बौद्ध समाज कोणत्या प्रवर्गामध्ये मोडतो आणि बौद्ध समाजाला आरक्षण किती आहे याविषयीची माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. यासाठी आपण 2011 च्या जनगणनेची अधिकृत आकडेवारी वापरली आहे.
बौद्ध समाजासाठी आरक्षण
भारतात आणि महाराष्ट्रात बौद्ध समाजाला किती आरक्षण आहे? How much is the reservation for the Buddhist community? – भारतामध्ये जात, लिंग, प्रदेश, धर्म, शारीरिक व्यंग इत्यादींवर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण दिले जाते. मात्र आपण येथे जातीवर आधारित आरक्षणाबद्दल [SC, ST, OBC] विचार करुया.
अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्ग (OBC) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) या चार सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी केंद्रामध्ये एकूण 59.50% आरक्षण आहे. महाराष्ट्र यांना एकूण 62% आरक्षण आहे.
एससी, एसटी, ओबीसी यांचे हे आरक्षण जातीवर वा समूहावर आधारित आहे, धर्मावर आधारित नाही. त्यामुळे बौद्ध समाजाला ‘बौद्ध’ म्हणून आरक्षण दिले गेले नाही. बौद्धांना अल्पसंख्यांक समुदायांसाठी असलेले आरक्षण दिले जाते.
अनेकांना असे वाटते की बौद्ध फक्त अनुसूचित जाती प्रवर्गात आहेत, पण प्रत्यक्षात ते आरक्षणाच्या सर्वच प्रवर्गांमध्ये आढळतात. महाराष्ट्रातील ‘बहुसंख्य’ बौद्ध लोक हे अनुसूचित जाती प्रवर्गामधील आहेत. यानंतर ते अनुसूचित जमाती, ओबीसी इडब्ल्यूएस अशा सर्व आरक्षित प्रवर्गांमध्ये आढळतात. अनारक्षित अर्थात खुल्या प्रवर्गात सुद्धा बौद्ध धर्मीय आहेत.
महाराष्ट्रातील बौद्ध समाजासाठी आरक्षण
आपण महाराष्ट्र राज्यातील बौद्ध लोकसंख्येची आरक्षणाच्या दृष्टीने आकडेवारी बघुया.
2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्र राज्यात एकूण 65,31,200 बौद्ध होते, त्यापैकी 52,04,284 बौद्ध (79.68%) हे अनुसूचित जाती (SC) तर 20,798 बौद्ध (0.32%) हे अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील होते. एससी आणि एसटी बौद्ध हे एकूण 52,25,082 किंवा 80.00% आहेत.
उर्वरित 13,06,118 (किंवा 20.00%) महाराष्ट्रीय बौद्ध हे पुढील तीन गटांमध्ये विभागले गेले आहेत – अन्य मागासवर्ग (OBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अनारक्षित वा सामान्य वर्ग.
महाराष्ट्रातील 52 लाख एससी बौद्धांना 13 टक्के आरक्षण आहे. हे 13 टक्के आरक्षण अजून 80.60 लाख हिंदू दलित आणि साडे 11 हजार शीख यांचा सुद्धा उपलब्ध आहे. अशाप्रकारे महाराष्ट्रात एकूण अनुसूचित जातींची अर्थात दलितांची लोकसंख्या 1 कोटी 33 लाख असून त्यांना 13% आरक्षण आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील 59 पैकी 53 अनुसूचित जातींमध्ये बौद्ध लोक आढळले होते.
महाराष्ट्रातील 20.8 हजार एसटी बौद्धांना 7 टक्के आरक्षण आहे. हे 7 टक्के आरक्षण एकूण 1,05,10,213 लोकसंख्या असलेल्या 45 अनुसूचित जमातींसाठी अर्थात आदिवासींसाठी आहे. अनुसूचित जातींमधील बौद्धांचे प्रमाण अवघे 0.20% आहे. तथापि अनुसूचित जातींमधील हिंदू (97.22%) आणि मुस्लिम (1.07%) नंतर बौद्धांची तिसरी सर्वात जास्त लोकसंख्या आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील 45 पैकी 40 अनुसूचित जमातींमध्ये बौद्ध धर्मीय होते. (पूर्वी महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची संख्या 47 होती, त्यामधून 2 जमाती वगळण्यात आल्या आहेत.)
अनुसूचित जाती प्रवर्गातील बौद्ध
– | एकूण बौद्ध लोकसंख्या | अनु.जाती. बौद्ध लोकसंख्या | प्रमाण (%) |
---|---|---|---|
भारत | 84,42,972 | 57,57,000 | 68.19% |
महाराष्ट्र | 65,31,200 | 52,04,284 | 79.68% |
भारतातील बौद्ध समाजासाठी आरक्षण
आता आपण भारत देशातील बौद्ध लोकसंख्येची आरक्षणाच्या दृष्टीने आकडेवारी बघुया.
