भारतीय संसदेत महाराष्ट्रातील विद्यमान बौद्ध खासदार (Current Buddhist MPs from Maharashtra) यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. यासोबतच लोकसंख्येच्या प्रमाणात बौद्धांना संसदेत किती प्रतिनिधित्व मिळायला हवे आणि त्यांना किती प्रतिनिधित्व मिळाले याची माहितीही लेखात देण्यात आली आहे.
भारताच्या संसदेत लोकसभा आणि राज्यसभा या दोन सभागृहांचा समावेश होतो आणि दोन्ही सभागृहांचे सदस्य ‘खासदार’ असतात. ‘खासदार’ म्हणजे ‘संसद सदस्य’, ज्याला आपण इंग्रजीत ‘मेंबर ऑफ पार्लमेंट’ (एमपी) आणि हिंदीत ‘सांसद’ म्हणतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते चंद्रकांत हंडोरे यांच्यापर्यंत महाराष्ट्राने अनेक बौद्ध खासदार भारताला दिले आहेत. 2019-24 मधील केंद्रीय मंत्रिमंडळातील दोन मंत्री, किरेन रिजिजू आणि रामदास आठवले हे बौद्ध धर्मीय आहेत. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेही बौद्ध आहेत.
- महाराष्ट्रात बौद्ध समाजाला राजकीय प्रतिनिधित्व किती असायला हवे आणि किती आहे?
- महाराष्ट्रातील विद्यमान बौद्ध आमदारांची यादी
संसदेत महाराष्ट्रातून 6 बौद्ध खासदार (8.5%) असावेत – लोकसभेत 4 आणि राज्यसभेत 2. पण प्रत्यक्षात बौद्धांना संसदेत कमी प्रतिनिधित्व आहे (6 टक्के किंवा 6 खासदार).
सध्या, 2024 मध्ये, महाराष्ट्रात चार बौद्ध खासदार आहेत — दोन राज्यसभेत आणि दोन लोकसभेत. ‘राजस्थान’मधून आणखी एक महाराष्ट्रीयन बौद्ध खासदार राज्यसभेवर निवडून आला आहे. त्यामुळे, आपण या पाचही खासदारांबद्दल जाणून घेऊया, सोबतच त्यांच्या राजकीय व्यक्तिरेखांवर एक नजर टाकूया.
महाराष्ट्रातील विद्यमान बौद्ध खासदार
1. रामदास आठवले (राज्यसभा खासदार, 2014 पासून)
रामदास बंडू आठवले हे आंबेडकरी बौद्ध चळवळीतील एक दिग्गज नेते आणि ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)’ पक्षाचे अध्यक्ष आहेत. ते वीस वर्षांहून अधिक काळ खासदार राहिलेले आहेत.
रामदास आठवले 2014 पासून राज्यसभेचे सदस्य (खासदार) आणि 2016 पासून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून काम करत आहेत. यापूर्वी ते तीन वेळा (1998-99 आणि 1999-04, 2004-09) लोकसभेचे खासदार सुद्धा होते.
याआधी ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य (1990-95) सुद्धा होते आणि याच काळात त्यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री म्हणून देखील काम केले. 1998 पासून 2009 पर्यंत आणि त्यानंतर 2014 पासून आजपर्यंत (2024) ते एकूण 21 वर्षे खासदार राहिलेले आहेत. 2026 मध्ये त्यांचे राज्यसभा सदस्यत्व संपेल.
2. चंद्रकांत हंडोरे (राज्यसभा खासदार, 2024 पासून)
चंद्रकांत दामोधर हंडोरे (जन्म 13 मार्च 1957) हे राज्यसभा खासदार आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सभासद आहेत. फेब्रुवारी 2024 मध्ये, हंडोरे यांचे राज्यसभेसाठी नामांकन केले गेले, आणि त्यांचा कार्यकाळ 3 एप्रिल 2024 ते 3 एप्रिल 2030 असा आहे.
हंडोरे हे 2004-14 मध्ये महाराष्ट्र विधानसभेत चेंबूरचे आमदार होते. चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे विलासराव देशमुख मंत्रीमंडळात महाराष्ट्र शासनामध्ये समाज कल्याण कॅबिनेट मंत्रीपदासोबत संसदीय कामकाज मंत्रीपदाची सुद्धा जबाबदारी होती.
