बहुआयामी विद्वान असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘दलितांचे नेते’ म्हणून सर्वश्रुत आहेत. दलित चळवळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. दलितांसाठी त्यांनी केलेल्या संघर्षामुळे त्यांना वैश्विक ओळख प्राप्त झाली. आजच्या लेखामध्ये आपण दलित चळवळीतील बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रात अनेक महान समाजसुधारक होऊन गेले. त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रमुख होते. त्यांचे कार्य कायदा, अर्थशास्त्र, राजकारण, पत्रकारिता, धर्म, शिक्षण, पर्यावरण यासारख्या अनेक क्षेत्रांत आहे. परंतु त्यांपैकी आपल्या दलित बांधवांकरिता त्यांनी फार मोठे काम केले होते. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख प्राप्त झाले.
त्यांच्या सामाजिक कार्यांमध्ये दलितांच्या उद्धार, महिलांसाठीचे अधिकार, शैक्षणिक सुधारणा इत्यादींचा समावेश होतो. आज आपण बाबासाहेबांच्या सामाजिक चळवळीतील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली दलित चळवळ आणि त्यातील बाबासाहेबांचे योगदान जाणून घेऊया.
दलित चळवळीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान
हजारो वर्षांपासून अस्पृश्यतेच्या आणि जातीयतेच्या अंधारात पडलेल्या करोडो कोट्यवधी लोकांचा उद्धार केल्यामुळे ‘युगपुरुष’, ‘महामानव’ आणि ‘अस्पृश्यांचा उद्धारक’ म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव केला जातो. त्यांच्या कार्याची सुरुवात साधारणतः 1921 पासून सुरू झाली. तथापि 1919 पासून त्यांनी समाजकारण आणि राजकारणामध्ये सहभाग नोंदवलेला दिसतो.
बाबासाहेबांच्या पूर्वीही दलित चळवळ अस्तित्वात होती बाबासाहेबांच्या नंतर सुद्धा दलित चळवळ अस्तित्वात राहिली परंतु बाबासाहेबांच्या काळातील दलित चळवळ सर्वात प्रभावीपणे कार्यरत होती. कारण त्या चळवळीला बाबासाहेबांसारखा अतिशय तल्लख बुद्धी असलेला थोर पुढारी मिळाला होता.
बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 9 मार्च, 1924 रोजी मुंबई येथे दलित समाजातील नव्या व जुन्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे ध्येय व उद्दिष्ट खालीलप्रमाणे होते.
(1) मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता वसतिगृहांची निर्मिती करणे, त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडविणे.
(2) बहिष्कृत समाजातील विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक व त्यांच्याकरिता वाचनालये सुरू करणे.
(3) त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता शेतीविषयक व्यावसायिक, आणि औद्योगिक शाळा चालविणे.
या संस्थेच्या कार्याध्यक्षपदी स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. ही संस्था डॉ. आंबेडकरांच्या कार्याची दिशा दर्शवणारी होती. त्याद्वारे भारतातील दलित, पददलित वर्गाला स्वावलंबन, स्वाभिमान व आत्मोद्धाराची शिकवण देणे, त्यांचे परिवर्तन घडवून आणणे यासारखी महत्त्वाची कामे झाली.
या संस्थेच्या वतीने सोलापूर येथे 1925 मध्ये पहिले वसतिगृह सुरू करण्यात आले. ‘सरस्वती विलास’ नावाचे हस्तलिखित दरवर्षी प्रसिद्ध केले जात होते. प्रारंभी या संस्थेच्या कामात दलित लोकांचासुद्धा फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. नंतर रात लोकांचा सहभाग वाढला.
महाडचा सत्याग्रह
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात 1927 चा महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह महत्त्वपूर्ण ठरला. या सत्याग्रहाची दखल त्यावेळी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली होती.
1923 मध्ये ब्राह्मणेतर पक्षाचे विधिमंडळ सदस्य सी. के. बोले यांनी 4 ऑगस्ट, 1923 कायदेमंडळात ठराव मंजूर करून घेतला की, सार्वजनिक पाणवटे, विहिरी, धर्मशाळा, विद्यालय, बगीचे या ठिकाणी अस्पृश्यता पाळू नये. त्यांना अडचणी येऊ नयेत. त्यांना मुक्त संचार असावा या ठरावाची अंमलबजावणी न करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, लोकल बोर्ड, ग्रामपंचायतीचे अनुदान बंद करण्यात येईल.
या ठरावानुसार महाडच्या नगरपालिकेने ठराव पास करून दलित वर्गांकरिता पाणवठा तलाव खुला केला; परंतु स्पृश्य हिंदूंच्या विरोधामुळे दलित तेथे जाऊन पाणी भरू शकत नव्हते. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 19 व 20 मार्च 1927 रोजी महाड येथे बहिष्कृत परिषद घेण्याचे ठरविले.