2011 च्या जनगणनेनुसार, संबंध भारतात 84.43 लाख बौद्ध होते, त्यापैकी 57.57 लाख बौद्ध (68%) हे अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील होते. उर्वरित 26.86 लाख बौद्ध हे अनुसूचित जमाती (ST), अन्य मागासवर्ग (OBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) तसेच अनारक्षित अर्थात सामान्य वर्गामधील होते.
भारतातील साडे 57 लाख अनुसूचित जातीतील बौद्धांना केंद्रात 15 टक्के आरक्षण आहे. हे 15 टक्के आरक्षण फक्त एस्सी बौद्धांसाठी नसून त्यात 18 कोटी 96 लाख दलित हिंदू आणि 59.53 लाख दलित शीख यांचा सुद्धा समावेश आहे. या तिन्ही अनुसूचित जातींच्या समुदायांची देशातील एकूण लोकसंख्या 20 कोटी 14 लाख आहे, अर्थात 16.6 टक्के आहे. यामध्ये बौद्धांचा वाटा 3% पेक्षा कमी आहे.
बौद्ध आणि महार
2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमध्ये महार समाजाची लोकसंख्या 80 लाख आहे. तर राज्यातील एकूण बौद्ध लोकसंख्या 65 लाख आहे. या दोन्ही समूहाच्या लोकसंख्येत 49.44 लाख लोक हे महारही आहेत आणि बौद्धही आहेत. त्यामुळे महार आणि बौद्ध या दोन्ही समूहाची एकत्रितपणे लोकसंख्या 1 कोटी 45 लाख नसून सुमारे 96 लाख आहे.
महाराष्ट्रात, ‘बौद्ध’ समाज आणि ‘महार’ समाज हे एकमेकांसाठी पर्यायी शब्द म्हणून वापरले जातात. परंतु बौद्ध समाज म्हणजे महार समाज नव्हे आणि महार समाज म्हणजे बौद्ध समाज नव्हे. कारण सर्वच महार लोक हे बौद्ध नाहीत आणि सर्व बौद्ध लोक हे महार नाहीत.
तथापि आपण हे समजून घ्यायला हवे की, राज्यातील बहुसंख्य महार (61.75 टक्के) हे बौद्ध धर्मीय आहेत, तसेच बहुसंख्य बौद्ध धर्मीय (75.70 टक्के) हे महार समुदायातील आहेत. राज्यातील अनुसूचित जातींच्या बौद्धांमध्ये तर 95 टक्के प्रमाण हे एकट्या महार समाजाचे आहे, तर उर्वरित 5 टक्के एससी बौद्ध हे 52 अनुसूचित जातींमधील आहे. 6 अनुसूचित जातींमध्ये बौद्ध धर्मीय आढळले नाहीत.
महाराष्ट्रातील 13 टक्के आरक्षण हे 59 अनुसूचित जातींसाठी आहे. ‘बौद्ध’, ‘नवबौद्ध’ किंवा ‘धर्मांतरित बौद्ध’ ही नावे अनुसूचित जातींच्या यादीमध्ये नाहीत, त्यामुळे ‘बौद्ध’ म्हणून अनुसूचित जातीचे आरक्षण दिले जात नाही.
सारांश
आता आपल्याला माहित झाले असेल की आरक्षित प्रवर्गांमधील बौद्ध समाजासाठी किती आरक्षण आहे.
आपण या लेखामध्ये काय समजून घेतले ते थोडक्यात पाहूया – बौद्धांना ‘बौद्ध’ म्हणून एससी-एसटीचे आरक्षण दिले जात नाही. अनुसूचित जातीच्या बौद्ध समाजाला केंद्रात 15 टक्के आहे तर राज्यात 13 टक्के आरक्षण मिळते.
अनुसूचित जमातीच्या बौद्ध समाजाला केंद्रात 7.5% तर राज्यात 7% आरक्षण आहे. इतर मागासवर्गीय अर्थात ओबीसी बौद्धांना केंद्रात 27% आणि राज्यात 32 टक्के आरक्षण आहे.
अनारक्षित म्हणजेच सामान्य वा ओपन जातसमूहातील बौद्धांना एससी, एसटी, ओबीसी यांपैकी कोणतेही आरक्षण भेटत नाही. अशा खुल्या गटातील बौद्धांमधील गरिबांना (आर्थिकदृष्ट्या दुर्बल) ईडब्ल्यूएसचे आरक्षण उपलब्ध आहे.
- महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी
- महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची धर्मनिहाय लोकसंख्या
- बौद्ध, महार आणि दलित यांची लोकसंख्या
- सर्व आरक्षण रद्द केले तर काय होईल?
- महाराष्ट्रातील जातीनिहाय लोकसंख्या
- भारतातील बौद्ध लोकसंख्या 1 कोटी की 7 कोटी?
- बौद्ध आरक्षण – बौद्ध धर्म किस कैटेगरी में आता है?
- व्हॉट्सॲपवर धम्म भारत चॅनल फॉलो करा
धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला खालील सोशल मिडिया माध्यमांवर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा.
♦ WhatsApp ♦ Facebook ♦ Telegram ♦
♦ संपर्क – E-mail ♦
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.