पेरियार यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील भाषण

1956 मध्ये पेरियार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर भाषण केले होते, ज्यात त्यांनी बाबासाहेबांवर आणि त्यांच्या समुदायिक बौद्ध धर्मांतरावर आपला दृष्टिकोन मांडला होता. पेरियार व आंबेडकर या दोघांना एकमेकांच्या कार्यांबद्दल आदर होता.

Ambedkar, Buddha and Periyar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध आणि थंथाई पेरियार

इरोड वेंकटप्पा रामासामी (17 सप्टेंबर 1879 – 24 डिसेंबर 1973) हे भारतीय समाजसुधारक, तार्किक विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी होते. त्यांना पेरियार किंवा थंथाई पेरियार म्हणून देखील ओळखले जाते. त्यांनी स्वाभिमान चळवळ आणि द्रविडर मकळघम सुरू केली, तसेच त्यांना ‘द्राविड चळवळीचे जनक’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी तमिळनाडूमधील ब्राह्मणी वर्चस्व आणि लिंग आणि जातीय विषमतेविरुद्ध बंड केले. पेरियार यांना ‘तमिळनाडूचे आंबेडकर’ सुद्धा म्हटले जाते.

2021 पासून, तामिळनाडू राज्य त्यांची जयंती ‘सामाजिक न्याय दिन‘ म्हणून साजरी करते. तसेच तामिळनाडू राज्य बाबासाहेबांची जयंती ‘समता दिन‘ म्हणून साजरी करते. पेरियार हे बाबासाहेबांपेक्षा बारा वर्षांनी मोठे होते तसेच बाबासाहेबांच्या महापरीनिर्वाणानंतर सतरा वर्षांनी त्यांचे निधन झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी पेरियार इ.व्ही. रामासामी यांची पहिली भेट 1940 मध्ये मुंबईत झाली होती, ज्यामध्ये दोघांनी स्वतंत्र भारतातील दलित आणि ब्राह्मणेतर (शूद्र) जातींच्या राजकीय भवितव्यावर चर्चा केली. 1944 च्या मद्रास भेटीत डॉ. आंबेडकरांनी शहरातील पाच सभांना संबोधित केले, आणि या दरम्यान दोघांची पुन्हा भेट झाली. 1954 मध्ये रंगून (म्यानमार) येथे त्यांची भेट झाली, जेव्हा ते दोघेही जागतिक बौद्ध परिषदेत सहभागी होण्यासाठी बर्माच्या राजधानीत पोहोचले होते.

 

डॉ. आंबेडकरांच्या बौद्ध धर्मांतरावर पेरियार काय म्हणाले?

पेरियार इ.व्ही. रामासामी यांनी 28 ऑक्टोबर 1956 रोजी चेन्नईजवळील वेल्लोर महानगरपालिकेने डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेच्या अनावरण प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात तमिळमध्ये भाषण दिले. याच्या 14 दिवस आधी म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला होता. पेरियार यांचे हे अल्प-ज्ञात भाषण म्हणजे त्यांचा धर्माविषयीचा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी एक प्रातिनिधिक दस्तऐवज आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराविषयी आणि व्यक्तिमत्त्वाविषयीचे पेरियार यांचे हे वैचारिक भाषण दलित चळवळीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. या आपल्या भाषणात पेरियार यांनी डॉ. आंबेडकरांचा धर्म आणि धर्मांतराबाबतचा दृष्टीकोन आणि या संपूर्ण घटनेत त्यांची स्वतःची भूमिका काय होती, हेही उलगडले आहे.

 

पेरियार यांचे भाषण खालीलप्रमाणे :

 

सामाजिक समानता

जगात, विशेषतः आपल्या देशात, उच्च-नीच असे वर्गीकरण करून लोकांमध्ये भेदभाव करण्याची प्रवृत्ती काही प्रमाणात कमी झाली आहे. लोक समानतेची भावना रुजवू लागले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ त्यांच्या उत्कृष्ट बुद्धिमत्तेमुळे आणि बौद्धिक कौशल्यामुळेच नव्हे तर त्यांची विद्वत्ता आणि क्षमता सामान्य लोकांच्या कल्याणासाठी वापरत असल्यामुळे त्यांना अत्यंत बुद्धिमान मानले जाते. बाकीचे लोक त्यांच्या ज्ञानाचा आणि बौद्धिक कौशल्याचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा विशिष्ट वर्गाच्या फायद्यासाठी करत आहेत.

