Last Updated on 7 October 2025 by Sandesh Hiwale
भारतीय इतिहासातील टॉप 32 सर्वश्रेष्ठ बौद्ध व्यक्तींबद्दल जाणून घ्या! पँथिओनच्या 2025 Historical Popularity Index (HPI) नुसार क्रमांकित, बुद्धांपासून ते आंबेडकरांपर्यंत ही थोर बुद्धिस्ट व्यक्तिमत्त्वे तुम्हाला प्रेरणा आणि ज्ञानाचा खजिना देतील.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा!
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा आज 69 वा सोहळा! या ऐतिहासिक दिवशी आपण भारतीय इतिहास उजळविणाऱ्या टॉप 32 महान बौद्ध व्यक्तिमत्त्वांबद्दल जाणून घेणार आहोत. – Top 32 Great Buddhist Personalities in India
बौद्ध धर्म हा भारताने जगाला दिलेला महान आध्यात्मिक वारसा आहे. इ.स.पू. सहाव्या शतकात बुद्धांनी दिलेला धर्म आज संपूर्ण जगभर पसरला आहे. करुणा, समता, अहिंसा, प्रज्ञा आणि शांती या मूल्यांवर उभा असलेला हा धर्म विविध काळात अनेक महान व्यक्तींनी पुढे नेला.
येथे अनेक श्रेष्ठ बौद्ध व्यक्तींनी केवळ धर्मच नव्हे तर समाज, राजकारण, शिक्षण, तत्त्वज्ञान आणि संस्कृती यांना नवी दिशा दिली आहे. गौतम बुद्धांपासून सम्राट अशोक, आचार्य नागार्जुन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दलाई लामा यांच्यापर्यंत अनेक थोर बौद्धांनी आपला ठसा उमटवला.
या लेखात पँथिओनच्या Historical Popularity Index (HPI 2025) नुसार निवडलेल्या 32 सर्वश्रेष्ठ बौद्ध व्यक्तींची माहिती दिली आहे. या बौद्ध व्यक्ती जागतिक स्तरावर सर्वाधिक प्रसिद्ध ठरल्या आहेत. या व्यक्तींमध्ये सम्राट, भिक्खू, भिक्खुनी, तत्त्वज्ञ, कवी, समाजसुधारक आणि आधुनिक विचारवंत यांचा समावेश आहे. त्यांच्या योगदानामुळेच बौद्ध धर्म इतका व्यापक आणि प्रभावी ठरला.
Table of Contents
ToggleHistorical Popularity Index (HPI) म्हणजे काय?
पँथिओन ही डिजिटल संस्था Historical Popularity Index (HPI) द्वारे व्यक्तीच्या लोकप्रियतेचा आढावा घेते. HPI अर्थात ऐतिहासिक लोकप्रिय निर्देशांक हा एखाद्या व्यक्तीची इंटरनेटवरील लोकप्रियता मोजण्याचे एक साधन होय. या निर्देशांकाची गणना करताना –
- संबंधित व्यक्तीचा विकिपीडिया चरित्रलेख किती भाषांमध्ये लिहिला आहे,
- त्या चरित्रलेखाला किती वाचकसंख्या (views) आहे,
- ती व्यक्ती किती प्राचीन अथवा आधुनिक आहे,
- इंग्रजी विकिपीडिया सोडून इतर भाषांतील विकिपीडियांवर तिची लोकप्रियता (वाचकसंख्या) किती आहे,
या सर्व उल्लेखनीय बाबींचा विचार केला जातो. या सर्व घटकांचे मूल्यमापन करून त्या व्यक्तीला ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक (HPI स्कोअर) दिला जातो.
चला, या सर्वश्रेष्ठ बौद्ध व्यक्तींच्या जीवनकथा, योगदान आणि वारसा जाणून घेऊ. ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांकांनुसार या सर्वात लोकप्रिय बौद्धांची क्रमवारी लावली गेली आहे.
भारतातील 32 सर्वश्रेष्ठ बौद्ध व्यक्ती (Pantheon HPI 2025 नुसार)
1. गौतम बुद्ध (HPI – 94.48)
कालावधी – इ.स.पू. 7वे-6वे शतक किंवा इ.स.पू. 6वे-5वे शतक

भगवान गौतम बुद्ध (इ.स.पू. 623/ 563 – इ.स.पू. 543/ 483) हे भारतीय तत्त्वज्ञ व बौद्ध धर्माचे संस्थापक असून त्यांना जगाचे सार्वकालिक आध्यात्मिक नेते मानले जातात. त्यांचा जन्म लुंबिनी येथे झाला. ते शाक्यकुलातील राजकुमार होते. सांसारिक वैभव असूनही त्यांनी राजमहालाचा त्याग केला.
बोधगया येथे कठोर साधना आणि ध्यानानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ते ‘बुद्ध’ झाले. त्यांनी चार आर्यसत्ये व अष्टांगिक मार्ग सांगितला. मध्यममार्ग हा जीवनातील खरी समतोल पद्धत आहे असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी जातिभेद, वर्णभेद, यज्ञयाग, हिंसा यांचा विरोध करून करुणा, प्रज्ञा आणि समता या मूल्यांचा प्रसार केला.
त्यांच्या उपदेशामुळे भारतात आणि नंतर संपूर्ण आशियात बौद्ध धर्माचा प्रसार झाला. ते थोर समाजसुधारक म्हणून देखील ओळखले जातात. आज जगभरातील कोट्यवधी लोक बुद्धांना ‘जगद्गुरू’ मानतात.
गौतम बुद्धांचा जागतिक क्रमांक 2
भारतातील सर्वाधिक HPI स्कोअर असलेली व्यक्ती म्हणजेच तथागत गौतम बुद्ध आहेत. ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक 2025 नुसार –
- जगात दुसऱ्या क्रमांकावर गौतम बुद्ध आहेत.
- पहिल्या क्रमांकावर मोहम्मद पैगंबर तर
- तिसऱ्या क्रमांकावर आयझॅक न्यूटन आहेत.
यावरून स्पष्ट होते की गौतम बुद्ध हे केवळ बौद्धांमध्ये श्रेष्ठ नाहीत, केवळ भारतीयांमध्ये श्रेष्ठ नाहीत, तर संपूर्ण जगभरात ते पहिल्या तीन सर्वश्रेष्ठ व्यक्तींपैकी एक आहेत.
