भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणात ‘आंबेडकर घराण्या’चा नेहमीच हस्तक्षेप राहिला आहे. आज आपण आंबेडकर घराण्याचा राजकीय प्रवास जाणून घेणार आहोत…
भारताच्या प्रमुख राष्ट्रीय नेत्यांमध्ये महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले जाते. भारतीय राजकारणात नेहरू-गांधी घराण्याचा सर्वाधिक हस्तक्षेप आहे. भारतीय राजकारणावर डॉ. आंबेडकरांचा खोलवर प्रभाव आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते सुजात आंबेडकरांपर्यंत, ‘आंबेडकर कुटुंबाचा’ भारत देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात हस्तक्षेप आहे. आंबेडकर घराण्यातील सदस्यांचे काम सामाजिक क्षेत्रातून सुरू झाले, आणि नंतर ते राजकीय चळवळीत सक्रिय झालेले आहेत. political journey of Ambedkar family
आंबेडकर घराण्याच्या राजकीय वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे –
- 1919 – 1920 : डॉ. भीमराव रामजी आंबेडकर सामाजिक क्षेत्रात आणि राजकारणात सक्रिय झाले.
- 1926 – 1937 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई विधान परिषदेचे सदस्य (आमदार) म्हणून पद भूषवले.
- 1930 – 1932 : लंडन येथे झालेल्या तिन्ही गोलमेज परिषदांमध्ये डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांचे प्रतिनिधित्व केले. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. या काळातच ‘द टाईम‘ या जगप्रसिद्ध अमेरिकन मासिकाने बाबासाहेब आंबेडकरांना ‘भारताचे अब्राहम लिंकन‘ म्हटले.
- 1936 : बाबासाहेबांनी ‘स्वतंत्र मजूर पक्ष‘ नावाचा पहिला राजकीय पक्ष स्थापन केला.
- 1937 : मुंबई प्रांतीय विधानसभा निवडणुकीत ‘स्वतंत्र मजूर पक्षा’चे 15 पैकी 13 उमेदवार निवडून आले. पक्षाला मिळालेले हे सर्वात मोठे यश होते.
- 1937 – 1942 : डॉ. आंबेडकर यांनी मुंबई विधानसभेचे सदस्य (आमदार) आणि विरोधी पक्षनेतेपद भूषवले. काँग्रेसनंतर स्वतंत्र मजूर पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या.
- 1942 : बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन’ अर्थात ‘अनुसूचित जाती महासंघ’ या नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली.
- 1942 – 1946 : डॉ. आंबेडकर यांनी ब्रिटिश भारताच्या केंद्र सरकारमध्ये कामगार मंत्री (लेबर मिनिस्टर) म्हणून काम केले. कामगार मंत्री व्यतिरिक्त त्यांनी उर्जा मंत्री आणि पाटबंधारे मंत्री ही पदे भूषवली.
- 1946 – 1950 : या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधान सभेचे सदस्य आणि संसद सदस्य होते. (याखेरीज ते केंद्रीय कॅबिनेट मंत्री अशा एकूण तीन भूमिकेत होते.) भारताचे संविधान बनवणाऱ्या संविधान सभेच्या एकूण 22 समित्या होत्या, त्यापैकी डॉ. आंबेडकर हे 9 समित्यांमध्ये सदस्य होते आणि ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. राज्यघटनेच्या निर्मितीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे त्यांना ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार’ म्हटले जाते. या काळात संविधान सभेने भारताची संसद म्हणूनही काम केले आणि त्यामुळे बाबासाहेब खासदारही होते.
- 1947 – 1951 : डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताचे कायदा व न्याय मंत्रीपद भूषवले. नेहरू सरकारशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी ऑक्टोबर 1951 मध्ये या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
- 1952 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची पहिली लोकसभा निवडणूक लढवली होती, परंतु त्यांचा एका काँग्रेस उमेदवाराकडून पराभव झाला. त्याच वर्षी, ते भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेचे सदस्य झाले.
- 1954 : डॉ. आंबेडकरांनी भंडारा येथून लोकसभा पोटनिवडणूक लढवली, पण यावेळीही त्यांचा पराभव झाला.
- 1952 – 1956 : बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह ‘राज्यसभेचे सदस्य‘ म्हणून काम केले. बाबासाहेब दुसऱ्यांदा खासदार झाले (याआधी 1946-1950 मध्ये). 30 सप्टेंबर 1956 रोजी डॉ. बी.आर. आंबेडकरांनी “शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” बरखास्त करून “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया” स्थापन करण्याची घोषणा केली होती. पुढील दोन महिन्यानंतर 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले.
- 1957 : 3 ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र यशवंत आंबेडकर, एन. शिवराज, पी.टी. बोराळे, ए.जी. पवार, दत्ता कट्टी, दा.ता. रुपवते यांनी ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया‘ (आरपीआय) पक्षाची स्थापन केली. या पक्षाची रूपरेषा बाबासाहेबांनी स्वत: तयार केली होती, पण ती प्रत्यक्षात येण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.
- 1957 – 1962 : 1957 मध्ये दुसरी लोकसभा निवडणूक झाली, ज्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सहा खासदार लोकसभेवर निवडून आले. डॉ. आंबेडकरांच्या नव्या पक्षाची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी आहे.
- 1962 : बाबासाहेबांचे पुत्र यशवंत आंबेडकर यांनी पंजाब मधील होशियारपूर लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तिकिटावर निवडणूक लढवली, पण 11,000 मतांनी त्यांचा पराभव झाला.
- 1960 – 1966 : यशवंत आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य (आमदार) पद भूषवले. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर यशवंत हे आजीवन बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षस्थानी राहिले.