सामाजिक क्षेत्रात येथे मोठी क्रांती घडत आहे. आर्थिक समतेचे ध्येय गाठण्यापूर्वी सामाजिक समतेचे ध्येय गाठणे आवश्यक आहे. पाश्चात्य राष्ट्रांनी सामाजिक समतेचे क्रांतिकारी ध्येय गाठले आहे. तेथे, व्यक्तीच्या जन्मावर आधारित असमानता (मग ती जात किंवा पंथ) नष्ट केल्याने, कोठेही कोणाचेही नुकसान झालेले नाही. आपल्या येथील लोक जे (जाती-आधारित समाजात) आधीपासून सामाजिक विषमतेचा फायदा घेत होते ते सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे आपल्या देशात सामाजिक क्रांतीची चळवळ मजबूत झालेली नाही. सामाजिक समतेसाठी काम करण्यासाठी काही मोजकेच लोक पुढे येतात.

डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्याची संधी तुम्ही मला दिली आहे. मला याबद्दल खूप आनंद झाला आहे, आणि तुमच्या आनंददायी विनंतीचे पालन करण्यात मला सन्मान वाटतो. डॉ. आंबेडकर हे जगातील सर्वात महान परम प्रतिभावंतांपैकी एक आहेत. बुद्धिमत्तेच्या व ज्ञानाच्या जोरावर ते इतके महान कसे झाले? त्यांच्या शिक्षणाचे आणि बौद्धिक क्षमतेचे महत्त्व ही नंतरची बाब आहे. जगात काही असेही लोक आहेत जे त्यांच्या पेक्षा जास्त शिकलेले आणि लायक आहेत. डॉ. आंबेडकरांना विलक्षण प्रतिभाशाली असल्याचा सन्मान त्यांच्या विद्वत्तेमुळे आणि बौद्धिक पराक्रमामुळे मिळाला नव्हे तर त्यांच्या शिक्षणाचा आणि योग्यतेचा उपयोग सामान्य लोकांच्या कल्याणासाठी केला जात असल्याने मिळाला आहे. बाकीचे लोक त्यांचे ज्ञान आणि क्षमता फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि संकुचित फायद्यासाठी वापरतात.

डॉ. आंबेडकर हे नास्तिक आहेत. ही काही आताची गोष्ट नाही, तर ते फार पूर्वीपासून नास्तिक झाले आहेत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो : जगभरात जेवढेही महान विचारवंत आहेत ते सर्व नास्तिक आहेत. केवळ नास्तिकच तर्क आणि तर्कशुद्धतेच्या शिखरावर पोहोचू शकतो; तीक्ष्ण मनाची व्यक्तीच महान व्यक्ती बनू शकते. जे शिक्षित आहेत ते सर्वच तर्कशुद्ध आणि विवेकी असतीलच असे नाही. नव्वद टक्के लोक आपले विचार सर्वांसमोर उघडपणे मांडायला घाबरतात. देवाचे अस्तित्व नाकारणारेच नव्हे तर देवाच्या काल्पनिक गोष्टींवर मुक्तपणे विचार करण्याचे धाडस करणारेही नास्तिक मानले जातात.

डॉ. आंबेडकर हे एक अतिशय तल्लख बुद्धीचे आहेत, म्हणूनच ते नास्तिक आहेत. त्यांनी त्यांच्या विचारप्रक्रियेतून काढलेले निष्कर्ष त्यांनी उघडपणे मांडले आहेत. आपल्या देशातील बुद्धीजीवी वर्ग आपले मत व्यक्त करण्यात अतिशय भित्रा आहे. पण डॉ. आंबेडकर तसे नाहीत, त्यांना जे वाटते ते मांडण्याचे धाडस त्यांच्यात आहे.

Jinna, Periyar, Dr Ambedkar and others in 1940 in Bombay
8 जानेवारी 1940 रोजी मुंबईत बाबासाहेब आंबेडकर, पेरियार, मोहम्मद अली जिन्ना आणि इतर

एक अद्भुत घटना

नुकतीच एक अद्भुत घटना घडली आहे, ती जगाच्या दीर्घकाळ लक्षात राहील. ती घटना म्हणजे डॉ. आंबेडकरांची बौद्ध धर्माची दीक्षा घेणे होय. त्यांनी सध्या जे केले ती केवळ औपचारिकता आहे. सत्य तर हे आहे की ते बऱ्याच काळापासून बौद्ध आहेत.