2. सम्राट अशोक (HPI – 85.09)
कालावधी – इ.स.पू. 3रे शतक

सम्राट अशोक हे मौर्य वंशातील तिसरे सम्राट (इ.स.पू. २६८-२३२) आणि भारतीय उपखंडातील सर्वात महान शासक होते. चंद्रगुप्त मौर्य आणि बिंदुसार यांच्या पायावर उभारलेले साम्राज्य त्यांनी अफगाणिस्तान ते आसाम आणि म्हैसूरपर्यंत विस्तारित करून सर्वात विशाल व शक्तिशाली बनवले.
कलिंग युद्धातील प्रचंड हानीमुळे हृदयपरिवर्तन होऊन त्यांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारला आणि आपले आयुष्य बौद्ध धर्मप्रसाराला वाहिले. त्यांनी शिलालेख, स्तंभ, स्तूप आणि विहार उभारून मानवतावादी बौद्ध संदेश प्रसारित केले; सांची, सारनाथ, बोधगया येथील स्मारक आजही विद्यमान आहेत.
त्यांनी आपल्या मुलांना – पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा ह्यांना श्रीलंकेत धर्मप्रसारासाठी पाठवले. त्यांच्या प्रयत्नामुळे बौद्ध धर्म भारतातून आशियात, विशेषतः श्रीलंका, बर्मा, चीन, थायलंडमध्ये पोहोचला. त्यांच्या कारकीर्दीत तिसरे बौद्ध संमेलन झाले, ज्याने थेरवाद बौद्ध धर्माला प्रोत्साहन मिळाले.
प्रजाकल्याणासाठी रुग्णालये, विहिरी, रस्ते, वृक्षारोपण आणि जनावरांची काळजी यासारख्या योजना राबवल्या. त्यांचा वारसा भारताच्या राजमुद्रा-सिंहस्तंभ (अशोकस्तंभ) आणि ध्वजातील अशोकचक्रात जिवंत आहे. अलेक्झांडर व सीझरसारख्या जगप्रसिद्ध शासकांमध्ये ते युद्धवीर नव्हे, तर करुणा व धर्मनीतीमुळे वेगळे ठरतात.
3. 14वे दलाई लामा (HPI – 83.17)
कालावधी – इ.स. 20वे – 21वे शतक (1935 – आजपर्यंत)

90 वर्षीय आध्यात्मिक नेता 14वे दलाई लामा, तेनझिन ग्यात्सो, यांचा जन्म 1935 मध्ये तिबेटमध्ये झाला. बालपणीच त्यांना तिबेटी बौद्धधर्माचे आध्यात्मिक नेते म्हणून ओळखले गेले. 1959 मध्ये चीनने तिबेटवर कब्जा केल्यानंतर त्यांनी भारतात आश्रय घेतला आणि धर्मशाळेत निर्वासित सरकार स्थापन झाले.
ते तिबेटी बौद्ध धर्माचे सर्वोच्च नेते आहेत. शांतता, अहिंसा, करुणा यासाठी त्यांनी जगभर प्रवास केला. 1989 मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. ते म्हणतात की मी “भारताचा अध्यात्मिक पुत्र” आहे, आणि ते गेल्या 65 वर्षांहून अधिक काळ भारतात वास्तव्य करीत आहेत.
ते आज बौद्ध धर्माचे जागतिक दूत मानले जातात. त्यांच्या शिकवणुकीत मानवी हक्क, धार्मिक सहिष्णुता आणि विज्ञानाशी संवाद दिसून येतो. त्यांचे उपदेश केवळ तिबेट्यांपुरते किंवा बौद्धांपुरते मर्यादित नाहीत, तर संपूर्ण मानवजातीला प्रेरणादायी आहेत. त्यांना ‘भारतरत्न‘ पुरस्कार देण्याची मागणी सुद्धा होत आहे.
4. आचार्य नागार्जुन (HPI – 80.71)
कालावधी – इ.स. 2रे – 3रे शतक

आचार्य नागार्जुन (150 – 250) हे महायान बौद्ध धर्मातील महान तत्त्वज्ञ होते. याशिवाय त्यांना खगोलशास्त्रज्ञ, खनिजशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, वैद्य, शून्यवादाचे उद्गाते व भिक्खू म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी माध्यमिक तत्त्वज्ञान विकसित केले ज्यामध्ये शून्यता (सर्व गोष्टींचा नश्वरपणा) केंद्रस्थानी आहे. म्हणजेच सर्व गोष्टींचा स्वतंत्र, शाश्वत स्वभाव नसतो, त्या परस्परावलंबी असतात.
त्यांच्या मूलमाध्यमककारिका या ग्रंथाला महायान परंपरेतील मूलभूत तत्त्वज्ञान मानले जाते. नागार्जुनांनी बुद्धांच्या उपदेशांचे तर्कशास्त्रीय विश्लेषण केले व धर्माला बौद्धिक गाभा दिला.
त्यांच्या लेखनामुळे बौद्ध धर्माला तात्त्विक व तर्कशास्त्रीय पाया मिळाला. त्यांनी सामान्य लोकांसाठी धर्म समजण्याजोगा करून सांगितला, तर विद्वानांसाठी गहन तत्त्वज्ञान विकसित केले.
चीन, जपान, तिबेट यांसारख्या देशांत त्यांचा प्रभाव आजही जिवंत आहे. अनेकदा त्यांना ‘दुसरे बुद्ध’ म्हणूनही गौरविले जाते. आध्यात्मिकता, तार्किक कुशाग्रता आणि आत्मिक मर्मदृष्टी या बाबींमध्ये आद्य शंकराचार्यांचा अपवाद वगळता भारतात त्यांच्या तोडीचा दुसरा कोणी विचारवंत झाला नाही.
5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (HPI – 80.47)
कालावधी – इ.स. 20वे शतक (1891–1956)

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार, तत्त्वज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी आजीवन अस्पृश्यतेविरुद्ध आणि सामाजिक विषमतेविरुद्ध लढा दिला.
14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे त्यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. या ऐतिहासिक घटनेमुळे भारतात नवबौद्ध चळवळ निर्माण झाली. त्यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांना बुद्धांच्या धर्माशी जोडले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतरामुळे 20व्या शतकात बौद्ध धर्माचे मोठे पुनरुज्जीवन झाले. सम्राट अशोकांनंतर बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी भारतामध्ये सर्वाधिक कार्य बाबासाहेबांनी केलेले आहे. आज भारतातील बहुसंख्य बौद्ध लोक त्यांना प्रेरणास्थान मानतात.
हेही पाहा : टॉप 30 सर्वात प्रसिद्ध भारतीय व्यक्तिमत्त्वे; लोकप्रियता निर्देशांकांनुसार क्रमवारी
6. सम्राट कनिष्क (HPI – 79.23)
कालावधी – इ.स. 1ले – 2रे शतक

कनिष्क हा कुषाण वंशातील एक पराक्रमी सम्राट होता. त्याचे साम्राज्य काबूलपासून ते वाराणसीपर्यंत पसरले होते. कनिष्क सुमारे इ.स. 127 ते 151 या काळात सत्तेवर होता.
