महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका

Last Updated on 26 September 2025 by Sandesh Hiwale

बौद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान – बोधगयातील महाबोधी महाविहार हे हिंदू धर्मियांच्या नियंत्रणात आहे. त्याच्या मुक्तीसाठी अनेक वर्षांपासून आंदोलने सुरू असून, यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही महत्त्वपूर्ण भूमिका घेतली होती.

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका

बोधगया (बिहार) येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्माचे सर्वात पवित्र स्थळ आहे. मात्र, या बौद्ध विहारावर हिंदू अधिपत्याचा वाद कायम राहिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या प्रश्नाची जाणीव होती आणि ते हे महाविहार हिंदूंच्या ताब्यातून मुक्त करण्याच्या तयारीत होते.

दुर्दैवाने, 1956 मध्ये त्यांचे निधन झाल्याने हे प्रयत्न अपूर्ण राहिले. आज हे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन देशभरच नव्हे तर जगभर पसरले असून, बौद्ध समाजासाठी हा कळीचा मुद्दा बनला आहे.

या लेखात, वामनराव गोडबोले यांच्या पुस्तकातील आठवणींवर आधारित या घटनेचा तपशील जाणून घेऊया.

महाबोधी महाविहाराचा इतिहास आणि विवाद

महाबोधी महाविहार हे भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालेले स्थळ आहे. यामुळे जगभरातील बौद्ध धर्मीयांसाठी हे सर्वात पवित्र स्थळ आहे.

ख्रिस्त पूर्व तिसऱ्या शतकात, सम्राट अशोक यांच्या काळात हे विहार बांधले होते, आणि सुरुवातीला एक शतकाहून अधिक काळ ते बौद्ध धर्मीयांच्या नियंत्रणात होते. मात्र, तेराव्या शतकानंतर या बौद्ध विहारावर हिंदू धर्मीयांचे नियंत्रण प्रस्थापित झाले, जे आजपर्यंत कायम आहे.

स्थानिक ब्राह्मण येथील बुद्ध व त्यांच्या शिष्यांच्या मूर्तींना ‘पाच पांडव’ म्हणून सादर करतात आणि मुख्य विहारात शिवलिंगाची स्थापना करतात. बौद्धांच्या सर्वोच्च प्रार्थनास्थळावर हिंदुंच्या अतिक्रमणामुळे बौद्ध धर्मीयांच्या भावना दुखावल्या जातात.

भिक्खू अनागरिक धम्मपाल आणि भदन्त सुरई ससाई यांसारख्या अनेक बौद्ध व्यक्तींनी याकडे लक्ष वेधले होते, आणि हे बौद्ध स्थळ पूर्णतः बौद्धांच्या नियंत्रणात आणण्यासाठी संघर्ष केला. आजही हे विहार हिंदूंपासून मुक्त करण्यासाठी आंदोलन सुरू आहे, ज्यात भारतासह जगभरातील बौद्ध लोक सहभागी होत आहे.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आणि अपूर्ण योजना

बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक न्यायाचे प्रणेते आणि बौद्ध धर्माचे अनुयायी होते. त्यांना महाबोधी महाविहारातील हिंदू प्रभावाची पूर्ण कल्पना होती आणि ते यात बदल घडवण्याच्या तयारीत होते.

बाबासाहेबांचे अनुयायी असलेले वामनराव गोडबोले यांनी बोधगया भेटीदरम्यानचे प्रत्यक्ष अनुभव सांगून, तेथे हिंदू ब्राह्मणांचा कसा कब्जा आहे हे बाबासाहेबांना सविस्तर सांगितले. तेव्हा बाबासाहेब म्हणाले की आधी आपण सामूहिकपणे बौद्ध धर्माचा स्वीकार करू  आणि त्यानंतर महाबोधी महाविहारावरील हिंदूंची सत्ता संपुष्टात आणू.

याचा अर्थ असा की, महाबोधी महाविहार हे मूळतः बौद्धांचे पवित्र स्थळ आहे आणि त्यावर बौद्ध समाजाचेच नियंत्रण असावे, असे त्यांचे स्पष्ट मत होते. मात्र, बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर थोड्या काळातच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाल्याने हे प्रयत्न पूर्णत्वास येऊ शकले नाहीत.

आज हे आंदोलन देशभरात पसरले असून, बाबासाहेबांची ही अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी जनसमर्थन आणि प्रयत्न सुरू आहेत.

 

वामनराव गोडबोले आणि बोधगया विहारातील धक्कादायक घटना

वामनराव गोडबोले हे 1956 च्या बौद्ध धम्म दीक्षेचे प्रमुख आयोजक होते. त्यांच्या ‘बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म दीक्षेचा अविस्मरणीय इतिहास’ या पुस्तकात महाबोधी विहारातील घटनेची रंजक नोंद आहे. रेल्वे कर्मचारी असल्याने त्यांना फर्स्ट क्लास पास मिळायचा.

त्यांचे काका महादेव मेश्राम हे पोर्टर होते आणि ते दोघे बौद्ध स्थळांना भेटी देत असत. बोधगया, सारनाथ, लुंबिनी आदी ठिकाणी ते फिरले. बोधगयातील पहिल्या भेटीत विचित्र घटना घडली, ज्यात काकांचा जीव वाचला.

वामनराव आणि त्यांचे काका महाबोधी विहारात गेले असता, तेथील ब्राह्मण पुजारी बुद्ध मूर्तींना ‘पाच पांडव’ म्हणत होते. काका रागावले, पण वामनरावांनी त्यांना शांत केले. मुख्य विहारात शिवलिंग पाहून काका भडकले आणि ब्राह्मणाला पकडले. आरडाओरड झाली आणि लोक गोळा झाले.

तेव्हा मनिंद्र बरुआ धावले आणि त्यांनी मध्यस्थी केली. ते म्हणाले, “यहां पर इन्हीं (हिंदू) का राज है। वो आपको मार डालेंगे तो भी किसी को पता नहीं चलेगा।” (इथे यांचीच सत्ता आहे. त्यांनी तुम्हाला मारून टाकले टाकले तरी कुणाला कळणार नाही.”)

ही घटना वामनरावांनी नंतर बाबासाहेबांना सांगितली, तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, “आधी आपण धर्मांतर करू. मग पाहू तिथली सत्ता कशी हिंदूंच्या हातात राहते ती!” म्हणजे बौद्ध धर्मात प्रवेश केल्यानंतर बाबासाहेबांनी महाबोधी महाविहाराच्या मुक्तीची योजना आखली होती.

 

आजच्या आंदोलनाची स्थिती आणि भविष्य

आज महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन देशभर पसरले आहे. बौद्ध समाज यासाठी एकत्र येत आहे. बाबासाहेबांची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी हे आंदोलन महत्त्वाचे आहे.

यामुळे बौद्ध स्थळांचे संरक्षण आणि धार्मिक स्वातंत्र्याचे मुद्दे चर्चेत आले आहेत. भविष्यात हे आंदोलन यशस्वी होण्याची आशा आहे.


महाबोधी महाविहाराचा प्रश्न हा केवळ धार्मिक नाही, तर सामाजिक न्यायाचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांची दृष्टी आजही प्रेरणादायी आहे. या आंदोलनाला पाठिंबा देऊन आपण त्यांची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यात योगदान देऊ शकतो. बौद्ध धर्माच्या संरक्षणासाठी एकजुटीने प्रयत्न करूया.


हे ही वाचलंत का?


धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.


मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र

पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!