खरंच Oxford University ने जगातील 100 सर्वश्रेष्ठ व्यक्तींमध्ये बुद्धांना पहिल्या आणि बाबासाहेबांना चौथ्या क्रमांकावर ठेवले आहे का?

खरंच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने ‘द मेकर्स ऑफ द युनिव्हर्स’ सर्वेक्षण करून त्यात गौतम बुद्धांना पहिल्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चौथ्या क्रमांकावर ठेवले होते का? The Makers of Universe by Oxford University

Oxford university top 100 greatest person list of all time
The Makers of Universe – Oxford University top 100 Greatest Person list of all time

दावा

जर तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अधिक माहिती वाचत असाल, तर तुम्ही कधीतरी पाहिले किंवा ऐकले असेल की,

ऑक्सफर्ड विद्यापीठाने ‘द मेकर्स ऑफ द युनिव्हर्स’ नावाचे सर्वेक्षण किंवा पुस्तक प्रकाशित केले, ज्यामध्ये गेल्या 10,000 वर्षांतल्या जगातील टॉप 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी तयार केली. या यादीत पहिल्या क्रमांकावर बुद्ध, दुसऱ्या क्रमांकावर महावीर, तिसऱ्या क्रमांकावर सम्राट अशोक आणि चौथ्या क्रमांकावर बाबासाहेब आंबेडकर यांना ठेवण्यात आले.

वरीलप्रमाणे दावा अनेक सोशल मीडिया पोस्ट्समध्ये आणि बातम्यांमध्येही देखील करण्यात आला आहे.

पण हा दावा खरा आहे का? ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने खरोखरच जगातल्या 100 महान मानवांची यादी तयार केली आहे का? आणि अशी यादी तयार केली असेल तर त्यात बुद्ध, महावीर, अशोक आणि बाबासाहेब यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ स्थान देण्यात आले आहे का?

चला तर जाणून घेऊया या दाव्यामागील सत्य!

 

विश्लेषण

युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड अर्थात ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांनी ‘द मेकर्स ऑफ द युनिव्हर्स’ नावाचे कोणतेही सर्वेक्षण केल्याचे किंवा पुस्तक प्रकाशित केल्याचे आढळून आले नाही.

याशिवाय, या संदर्भातील इतर कोणतेही अधिकृत दस्तऐवज इंटरनेटवर उपलब्ध नाहीत. त्यामुळे हा दावा प्रथमदर्शनी चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

हा दावा चुकीचा असूनही बनावट पोस्टमध्ये फक्त बुद्ध, महावीर, अशोक आणि आंबेडकर ही चारच नावे का लिहिली गेली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हे सहज केले होते की त्यामध्ये काही विशेष कारण होते?

चार थोर भारतीयांमध्ये महात्मा गांधी, नागार्जुन, जवाहरलाल नेहरू, शिवाजी महाराज, आर्यभट्ट, स्वामी विवेकानंद, संत कबीर इत्यादी महापुरुषांची नावे का घेतली नसावीत? असे का केले गेले ते पहा.

 

1978 मध्ये, मायकेल एच. हार्ट या अमेरिकन लेखकाने ‘द 100: ए रँकिंग ऑफ द मोस्ट इंफ्लुशियल पर्सन्स इन हिस्ट्री‘ नावाचे जगप्रसिद्ध पुस्तक प्रकाशित केले होते. या पुस्तकामध्ये लेखकाने मानवी इतिहासावर सर्वाधिक प्रभाव पाडणाऱ्या 100 लोकांची क्रमवारी (रँकिंग) तयार केली आहे.

विशेष म्हणजे या अव्वल 100 प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांमध्ये फक्त तीन भारतीयांचा समावेश करण्यात आला होता – गौतम बुद्ध, सम्राट अशोक आणि वर्धमान महावीर.

या पुस्तकात जगातील टॉप 100 प्रभावशाली लोकांमध्ये प्रेषित मुहम्मद पहिल्या स्थानावर, आयझॅक न्यूटन दुसऱ्या स्थानावर, येशू ख्रिस्त तिसऱ्या स्थानावर, गौतम बुद्ध चौथ्या स्थानावर आणि कन्फ्यूशियस पाचव्या स्थानावर होते.

या यादीत सम्राट अशोक 53व्या तर भगवान महावीर सर्वात शेवटी 100व्या स्थानावर होते. परंतु या यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव नव्हते, तसेच महात्मा गांधी देखील समाविष्ट नव्हते.

 

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नावाने पसरवले जाणारे the Makers of Universe हे ‘बनावट’ सर्वेक्षण/ पुस्तक आणि त्यातील पहिल्या चार व्यक्तींची नावे, याचा मूळ स्रोत हा मायकेल हार्ट चे The 100: A Ranking of the Most Influential Persons in History पुस्तक आहे.

बनावट पोस्टमध्ये फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव नव्याने जोडण्यात आले असून त्यात बुद्ध, अशोक आणि महावीर ही तीन नावे आधीच स्पष्ट होती. याशिवाय सम्राट अशोक आणि भगवान महावीर यांच्या स्थानामध्येही बदल करण्यात आला होता.