तो बौद्ध धर्माचा मोठा संरक्षक होता. त्याच्या कारकीर्दीत काश्मीरमधील कुंडलवन येथे बौद्ध धर्माची चौथी परिषद भरवण्यात आली होती, ज्यामुळे महायान बौद्ध धर्माला मजबूत आधार मिळाला.
कनिष्काच्या आश्रयामुळेच गंधार शैलीतील बुद्धाच्या मूर्ती घडवायला सुरुवात झाली. भारतामध्ये सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुषाण राजवटीतच झाली. कनिष्काची सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहेत, आणि त्यावर गौतम बुद्ध तसेच इतर भारतीय देवतांची चित्रं कोरलेली आहेत.
त्याच्या कारकीर्दीमुळे भारत आणि मध्य आशिया यांच्यातला एक महत्त्वाचा सांस्कृतिक सेतू निर्माण झाला. त्याच्यामुळे बौद्ध धर्म चीनपर्यंत पोहोचू शकला. तो स्वतः बौद्ध धर्माचे पालन करणारा सम्राट होता.
7. भिक्खू आनंद (HPI – 78.44)
कालावधी – इ.स.पू. 6वे – 5वे शतक

भिक्खू आनंद हे भगवान बुद्धांचे चुलतभाऊ व प्रमुख शिष्य होते. ते बुद्धांचे वैयक्तिक सेवक आणि सतत सोबती म्हणून ओळखले जात.
त्यांना बौद्ध धर्माचे “स्मृतीभांडार” किंवा धर्मस्मृतीचा महासागर म्हटले जाते. कारण त्यांनी बुद्धांचे अनेक प्रवचने ऐकून पाठ केले आणि नंतरच्या काळात त्यांचे संकलन केले. पहिल्या बौद्ध संमेलनात आनंद यांनी बुद्धवचनांचे पठण केले.
सुत्त पिटकामध्ये असलेली बहुतांश सुत्ते पहिल्या बौद्ध परिषदेदरम्यान बुद्धांने दिलेल्या उपदेशाच्या आनंदला झालेल्या स्मरणावर बेतलेली आहेत. या कारणासाठी आनंदला ‘धर्मरक्षक’ मानले जाते. त्यांचा स्मरणशक्तीचा अद्वितीय वारसा बौद्ध त्रिपिटकाच्या निर्मितीस कारणीभूत ठरला.
आनंद सुद्धा एक राजपुत्र होता. बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या वीस वर्षानंतर आनंदचे निर्वाण झाले. बुद्धांच्या संघामध्ये महिलांचा समावेश करण्यामध्ये आनंद यांची महत्त्वाची भूमिका होती.
8. भिक्खू बोधिधर्म (HPI – 78.17)
कालावधी – इ.स. 5वे – 6वे शतक

भिक्खू बोधिधर्म हे दक्षिण भारतातील पाल्लव राजघराण्यात जन्मले. त्यांनी चीनमध्ये जाऊन बौद्ध धर्मप्रसार केला. तेथे त्यांनी झेन बौद्ध धर्माची पायाभरणी केली. त्यांना औषधशास्त्राचेही सखोल ज्ञान होते.
बोधिधर्मांनी शाओलिन मंदिरात साधना केली आणि ध्यान व मार्शल आर्ट यांचा संगम घडवून आणला. त्यांच्याच नेतृत्वातून शाओलिन कंग फू या युद्धप्रकाराचा उदय झाला. त्यामुळेच ते चीन, कोरिया व जपानमध्ये अत्यंत पूजनीय आहेत.
त्यांना झेन (चान) बौद्ध संप्रदायाचे प्रवर्तक मानले जाते तसेच त्यांना अनेकदा ‘दुसरे बुद्ध’ देखील म्हटले जाते. त्यांचा वारसा म्हणजे झेन परंपरेतील ध्यानमार्ग आणि आत्मानुशासनाची शिकवण होय.
9. भिक्खू पद्मसंभव (HPI – 78.07)
कालावधी – इ.स. 8वे शतक

पद्मसंभव हे तिबेटी बौद्ध धर्माचे संस्थापक मानले जातात. त्यांना गुरु रिनपोचे (अमूल्य गुरु) या नावाने ओळखले जाते.
त्यांनी तंत्रमार्ग आणि योगसाधना यांचा तिबेटमध्ये प्रसार केला. त्यांनी तिबेटी स्थानिक देवतांना बौद्ध धर्मात समाविष्ट करून धर्माला व्यापक रूप दिले.
आज तिबेट, भूतान, नेपाळ येथे पद्मसंभवांची स्मृती पवित्र मानली जाते. त्यांना ‘दुसरे बुद्ध’ म्हणूनही मानले जाते.
10. भिक्खुनी यशोधरा (HPI – 77.75)
कालावधी – इ.स.पू. 6वे – 5वे शतक
यशोधरा या भगवान बुद्धांच्या पत्नी होत्या. त्यांचा जन्म कोलिय वंशात झाला होता. सिद्धार्थाने घरत्याग केला तेव्हा त्या कुमार राहुलासह राहिल्या. नंतर त्यांनीही भिक्खुनीसंघात प्रवेश केला.
त्यांच्या जीवनकथेतून त्याग, धैर्य आणि समर्पण दिसते. त्या बौद्ध स्त्रियांसाठी आदर्श आहेत.
बुद्धांच्या शिकवणुकीला त्यांनी कुटुंबाच्या दृष्टिकोनातून अनुभवले. त्यामुळे त्यांचा उल्लेख बौद्ध इतिहासात महत्त्वपूर्ण मानला जातो.
11. महामाया (HPI – 77.09)
कालावधी – इ.स.पू. 6वे शतक
महाराणी महामाया या भगवान बुद्धांच्या मातोश्री होत्या. त्यांचा जन्म कोलिय वंशात झाला होता. शाक्य वंशाचा राजा शुद्धोधनांशी विवाह झाल्यानंतर त्या कपिलवस्तूमध्ये आल्या.
महामायांचा स्वभाव पवित्र आणि शांत होता. बुद्धांचा जन्म लुंबिनीच्या उपवनात त्यांच्या गर्भातून झाला आणि सातव्या दिवशीच त्यांचे निधन झाले. त्यामुळे बुद्धांना त्यांच्या मातृप्रेमाचा दीर्घ अनुभव घेता आला नाही. बुद्धांचे बालपण त्यांची मावशी महामहाप्रजापती गौतमी यांच्या देखरेखीखाली गेले.