बुद्ध कोण आहेत? जागतिक बौद्ध संघटनेचे अध्यक्ष आदरणीय मलालशेखर यांनी जानेवारी 1954 च्या तिसऱ्या आठवड्यात इरोड (तामिळनाडू) येथे झालेल्या बौद्ध परिषदेत हे स्पष्ट केले. सिद्धार्थ यांनी बौद्ध तत्त्वज्ञानाचा पाया रचला होता. त्यांचे खरे नाव बुद्ध नव्हते. सिद्धार्थ यांनी आपली बुद्धी (तर्कशक्ती किंवा बुद्धिमत्ता) वापरली, ज्यानंतर त्यांना बुद्ध म्हटले गेले. बुद्ध म्हणजे जागरूक (चैतन्य), ज्ञानी (प्रबुद्ध), आत्म-जागृत व्यक्ती.

डॉ. आंबेडकर हे गेली 20-30 वर्षे हिंदू धर्माच्या श्रद्धांशी असहमत होते. मनुस्मृतीचे समर्थक, परंपरावादी हिंदू असणारे आणि वर्णव्यवस्थेचे समर्थन करणारे म्हणून त्यांनी महात्मा गांधींवर (1869-1948) अनेकदा टीका केली होती. ते म्हणाले होते की कट्टर आणि परंपरावादी हिंदू असल्याने गांधींनी आदि द्रविड (किंवा भारतातील मूळ रहिवासी) यांच्या उन्नतीसाठी ठोस किंवा उल्लेखनीय असे काहीही केले नाही.

जातिव्यवस्था संपुष्टात आणण्याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टीकोन पूर्णपणे तार्किक आहे. पंजाबमधील जातिव्यवस्था संपवण्यासाठी एक संघटना (जाट-पात तोडक मंडळ) कार्यरत होती. त्यांनी मला सुद्धा सदस्य म्हणून सूचीबद्ध केले होते. डॉ. आंबेडकरांना संमेलनाचे अध्यक्षपद देण्याची विनंती केली. हे मान्य करून डॉ. आंबेडकरांनी आपले अध्यक्षीय भाषण (Annihilation of Caste / जातीचे उच्चाटन) तयार केले होते. ते आयोजकांकडे पाठवले. त्यावर संयोजकांना वाटले की डॉ. आंबेडकर जातिव्यवस्था नष्ट करण्याच्या नावाखाली हिंदू धर्मच नष्ट करण्याचा आग्रह धरत आहेत.

त्यांनी डॉ. आंबेडकरांना त्यांच्या भाषणातील आक्षेपार्ह भाग काढून टाकण्याची विनंती केली. आमची संघटना हिंदू धर्म नष्ट करण्यासाठी नव्हे तर जाती नष्ट करण्यासाठी स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर आंबेडकर म्हणाले होते की, हिंदू धर्म हा जातीव्यवस्थेचा आधार आणि पाया आहे. आपल्या भाषणातील आक्षेपार्ह भाग काढण्यास त्यांनी नकार दिला होता. व्याख्यान देण्यासाठी ते पंजाबलाही गेले नाहीत. मी त्यांच्याकडून भाषणाची एक प्रत मिळवली आणि ती 1936 मध्ये तामिळमध्ये ‘जातीयाई ओझिक्का वाझी’ या शीर्षकाखाली प्रकाशित केली.

आपण रामायण जाळण्याची चर्चा करत असलो तरी डॉ. आंबेडकरांनी 1932 मध्येच ते जाळले होते. श्री शिवराज (रायबहादूर एन. शिवराज) त्या परिषदेचे अध्यक्ष होते.

एकदा डॉ. आंबेडकर मद्रासला (आताचे चेन्नई) आले होते. तेव्हा ते म्हणाले होते की भगवद्गीता ही एखाद्या वेड्या माणसाची बकवास आहे. सर सी.पी. रामासामी अय्यर यांनी त्यांच्या विवेचनावर आक्षेप घेतला होता की हे सामान्य माणसाचे (गीतेबद्दलचे) मत नाही तर व्हाईसरॉयच्या कौन्सिलच्या सदस्याचे आहे. त्यांना असे मत व्यक्त करण्याचा अधिकार नाही.

