आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे चालवण्यासाठी तसेच महामानवांचा गौरव करण्यासाठी त्यांचे भव्य पुतळे उभारले जात असतात. भारतामध्येही आपला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी असंख्य पुतळे उभारण्यात आलेले आहेत. आज आपण भारतातील सर्वात उंच पुतळे कोणकोणती आहेत ते जाणून घेणार आहोत.
भारताला ‘पुतळ्यांचा देश’ म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. कारण या देशात लहान मोठ्या सर्व प्रकारच्या पुतळ्यांचा विचार केला तर त्यांची संख्या हजारोंमध्ये नव्हे तर लाखोंमध्ये असेल.
सर्वाधिक उंचीच्या पुतळ्यांची यादी तयार करताना अर्थात पुतळ्यांना रँकिंग नुसार क्रमबद्ध करताना एकतर मुख्य पुतळ्याची उंची गृहीत धरली जाते किंवा चबुतऱ्यासह पुतळ्याची उंची मोजली जाते. सर्व पुतळ्यांसाठी या दोन्हींपैकी कोणतातरी एकच निकष लागू करावा लागतो. या लेखामध्ये चबुतऱ्यासह पुतळ्याची उंची गृहीत धरून भारतातील सर्वाधिक उंचीच्या 10 पुतळ्यांना क्रमबद्ध केले आहे.
भारतातील या सर्वात उंच पुतळ्यांपैकी दोन पुतळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेही आहेत. या दोन्ही मूर्तींची रँक जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. चला तर जाणून घेऊया भारतातील सर्वात उंच 10 पुतळ्यांबद्दल….
भारतातील 10 सर्वात उंच पुतळे
10. हनुमान पुतळा, आंध्र प्रदेश (135 फूट)
परिताळा अंजनेय मंदिर हे भगवान हनुमानाची भव्य मूर्ती असलेले मंदिर आहे. भगवान हनुमानाला समर्पित भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच अशी या मूर्तीची ख्याती आहे. तसेच हा भारतातील सर्वात उंच पुतळ्यामध्ये हा दहाव्या क्रमांकावर आहे.
हा पुतळा आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा शहरापासून अंदाजे 30 किमी अंतरावर NH-65 वरील परिताळा गावात आहे. हा पुतळा 2003 मध्ये स्थापित करण्यात आला होता आणि तो 135 फूट (41 मीटर) उंच आहे. सुमारे दहा फुटांच्या मंदिर रुपी चबुतऱ्यावर 125 फूट हनुमानाचा पुतळा उभा आहे.
9. वैष्णोदेवी मूर्ती, उत्तर प्रदेश (141 फूट)
उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे वैष्णोदेवीची भव्य मूर्ती बसवण्यात आली आहे, जिची एकूण उंची 141 फूट (43 मीटर) आहे. वैष्णोदेवीचा हा पुतळा भारतातील सर्वात उंच पुतळ्यांमध्ये 9 व्या क्रमांकावर आहे.
मूर्तीमध्ये वैष्णोदेवी ही सिंहावर बसलेल्या अवस्थेत दाखवण्यात आली आहे तसेच तिच्यासमोर हनुमान सुद्धा प्रणाम करताना चितारण्यात आला आहे. वैष्णोदेवीने तिच्या आठ हातात आठ वेगवेगळ्या शस्त्रे वा वस्तू धारण केल्या आहेत, ज्या म्हणजे गदा, शंख, धनुष, तलवार, त्रिशूल, चक्र आणि कमळ.
वैष्णोदेवीची मूर्ती ही जमिनीपासून 141 फूट उंच आहे. जमिनीपासून सिंहाची उंची अंदाजे 35′-6″ फूट आहे. हनुमानाची मूर्ती 32 फूट उंच आहे आणि त्याचा गदा 26 फूट लांब आहे. केवळ माँ वैष्णोदेवीची उंची सुमारे 102 फूट आहे.
8. मुरुगन पुतळा, तमिळनाडू (146 फूट)
एप्रिल 2022 मध्ये तामिळनाडूतील सेलम जिल्ह्यातील पुथिरागौंडमपलायम (Puthiragoundanpalayam) येथे जगातील सर्वात उंच भगवान मुरुगन (कार्तिकेय) यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या मूर्तीची उंची 146 फूट असून ती भक्तांसाठी कुंभाभिषेक करण्यासाठी खुली करण्यात आली होती.
पुथिरागौंदनपालयम येथील श्री मुथुमलाई मुरुगन ट्रस्टने बांधलेला हा पुतळा मलेशियातील पाथुमलाई मुरुगन पुतळ्यापेक्षा उंच आहे, ज्याची उंची 140 फूट आहे.