महामाया बौद्ध इतिहासातील एक पवित्र व आदरणीय व्यक्तिमत्व आहेत. त्यांचा उल्लेख प्रत्येक बुद्धचरित्रात अत्यंत सन्मानाने केला जातो. महामाया स्वतः धर्मसंघात सहभागी झाल्या नाहीत, पण त्यांचा मातृत्व वारसा संपूर्ण बौद्ध परंपरेत जिवंत आहे. बुद्धांचे जन्मस्थान लुंबिनी हे त्यांच्याशी कायम जोडलेले आहे.
भारतातील सर्वात महान बौद्ध व्यक्तित्व
12. भिक्खू बुद्धघोष (HPI – 76.08)
कालावधी – इ.स. 5वे शतक
भिक्खू बुद्धघोष हे श्रीलंकेतील महत्त्वाचे बौद्ध पंडित होते. मूळचे ते भारतातील तमिळ प्रदेशातील होते. त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञान पाली भाषेत सोप्या रीतीने मांडले.
त्यांचा विशुद्धीमग्ग हा ग्रंथ बौद्ध ध्यानसाधनेचा आणि तात्त्विक विश्लेषणाचा आधारभूत ग्रंथ आहे. त्यांनी त्रिपिटकावर विस्तृत टीकाग्रंथ लिहिले.
बुद्धघोषांच्या कार्यामुळे बौद्ध धर्माला विद्वत्तेचा नवा आयाम मिळाला. आजही थेरवाद परंपरेत त्यांचा ग्रंथ पवित्र मानला जातो.
13. राजा बिंबिसार (HPI – 75.93)
कालावधी – इ.स.पू. 6वे – 5वे शतक
बिंबिसार हे मगधचे सामर्थ्यशाली सम्राट होते. ते बुद्धांचा समकालीन होते. त्यांनी बुद्धांना राजगृहाजवळील वेलुवनाराम दान दिला, जो पहिला बौद्ध विहार मानला जातो.
बिंबिसार हे बौद्ध धर्माचे आश्रयदाता होते. त्यांनी बुद्धांचे अनेक प्रवचन ऐकले व त्यांचा आदर केला. त्यांच्या कारकीर्दीत मगध साम्राज्य बौद्ध धर्माचे महत्त्वाचे केंद्र बनले.
इ.स. पूर्व सहाव्या शतकात भारतात कुरू, पांचाल, गांधार, अवंती, मगध यासारखी एकूण सोळा महाजनपदे होती. यातील मगध महाजनपदाचे साम्राज्यात रुपांतर करण्याची सुरुवात बिंबिसार यांनी केली. त्यांनी मगधला राजकीय प्रतिष्ठा मिळवून दिली.
त्यांचा मुलगा अजातशत्रू नंतर बौद्ध धर्माशी जोडला गेला. बिंबिसारांच्या आश्रयामुळे बौद्ध संघटनेला सुरुवातीला भक्कम पाठबळ मिळाले.
14. भिक्खू सारिपुत्र (HPI – 74.70)
कालावधी – इ.स.पू. 5वे शतक

भिक्खू सारिपुत्र हे भगवान बुद्धांचे प्रमुख शिष्य होते. ते मूळचे ब्राह्मण कुटुंबात जन्मले. त्यांची बुद्धी विलक्षण तीक्ष्ण होती.
सारिपुत्रांना धम्माचा महासेनापती म्हटले जाते. त्यांनी बौद्ध संघटनेची रचना मजबूत केली. अनेक भिक्खू त्यांचे शिष्य होते.
बुद्धांपूर्वी सारिपुत्रांचे निर्वाण झाले. बुद्धांनी सारीपुत्र यांना आपला सर्वात हुशार शिष्य घोषित केल्याचे मानले जाते. त्यांच्या तत्त्वज्ञानातील स्पष्टता, करुणा व संघटनशक्तीमुळे बौद्ध धर्माला स्थैर्य मिळाले. त्यांचा वारसा आजही आदरपूर्वक स्मरला जातो.
15. राजा अजातशत्रू (HPI – 74.51)
कालावधी – इ.स.पू. 5वे शतक
अजातशत्रू हे राजा बिंबिसार यांचे पुत्र व मगधचे सम्राट होते. सुरुवातीला त्यांनी आपल्या वडिलांना कैद केले, पण नंतर त्यांना पश्चात्ताप झाला आणि ते बुद्धांचे अनुयायी झाले.
त्यांच्या राज्यकाळात पहिले बौद्ध संमेलन झाले. त्यांनी राजगृहात या संमेलनासाठी पाठिंबा दिला.
त्यांच्या आश्रयामुळे बौद्ध संघटना टिकून राहिली. अजातशत्रूंचा बदललेला दृष्टिकोन दाखवतो की बुद्धांचा उपदेश कठोर हृदयालाही परिवर्तित करू शकतो.
16. महाप्रजापती गौतमी (HPI – 73.12)
कालावधी – इ.स.पू. 6वे – 5वे शतक
महाप्रजापती गौतमी या बुद्धांच्या सावत्र आई, मावशी व पालनकर्त्या होत्या. महामायांच्या निधनानंतर त्यांनी बुद्धांचे संगोपन केले.
गौतमी यांच्या आग्रहामुळे बुद्धांनी स्त्रियांसाठी संघाची दारे उघडली. त्यामुळे बौद्ध धर्मात स्त्रियांना धार्मिक अधिकार मिळाले. महाप्रजापती गौतमी यांनी थेट बुद्धांकडून धम्मदीक्षा घेतली आणि त्या जगातील पहिल्या भिक्खुनी ठरल्या.
गौतमींचे योगदान म्हणजे स्त्रियांना आध्यात्मिक मार्गावर समान संधी मिळवून देणे. त्यांचा वारसा आजही भिक्खुनी संघाच्या रूपात टिकून आहे.
17. आचार्य वसुबंधू (HPI – 72.33)
कालावधी – इ.स. 4थे शतक

आचार्य वसुबंधू हे चौथ्या शतकातील महान बौद्ध तत्त्वज्ञ आणि योगाचार संप्रदायाचे प्रमुख आचार्य होते. ते मूळचे गांधार प्रदेशातील (सध्याचे पाकिस्तान) होते.
त्यांनी ‘विज्ञानवाद’ किंवा ‘चित्तमात्र’ ही संकल्पना मांडली, ज्यात सर्व जग हे मनाच्या जाणिवेचे प्रक्षेपण आहे असे सांगितले जाते. या शिकवणींनी महायान बौद्ध धर्माला नवी दिशा मिळाली आणि त्यांच्या कार्यामुळे बौद्ध धर्मात तत्त्वज्ञान व मानसशास्त्राचा संगम झाला.
