांनी ही उच्च शिक्षणाची योजना रद्द करून टाकली.

या देशात आम्हाला हजारो वर्षे निरुत्साही करून ठेवील, अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या उन्नतीबद्दल उत्साह उत्पन्न होणे शक्य नाही. याबाबतीत या धर्मात राहून आम्ही काहीच करू शकत नाही. मनुस्मृतीमध्ये चातुर्वर्ण्य सांगितले आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्था ही मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला अत्यंत घातक आहे.

मनुस्मृतीत लिहिले आहे की शूद्रांनी फक्त सेवाचाकरी करावी. त्यांना शिक्षण कशाला? ब्राह्मणाने शिक्षण घ्यावे, क्षत्रियाने शस्त्रे धारण करावीत, वैश्याने व्यापार उदीम करावा व शूद्राने चाकरी करावी. ही घड़ी कोण उलगडू शकेल? ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य वर्णाच्या लोकांना काही ना काही फायदा आहे, शूद्रांचे काय? तीन वर्ण सोडले तर इतर जातीत काही उत्साह उत्पन्न होईल काय? चातुर्वर्ण्याची व्यवस्था काही फुकाफुकी नाही; ही रूढी नाही; हा धर्म आहे.

हिंदू धर्मामध्ये समता नाही. गांधींना एकदा मी भेटावयास गेलो असता ते म्हणाले, “मी चातुर्वर्ण्य मानतो.” मी म्हणालो, “तुमच्यासारखे महात्मे चातुर्वर्ण्य मानतात! पण हे चातुर्वर्ण्य कोणते व कसे?” (हाताच्या पंजाची बोटे एकावर एक येतील असा हात करून) हे चातुर्वर्ण्य उलट की सुलट; चातुर्वर्ण्याची सुरुवात कोणीकडून व शेवट कोठे?

गांधींनी या प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि देणार तरी काय? आमचा ज्या लोकांनी नाश केला, त्यांचा देखील या धर्माने नाश होईल! हा मी हिंदू धर्मावर उगीच आरोप करीत नाही. हिंदू धर्मामुळे कोणाचाही उद्धार होऊ शकणार नाही. तो धर्मच नष्टधर्म आहे.

आपला देश परकीयांच्या ताब्यात का गेला? युरोपमध्ये 1945 पर्यंत लढाया चालू होत्या. जेवढे सैन्य मरत असे तेवढे रिक्रुट भरतीमुळे पुढे येत असे. त्यावेळी कोणीही आम्ही लढाई जिंकली असे म्हणू शकले नाही. आमच्या देशाचे सगळे काही निराळे! क्षत्रिय मेले की आम्ही खलास! आम्हाला जर शस्त्रे धारण करण्याचा अधिकार असता, तर हा देश पारतंत्र्यात गेला नसता. मग कोणीही हा देश जिंकू शकले नसते!

हिंदू धर्मामध्ये राहुन कोणाचा काहीही उद्धार होणार नाही. हिंदू धर्मरचनेप्रमाणे वरिष्ठ वर्णांना व जातींना फायदे आहेत हे खरे आहे, पण इतरांचे काय? ब्राह्मण बाई बाळंतीण झाली की तिची नजर हायकोर्ट जज्याची (न्यायाधीश) जागा कोठे रिकामी आहे त्याकडे असते.

आमची झाडूवाली बाई बाळंतीण झाली तर तिची नजर कोठे झाडूवाल्याची जागा रिकामी आहे तिकडे असते. अशी विचित्र रचना हिंदू धर्माच्या वर्णव्यवस्थेने केलेली आहे. यातून सुधारणा ती काय होणार? उत्कर्ष हा फक्त बौद्ध धर्मातच होऊ शकेल.

