डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘जगातील सर्वात हुशार व्यक्ती’ ठरवणाऱ्या काही खास गोष्टी कोणत्या आहेत, हे या लेखामध्ये तुम्हाला बघायला मिळेल.

आज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती, त्यानिमित्ताने आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेची संबंधित अशा काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. त्यानंतर तुम्हालाही कळेल की डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते ‘जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती’.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कुशाग्र बुद्धीचे व्यक्ती होते. त्यांचे वाचन अफाट असल्यामुळे त्यांची स्मरणशक्ती खूप दांडगी झाली होती आणि ते प्रचंड ज्ञानवंत बनले होते. इतिहासात आइनस्टाइन, न्यूटन सारखे ‘प्रतिभावान’ आणि लिओनार्दो, बेंजामिन फ्रँक्लीन सारखे ‘बहुआयामी’ व्यक्तिमत्त्वे झालेली आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या जीवनात खूप संघर्ष करावा लागला आहे, आणि या संघर्षामधूनच त्यांनी हिमालयाएवढी उंची गाठली. कोण-कोणत्या गोष्टींमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जगातील सर्वात हुशार व्यक्ती ठरवले गेले आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित काही खास गोष्टी, ज्या त्यांना बनवतात ‘जगातील सर्वात हुशार व्यक्ती’…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर – जगातील सर्वात हुशार व्यक्ती
#1 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे इतिहासातील अग्रगण्य बहुआयामी विद्वान (polymath) आहेत. ते तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ, राजकारणी, समाजसुधारक, पत्रकार, लेखक, वकील, मानववंशशास्त्रज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, पर्यावरणतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, घटनातज्ज्ञ, बहुभाषिक, भाषाशास्त्रज्ञ, वक्ते, इतिहासकार इत्यादी होते. ते प्रजासत्ताक भारताच्या निर्मात्यांपैकी एक होते.
#2 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मराठी, हिंदी, इंग्रजी, पाली, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, बंगाली, कन्नड, उर्दू, फारसी आणि गुजराती अशा 12 भाषा अवगत होत्या.
#3 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे व्यापकपणे आतापर्यंतचे ‘सर्वात बुद्धिमान भारतीय’ म्हणून ओळखले जातात.
#4 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धी अतिशय तीक्ष्ण होती, आणि ते खुप मेहनती होते. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये 8 वर्षांचा अभ्यास केवळ 2 वर्ष 3 महिन्यांत पूर्ण केला, त्यासाठी त्यांना दिवसातील 24 तासांपैकी 21-21 तास अभ्यास करावा लागला. याचा उल्लेख त्यांनी स्वतः त्यांच्या ‘आत्मचरित्र’मध्ये केला आहे.
#5 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्व काळातील सर्वोच्च शिक्षित भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ प्रा. अमर्त्य सेन डॉ. आंबेडकरांना अर्थशास्त्रातील आपले गुरू मानतात. ते जगातील महान अर्थतज्ञ होते.
#6 परदेशातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट (पीएचडी) पदवी मिळवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पहिले भारतीय होते. एवढेच नाही तर त्यांनी अर्थशास्त्रात दोन डॉक्टरेट मिळवल्या आणि असे करणारे ते दक्षिण आशियातील पहिले व्यक्ती ठरले. त्यांनी 1916 मध्ये कोलंबिया विद्यापीठातून (यूएसए) अर्थशास्त्रात डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएचडी) पदवी प्राप्त केली, त्यानंतर 1923 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून डॉक्टर ऑफ सायन्स (डीएससी) पदवी प्राप्त केली.
#7 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 20 व्या शतकातील जगातील सर्वात शिक्षित राजकारणी होते. केवळ राजकारणी म्हणूनच नव्हे तर एक व्यक्ती म्हणूनही ते त्यांच्या काळातील जगातील सर्वात शिक्षित व्यक्ती होते. डॉ. आंबेडकर हे भारतीय इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात बुद्धिमान व्यक्ती आहेत.
#8 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील यश आणि त्यांच्या प्रकांड विद्वत्ता या मागे ते त्यांची 5% स्फुर्ती (inspiration) आणि 95% कष्ट (perspiration) मानतात.
#9 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान धर्मशास्त्रज्ञ होते, त्यांनी 35 वर्षे जगातील सर्व प्रमुख धर्मांचा तुलनात्मक अभ्यास केला. शेवटी, त्यांनी बौद्ध धर्माचे जगातील सर्वोत्तम आणि वैज्ञानिक धर्म म्हणून वर्णन केले आणि आपल्या लाखो अनुयायांसह स्वतः बौद्ध बनले.