त्यांनी शेकडो ग्रंथांची रचना केली, ज्यात अभिधर्मकोश हा विशेष प्रसिद्ध आहे. या ग्रंथात त्यांनी बौद्ध धर्मातील ज्ञान, ध्यान, करुणा यांचे सखोल विवेचन केले, तसेच मन व चेतनेचे गहन विश्लेषण मांडले.
सुरुवातीला त्यांनी सर्वत्ववाद आणि सौत्रिक शाखांच्या दृष्टीकोनातून अभिधम्मपिटकावर भाष्य लिहिले; नंतर महायान बौद्ध धर्म अंगीकारून सावत्र बंधू असंग यांच्यासह योगाचार शाखेचे मुख्य संस्थापक ठरले. त्यांच्या लेखनामुळे बौद्ध तत्त्वज्ञानाला वैज्ञानिक आणि व्यवस्थित रूप मिळाले.
वसुबंधूंचा वारसा चीन, कोरिया, जपान आणि आशियातील अनेक देशांपर्यंत पोहोचला, जेथे योगाचार पंथ अनेक बौद्ध परंपरांचा आधारस्तंभ बनला.
18. भिक्खू राहुल (HPI – 71.96)
कालावधी – इ.स.पू. 6वे – 5वे शतक
राजकुमारी यशोधरा आणि भगवान बुद्धांचे सुपुत्र राहुल यांचा उल्लेख बौद्ध इतिहासात महत्त्वपूर्ण आहे. इ.स.पू. सहाव्या शतकात जन्मलेले राहुल पुढे स्थवीर भिक्खू झाले. लहान वयातच त्यांनी धर्मसंघात प्रवेश केला आणि बुद्धांनी त्यांना संयम व साधनेचा उपदेश दिला.
पालि त्रिपिटकामध्ये राहुलसूत्त व अम्बलट्ठिक-राहुलसूत्त या प्रवचनांत बुद्धांनी राहुला यांना प्रामाणिकपणा, आत्मपरीक्षण आणि नैतिक आचरणाचे महत्त्व शिकवले. राहुल हे बुद्धांच्या शिकवणींना अत्यंत निष्ठेने आचरणात आणणारे शिष्य मानले जातात.
बौद्ध परंपरेत राहुलाला आदर्श भिक्खू म्हणून गौरवले जाते. त्यांचे जीवन हे मुलांनी आपल्या पालकांकडून शिकलेल्या धर्ममूल्यांचे एक उत्तम उदाहरण ठरले.
19. अतिष दीपंकर (HPI – 71.86)
कालावधी – इ.स. 10वे – 11वे शतक
इ.स. 982–1054 या काळात होऊन गेलेले आचार्य अतिष दीपंकर हे बंगालमधील थोर बौद्ध आचार्य होते. त्यांनी तिबेटमध्ये धर्मप्रसार करून बौद्ध धर्माला नवजीवन दिले. त्यामुळे त्यांना तिबेटमध्ये अत्यंत आदराचे स्थान आहे. ते बिहारमधील विक्रमशिला मठात देखील राहिले.
अतिषांनी बोधिपथप्रदीप हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला, ज्यामध्ये साधकांसाठी बोधीप्राप्तीचा मार्ग स्पष्ट केला आहे. त्यांची शिकवण सोपी, व्यवहार्य आणि सर्वांसाठी उपयुक्त होती.
आजही तिबेटी बौद्ध धर्मातील अनेक पंथ त्यांना आपला मार्गदर्शक मानतात. त्यांच्या आयुष्यामुळे भारत व तिबेट या दोन देशांतील सांस्कृतिक व धार्मिक संबंध अधिक दृढ झाले.
20. राजा शुद्धोधन (HPI – 71.73)
कालावधी – इ.स.पू. 6वे शतक
शाक्यकुलाचे प्रमुख आणि भगवान बुद्धांचे पिताश्री राजा शुद्धोधन यांचे जीवन बौद्ध परंपरेत विशेष महत्त्वाचे आहे. त्यांनी सिद्धार्थाला ऐश्वर्यसंपन्न जीवन दिले, परंतु पुढे सिद्धार्थाने घरत्याग करून ज्ञानमार्ग स्वीकारला व ‘बुद्ध’ झाले.
प्रथम त्यांच्या मुलाच्या निर्णयाला शुद्धोधनांनी विरोध केला. पण नंतर त्यांनी बुद्धांच्या उपदेशांचा स्वीकार करून बौद्ध धर्माचा आदर केला. काही ग्रंथांनुसार त्यांनी जीवनाच्या अखेरीस धर्मसंघात प्रवेश केला आणि भिक्खू बनले.
शुद्धोधनांचा उल्लेख हा केवळ पित्याच्या भूमिकेत नाही, तर राजसत्तेतून धर्ममार्गाकडे झुकलेली व्यक्ती म्हणून केला जातो. त्यांचा वारसा म्हणजे राजकीय ऐश्वर्य असूनही धर्ममार्गाचा सन्मान करणारा दृष्टिकोन होय.
21. भिक्खू मौद्गल्यायन (HPI – 71.51)
कालावधी – इ.स.पू. 6वे – 5वे शतक
भगवान बुद्धांचे प्रमुख दोन शिष्यांपैकी भिक्खू मौद्गल्यायन हे एक होते (दुसरे सारिपुत्र). ते ध्यान व अद्भुत आध्यात्मिक सामर्थ्यासाठी ओळखले जात. इ.स.पू. सहाव्या शतकात ते बुद्धांच्या संघात सामील झाले आणि बुद्धांनंतर धर्मसंघातील अग्रगण्य गुरु म्हणून मान्यता मिळाली.
पालि साहित्यानुसार मौद्गल्यायन यांना विलक्षण अध्यात्मिक शक्ती होत्या. त्यांनी त्या शक्तींचा उपयोग लोककल्याणासाठी केला. तथापि, त्यांच्या या सामर्थ्यांचा वापर बुद्धांनी नेहमीच संयमाने करण्यास सांगितला होता.
मौद्गल्यायनांचे जीवन हे साधना, करुणा आणि धर्मनिष्ठा यांचे आदर्श आहे. त्यांचा वारसा आजही बौद्ध भिक्खूंसाठी प्रेरणादायी ठरतो.
22. सम्राट हर्षवर्धन (HPI – 71.12)
कालावधी – इ.स. 7वे शतक
सातव्या शतकातील सम्राट हर्षवर्धन हे उत्तर भारतातील एक शक्तिशाली सम्राट होते. ते पुष्याभूती साम्राज्यातील शेवटचे सम्राट होते.