1992 ते 1993 या कालावधीत ते मुंबईचे महापौर होते. पुढे ते 2014 ते 2021 या कालावधीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष होते. 2020 पासून ते मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी देखील आहेत.
2021 मध्ये त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. चंद्रकांत हंडोरे हे आंबेडकरवादी आणि सामाजिक-राजकीय संघटना “भीम शक्ती”चे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.
3. वर्षा गायकवाड (लोकसभा खासदार, 2024 पासून)
वर्षा एकनाथ गायकवाड या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सदस्या आणि विद्यमान खासदार आहेत. याआधी त्या सलग वीस वर्षे आमदार राहिल्या आणि याच काळात त्यांनी दोन वेळा कॅबिनेट मंत्री तर एकदा राज्यमंत्री म्हणून काम पाहिले.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्या मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्या. या निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार वकील उज्वल निकम यांचा पराभव केला. मुंबई उत्तर मध्य हा खुला (गैर-राखीव) लोकसभा मतदारसंघ आहे आणि वर्षा गायकवाड या खुल्या मतदारसंघातून संसदेवर निवडून आलेल्या एकमेव अनुसूचित जातीच्या खासदार आहेत.
वर्षा गायकवाड या सलग चार वेळा (2004, 2009, 2014 आणि 2019 मध्ये) मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून [SC राखीव] निवडून आल्या होत्या. त्या वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, पर्यटन, विशेष सहाय्य विभागाच्या राज्यमंत्री (2009 – 2010), महिला आणि बालविकास विभागाच्या कॅबिनेट मंत्री (2010 – 2014) आणि शालेय शिक्षण विभागाच्या कॅबिनेट मंत्री (2019 – 2022) होत्या.
त्यांची धाकटी बहीण ज्योती गायकवाड 2024 च्या विधानसभा निवडणुकीत धारावी मतदारसंघातून आमदार झाल्या आहेत. त्यांचे वडील एकनाथ गायकवाड हेही दोन वेळा खासदार झाले होते. वर्षा गायकवाड या आंबेडकरी बौद्ध कुटुंबातील आहेत. काही काळ त्या मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये लेक्चरर होत्या. वर्षा गायकवाड
4. बळवंत वानखेडे (लोकसभा खासदार, 2024 पासून)
बळवंत बसवंत वानखडे हे भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ते पहिल्यांदाच अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. आणि आता ते महाराष्ट्राचे विद्यमान बौद्ध खासदार आहेत.
बळवंत वानखेडे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून (SC राखीव) निवडून आले होते. त्यांनी मोची/चांभार समाजाच्या भाजप उमेदवार नवनीत कौर राणा यांचा पराभव केला, ज्या 2019-24 मध्ये अमरावतीच्या खासदार होत्या. वानखेडे हे लोकसभेवर निवडून आलेले दुसरे बौद्ध खासदार आहेत.
5. मुकुल वासनिक (राज्यसभा खासदार, 2022 पासून)
मुकुल बाळकृष्ण वासनिक हे भारतीय राजकारणी आणि राजस्थान मधील राज्यसभा सदस्य आहेत. ते भारत सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री होते. महाराष्ट्राच्या बुलढाणा (3 वेळा) आणि रामटेक (1 वेळा) लोकसभा मतदारसंघांमध्ये ते 4 वेळा निवडून आले आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीसही आहेत. 2022 मध्ये वासनिक यांची ‘राजस्थान’ मधून राज्यसभेवर निवड झाली. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील बौद्ध खासदार म्हणता येणार नाही.
1984 मध्ये, वासनिक हे 25 वर्षांचे सर्वात तरुण संसद सदस्य बनले होते. त्यांनी 8व्या लोकसभेत 1984-1989, 1991-1996 दरम्यान 10व्या लोकसभेत आणि 1998-1999 दरम्यान 12व्या लोकसभेत महाराष्ट्राच्या बुलढाण्याचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर 2009 ते 2014 पर्यंत त्यांनी महाराष्ट्राच्या रामटेक लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. अशाप्रकारे दोन मतदारसंघातून चार वेळा लोकसभा खासदार झाले. या काळात त्यांनी अनेक विभागांचे मंत्री म्हणून काम केले. त्यांचे वडील देखील खासदार होते.
वासनिक यांची 1984-1986 दरम्यान नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. पुढे वासनिक यांची 1988-1990 दरम्यान भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. जून 2022 मध्ये, वासनिक हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नामांकनावर राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून आले.