वरवर पाहता, मलेशियाच्या मुरुगन पुतळ्याने सालेममधील पुतळ्याच्या निर्मितीला प्रेरणा दिली. श्री मुथुमलाई मुरुगन ट्रस्टचे अध्यक्ष एन श्रीधर यांना त्यांच्या मूळ गावी अत्तूरमध्ये मुरुगनचा सर्वात उंच पुतळा बनवायचा होता.
अहवालानुसार, श्रीधरने विचार केला की प्रत्येकजण मलेशियाला जाऊ शकत नाही आणि तेथे देवतेची पूजा करू शकत नाही म्हणून त्याने सालेम जिल्ह्यात एक आणले पाहिजे. नंतर 2014 मध्ये, श्रीधर, जो एक व्यापारी देखील आहे, त्याने त्याच्या जमिनीवर मंदिर आणि मुथुमलाई मुरुगन पुतळा बांधण्याचा निर्णय घेतला.
श्रीधर यांनी मूर्तिकार तिरुवरुर थियागराजन यांना पुतळा बांधण्यासाठी नियुक्त केले. विशेष म्हणजे तोच शिल्पकार होता ज्याने 2006 मध्ये मलेशियामध्ये मुरुगनचा पुतळा बांधला होता. श्रीधर यांना या पुतळ्याच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी सुमारे दोन वर्षे लागली.
7. पंचमुखी हनुमान पुतळा, कर्नाटक (161 फूट)
कर्नाटकातील, बिडनागेरे येथे 161 फूट उंच पंचमुखी अंजनेय स्वामी (हनुमान) पुतळा उभा आहे. हा भारतातील सातवा सर्वात उंच पुतळा आहे.
रामनवमीच्या प्रसंगी, 10 एप्रिल 2022 रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बिडनागेरे बसवेश्वरा मठातील 161 फूट उंच हनुमानाच्या मूर्तीचे अनावरण केले.
हा पुतळा भारतातील दुसरा सर्वात उंच हनुमानाचा पुतळा आहे. दहा हात असलेला आणि पाच मुख (तोंडे) असलेला हा पंचमुखी हनुमानाचा पुतळा आहे.
भारतातील 5 सर्वात उंच पुतळे
6. हनुमान पुतळा, आंध्र प्रदेश (171 फूट)
हा हनुमानाचा पुतळा आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील मदापम येथे वंशधारा नदीच्या काठावर आहे. ही भारतातील सर्वात उंच हनुमानाची मूर्ती असून तिची उंची 52 मीटर (171 फूट) आहे.
या मूर्तीच्या बांधकामासाठी अंदाजे 1 कोटी भारतीय रुपये खर्च आला. ही मूर्ती हनुमानाच्या सध्याच्या जगातील सर्वात उंच पुतळ्यांमध्ये पहिली आहे.
5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, तेलंगणा (175 फूट)
तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील दुसरा सर्वात उंच पुतळा उभारण्यात आला आहे.
बाबासाहेबांच्या मुख्य पुतळ्याची उंची 125 फूट (38.1 मीटर) आहे. चौथऱ्याची उंची 50 फूट (15.24 मीटर) आहे. चौथऱ्यासकट पुतळ्याची उंची 175 फूट (53.34 मीटर) इतकी आहे. हा भारतातील पाचवा सर्वात उंच पुतळा आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीदिनी 14 एप्रिल 2023 रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी 175 फूट उंच बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण केले.
पुतळा बांधण्यासाठी अंदाजे ₹146.5 कोटी खर्च आला होता. हे संपूर्ण स्मारक 11 एकरांवर पसरलेले आहे. 2017 मध्ये, तेलंगणा सरकारने राज्यघटनेच्या शिल्पकाराचा 125 फूट उंच पुतळा राज्यात बसवण्याचा निर्णय घेतला होता.
4. स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टीस, आंध्र प्रदेश (206 फूट)
आंध्रप्रदेश राज्यातील विजयवाडा शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 206 फूट उंचीचा विशाल पुतळा उभारण्यात आला आहे. स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टीस अर्थात सामाजिक न्यायाचा पुतळा असे या पुतळ्याचे नाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. हा भारतातील चौथा सर्वात उंच पुतळा, आणि भारतातील दुसरा सर्वात उंच उभा पुतळा आहे. विजयवाडा येथील डॉ. बी.आर. आंबेडकर स्वराज्य मैदानावरील ‘डॉ. बी.आर. आंबेडकर स्मृतिवनम’ (डॉ. बी.आर. आंबेडकर स्मारक) मध्ये हा पुतळा उभा आहे.