त्यांनी आपले राज्य बौद्ध धर्माच्या मूल्यांवर आधारले. हर्षवर्धनांनी कन्नौज येथे भव्य धर्मसभा आयोजित केली, ज्यामध्ये बौद्ध धर्माच्या शिकवणींचा प्रचार झाला.
त्यांच्या राज्यात धर्मनिरपेक्षता व सहिष्णुता यांना विशेष स्थान होते. त्यांनी आपल्या प्रजेसाठी कल्याणकारी गोष्टी केल्या. त्यांनी भिक्खू व भिक्खुनींना दान दिले आणि संघाच्या प्रगतीस हातभार लावला.
सम्राट हर्ष यांचा वारसा म्हणजे बौद्ध धर्माचा वैभवशाली आश्रय होय. त्यांनी बौद्ध धर्माला शासकीय पाठबळ देऊन त्याचे पुनरुज्जीवन केले.
देशातील विख्यात बौद्ध व्यक्ती
23. आचार्य अश्वघोष (HPI – 70.30)
कालावधी – इ.स. 1ले – 2रे शतक
इ.स. पहिल्या-दुसऱ्या शतकातील आचार्य अश्वघोष हे संस्कृत साहित्यिक, नाटककार आणि कवी होते. त्यांनी बुद्धचरित हे महाकाव्य लिहिले, ज्यामध्ये भगवान बुद्धांच्या जीवन व कार्याचे वर्णन केले आहे. त्यांनी वज्रसूची हा प्रसिद्ध ग्रंथ देखील लिहिला.
अश्वघोषांनी बौद्ध धर्माची शिकवण काव्यरूपाने लोकांपर्यंत पोहोचवली. त्यांची शैली सुबोध आणि प्रभावी होती. त्यामुळे सामान्य जनतेला बौद्ध धर्म समजणे सोपे झाले.
अश्वघोषांचा वारसा म्हणजे धर्माचे साहित्यिक रुपांतर. त्यांना कालिदासापूर्वीच्या काळातील अग्रणी भारतीय नाटककार मानले जाते. त्यांनी धर्मशास्त्राला काव्य व नाट्याच्या माध्यमातून लोकप्रिय केले.
24. भिक्खू महाकश्यप (HPI – 71.13)
कालावधी – इ.स.पू. 6वे – 5वे शतक
भगवान बुद्धांचे निकटवर्ती शिष्य भिक्खू महाकश्यप हे धर्मसंघातील एक महत्त्वाचे स्तंभ होते. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर पहिल्या धर्मसंगितीचे नेतृत्व त्यांनी केले. त्यामुळे बौद्ध धर्माचे संरक्षण आणि पुढील पिढ्यांपर्यंत त्याचे प्रेषण शक्य झाले.
महाकश्यप हे अत्यंत कठोर तपश्चर्या करणारे साधक होते. त्यांनी साधेपणा, संयम आणि वैराग्य यांचा आदर्श ठेवला.
सुरुवातीच्या बौद्ध शाखांमधील ते पहिले कुलपुरूष मानले जातात आणि चान आणि झेन बौद्ध परंपरेत कुलगुरू म्हणून त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका कायम राहिली आहे.
त्यांचा वारसा म्हणजे भिक्खू संघाची अखंडता टिकवून ठेवणे. महाकश्यपांशिवाय बौद्ध धर्माची परंपरा शतकानुशतके टिकून राहिली नसती.
25. आचार्य असंग (HPI – 69.93)
कालावधी – इ.स. 4थे शतक
आचार्य असंग हे चौथ्या शतकातील महायान बौद्धतत्त्वज्ञ होते. ते वसुबंधूंचे भाऊ होते आणि त्यांनी योगाचार पंथाची मांडणी केली.
भिक्खू असंगांचे योगाचारभूमि शास्त्र हे महत्त्वाचे ग्रंथ आहे, ज्यामध्ये ध्यान, करुणा आणि प्रज्ञा यांचे सविस्तर विवेचन आहे. त्यांनी साधकांसाठी अष्टांगिक साधनेची नवी मांडणी केली.
त्यांचा वारसा चीन, कोरिया आणि जपानपर्यंत पोहोचला. योगाचार पंथ आजही त्यांच्या नावाशी जोडला जातो.
26. भिक्खू महेंद्र (HPI – 69.02)
कालावधी – इ.स.पू. 3रे शतक (285 – 205)
सम्राट अशोकांचा सुपुत्र भिक्खू महेंद्र यांनी बौद्ध धर्म श्रीलंकेत नेण्याचे ऐतिहासिक कार्य केले. इ.स.पू. तिसऱ्या शतकात त्यांनी आपल्या भगिनी संघमित्रेसह श्रीलंकेत धर्मप्रचार केला.
महेंद्रांच्या उपदेशामुळे श्रीलंकेत थेरवाद बौद्ध धर्माची पायाभरणी झाली. पुढे हा धर्म तेथे राष्ट्रीय संस्कृतीचा गाभा ठरला.
महेंद्रांचा वारसा म्हणजे भारताबाहेर बौद्ध धर्माचे यशस्वी प्रसारकार्य. त्यांच्या कार्यामुळे आजही श्रीलंका बौद्ध परंपरेचे प्रमुख केंद्र आहे.
27. भिक्खुनी संघमित्रा (HPI – 68.90)
कालावधी – इ.स.पू. 3रे शतक (282 BC – 203 BC)
सम्राट अशोकांची कन्या भिक्खुनी संघमित्रा या बौद्ध इतिहासातील आदरणीय महिला आहेत. त्यांनी श्रीलंकेत भिक्खुनी संघाची स्थापना केली. त्यांनी बंधू महेंद्रसह बौद्ध धर्म श्रीलंकेत नेण्याचे महत्त्वाचे कार्य केले.
संघमित्रा यांनी श्रीलंकेत बुद्धांच्या पवित्र बोधिवृक्षाचे रोप नेले, जे आजही बौद्धांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे. त्यांच्या कार्यामुळे स्त्रियांनाही धर्मसंघात प्रतिष्ठा व स्थान मिळाले.
त्यांचा वारसा म्हणजे स्त्री-पुरुष समानतेचे प्रतीक. संघमित्रांच्या योगदानामुळे बौद्ध धर्माने जागतिक पातळीवर स्त्रियांना स्थान दिले.