बौद्ध धर्मात 75 टक्के ब्राह्मण भिक्खू होते. 25 टक्के शूद्रादी होते. परंतु भगवंतांनी सांगितले, “हे भिक्खुंहो, तुम्ही निरनिराळ्या देशांतून व जातींतून आला आहात. आपल्या प्रदेशातून नद्या वाहतात तेव्हा त्या पृथक पृथक असतात, मात्र त्या सागरास मिळाल्या की त्या पृथक राहात नाहीत. त्या एकजीव व समान होतात.

बौद्ध संघ हा सागराप्रमाणे आहे. या संघात सर्व सारखे व समान!” सागरात गेल्यावर हे गंगेचे पाणी किंवा हे महानदीचे पाणी असे ओळखणे अशक्य असते. त्याचप्रमाणे बौद्ध संघात आले म्हणजे आपली जात जाते व सर्वजण समान असतात, अभी समता सांगणारा एकच महापुरुष आहे, आणि तो महापुरुष म्हणजे भगवान बुद्ध होय. (प्रचंड टाळया)

काही लोक असे म्हणतात, तुम्ही धर्मांतर करण्यास इतका अवधी का लावला? इतके दिवस काय करीत होता? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. धर्म पटवून देणे हे काम सोपे नाही. ते एका माणसाचे काम नाही. धर्माबाबत विचार करणाऱ्या कोणत्याही माणसास हे समजून येईल.

माझ्यावर जेवढी जवाबदारी आहे, तेवढी जबाबदारी जगातील कोणत्याही माणसावर नाही. मला अधिक आयुष्य लाभल्यास मी योजलेले कार्य पूर्ण करीन. (‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चिरायू होवोत’च्या घोषणा व निनाद)

महार बौद्ध झाले तर काय होईल, असे काही लोक म्हणतील. असे त्यांनी म्हणू नये, असे माझे त्यांना सांगणे आहे. ते त्यांना धोकादायक होईल. वरिष्ठ व संपत्तीवान वर्गाला धर्माची आवश्यकता वाटणार नाही. त्यांच्यामधील अधिकारावर असलेल्या साहेब लोकांना राहण्यास बंगला आहे, त्यांची सेवा करावयास नोकर-चाकर आहेत, त्यांना धनसंपत्ती आहे, मानमरातब आहे, अशा माणसांना धर्माबदल विचार अगर चिंता करण्याचे कारण नाही.

धर्माची आवश्यकता गरीबांना आहे. पीडित लोकांना धर्माची आवश्यकता आहे. गरीब मनुष्य जगतो तो आशेवर. Hope! जीवनाचे मूळ आशेत आहे. आशाच नष्ट झाली तर जीवन कसे होईल? धर्म आशादायी बनवितो व पीडितांना, गरिबांना संदेश देतो, ‘काही घाबरू नकोस, होईल, जीवन आशादायी होईल.’ म्हणून गरीब व पीडित मनुष्यमात्र धर्माला चिकटून राहतो.

जेव्हा युरोपमध्ये ख्रिस्ती धर्म शिरला त्यावेळी रोमची व आसपासच्या देशांची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. लोकांना पोटभर जेवणही मिळत नव्हते. त्यावेळी गरीब लोकांना खिचडी वाटण्यात येत असे. त्यावेळी ख्रिस्ताचे अनुयायी कोण झाले?

गरीब पीडलेले लोकच झाले. युरोपमधील सर्व गरीब व कनिष्ठ जनता ख्रिस्ती बनली. हा ख्रिश्चन धर्म भीक मागणाऱ्यांचा आहे, असे गिबनने म्हटले होते. ख्रिस्ती धर्म हा युरोपमध्ये सर्वाचा धर्म कसा झाला, याचे उत्तर द्यावयास गिबन आज हयात नाही; नाही तर याचेही उत्तर त्याला द्यावे लागले असते.

काही लोक असे म्हणतील, हा बौद्ध धर्म महारड्या-मांगांचा धर्म आहे. ब्राह्मण लोक भगवंताला ‘भो गौतम’ म्हणजे ‘अरे गौतम’ असे म्हणत असत. ब्राह्मण बुद्धाला असे हिणवीत-चिडवीत असत. पण राम, कृष्ण, शंकर यांच्या मूर्ती परदेशांत विकावयास ठेवाल्या तर किती खपतील ते पाहावे.