तेथील सभेत भाषण करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले की, आपण महाडच्या सार्वजनिक चवदार तलावावर जाऊन आपला हक्क बजाऊ. पाणी पिणे हा सत्याग्रहाचा उद्देश नसून पाण्यावर सर्वांचा हक्क आहे ही बाब लोकांच्या निदर्शनास आणणे आहे. यावेळी बाबासाहेबांचे अनेक सहकारी व अनुयायी उपस्थित होते.
महाडच्या या परिषदेत स्पृश्यांनी अस्पृश्यांना नागरी हक्क मिळविण्यास सहकार्य करावे. स्पृश्यांनी अस्पृश्यांना नोकरीस ठेवावे. मेलेली जनावरे दलितांनी ओवू नये, असे ठराव संमत करण्यात आले.
त्याचप्रमाणे परिषदेच्या दुसऱ्या दिवशी 20 मार्च 1927 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रही पद्धतशीरपणे तुकड्यातुकड्यांनी महाडच्या चवदार तळ्याकडे निघाले. आतापर्यंत स्पृश्यासह खिश्चन, मुसलमान, जनावरे, पशुपक्षी चवदार तळ्याचे पाणी पित होते. फक्त दलितांना तेथे जाऊन पाणी पिण्याची, त्याला स्पर्श करण्याची मुभा नव्हती.
हजारो सत्याग्रहींसमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तळ्यावर गेले व त्यांनी ओंजळभर पाणी घेऊन प्याले. त्यांचे अनुकरण हजारो अनुयायांनी केले. त्या दिवशी बाबासाहेबांनी समतेचा व मानवतेचा संदेश दिला. मात्र याप्रसंगी सवर्ण हिंदूंनी अस्पृश्यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली.
यामध्ये बाबासाहेबांनाही देखील दुखापत झाली. बाबासाहेबांनी जखमी लोकांची विचारपूस केली व शांतता राखण्याचे आवाहन केले. आपल्या दलित बांधवांवर हिंसक हल्ला झाल्याचे पाहून देखील बाबासाहेबांनी हिंसेने त्याचे प्रत्युत्तर दिले नाही, यामधून ‘अहिंसक आंबेडकर’ आपल्याला कळतात.
महाडच्या सत्याग्रहात अनेक ब्राह्मण व्यक्तीही सहभागी झाल्या होत्या; परंतु दलित जातीचे लोक जास्त होते. तथापि चांभार लोक अल्प होते, आणि त्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाईट वाटले. ब्राह्मणेतर चळवळीतील नेते जेधे, जवळकरसुद्धा या सत्याग्रहात सहभागी, तर भास्करराव जाधव यांनी एक पत्रक काढून सत्याग्रहास पाठिंबा दिला होता.
बाबासाहेबांचा हजारो दलितांनी चवदार तळ्याचे पाणी प्राशन केल्यामुळे चवदार तळे अशुद्ध झाले असल्याची बोंब कर्मठ सनातनी हिंदूंनी उठवली. कर्मठ ब्राह्मणांनी त्या अशुद्ध (?) तलावाचे गाईच्या मूत्राने शुद्धीकरण केले. पंचगव्य मिसळून त्याचा शुद्धीकरण विधी केला; परंतु भारताच्या इतिहासात ही घटना समतेचा हक्क प्रतिपादन करणारी ठरली.
मनुस्मृतीचे दहन
25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे, दलितांना मानवी हक्क नाकारणार्या ‘मनुस्मृती’ जाळण्याचा विधी करण्यात आला. त्याद्वारे आपल्यावरील अन्यायाचे परिमार्जन करण्याचा प्रयत्न केला. हा ग्रंथ अस्पृश्यता, वर्णव्यवस्था व जातिभेद यांचा पुरस्कार करणारा होता.
अंबादेवी मंदिर प्रवेश सत्याग्रह
अंबादेवीचे मंदिर हे अमरावती येथील पुरातन व प्रसिद्ध देवस्थान आहे. या मंदिराला भरपूर दक्षिणा मिळत असे; पण या देवस्थानात दलितांना प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यामुळे तेथे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह करण्यात आला.
सुरुवातीला अस्पृश्यांनी मंदिर समितीकडे मंदिर प्रवेशाचा व दर्शनाकरिता अर्ज केला. अस्पृश्यांनी म्हटले की, आमच्या प्रवेशाने मंदिर व देव भ्रष्ट होत नाही. परंतु समितीने अर्ज फेटाळून लावला.