1930 मध्ये मी सामाजिक सुधारणेच्या उद्देशाने इरोड येथे एक परिषद (सेल्फ-रिस्पेक्ट मूव्हमेंटची दुसरी राज्य परिषद) आयोजित केली. त्या परिषदेसाठी मी डॉ. आंबेडकरांनाही आमंत्रित केले होते. या गैरसमजातून की ते रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आहेत. मी त्यांना पत्र लिहून आश्वासन दिले की आम्ही त्यांना फक्त दोन दिवसांत परत जाऊ देऊ, जेणेकरून त्यांच्या रुग्णांना कोणतीही अडचण येणार नाही. काही कारणांमुळे आंबेडकर त्या परिषदेला येऊ शकले नाहीत. त्या परिषदेत सर आर के शङ्मुगम (रामासामी कंडासामी षणमुगम, जे नंतर स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री झाले) यांनी स्वागतपर भाषण केले होते. (डॉ. आंबेडकरांच्या वतीने) श्री एम. आर. जयकर त्या परिषदेत पोहोचले होते. त्यांनी आमच्या चळवळीचे कौतुक केले. त्यात स्वतः डॉ. आंबेडकर सहभागी व्हायला हवे होते अशी माझी इच्छा होती.

1930 च्या दशकात डॉ. आंबेडकरांनी मुस्लिम होण्याचा विचार करत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर एस. रामनाथन (सेल्फ-रिस्पेक्ट मूव्हमेंटचे संस्थापक) आणि मी त्यांना लिहिले –

“घाई करू नका. तुमच्यासह किमान एक लाख लोकांनी इस्लामचा स्वीकार केला पाहिजे. तरच ते तुमच्या विचारांचा आदर करू शकतील. अन्यथा मौलाना सांगतील तसे तुम्हाला करावे लागेल. मुस्लिम म्हणतात की इस्लाम हा एकमेव आदर्श धर्म आहे. त्यात कोणताही बदल करण्याची गरज नाही. ज्या धर्मात प्रार्थना आणि नमाज अदा करण्याशिवाय इतर कशालाही वाव नाही, तो धर्म तुम्हाला तुरुंगासारखा वाटेल.”

Ambedkar and Periyar in Rangoon in 1954
पेरियार आणि आंबेडकर 1954 मध्ये रंगूनमध्ये भेटले. हे दोघेही जागतिक बौद्ध परिषदेत सहभागी होण्यासाठी म्यानमारला गेले होते.

बर्मामध्ये : 1954

ते (डॉ. आंबेडकर) त्या काळातही धर्मांतरासाठी उत्सुक होते. यावेळी त्याच्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव होता. पण बौद्ध धर्मात येण्यापूर्वीच ते बौद्ध होते. डॉ. आंबेडकर आणि मी डिसेंबर १९५४ मध्ये बर्मा देशात (आताचे म्यानमार) भरलेल्या जागतिक बौद्ध परिषदेला गेलो होतो. खरे तर आयोजकांनी मला न विचारताही माझे नाव संमेलनाच्या कार्यक्रमात समाविष्ट केले होते. म्हणूनच मी तिथे पोहोचलो. पण काही कारणास्तव (मला सांगितले गेले की) त्यांनी माझ्या जागी दुसऱ्या प्रतिनिधीला भाषण करायला सांगितले होते. (तथापि त्यांच्या विनंतीवरून पेरियार यांनी प्रतिनिधींमध्ये अनौपचारिकपणे त्यांची मते मांडली होती).

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तेथेच बौद्ध धर्म स्वीकारायचा होता. त्या परिषदेत सिलोन (आता श्रीलंका), ब्रह्मदेश (म्यानमार), अमेरिका इत्यादी देशांतील सुमारे 500 प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्या व्यतिरिक्त स्थानिक प्रेक्षकही होते. परंतु तेथे 2000 हून अधिक बौद्ध श्रमण (भिक्खू) उपस्थित होते. तेथे त्यांनी विविध संस्कार आणि विधी केले, ज्यात हिंदू पुजारी आणि पुरोहितांपेक्षा अधिक दिखाऊपणा होता. अशा बौद्ध भिक्खुंकडे बोट दाखवून मी डॉ. आंबेडकरांना म्हणालो की –

“तुम्हाला बौद्ध बनण्याची घाई आहे. येथे या पुजाऱ्यांमध्ये (भिक्खुंमध्ये) मध्ये आपण काय करू शकतो? आपण तर्कशुद्ध विचार करतो. आपण भिक्खुंच्या आदेशाचे पालन कसे करू शकतो? निदान आत्तापर्यंत आपण हिंदू पुजार्‍यांशी संघर्ष करणे शिकलो आहोत. पण मला या बौद्ध भिक्खुंबद्दल संशय आहे. आपल्याला तेथे दोन-तीन वेळा जाऊन लोकांना भेटायला हवं. त्यानंतर आपण किमान एक लाख अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली पाहिजे. तरच ते आपला सन्मान करतील आणि बौद्ध धर्माच्या शिकवणीच्या आपल्या (तार्किक आणि मानवतावादी) व्याख्येशी सहमत होतील.”