- 1990 – 1996 : बाबासाहेबांचे नातू आणि यशवंत यांचे पुत्र, बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी राज्यसभा सदस्य (खासदार) पद भूषवले.
- 1994 : प्रकाश आंबेडकरांनी ‘भारिप बहुजन महासंघ‘ नावाचा राजकीय पक्ष काढला.
- 1998 : बाबासाहेबांचे धाकटे नातू आणि प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांनी ‘रिपब्लिकन सेना‘ नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली.
- 1998 – 1999 : प्रकाश आंबेडकर हे लोकसभेचे सदस्य (खासदार) बनले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे 4 सदस्य लोकसभेसाठी निवडून आले होते – प्रकाश आंबेडकर, दादासाहेब गवई, रामदास आठवले आणि जोगेंद्र कवाडे. 1957 नंतर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ही दुसरी सर्वात मोठी कामगिरी आहे.
- 1999 – 2004 : प्रकाश आंबेडकरांनी दुसऱ्यांदा लोकसभा सदस्यपद भूषवले. ते तीन वेळा खासदार होते. (यानंतरही त्यांनी पुढच्या सर्व (2004, 2009, 2014, 2019, 2024) लोकसभा निवडणुका लढवल्या, पण विजय मिळवता आला नाही.)
- 2014 : बाबासाहेबांचे बंधू मुकुंदराव यांचे नातू राजरत्न आंंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. प्रकाश आंबेडकर यांनीही निवडणूक लढवली, पण त्यांचाही पराभव झाला.
- 2019 : प्रकाश आंबेडकर यांनी ‘वंचित बहुजन आघाडी’ (VBA) हा नवा राजकीय पक्ष स्थापन केला आणि जुना भारिप बहुजन महासंघ पक्ष त्यात विलीन झाला.
महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनी व्हीबीएच्या तिकिटावर 47 उमेदवार उभे केले होते आणि एका एआयएमआयएम उमेदवाराला पाठिंबा दिला होता. कारण तेव्हा वंचित बहुजन आघाडी आणि AIMIM यांची युती होती. AIMIM उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाले, परंतु सर्व VBA उमेदवार पराभूत झाले. वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीत एकूण 7 टक्के मते मिळाली.
- 2019 : 14व्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या तिकिटावर 234 उमेदवार उभे केले, परंतु ते सर्व पराभूत झाले. मात्र, निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला एकूण 7 टक्के मते मिळाली. निवडणुकीपूर्वीच वंचित बहुजन आघाडी आणि AIMIM यांची युती तुटली होती.
- 2024 : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर कुणाशीही युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. 38 उमेदवार त्यांचे रिंगणात होते जे सर्व पराभूत झाले. निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेसोबत असलेली युती तोडली, तसेच महाविकास आघाडी मध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतला.
या लोकसभा निवडणुकीत बाबासाहेबांचे तीनही नातू तीन वेगवेगळ्या पक्षांकडून उभे होते आणि ते तिघेही पराभूत झाले – प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी, अकोला मतदारसंघ), आनंदराज आंबेडकर (रिपब्लिकन सेना, अमरावती मतदारसंघ) आणि भीमराव आंबेडकर (ग्लोबल रिपब्लिकन पार्टी, पंजाबमधील होशियारपूर मतदारसंघ).
- 2024 : 15व्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे 200 उमेदवार उभे होते, जे सर्व पराभूत झाले. निवडणुकीत वंचितला 2.5 टक्के मते मिळाली. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळीही स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आणि त्यांचा लाजिरवाणा पराभव झाला.
- 2024 : 15व्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राजरत्न आंबेडकर देखील वाशिम मतदारसंघातून उभे होते, मात्र तेही पराभूत झाले.
बाबासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सविता आंबेडकर यांना पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी राज्यसभेवर (खासदार) नेण्याचा आग्रह केला होता. पण काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्याने राज्यसभेची सदस्य बनणे माईंना पतीच्या तत्त्वांशी विश्वासघात करणे वाटले, म्हणून त्यांनी तीनही वेळा हे प्रस्ताव नम्रपणे नाकारले.
आंबेडकर घराण्याच्या राजकीय प्रवास यामध्ये कळले असेल कि बाबासाहेब हे आमदार, मंत्री आणि खासदार होते. त्यांचा मुलगा यशवंत आमदार, तर नातू प्रकाश आंबेडकर तीन वेळा खासदार झाले आहेत.
बाबासाहेबांचे पणतू आणि प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर हे देखील राजकीय कार्यकर्ते आहेत आणि व्हीबीएमध्ये काम करतात. 2019 मध्ये सुजातने निवडणूक प्रचारात खूप मदत केली. सुजात विविध माध्यमातून महाराष्ट्र आणि राज्यभर पसरलेल्या बाबा बाळासाहेबांच्या सर्व लक्ष ठेवून होते.
बाबासाहेबांच्या चुलत पणतू राजरत्न आंंबेडकर हे राजकारणापासून थोडेसे बाजूला होऊन सध्या बौद्ध धर्म प्रचाराचे कार्य करत आहे. राजरत्न हे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.
हे ही वाचलंत का?
- दलित चळवळीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान
- अस्पृश्यता निवारण चळवळीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान
- डॉ. बाबासाहब आंबेडकरांचे शैक्षणिक योगदान
- ‘या’ देशांमध्ये आहेत डॉ. आंबेडकरांचे पुतळे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- ‘धम्म भारत’चे अन्य लेख वाचा
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह जीवनचरित्र पुस्तके पुतळे सुविचार / Quotes दृष्टिकोन/ विचार कार्य आणि योगदान विकिपीडिया रंजक तथ्ये धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.