बाबासाहेबांच्या मुख्य पुतळ्याची उंची 125 फूट (38.1 मीटर) आहे. चौथऱ्याची उंची 81 फूट (24.69 मीटर) आहे. चौथऱ्यासकट पुतळ्याची उंची 206 फूट (62.79 मीटर) इतकी आहे. पुतळा बांधण्यासाठी अंदाजे ₹400 कोटी खर्च येणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प 20 एकरांवर पसरलेला आहे. हा पुतळा हैदराबादमध्ये बांधण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्यापेक्षा 31 फूट उंच आहे.
राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी 9 जुलै 2020 रोजी बाबासाहेबांचा 125 फूट उंच पुतळा आणि स्मारकाचे भूमिपूजन केले होते. त्यांच्याच हस्ते 19 जानेवारी 2024 रोजी या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
- अधिक माहिती : आंध्र प्रदेशातील डॉ. आंबेडकरांचा 206 फूट उंच पुतळा
3. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, तेलंगणा (216 फूट)
स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी (समता मूर्ती) हा 11व्या शतकातील भारतीय तत्त्वज्ञ व भक्ती संत रामानुजाचार्य यांचा पुतळा आहे, जो हैदराबादच्या बाहेरील भागात रंगा रेड्डी जिल्ह्यातील मुचिंतल येथे आहे. रामानुजाचार्य (1017 – 1137) ध्यान करत बसले आहेत, अशा स्थितीमधील हा पुतळा आहे. हा भारतातील दुसरा सर्वात उंच बसलेल्या स्थितीतील पुतळा आहे.
रामानुज यांच्या मुख्य पुतळ्याची उंची 108 फूट (32.9 मीटर) आहे. त्यातील त्रिदंड (वैष्णव पीठाधिपती सर्वसाधारणतः असा दंड धारण करतात) 135 फुटांचा आहे. चौथऱ्याची उंची 54 फूट आहे. पद्मपीठाची उंची 27 फूट आहे. तळातील चौथऱ्यासकट पुतळ्याची उंची 216 फूट (65.8 मीटर) इतकी आहे. रामानुजाचार्य यांचा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी भारतातील तिसरा सर्वात उंच पुतळा आहे.
चौथऱ्यावर 54 कमळाच्या पाकळ्या आहेत, त्यावर 36 हत्तींची शिल्पं आहेत. कमळावर 18 चक्रं आहेत. पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी 108 पायऱ्या आहेत. विविध द्रविडी साम्राज्यांच्या शिल्परूपी खुणा या पुतळ्यावर पाहायला मिळतात.
5 फेब्रुवारीला 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 216 फूट उंच ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ या पुतळ्याचे अनावरण केले. पुतळा बांधण्याचा प्रकल्प ट्रस्टने रामानुजांच्या 1,000 वर्षांच्या जयंती स्मरणार्थ संकल्पित केला होता, ज्याचा अंदाजे ₹1,000 कोटी खर्च आला होता. हा संपूर्ण प्रकल्प 45 एकरांवर पसरलेला आहे.
2. विश्वास स्वरुपम, राजस्थान (369 फूट)
स्टॅच्यू ऑफ बिलिफ किंवा विश्वास स्वरूपम ही भारतातील राजस्थानमधील नाथद्वारा येथे उभारलेली महादेवाची मूर्ती आहे. केवळ पुतळ्याची उंची 348 फूट (106 मीटर) उंच आहे. चबुतर्यासह हा पुतळा एकूण 369 फूट (112 मीटर) उंच आहे; चबुतरा 110 फूट (34 मीटर) उंच आहे.
हा महादेवाचा जगातील सर्वात उंच पुतळा आहे, तसेच बसलेल्या स्थितीतील हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच पुतळा आहे, आणि जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात उंच पुतळा आहे.
29 ऑक्टोबर 2022 रोजी पुतळा लोकांसाठी खुला करण्यात आला. या पुतळ्याची उभारण्याची कल्पना 2011 मध्ये आली होते, 2016 मध्ये त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि 2020 मध्ये पूर्ण झाले.
1. स्टॅच्यू ऑफ युनिटी, गुजरात (790 फूट)
स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात एकतेचा पुतळा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे, जो गुजरात राज्यातील केवडियाजवळ उभारण्यात आला आहे. वल्लभभाई पटेल (1875-1950) यांचा हा पुतळा आहे, जे स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रणी नेते होते.
भारतातील सर्वात उंच मूर्ती कोणती – स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्याची एकूण उंची 240 मीटर (790 फूट) आहे, ज्याचा पाया 58 मीटर (190 फूट) आहे आणि पुतळा 182 मीटर (597 फूट) आहे.