लोकसभेवर ते एकूण 17 वर्षे खासदार राहिलेले आहेत. राजस्थान मधून राज्यसभेवर ते 5 जुलै 2022 पासून खासदार असून 6 जुलै 2026 रोजी त्यांचे राज्यसभा सदस्यत्व संपेल.
संसदेतील बौद्धांचे प्रतिनिधित्व ?
भारतात लोकसभेवर एकूण 543 खासदार निवडून येतात, त्यापैकी 48 महाराष्ट्रातील असतात. तर, राज्यसभेत 245 खासदार असून त्यापैकी 19 महाराष्ट्रातून येत असतात. अशा प्रकारे महाराष्ट्रात एकूण 67 खासदार असतात.
महाराष्ट्रात महारांची आणि बौद्धांची लोकसंख्या 8.5 टक्के असल्यामुळे संसदेत बौद्धांचे 6 खासदार असायला हवे – लोकसभेत 4 आणि राज्यसभेत 2. पण प्रत्यक्षात बौद्धांना संसदेत कमी (6%) प्रतिनिधित्व मिळाले आहे.
- महाराष्ट्रात बौद्ध समाजाला राजकीय प्रतिनिधित्व किती असायला हवे आणि किती आहे?
- महाराष्ट्रातील 59 अनुसूचित जातींची लोकसंख्या जाणून घ्या
2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात महार समाजाची लोकसंख्या 80,06,060 होती, त्यांपैकी 49,43,821 बौद्ध, 30,54,158 हिंदू आणि उरलेले 8,081 शीख होते.
2011 मध्ये, बौद्ध (65.31 लाख किंवा 6%) आणि हिंदू महार (30.54 लाख किंवा 2.5%) यांची एकत्रित लोकसंख्या 95.85 लाख होती, आणि हा आकडा राज्याच्या लोकसंख्येच्या 8.53 टक्के आहे. 2024 मध्ये महाराष्ट्रातील बौद्धांचा लोकसंख्या 1 कोटी 10 लाख इतकी आहे. जनगणनेत ‘हिंदू’ अशी धार्मिक नोंद झालेले जवळजवळ सर्व (99%) महार लोक सुद्धा स्वतःला बौद्ध धर्मीय मानतात.
- महाराष्ट्रातील बौद्ध समाजाचे सध्या संसदेत (दोन्ही सभागृहांत) 4 खासदार म्हणजे 6 टक्के प्रतिनिधित्व आहे. 6 बौद्ध खासदार (8.5%) असायला पाहिजे. म्हणजे बौद्धांना संसदेत 2.5 टक्के कमी प्रतिनिधित्व मिळाले आहे.
- बौद्ध समाजासाठी लोकसभेच्या 4 आणि राज्यसभेत 2 जागा असायला पाहिजे. पण सध्या लोकसभेत 2 (4%) आणि राज्यसभेत 2 (8.5%) बौद्ध खासदार आहेत. म्हणजे बौद्धांना लोकसभेत देखील 4.5 टक्के कमी प्रतिनिधित्व आहे तर राज्यसभेत पूर्ण राजकीय प्रतिनिधित्व मिळाले आहे.
एससी राखीव जागांवरील बौद्धांचे प्रतिनिधित्व ?
2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील 59 अनुसूचित जातींना (एससी) लोकसभेत किती वाटा किंवा प्रतिनिधित्व मिळायला हवे ते थोडक्यात पाहू.
राज्याच्या लोकसंख्येच्या 12 टक्के (2011 मध्ये 1 कोटी 33 लाख लोकसंख्या) असलेल्या एससी समाजाला लोकसभेच्या 6 जागा मिळाल्या पाहिजेत. (48 पैकी) 5 लोकसभा मतदारसंघ तर अनुसूचित जातींसाठी राखीव आहेच आणि अजून एका खुल्या जागेवरून अनुसूचित जातीचा उमेदवार निवडून यायला हवा.
2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येत महारांची आणि इतर एसएससी बौद्धांची एकत्रित लोकसंख्या ही 62% (85 लाख) होती. त्यामुळे एससी बौद्धांना अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागांमध्ये 62% प्रतिनिधित्व मिळायला हवे. म्हणजे पाच राखीव जागांपैकी तीन जागा बौद्धांसाठी पाहिजे. 2019 आणि 2024 च्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत केवळ एकाच राखीव जागेवरून बौद्ध उमेदवार निवडून आला.