मी डॉ. आंबेडकरांशी बोलत असतानाच एक बौद्ध भिक्खू तेथे पोहोचला. त्याचे वय 30च्या आसपास असावे. तो सडपातळ, उंच आणि गोऱ्या रंगाचा होता. तो बंगालमधून आला होता. त्याला माझ्याकडून माझ्या घराच्या ठिकाणाबद्दल जाणून घ्यायचे होते. मी त्याला सांगितले की मी मद्रास प्रांतातून (आता तामिळनाडू) आलो आहे. दरम्यान माझ्या मागे बसलेली एक व्यक्ती म्हणाली – ‘ते पेरियार रामासामी आहेत’.

मला पाहून बौद्ध भिक्खुला मी कोण आहे ते कळले नाही. माझे नाव ऐकल्यावरच तो मला ओळखू शकला. त्यानंतर त्याने मला विचारले – ‘तुम्ही येथे बौद्ध धर्म वाचवण्यासाठी आला आहात की तो नष्ट करण्यासाठी?’ मी लगेच विचारले, ‘बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी तुम्ही पारपान (ब्राह्मण) होता का?’ त्याने उत्तर दिले, ‘हो.’ मग तो म्हणाला, ‘आता याचा अर्थ काय?’ त्यानंतर तो निघून गेला.

तात्पर्य असे की तो पारपनातून बौद्ध झाला. या घटनेबद्दल मी डॉ. आंबेडकरांशी चर्चा केली. डॉ. आंबेडकर मला सांगितले की, ‘म्हैसूरच्या महाराजांना बौद्ध धर्माच्या तत्त्वांशी अतोनात लगाव आहे. त्यांनी मला मोठी जमीन दान करण्याचे आश्वासन दिले आहे. मी कायमस्वरूपी म्हैसूरमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. देणगीतून पैसा उभा करून मला तिथे विद्यापीठ स्थापन करायचे आहे. ज्या गोष्टी आपण सामान्यतः मरेपर्यंत करत राहतो, अशा गोष्टींचे औचित्य काय? मरण्याआधी काहीतरी करायला हवं ना?” या संदर्भात त्यांनी आणखीही अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.

अलीकडेच त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या दिशेने धाडसी पाऊले उचलली आहेत. त्यांनी एक निवेदनही जारी केले आहे. ते तुम्ही वर्तमानपत्रात वाचले असेलच. ते म्हणाले – ‘यानंतर मी राम, कृष्ण, शिव, रुद्र इत्यादींना देव मानणार नाही. मी अवतार या संकल्पनेवरही विश्वास ठेवणार नाही. मी जातिव्यवस्था, स्वर्ग, नरक इत्यादींवर विश्वास ठेवणार नाही. मी कोणतेही विधी किंवा कर्मकांड करणार नाही. मी माझ्या आई-वडिलांचे श्राद्धही करणार नाही. त्यांनी या सर्व गोष्टी नाकारल्या आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणे थांबवले. ठीक तसेच जसे आम्ही केले आहे.

 

हिंदू धर्म हा खऱ्या अर्थाने धर्मच नाही

डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतरानंतर अनेक प्रसारमाध्यमे माझ्याकडे आली. ‘धिना-थंती’ (एक प्रमुख तामिळ दैनिक) च्या पत्रकाराने मला विचारले – ‘मीही हिंदू धर्म सोडणार आहे का?’ मी त्याला सांगितले की हिंदू धर्म नावाचा कोणताही धर्म नाही, जो मला सोडावा लागेल. ख्रिश्चन, इस्लाम, शीख धर्मात आहे त्याप्रमाणे त्याचा कोणी संस्थापक नाही, प्रमुख नाही, विशिष्ट तत्त्वज्ञान नाही, अधिकृत धर्मशास्त्र सुद्धा नाही. जे भक्त राम, कृष्ण, विष्णू, गणेश, शिव इत्यादींना देव म्हणून पूजतात तेही हिंदूच आहेत आणि जे त्यांचा द्वेष करतात तेही हिंदूच मानले जातात. केवळ आस्तिकच नव्हे तर नास्तिकही हिंदू आहेत. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या प्रसंगी, वेगवेगळ्या ठिकाणी, एकमेकांच्या विरुद्ध असलेली वेगवेगळी तत्त्वे आणि प्रथा मांडल्या आहेत. परंतु हे सर्व ‘हिंदू धर्म’ या सामान्य शब्दांतर्गत एकत्र केले गेले आहेत ज्यात वास्तविक धर्माची आवश्यक वैशिष्ट्ये नाहीत. त्यामुळे मला आणि माझ्या अनुयायांना धर्मांतर करण्याची आवश्यकता नाही.