द मेकर्स ऑफ युनिव्हर्सच्या ‘बनावट’ पोस्टमध्ये महावीर दुसऱ्या आणि सम्राट अशोक तिसऱ्या स्थानावर असल्याचे सांगण्यात आले होते, तथापि मूळ स्त्रोत असलेल्या पुस्तकात (भारतीयांमध्ये) अशोक दुसऱ्या आणि महावीर तिसऱ्या स्थानावर होते.

भारताने असंख्य महान व्यक्ती निर्माण केल्या आहेत. बुद्ध, अशोक, महावीर आणि आंबेडकर हे चौघेही भारतातीलच नव्हे तर जगातील महान व्यक्ती आहेत. पण त्यांच्याबद्दल चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरवून त्यांची ‘महानता’ वाढवणे योग्य नाही.

 

निष्कर्ष

शेवटी निष्कर्ष असा की, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने ‘द मेकर्स ऑफ द युनिव्हर्स’ (The Makers of Universe by Oxford University) नावाचे कोणतेही सर्वेक्षण केले नाही किंवा असे पुस्तक प्रकाशित केले नाही. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने 10 हजार वर्षातील जग घडवणाऱ्या 100 व्यक्तींमध्ये गौतम बुद्धांना पहिल्या, महावीरांना दुसऱ्या, अशोकांना तिसऱ्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चौथ्या क्रमांकावर ठेवलेले नाही.


आतापर्यंतच्या जगातील 10 सर्वात महान व्यक्तींचा विचार केला तर त्यात एक नाव निःसंशयपणे आढळेल आणि ते म्हणजे भगवान गौतम बुद्ध. बुद्धानंतर जगावर जर कोणत्या भारतीयाने सर्वाधिक प्रभाव टाकला असेल तर ते महात्मा गांधी होय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वर्धमान महावीर भारतात अत्यंत प्रभावशाली आणि लोकप्रिय आहेत, परंतु जागतिक स्तरावर नाहीत. निःसंशयपणे या दोन्ही महान व्यक्ती आहेत, परंतु भारताबाहेर त्यांना महानत्व आणि लोकप्रियता वा प्रसिद्धीच्या बाबतीत योग्य स्थान मिळालेले नाही हे सत्य देखील आपण स्वीकारले पाहिजे.

जग ज्याप्रमाणे मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांना ओळखतं, नेल्सन मंडेला यांना ओळखतं, त्याप्रमाणे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ओळखत नाही, जरी बाबासाहेबांचे कार्य हे किंग व मंडेला यांच्यापेक्षा कमी नाही, किंबहुना ते जास्तच आहे.

जगातील लोक बाबासाहेबांच्या कामांपासून अनभिज्ञ असण्याचे कारण हे की, [जातीयवादी] भारतीय समाजाने, [वर्चस्ववादी] भारतीय राजकारणाने आणि [गांधीवादी-काँग्रेसी] भारतीय शासनाने सुरुवातीपासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर खूप मोठा अन्याय केला आहे, त्यांच्या कामांना दुर्लक्षित केले, त्यांच्याबाबत नकारात्मक दृष्टिकोन ठेवला. आणि परिणामी बाबासाहेबांची ओळख, त्यांचे महत्त्वपूर्ण कार्य जे जगभर पोहोचायला हवे होते, ते पोहोचले नाही, ते जाणीवपूर्वक पोहोचवले गेले नाही.


हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तसेच तुमच्या काही सूचना किंवा प्रश्न असतील तर कृपया कॉमेंट बॉक्समध्ये किंवा ई-मेलद्वारे लिहून आवर्जून कळवावे. धन्यवाद.


हे ही वाचलंत का?


मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इंस्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी ई-मेल करु शकता.

3 thoughts on “खरंच Oxford University ने जगातील 100 सर्वश्रेष्ठ व्यक्तींमध्ये बुद्धांना पहिल्या आणि बाबासाहेबांना चौथ्या क्रमांकावर ठेवले आहे का?

  1. तुम्ही सांगितलेली खरी माहिती मला आवडली. माझ्या मते, 1978 च्या मायकल हार्टच्या पुस्तकामध्ये खरं तर गौतम बुद्ध हे जगातील पहिले सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून गणले गेले पाहिजे होते. बुद्ध हे मानवी इतिहासातील सर्वश्रेष्ठ मानव आहेत.

  2. धम्म भारत यांचा लेख आवडला.कोण सर्व श्रेष्ठ या बाबतीत माकेल एच य च्या पुस्तका नुसार लिहलं आहे. कोणी दुसरी व्यक्ती अजून काही ही लिहिलं. मला त्याचे काही वाटतं नक्षी. मला माझ्या समाजासाठी देशाचे सर्वांचे हित बघणारे बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी सर्व जाती धर्म एकत्रित ठेवण्यासाठी संविधान दिले, वरसानुवरसे अन्याय होणाऱयांना सन्मान मिळवून दिला. माणसासाठी माणुसकी धर्म दिला तेच सर्व श्रेष्ठ आहेत. त्यामुळे छ. Shivaji महाराज जोतिबा बाबासाहेब आंबेडकरच श्रेष्ठ व आमचे उद्धारकर्ते. शांतिचा संदेश देणारे भगवान महावीर गौतम buddha यांचे मुळेच जग टिकून राहील. हेच महान जगाला नाशा पासून वाचवीणारे

  3. It’s very important and helpful information. No doubt, Buddha is the greatest, so people shouldn’t make and share fake information.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!