आंबडवे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आहे. आंबडवे गावाला ‘स्फूर्तिभूमी’ म्हटले जाते. बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्वज आंबडवे (Ambadawe) गावला राहत असे. बाबासाहेबांच्या सन्मानार्थ येथे एक स्मारक सुद्धा उभारण्यात आले आहे. आज आपण या आंबडवे गावाविषयी आणि बाबासाहेबांच्या पूर्वजांच्या इतिहासाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
Dr. Babasaheb Ambedkar’s ancestral village Ambadawe
कसं आहे बाबासाहेबांचं मूळ गाव?
आंबडवे हे रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे. हे गाव मंडणगड या तालुक्याच्या ठिकाणापासून 17 किलोमीटर अंतरावर आहे.
ह्याच्या सर्वात जवळचे शहर खेड 60 किलोमीटर अंतरावर आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव’ अशी या आंबडवे गावची ओळख आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्वजांचे मूळ गाव आंबडवे हे होय. हा शोधदेखील एका ब्रिटिश अभ्यासकाने लावला. तोपर्यंत हे गावदेखील दुर्लक्षितच होते.
या ठिकाणी सकपाळ कुटुंबीयांची अनेक घरे आहेत. आंबडवे येथील एका सकपाळ कुटुंबात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला.
आंबडवे गावाचे क्षेत्रफळ 324.33 हेक्टर आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, ह्या गावात 64 कुटुंबे असून एकूण लोकसंख्या अवघी 240 आहे. 240 लोकांमध्ये 111 पुरुष आणि 129 स्त्रिया आहेत. गावामध्ये 57 अनुसूचित जातीचे तर 11 अनुसूचित जमातीचे लोक आहेत.
डॉ. आंबेडकरांच्या पूर्वजांचा इतिहास
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्वज आंबडवे गावात राहत असे. डॉ. आंबेडकरांच्या पूर्वजांचे आडनाव ‘सकपाळ’ होते. या सकपाळ घराण्यातीलच मालोजी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आजोबा होते.
मालोजी सकपाळ हे भारतीय ब्रिटिश सैन्यामध्ये सैनिक होते, तसेच त्यांची दोन मुले (बाबासाहेबांचे वडील आणि काका) सुद्धा भारतीय सैन्यामध्ये नोकरीला होते. त्यामुळे त्यांना या गावाबाहेर जावे लागले.
1991 पासून, सध्याच्या मध्यप्रदेशातील ‘महू’ या सैन्य छापनीत 1991 रामजी सकपाळ आपल्या कुटुंबासह राहत व आपली सैन्य नोकरी करत होते. तेथेच 14 एप्रिल 1891 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. पुढील काही वर्षांत हे कुटुंब महाराष्ट्रात स्थायिक झाले.
मूळ आडनाव ‘सकपाळ’ असतांना देखील बाबासाहेबांच्या वडिलांनी 7 नोव्हेंबर 1900 रोजी साताऱ्याच्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये आपल्या मुलाचे आडनाव ‘आंबडवेकर’ असे नोंदवले.
कारण पूर्वी कोकणामधील लोकांमध्ये आपल्या गावाच्या नावावरून आपले आडनाव ठेवण्याचा प्रघात होता; ज्यामध्ये गावाच्या नावात शेवटी ‘कर’ शब्द जोडण्यात येत असे. अशाप्रकारे ‘आंबडवे’ चे ‘आंबडवेकर’ असे आडनाव बाबासाहेबांचे झाले.
परंतु दुसरीकडे, अनेक ठिकाणी ‘आंबडवे’ गावचा आणि बाबासाहेबांच्या ‘आंबडवेकर’ आडनावाचा अनुक्रमे ‘आंबवडे’ व ‘आंबवडेकर’ असा चूकीचा उल्लेख करण्यात आला आहे.
साताऱ्याच्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये, ज्याला आता प्रतापसिंह हायस्कूल नाव दिले आहे, बाबासाहेबांना शिकवण्यासाठी कृष्णाजी केशव आंबेडकर नावाचे ब्राह्मण समाजाचे शिक्षक होते.
शाळेच्या दप्तरात नोंदवलेले ‘आंबडवेकर’ हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडनीड वाटत असे; म्हणून माझे ‘आंबेडकर’ हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमाला सुचविले. त्याला बाळ भीमाने लगेच होकार दिला आणि बाबासाहेबांचे आडनाव आंबडवेकरांचे आंबेडकर झाले. तशी नोंद शाळेत झाली.
लहानपणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या आंबडवे या मूळ गावी चुलत भावाच्या विवाहानिमित्त लहानपणी कुटुंबासमवेत एकदा आले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आंबडवे
आंबडवे येथे विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक निर्माण करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलोपार्जित घराचेच स्मारकात रूपांतर करण्यात आले आहे.
आंबडवे येथे डॉ. आंबेडकर यांचे जुने झोपडीवजा घर होते. ते पाडून महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी आंबेडकर स्मारक बांधले आहे.
12 एप्रिल 2010 रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर पुण्याच्या अशोक सर्वांगीण विकास संस्थेने अशोक स्तंभ आणि शीलालेख उभारला आहे.
या स्मारक परिसरांत व वास्तूमधे बाबासाहेबांच्या वस्तूंचे जतन करण्यात आले आहे. भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्ती स्मारकात आहेत.
यास स्मारकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्थीकलश सुद्धा आहे. रमाबाई आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, मुकुंदराव आंबेडकर, रामजी आंबेडकर, यशवंत आंबेडकर यांचे फोटो देखील स्मारकामध्ये आहेत.
अशोक सर्वांगीण विकास सोसायटीने उभारलेल्या शिलालेखावर खालील अक्षरे कोरलेली आहेत…
स्फूर्तीभूमी
(शिलालेख)
हा अशोकस्तंभ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपणा सर्वांसाठी स्फूर्ती आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळगाव खऱ्या अर्थाने आपले प्रेरणास्थळ देखील आहे. म्हणून या भूमीला संस्थेने ‘स्फूर्तीभूमी’ मानून हा स्तंभ आणि पुतळा उभा केला आहे. आंबेडकरी अनुयायांनी या मातीची धूळ कपाळी लावून त्यांच्या कार्यातून सतत स्फूर्ती आणि प्रेरणा घेण्याचा संकल्प करावा आणि तथागतांचा, सम्राट अशोकांचा, डॉ. बाबासाहेबांचा विचार मनामनात रुजवावा.
राष्ट्रपतींची भेट
12 फेब्रुवारी 2022 रोजी, भारताचे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आंबडवे गावाला भेट दिली होती.
भारत सरकार विकसित करत असलेल्या बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या स्थानांमध्ये आंबडवेचा सुद्धा समावेश करण्याची ग्वाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली होती.
सारांश
या लेखात आपण आंबडवे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती आवडल्यास आपल्या मैत्रिणी आणि मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.
याशिवाय तुमचे काही प्रश्न किंवा सूचना असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये किंवा ई-मेल द्वारे जरूर कळवा. धन्यवाद.
हे ही वाचलंत का?
- डॉ. आंबेडकर यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती
- 2022 मध्ये ‘मराठी विकिपीडिया’वर सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती कोण? जाणून घ्या…
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- ‘धम्म भारत’चे अन्य लेख वाचा
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह |
जीवनचरित्र |
पुस्तके |
पुतळे |
सुविचार / Quotes |
दृष्टिकोन/ विचार |
कार्य आणि योगदान |
विकिपीडिया |
रंजक तथ्ये |
धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा. |