पण बुद्धाची मूर्ती ठेवली तर एकही मूर्ती शिल्लक राहणार नाही. (टाळ्यांचा कडकडाट) जाता घरातल्या घरात (भारतात) हे पुष्कळ झालं, बाहेर काही दाखवा; जगात नाव जाहीर आहे ते फक्त बुद्धाचेच! तेव्हा ह्या धर्माचा प्रसार झाल्याशिवाय कसा राहील?

आमच्या वाटेने आम्ही जाऊ; तुमच्या वाटेने तुम्ही जावे. आम्हाला नवीन वाट मिळाली आहे. हा आशेचा दिवस आहे. हा अभ्युदयाचा, उत्कर्षाचा मार्ग आहे. हा मार्ग काही नवीन नाही. हा मार्ग कोठून आणलेला नाही. हा मार्ग येथलाच आहे, भारतातीलच आहे.

या देशामध्ये 2000 वर्षे बौद्ध धर्म होता. खरे म्हणजे, या पूर्वीच आम्ही बौद्ध धर्मात का गेलो नाही, याचीच आम्हाला खंत वाटते. भगवान बुद्धाने सांगितलेली तत्त्वे अजरामर आहेत. पण बुद्धाने मात्र तसा दावा केलेला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.

बौद्ध धर्माचा नाश झाला याचे मुख्य कारण मुसलमानांच्या स्वाऱ्या हे होय. मुसलमानांनी स्वाऱ्यांमध्ये [बुद्ध] मूर्ती फोडून टाकल्या. बौद्ध धर्मावर यामुळे पहिले आक्रमण झाले. त्यांच्या स्वाऱ्यांना भिऊन बौद्ध भिक्खू नाहीसे झाले. कोणी तिबेटला गेले; कोणी चीनला गेले; कोणी कोठे गेले!

धर्माचे संरक्षण करण्यासाठी उपासक लोक हवे असतात. वायव्य सरहद्द प्रांतात एक ग्रीक राजा होता. त्याचे नाव मिलिंद. हा राजा सदोदित वादविवाद करीत असे. वादविवादाची त्यास मोठी आवड होती. तो हिंदूंना सांगे, जो कोणी वादविवादपटू असेल, त्याने येऊन वादविवाद करावा. त्याने पुष्कळांना निरुत्तर केले होते.

एकदा त्याला बौद्ध लोकांबरोबर वादविवाद करावा असे वाटले व वादविवादपटू कोणी बौद्ध असल्यास त्यास घेऊन यावे, असे त्याने सांगितले. तेव्हा बौद्ध लोकांनी नागसेनास विनंती केली की तुम्ही या वादविवादात बौद्धजनांची बाजू मांडावी.

नागसेन विद्वान होता. तो पूर्वीचा ब्राह्मण होता. नागसेनाचा व मिलिंदचा जो वादविवाद झाला तो पुस्तक रुपाने जगाला माहीत आहे. त्या पुस्तकाचे नाव ‘मिलिंद पन्ह’ (मिलिंद प्रश्न) आहे. मिलिंदाने असा प्रश्न विचारला की धर्मास ग्लानी का येते?

नागसेनाने उत्तर देऊन त्याची तीन कारणे सांगितली. पहिले कारण हे की एखादा धर्मच कच्चा असतो. त्या धर्माच्या मूळ तत्त्वात गांभीर्य नसते. तो कालिक धर्म बनतो व काळापुरता असा धर्म टिकतो.

दुसरे कारण हे की धर्मप्रचार करणारे विद्वान लोक नसतील धर्मग्लानी होते. ज्ञानी माणसांनी धर्म-ज्ञान सांगितले पाहिजे. विरोधकांशी वादविवाद करण्यास धर्माचे प्रचारक सिद्ध नसतील, तर धर्माला ग्लानी येते.