28. आचार्य शांतिदेव (HPI – 67.07)
कालावधी – इ.स. 8वे शतक (685 – 763 )
इ.स. आठव्या शतकातील आचार्य शांतिदेव हे एक महान महायान बौद्ध आचार्य, तत्त्वज्ञ आणि कवी होते. त्यांचा जन्म सौराष्ट्र (आजचे गुजरात) येथे झाला होता, असे मानले जाते. नालंदा विद्यापीठात त्यांनी भिक्खू म्हणून दीक्षा घेतली आणि तिथेच त्यांनी आपले गहन बौद्ध शिक्षण पूर्ण केले.
ते नालंदाच्या महाविहारातील विद्वान होते. तसेच ते नागार्जुनांच्या माध्यमक तत्त्वज्ञानाचे अनुयायी होते. त्यांनी वैयक्तिक कीर्तीपेक्षा सामूहिक कल्याणाला प्राधान्य दिले.
शांतीदेव यांचे सर्वात प्रसिद्ध कार्य म्हणजे “बोधिचर्यावतार” (Bodhicaryāvatāra) हे महाकाव्य. या ग्रंथामध्ये बोधिसत्त्वाच्या जीवनमार्गाचे आणि करुणा, प्रज्ञा, सहिष्णुता, परोपकार यांसारख्या गुणांचे उत्कृष्ट वर्णन आहे. हा ग्रंथ आजही संपूर्ण जगभरातील बौद्ध साधक आणि विद्वान अभ्यासतात.
शांतीदेव यांनी बौद्ध धर्मामध्ये करुणेचे महत्त्व, प्रज्ञेचे आकलन आणि बोधिसत्त्वाचा मार्ग यांचा प्रचार केला. त्यांनी सांगितले की खऱ्या अर्थाने साधना म्हणजे दुसऱ्यांच्या कल्याणासाठी स्वतःला वाहून घेणे. त्यांच्या शिकवणीमुळे तिबेटमध्ये बौद्ध धर्माला नवी दिशा मिळाली.
आजही त्यांच्या शिकवणींमुळे जगभरातील बौद्ध साधक प्रेरित होतात. त्यांचा वारसा म्हणजे करुणा व निःस्वार्थी आचरणाची शाश्वत शिकवण होय. “बोधिचर्यावतार” हा ग्रंथ आजही महायान बौद्ध धर्मातील सर्वात प्रभावी ग्रंथांपैकी एक मानला जातो.
करुणा, प्रज्ञा आणि परोपकार यावर दिलेला भर हा त्यांच्या तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. तिबेटी बौद्ध धर्मात आणि जगभरातील अनेक साधकांमध्ये शांतीदेव यांना “करुणेचा कवी” म्हणून मोठा मान आहे.
29. आचार्य अनिरुद्ध (HPI – 64.45)
कालावधी – इ.स.पू. 6वे – 5वे शतक
भगवान बुद्धांचे एक प्रमुख शिष्य आचार्य अनिरुद्ध ध्यानसामर्थ्यासाठी प्रसिद्ध होते. ते बुद्धांचे चुलत भाऊ होते. त्यांनी बौद्ध धर्माच्या शिकवणींना आयुष्यभर समर्पित केले.
भिक्खू अनिरुद्ध यांना दृष्टी गमावल्यानंतरही अद्भुत आध्यात्मिक दृष्टि प्राप्त झाली असे सांगितले जाते. त्यांनी धर्मसंघात निष्ठा व कर्तव्यपरायणतेचे आदर्श ठेवले.
त्यांचा वारसा म्हणजे अडचणी असूनही धर्ममार्गावर टिकून राहण्याची प्रेरणा होय.
30. आचार्य दिग्नाग (HPI – 64.39)
कालावधी – इ.स. 5वे शतक
पाचव्या शतकातील आचार्य दिग्नाग (किंवा दिङ्नाग) हे बौद्ध तर्कशास्त्राचे महान आचार्य होते. त्यांनी प्रमाणसमुच्चय हा ग्रंथ लिहिला. दिङ्नाग दोनच प्रमाण स्वीकारत होते – प्रत्यक्ष आणि अनुमान.
दिग्नागांनी ज्ञान, तर्क आणि प्रमाण यांचा अभ्यास करून बौद्ध तत्त्वज्ञानाला मजबूत पाया दिला. त्यांच्या विचारांचा प्रभाव पुढील तत्त्वज्ञ धर्मकीर्तींवरही झाला.
त्यांचा वारसा म्हणजे बौद्ध तर्कशास्त्राची समृद्ध परंपरा होय. आजही भारतीय व तिबेटी बौद्ध विद्यापीठांत त्यांचे ग्रंथ अभ्यासले जातात.
30. आचार्य शांतरक्षित (HPI – 64.39)
कालावधी – इ.स. 8वे शतक

आचार्य शांतरक्षित (725 – 788) हे आठव्या शतकातील महान बौद्ध गुरु होते. त्यांनी तिबेटमध्ये बौद्ध धर्माची दृढ पायाभरणी केली. ते माध्यमक शाखेचे तत्त्वज्ञ होते.
भिक्खू शांतरक्षित यांनी तर्कशास्त्र, ध्यान आणि नैतिकतेचा संगम साधून साधकांना प्रेरणा दिली. त्यांनी पद्मसंभवांसह तिबेटमध्ये धर्मप्रचार केला.
त्यांचा वारसा म्हणजे तिबेटमधील बौद्ध धर्माचा मजबूत पाया होय. तिबेटी बौद्ध परंपरेत त्यांना “महागुरु” म्हणून ओळखले जाते.
32. फुलन देवी (HPI – 62.37)
कालावधी – इ.स.20वे – 21वे शतक
1963 मध्ये जन्मलेल्या फुलन देवी या भारतातील एक बहुचर्चित राजकीय व्यक्तिमत्त्व, समाजसेविका आणि दलित अधिकारांसाठी संघर्ष करणाऱ्या नेत्या होत्या. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील एका तथाकथित खालच्या जातीच्या कुटुंबात झाला. बालवयात झालेला अन्याय, विवाहातील संकटे, तसेच समाजातील अत्याचार यामुळे त्यांच्या आयुष्याला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला.
समाजातील जातीय भेदभाव, सतत होणारे लैंगिक अत्याचार या अन्यायाविरुद्ध बंड करत त्यांनी डाकुचे जीवन स्वीकारले, परंतु नंतर आत्मसमर्पण करून त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. नंतरच्या काळात (1966मध्ये) त्या लोकसभेच्या खासदार बनल्या आणि दलित, महिला व दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी उभ्या राहिल्या.