2010 मध्ये या पुतळ्याच्या प्रकल्पाची पहिल्यांदा घोषणा करण्यात आली आणि ऑक्टोबर 2013 मध्ये त्याचे बांधकाम सुरू केले. शिल्पकार राम व्ही. सुतार यांनी हा पुतळा तयार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 31 ऑक्टोबर 2018 रोजी सरदार पटेल यांच्या 143 व्या जयंतीदिनी पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
विशेष माहिती :
भारतातील 10 सर्वात उंच पुतळ्यांमध्ये 6 पुतळे हे पौराणिक व्यक्तींचे आहेत तर 4 पुतळे हे ऐतिहासिक व्यक्तींचे आहेत. या यादीतील पुतळ्यांमध्ये हनुमानाचे तीन पुतळे, बाबासाहेब आंबेडकरांचे दोन पुतळे, आणि इतर 5 जणांचा प्रत्येकी एक पुतळा आहे.
या दहा सर्वात उंच पुतळ्यांमध्ये प्रत्येकी एक पुतळा हा गुजरात, राजस्थान, कर्नाटक, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमध्ये आहे. तर तेलंगणा (2) आणि आंध्र प्रदेश (3) या दोन तेलगू भाषी राज्यांमध्ये पाच पुतळे आहेत.
टीप : उंच पुतळ्यांना क्रमबद्ध करताना होणारा गोंधळ
पुतळे माहिती – या लेखामध्ये पुतळ्यांच्या चबुतऱ्यासह एकूण उंचीचा विचार करून त्यांचा क्रम ठरवण्यात आला आहे. तथापि इतर काही वेबसाईटवर सर्वाधिक उंचीच्या पुतळ्यांमध्ये गोंधळ दिसून येतो. उदाहरणार्थ: पुतळ्यांचा क्रम ठरविताना तेथे एका पुतळ्याची उंची चबुतऱ्यासह मोजली जाते, तर त्या खालील पुतळ्याची उंची मात्र चबुतरा सोडून मोजली जाते. पुतळ्यांच्या उंचीचे निकष हे एकसमान असावेत. एकतर केवळ पुतळ्याची उंची किंवा चबुतर्यासह पुतळ्याची एकूण उंची या दोन्हींपैकी कोणताही एकच निकष सर्व पुतळ्यांसाठी लागू असावा, तेव्हाच त्यांना उंचीनुसार योग्य क्रमबद्ध करण्यात येईल.
रामानुज यांचा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी आणि डॉ. आंबेडकरांचा हैदराबाद मधील पुतळा या दोघांपैकी कोणता पुतळा उंच आहे असा जर तुम्हाला प्रश्न केला तर तुम्ही कोणते उत्तर सांगाल? या प्रश्नांचे उत्तर डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा म्हटले तरी योग्य राहिल आणि रामानुजांचा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी म्हटले तरी योग्य राहील. बघा, आपण जर मुख्य पुतळ्याची उंची विचारात घेतली तर बाबासाहेबांचा पुतळा 125 फूट आणि रामानुज यांचा पुतळा 108 फूट उंच आहे. येथे बाबासाहेबांचा पुतळा अधिक उंच ठरेल. परंतु जर आपण चबुतऱ्यासह पुतळ्याची एकूण उंची मोजली तर बाबासाहेबांचा पुतळा हा 175 फूट असेल आणि रामानुज यांचा पुतळा 216 फूट आहे. आणि आता रामानुज यांचा पुतळा अधिक उंच राहील. त्यामुळे पुतळ्यांची उंची मोजताना सर्व पुतळ्याची उंची मोजण्याचे निकष एक समान असावे. मी अनेक वेबसाइट्स पाहिल्या आहेत ज्यामध्ये टॉप टेन पुतळ्यांची यादीमध्ये एखाद्या पुतळ्याची उंची चबुतऱ्यासह मोजली आहे तर दुसऱ्या पुतळ्याची उंची चबुतऱ्याविना मोजली आहे.
सारांश
Tallest statues in India in Marathi : या लेखात आपण भारतातील सर्वात उंच पुतळ्यांची माहिती पाहिली. हे लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद.
हे ही वाचलंत का?
- डॉ. आंबेडकर यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती
- Wikipedia : 2022 मध्ये ‘मराठी विकिपीडिया’वर सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती कोण? जाणून घ्या…
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- ‘धम्म भारत’चे अन्य लेख वाचा
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह |
जीवनचरित्र |
पुस्तके |
पुतळे |
सुविचार / Quotes |
दृष्टिकोन/ विचार |
कार्य आणि योगदान |
विकिपीडिया |
रंजक तथ्ये |
धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा. |