आणि तिसरे कारण हे की धर्म व धर्माची तत्त्वे विद्वानांसाठी असतात. प्राकृत व सामान्य लोकांकरिता मंदिरे-देवळे असतात. ते तेथे जाऊन आपल्या श्रेष्ठ विभूतीचे पूजन करतात.

आपण बौद्ध धर्म स्वीकारताना ही कारणे लक्षात ठेवली पाहिजेत. बौद्ध धर्माची तत्त्वे कालिक, काही कालापुरती आहेत असे कोणासही म्हणता यावयाचे नाही. आज दोन हजार पाचशे वर्षांनंतरही बुद्धाची सारी तत्त्वे सर्व जग मानते. अमेरिकेमध्ये बुद्धाच्या दोन हजार संस्था आहेत. इंग्लंडमध्ये तीन लाख रुपये खर्च करून बौद्ध मंदिर बांधण्यात आले आहे. जर्मनीतही तीन-चार हजार बौद्ध संस्था आहेत.

बुद्धाची तत्त्वे अजरामर आहेत. तथापि बुद्धाने असा दावा केला नाही की हा धर्म ईश्वराचा आहे. बुद्धाने सांगितले, माझे वडील प्राकृत होते, माझी आई प्राकृत होती. हा धर्म तुम्हाला वाटेल तर घ्यावा. हा धर्म जेव्हा तुमच्या बुद्धीला पटेल तेव्हा तो तुम्ही स्वीकारा. एवढी उदारता दुसऱ्या कोणाच्याही धर्मात सांगितलेली नाही.

बौद्ध धर्माचा मूळ पाया काय आहे? इतर धर्मांत व बौद्ध धर्मात फार फरक आहे. इतर धर्मात बदल हा घडवून यावयाचा नाही, कारण मनुष्य व ईश्वर यांचा संबंध से धर्म सांगतात. इतर धर्मांचे म्हणणे असे की ईश्वराने सृष्टी निर्माण केली. ईश्वराने आकाश, वायू, चंद्र, सूर्य सर्व काही निर्माण केले. आम्हाला ईश्वराने काहीही करावयाचे शिल्लक ठेवले नाही, म्हणून ईश्वरास भजावे!

ख्रिस्ती धर्माप्रमाणे तर मृत्यूनंतर एक निर्णयाचा दिवस Day of Judgement असतो व त्या निर्णयाप्रमाणे सर्व काही घडते. देव व आत्मा यांना बौद्ध धर्मात जागा नाही. भगवान बुद्धाने सांगितले, जगात सर्वत्र दुःख आहे; 90 टक्के माणसे दुःखाने पिडलेली आहेत.

त्या दुःखातून पिडलेल्या, गरीब माणसांना मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य आहे. बुद्धापेक्षा कार्ल मार्क्सने वेगळे काय सांगितले? भगवंताने जे सांगितले ते वेड्यावाकड्या मार्गाने सांगितले नाही.

नेपाळमध्ये डॉ. आंबेडकरांनी 'बुद्ध आणि कार्ल मार्क्स' हे प्रसिद्ध करताना
नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये चौथी ‘बौद्ध भ्रातृ संघ’ परिषदेत डॉ. आंबेडकर ‘बुद्ध आणि कार्ल मार्क्स’ या विषयावर भाषण करताना. त्यादरम्यान त्यांच्या बाजूला नेपाळचे राजे महेंद्र आणि महस्थवीर चंद्रमणी हे उपस्थित होते.

बंधुनों, मला सांगावयाचे होते ते सांगितले. हा धर्म सर्वतोपरी परिपूर्ण आहे. त्यास लांछन कोठेच नाही. हिंदू धर्माची अशी काही तत्त्वप्रणाली आहे की त्यामधून उत्साहच निर्माण होऊ शकत नाही. हजारो वर्षांपासून परवापर्यंत आपल्या समाजामधून एकही मनुष्य ग्रॅज्युएट अगर विद्वान होऊ शकला नाही.