#10 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक उत्कृष्ट लेखक होते. ते सध्याच्या काळातील सर्वात जास्त मागणी असलेले लेखक आहेत. त्यांच्या लेखन साहित्यात त्यांनी लिहिलेली ग्रंथ-पुस्तके, प्रबंध, लेख, भाषणे, स्फुटलेख, पत्रे, वर्तमानपत्रे इत्यादींचा समावेश होतो. भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही एवढे अधिक लेखन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. 32 ग्रंथ आणि पुस्तिका, 10 निवेदने किंवा साक्षीपुरावे, 10 शोधनिबंध, लेख आणि परिक्षणे हा एवढा संग्रह आंबेडकरांच्या इंग्रजी लेखनाचा आहे. याशिवाय ते भारतीय राज्यघटनेचे लेखक देखील आहेत.
#11 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक कुशल वकील तर होतेच, मात्र या सोबतच ते जगातील सर्वात प्रतिभावान कायदेतज्ज्ञ आणि घटनातज्ज्ञ सुद्धा होते. त्यांनी सुमारे 60 देशांच्या संविधानांचा सखोल अभ्यास केला होता. आंबेडकरांना “भारतीय राज्यघटनेचे जनक” म्हणून ओळखले जाते.
#12 भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड लिनलिथगो हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 500 पदवीधरांच्या बरोबरीचे बुद्धिवान समजत होते. तर महात्मा गांधी हे बाबासाहेबांना एक हजार सुशिक्षित हिंदू विद्वानांपेक्षा प्रतिभावंत समजत होते.
#13 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तके वाचण्याची खूप आवड होती. त्यांचे पुस्तकांवरील प्रेम इतके होते की ते सकाळपर्यंत पुस्तकांमध्ये गढून जात असत. डॉ. आंबेडकरांवर तीन पुस्तकांचा सर्वाधिक प्रभाव पडला. पहिले होते ‘लाइफ ऑफ टॉल्स्टॉय’, दुसरे व्हिक्टर ह्यूगोचे ‘ले मिझरबल’ आणि तिसरे थॉमस हार्डीचे ‘फार फ्रॉम द मॅडिंग क्राउड’.
#14 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो पुस्तके वाचलेली आहेत. एकदा त्यांनी आपल्या पुस्तक वाचण्याच्या लेखाबद्दल सांगितले आहे – “किती वेळ अभ्यास करायचा? इंग्लंडहून परतीच्या प्रवासात मी व्हेनिस आणि बॉम्बे या प्रवासात 8,000 पाने वाचली. हा सहा दिवसांचा प्रवास होता.”
बाबासाहेबांची वैयक्तिक लायब्ररी आणि त्यांचे निवासस्थान असलेल्या “राजगृह” मध्ये 50,000 हून अधिक पुस्तके आणि ग्रंथ होते. बाबासाहेबांचे राजगृह हे जगातील सर्वात मोठे “खाजगी ग्रंथालय” होते.
#15 लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि कोलंबिया विद्यापीठ या दोन्ही शिक्षण संस्थांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचा आजपर्यंतचा ‘सर्वात बुद्धिमान विद्यार्थी’ म्हणून गौरवण्यात आले. कोलंबिया विद्यापीठाने आपले 250 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 2004 मध्ये जगातील अशा 100 विद्वानांची एक यादी Columbians ahead of there time तयार करण्यात आली, जे कोलंबिया विद्यापीठाचे माजी विद्यार्थी होते आणि त्यांनी आपापल्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट योगदान दिलेले आहे. जेव्हा ही यादी क्रमाने लावण्यात आली, तेव्हा त्यावर पहिले नाव होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे, आणि या यादीत ते एकमेव भारतीय नाव होते. विद्यापीठाने डॉ. आंबेडकर यांचा परिचय “Founding Father of Modern India” असा दिला.
#16 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रचंड वाचनामुळे त्यांची स्मरणशक्ती खूप तल्लख झाली होती. त्यामुळे ते एखाद्या पुस्तकाच्या कोणत्या पानावरील कोणत्या ओळीमध्ये नेमणा काय मजकूर आहे हे ते क्षणार्धात सांगत असत.
#17 डॉ. आंबेडकर हे भारतातील सर्वाधिक शक्तिशाली राजकीय नेत्यांपैकी एक होते. त्यांना एकाच वेळी महात्मा गांधी (स्वतंत्रता आंदोलनातील प्रमुख चेहरा आणि सर्वविख्यात भारतीय) आणि हिंदू भारताशी (हिंदुस्थानातील सनातनी वर्ग) संघर्ष करावा लागला.
हे ही वाचलंत का?
- बौद्ध धर्माशी संबंधित 70+ रंजक तथ्ये आणि महत्त्वपूर्ण माहिती
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर निघालेत 15 पेक्षा अधिक चित्रपट
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- ‘धम्म भारत’चे अन्य लेख वाचा
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी खालील बाजूस उजवीकडे असणाऱ्या लाल रंगतील bell icon ला क्लिक करा.
(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)