 

आंबेडकर एक महान नेते

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे लोकांना मार्गदर्शन करणारी आणि त्यांना मार्ग दाखवणारी व्यक्ती. ते जात आणि धर्म या विषयावर त्यांचे विचार सुसंगत पद्धतीने मांडतात. लोकांसाठी निस्वार्थपणे काम करतात. संपूर्ण देशभरात त्यांची ओळख आहे. त्यांनी आपल्या अनुयायांना बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याचा सल्ला दिला. ते येथेही (तामिळनाडू) पोहोचण्याची चांगली शक्यता आहे. त्याच्या आगमनानंतर येथे अनेक लोक धर्मांतर करण्याचा निर्णय घेऊ शकतात. आपल्या समाजासाठी शिक्षण आणि रोजगाराची संधी मिळवून त्यांनी त्यांची उन्नती केली आहे. खरंच, ते एक महान नेते आहेत. त्यांच्यानंतर त्यांच्यासारखा नेता म्हणून दुसरा कोणीही उदयास येऊ शकत नाही.



या लेखामध्ये आपण, पेरियार यांचे बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्माबद्दलचे विचार आपण जाणून घेतले.‌ पेरियार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध या दोघांचाही आदर करत होते हेही आपल्या लक्षात येते. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. 

तसेच तुमच्या काही सूचना किंवा प्रश्न असतील तर कृपया कॉमेंट बॉक्समध्ये किंवा ई-मेलद्वारे लिहून आवर्जून कळवावे. धन्यवाद.


हे ही वाचलंत का?


धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.


‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

One thought on “पेरियार यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील भाषण

  1. Pharach Chan. Atishay Sunder Ase Vishleshan Hote. Dr. Babasaheb ambedkar ji Aani Periyar Swami Doghehi Tarkwadi Vicharache Mahapurush Hote. Tyan Che Vichar He Lokana Jagrut Karnyasarkhe Aahet. Purvi Aani Aata Aaple Purwaj Je Ashikshit Hote. Tyani Khup Pratha Aani Parampara Che Palan Kele. Karan Tya Vedes Ati Shudras Shikshnacha Adhikar Navta Aani Aaj Aapn Shikshit Asun Sudha Jyanya Pratha Aani Parampara Che Palan Karto. Tyamude Aaplya Shikshnacha Kahihi Upyog Hot Nahi Karan Aapn Tark Karat Nahi. Jar Aapn Shikshit Asun Pratek Goshtivat Tark Kelet Tar Aaplya Lakshat Yeyel Ki Ya Junya Pratha Aani Parampara Sarwa Bhagad Katha Aahet Aani Ya Prathanche Palan Karun Aapan Maansik Gulaam Banat Aaho. Tyamude Aaplach Nuksaan Hot Aahe. Aata Aapn Tarkwadi Banuya. Aani Boudha Dhamma Che Anuyayi Hou ya. Karan Boudha Dhamma Ha Tarkwadi Aani Vigyaan wadi Aahe. Budha He Ishwari Avtar Swatala Ghoshit Karat Nahi, kiva Te Swarg Kiva Nargachi Bhiti Sudha Dhakhvt Nahi. Ya Dhammat Kuthlahi Karmakand Kiva Andhrashdha Nahi. Budha He Margadata Aahet. Dukh Nirodhasathi Budhani Ashthg Marg Sagitla Aahe. Sukh Aani Dukha He Aaplya Karmanusar Midte. Tyamude Chagle Karmach Aaplya La Sukh Pradaan Kartat. Tyamude Chagle Karma Karne Aani Boudha Dhamma Cha Prachar Aani Prasar Karne He ch Aapla Sankalp Asayla Pahije. Jay Bhim… Namo Budhay

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!