तत्पूर्वी, 1995 मध्ये नागपूरच्या दीक्षाभूमी येथे फुलन देवी आणि त्यांचे पती उमेदसिंह यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्या वेळी त्यांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते आणि संपूर्ण विधीनिशी भिक्खूंना साक्षी ठेवून धर्मांतर केले. हा निर्णय त्यांनी केवळ धार्मिक स्वरूपात न घेता सामाजिक क्रांतीच्या दृष्टीने घेतला होता.
बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर फुलन देवी यांनी समता, न्याय आणि करुणा या तत्वांना आपल्या आयुष्याचा आधार मानले. जातीय शोषण आणि विषमतेच्या विरोधात त्यांनी उभा केलेला लढा हा त्यांच्या बौद्ध धर्माच्या मूल्यांवरील निष्ठेचे द्योतक ठरतो. त्यांच्या आयुष्याचा वारसा म्हणजे दलित, पीडित आणि शोषित समाजासाठी केलेली अविरत झुंज आणि समानतेच्या मूल्यांचा प्रसार होय.
फुलन देवी यांची हत्या 25 जुलै 2001 रोजी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी झाली. त्यांच्या अकाली निधनाने भारतीय राजकारण आणि दलित समाजकार्य क्षेत्राला मोठा धक्का बसला. तरीसुद्धा त्यांचा वारसा आजही सामाजिक न्याय आणि समतेसाठी लढणाऱ्यांना प्रेरणा देतो.
महान बौद्ध व्यक्तींचे वर्गीकरण
इतिहासात उल्लेखनीय ठरलेल्या या 32 व्यक्ती विविध अंगांनी बौद्ध धर्माशी जोडल्या आहेत. त्यांच्या जीवनातील योगदान वेगवेगळे असले तरी ते सर्व एका समान ध्येयाकडे – धर्म, प्रज्ञा आणि करुणा यांच्या प्रसाराकडे – वळलेले आहेत. चला तर त्यांच्या वर्गवारीकडे पाहूया.
या 32 महान बौद्ध व्यक्तींमध्ये 5 महिला व उर्वरित 27 पुरुष आहेत. बौद्ध धर्मातील थोर महिला ⇒ भिक्खुनी संघमित्रा, भिक्खुनी गौतमी (महाप्रजापती), भिक्खुनी यशोधरा, बुद्धमाता महामाया, आणि फुलन देवी.
या वर्गवारीत दिसते की प्राचीन काळातही स्त्रियांना धर्मसंघात व इतिहासात स्थान मिळाले, जरी संख्या कमी असली तरी त्यांचे योगदान अमूल्य होते.
जीवनकाळानुसार वर्गीकरण
-
बुद्ध काल (इ.स.पू. 6वे–5वे शतक) – बुद्ध, आनंद, सारिपुत्र, मौद्गल्यायन, शुद्धोधन, राहुल, महाप्रजापती गौतमी व यशोधरा.
-
मौर्यकाल (इ.स.पू. 3रे शतक) – सम्राट अशोक, भिक्खू महेंद्र व भिक्खुनी संघमित्रा.
-
कुषाण व गुप्तकाल (इ.स. 1ले–5वे शतक) – कनिष्क, अश्वघोष, नागार्जुन, वसुबंधू, असंग व दिग्नाग.
-
मध्ययुग (इ.स. 7वे–12वे शतक) – हर्षवर्धन, शांतिदेव, शांतरक्षित, शांतीदेव पद्मसंभव व अतिष दीपंकर.
-
आधुनिक काळ (इ.स. 20वे–21वे शतक) – बाबासाहेब आंबेडकर, दलाई लामा व फुलन देवी.
अशा प्रकारे बौद्ध धर्माचा प्रवास प्राचीन भारतापासून आधुनिक जगापर्यंत सतत सुरू राहिल्याचे स्पष्ट दिसते.
कार्यक्षेत्रानुसार वर्गीकरण
-
संस्थापक व तत्त्वज्ञ – बुद्ध, नागार्जुन, वसुबंधू, असंग, दिग्नाग.
-
राजे व सम्राट – अशोक, कनिष्क, शुद्धोधन, बिंबिसार, अजातशत्रू, हर्षवर्धन.
-
साहित्यिक व कवी – अश्वघोष, शांतिदेव.
-
शिष्य व निकटवर्ती भिक्खू – आनंद, सारिपुत्र, मौद्गल्यायन, महाकश्यप, राहुल, अनिरुद्ध.
-
प्रचारक व धर्मदूत – महेंद्र, संघमित्रा, पद्मसंभव, अतिष दीपंकर, शांतरक्षित.
-
आधुनिक काळातील बौद्ध – बाबासाहेब आंबेडकर, दलाई लामा, फुलन देवी.
-
कुटुंबीय योगदान – शुद्धोधन, यशोधरा, गौतमी, राहुल, महामाया.
निष्कर्ष
भारताच्या इतिहासात आणि जगाच्या संस्कृतीत या ३२ सर्वश्रेष्ठ बौद्ध व्यक्तींचे योगदान अमूल्य आहे. भगवान बुद्धांनी सुरू केलेल्या धर्मक्रांतीपासून सम्राट अशोकांच्या जागतिक धर्मप्रसारापर्यंत, नागार्जुन व वसुबंधूंच्या तत्त्वज्ञानापासून पद्मसंभव व अतिष यांच्या तिबेटी परंपरेपर्यंत, तसेच बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीपासून दलाई लामांच्या जागतिक शांततेच्या संदेशापर्यंत – हा वारसा अखंडपणे वाहत आहे.
या सर्व व्यक्तींमध्ये भिन्नता असली तरी त्यांचा सामायिक धागा म्हणजे करुणा, प्रज्ञा आणि समता. त्यांच्या आयुष्यामुळे बौद्ध धर्म हा केवळ धार्मिक चळवळ न राहता मानवतेचा जागतिक वारसा ठरतो.
हेही वाचलंय का ?
- भारतातील बौद्ध अभिनेते आणि अभिनेत्री
- जगातील बौद्ध महिला राष्ट्रपती आणि पंतप्रधान
- भारतातील बौद्ध गायक आणि गायिका
- महाराष्ट्रातील मराठी बौद्ध कलाकार
- दक्षिण भारतातील बौद्ध अभिनेते आणि अन्य सेलिब्रिटी
- महाराष्ट्रातील 20 सर्वात प्रसिद्ध व्यक्ती; पहिल्या क्रमांकावर बाबासाहेब
- भारतातील 30 सर्वात प्रसिद्ध व्यक्ती; पहिल्या स्थानी भगवान बुद्ध
धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.
मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह जीवनचरित्र पुस्तके पुतळे सुविचार / Quotes दृष्टिकोन/ विचार कार्य आणि योगदान विकिपीडिया रंजक तथ्ये धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.