त्यामुळे अंबादेवीच्या मंदिरात अस्पृश्यांसाठी प्रवेश मिळवण्यासाठी सत्याग्रह करण्याचे ठरले; पण विश्वस्तांनी अर्जावर फेरविचार करून मंदिर खुले केले.
पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह
पुणे शहरातील पर्वती मंदिर हे अशा अनेक प्रसिद्ध देवस्थानांपैकी एक होते, ज्यात दलितांना प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे पुण्यातील अस्पृश्य वर्गाच्या वतीने मंदिर प्रवेशाची मागणी करण्यात आली.
त्यावेळी पुण्यातील तरुण संघातील एस.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर, शिरुभाऊ लिमये, मधू लिमयेसारख्या लोकांनी मंदिर संस्थानाकडे विनंती केली की, पर्वती मंदिर अस्पृश्यांना खुले करावे. परंतु मंदिर खाजगी असल्याचा दावा विश्वस्तांनी केला आणि अस्पृश्यांची मंदिर प्रवेश विनंती फेटाळून लावली.
त्यामुळे पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह करण्याचे ठरविले गेले. यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. कांबळे (अध्यक्ष), पा.ना. राजभोज, काका गाडगीळ, भुस्कुटे, साठे, जेधे त्यात सदस्य होते. न.चिं. केळकर, श्री.म. माटे, अप्पासाहेब भोपटकरही त्यास अनुकूल होते. या सत्याग्रहास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पाठिंबा होता.
13 आक्टोबर 1929 रोजी पर्वती मंदिर प्रवेशाकरिता सत्याग्रह पुकारला. जवळजवळ 250 लोकांनी सत्याग्रहात भाग घेतला. सनातनी हिंदूंनी त्यांच्यावर शिव्यांचा, दगडांचा, विटांचा वर्षाव केला.
यावर प्रतिगामींची निषेध सभा झाली. मंदिरास सरकारकडून अनुदान मिळते. म्हणून ते खाजगी ठरू शकत नाही. जेधे, शिंदे यांनी या चळवळीस अधिक व्यापक करण्यावर भर दिला; अखेर मंदिर दलितांसाठी खुले झाले.
काळाराम मंदिर सत्याग्रह
नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये सुद्धा अस्पृश्यांना प्रवेश निषिद्ध होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहामध्ये प्रत्यक्ष सहभाग होता. 1930 साली सुरू झालेला हा सत्याग्रह 1935 पर्यंत चालला. मात्र तरीही अस्पृश्यांना रामाच्या या मंदिरामध्ये प्रवेश मिळू शकला नाही.
हा सत्याग्रह अतिशय व्यापक प्रमाणात चालवला गेला होता. मात्र सनातनी हिंदूंची मने आपल्याच स्वधर्मीय अस्पृश्य बांधवांप्रती कठोर झाली होती. 1935 नंतर बाबासाहेबांनी मंदिर प्रवेशाचा नाद सोडून राजकारणामध्ये आणि शिक्षणामध्ये पुढाकार घेण्याविषयी आपल्या अनुयायांना संदेश दिला.
वृत्तपत्रे
कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी तिला वृत्तपत्राची नितांत आवश्यकता असते. आपल्या दलित चळवळीला प्रभावी बनवण्यासाठी आणि दलितांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी मूकनायक, जनता, समता, बहिष्कृत भारत आणि प्रबुद्ध भारत अशी पाच वृत्तपत्रे चालवली.
या वृत्तपत्रांद्वारे दलितांमध्ये स्वाभिमानाची तसेच स्वतःच्या अधिकारांसाठी लढण्याची प्रेरणा मिळाली. दलित चळवळीतील ही पाच वृत्तपत्रे महत्वाची भूमिका बजावतात.
सारांश
या लेखामध्ये आपण संक्षिप्तपणे दलित चळवळीतील बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान जाणून घेतले. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून किंवा ईमेलद्वारे जरूर कळवा. धन्यवाद.
हे ही वाचलंत का?
- राजरत्न आंबेडकर यांचे जीवन चरित्र
- Wikipedia : 2022 मध्ये ‘मराठी विकिपीडिया’वर सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती कोण? जाणून घ्या…
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 130 प्रेरणादायी सुविचार
- बौद्ध धर्माशी संबंधित 70+ रंजक तथ्ये आणि महत्त्वपूर्ण माहिती
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- ‘धम्म भारत’चे अन्य लेख वाचा
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत :
मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नव-नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी उजवीकडील खालील बाजूस असणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह |
जीवनचरित्र |
पुस्तके |
पुतळे |
सुविचार / Quotes |
दृष्टिकोन/ विचार |
कार्य आणि योगदान |
विकिपीडिया |
रंजक तथ्ये |
धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा. |