2024 लोकसभा निवडणूक : महाविकास आघाडीने दिलेले अनुसूचित जातीचे उमेदवार, जे सर्व विजयी झाले.
- 1] लातूर – शिवाजी काळगे [काँग्रेस] (42-माला जंगम – लिंगायत/ हिंदू)
- 2] सोलापूर – प्रणिती शिंदे [काँग्रेस] (18-ढोर – हिंदू)
- 3] अमरावती – बळवंत वानखेडे [काँग्रेस] (37-महार – बौद्ध)
- 4] रामटेक – श्मामकुमार बर्वे [काँग्रेस] (11-चांभार – हिंदू)
- 5] शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे [शिवसेना (उबाठा)] (11-चांभार – हिंदू)
- 6] मुंबई उत्तर मध्य (खुला) – वर्षा गायकवाड [काँग्रेस] (37-महार – बौद्ध)
इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीमधील काँग्रेसने पाच आणि ठाकरेंच्या शिवसेनेने एक असे एकूण सहा अनुसूचित जातीचे उमेदवार दिले होते. दक्षिण उत्तर मध्य या खुल्या मतदारसंघातून एक उमेदवार उभा होता. आणि शेवटी महाविकास आघाडीचे हे सहाही उमेदवार निवडणुकीमध्ये जिंकले.
महाविकास आघाडीने दोन चांभार, दोन महार – बौद्ध, एक ढोर आणि एक माला जंगम असे हे सहा एससी उमेदवार होते. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा बौद्ध समाजाला राजकीय प्रतिनिधित्व हे 4% मिळाले होते.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजय झालेले अनुसूचित जातीचे खासदार :
- 1] लातूर – सुधाकर शृंगारे [भाजप] (37-महार – बौद्ध)
- 2] सोलापूर – सिद्धेश्वर स्वामी [भाजप] (9-जंगम – हिंदू)
- 3] अमरावती – नवनीत कौर राणा [अपक्ष] (11-मोची/शीख चमार – हिंदू/शीख)
- 4]रामटेक – कृपाल तुमाने (11-चांभार – हिंदू)
- 5] शिर्डी – सदाशिव लोखंडे (11-चांभार – हिंदू)
- 6] दक्षिण मध्य मुंबई (खुला) – राहुल शेवाळे (11-चांभार – हिंदू)
अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या 5 मतदारसंघांमध्ये 3 जागा या महार जातसमूहासाठी (बौद्धांसाठी) पाहिजे, ज्यांचा अनुसूचित जातीच्या लोकसंख्येत 62 टक्के वाटा आहे. 18.7% असणार्या मांग जातमूहाला एक जागा, आणि चांभारासह उर्वरित 57 जातसमूहांसाठी (21% लोकसंख्या) 1 जागा, असे विभाजन लोकसंख्येच्या प्रमाणात हवे. आज रोजी 5 एससी मतदार संघांव्यतिरिक्त इतर (43) कोणत्याही मतदारसंघात अनुसूचित जातीचा उमेदवार निवडून आलेला नाही.
2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमध्ये 10.7 टक्के प्रमाण असणाऱ्या चांभार जातसमूहाला (एससींसाठी राखीव असलेल्या) लोकसभेमध्ये 60% प्रतिनिधित्व मिळाले आहे. तर 60% महार जातसमूहाला केवळ 20 टक्के राजकीय प्रतिनिधित्व मिळाले आहे. अनुसूचित जातीच्या लोकसंख्येत 0.2% हिस्सा असणाऱ्या जंगम जातीला तब्बल 20 टक्के राजकीय प्रतिनिधित्व मिळाले आहे.
- भारतातील 30 सर्वात प्रसिद्ध बौद्ध व्यक्ती
- हे आहेत 40 मराठी बौद्ध कलाकार
- भारतातील बौद्ध अभिनेते आणि अभिनेत्रींची यादी
- महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी
- महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची धर्मनिहाय लोकसंख्या
- बौद्ध, महार आणि दलित यांची लोकसंख्या
- सर्व आरक्षण रद्द केले तर काय होईल?
- महाराष्ट्रातील जातीनिहाय लोकसंख्या
- भारतातील बौद्ध लोकसंख्या 1 कोटी की 7 कोटी?
- बौद्ध आरक्षण – बौद्ध धर्म किस कैटेगरी में आता है?
- व्हॉट्सॲपवर धम्म भारत चॅनल फॉलो करा
धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.