मला सांगावयास हरकत नाही की माझ्या शाळेत झाडलोट करणारी एक बाई होती. ती मराठा होती. ती मला शिवत नसे. माझी आई मला सांगत असे की मोठ्या माणसांना मामा म्हणत जा. पोस्टमनला मी मामा म्हणत असे. (प्रचंड हशा) लहानपणी शाळेत असताना मला तहान लागली होती. मी मास्तरांना तसे सांगितले. मास्तरांनी माझ्या संरक्षणाकरिता चपराशाला दुसरीकडून बोलविले व ‘याला नळावर ने’ असे सांगितले.

आम्ही नळावर गेलो. चपराशाने मग नळ सुरू केला व मी पाणी प्यालो. [इतर विद्यार्थ्यांप्रमाणे] मला शाळेत पाणी प्यावयास मिळत नसे. पुढे मला डिस्ट्रिक जज्जाची (जिल्हा न्यायाधीश) नोकरी देऊ केली होती, पण ती घोरपड मी गळ्यात बांधून घेतली नाही. माझ्या बांधवांचे कार्य मग कोण करील, असे माझ्यापुढे कोडे होते. म्हणून मी नोकरीच्या बंधनात अडकलो नाही.

मला वैयक्तिकरित्या या देशातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही. (टाळ्या) तुमच्या डोक्यावर वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण अशी जी उतरंड रचली आहे, ती कशी उलटेल व मोडेल हा खरा प्रश्न आहे. म्हणून या धर्माचे ज्ञान सर्वप्रकारे तुम्हाला करून देणे हे माझे कर्तव्य आहे. मी पुस्तके लिहून तुमच्या शंकाकुशंका दूर करीन व ज्ञानाच्या पूर्णावस्थेला तुम्हास नेण्याचे सर्व प्रयत्न करीन. आज तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून वागले पाहिजे.

मात्र तुमचीही जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मानसन्मान वाटेल अशी कृती तुम्ही केली पाहिजे. हा धर्म म्हणजे आपण गळ्यात एक मडके अडकवून घेत आहोत असे मानू नका. बौद्ध धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शून्यवत आहे. म्हणून आपण उत्तम रीतीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे.

नाही तर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीस आणला असे होऊ नये म्हणून आपण दृढनिश्चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेच नव्हे तर जगाचाही उद्धार करू. कारण बौद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे. जगात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांतता राहणार नाही.

हा नवा मार्ग जबाबदारीचा आहे. आपण काही संकल्प केला आहे, काही इच्छिलेले आहे, हे तरूणांनी लक्षात घ्यावे. त्यांनी केवळ पोटाचे पाईक बनू नये. आपल्या प्राप्तीचा निदान 20वा हिस्सा या कामी देईन, असा निश्चय करावा.

मला सर्वांना बरोबर न्यावयाचे आहे. प्रथम तथागताने काही व्यक्तींना दीक्षा दिली व त्यांना ‘या धर्माचा प्रचार करा’ असा आदेश दिला. त्याप्रमाणे पुढे यश व त्याच्या 40 मित्रांनी बौद्ध दीक्षा घेतली.

यश हा श्रीमंत घराण्यातील होता. त्यांना भगवंताने सांगितले, हा धर्म कसा आहे? तर ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय, लोकानुकंपाय, धम्म आदि कल्याणं, मध्य कल्याणं, पर्यावसान कल्याणं’ त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे तथागताने आपल्या धर्माच्या प्रचाराचा मार्ग तयार केला.

आता आपणालाही यंत्रणा तयार करावी लागेल म्हणून समारंभानंतर दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी. दरेक बौद्ध माणसाला दीक्षा देण्याचा अधिकार आहे, असे मी जाहीर करतो. (टाळ्या)

 

(अशा प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले दोन तासांचे भाषण संपवले.)


संदर्भ : प्रबुद्ध भारत – आंबेडकर बौद्ध दीक्षा विशेषांक : 27 ऑक्टोबर1956


हे ही वाचलंत का?


धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.


‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!