महाराष्ट्रात महार समाजाची लोकसंख्या किती? जनगणनेतून आकडेवारी समोर

महार ही महाराष्ट्रात मराठ्यांच्या खालोखाल दुसरी सर्वात मोठी जात आहे. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात महारांची लोकसंख्या (Mahar population in Maharashtra) 80 लाखांपेक्षा जास्त होती. या लेखात आपण महाराष्ट्रातील महार लोकसंख्येबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. –  महार समाज लोकसंख्या महाराष्ट्र

  इस लेख को हिंदी में पढ़ें 

 Read this article in English 

महार समाज लोकसंख्या
महार समाज लोकसंख्या महाराष्ट्र – Population of Mahar community in Maharashtra

महाराष्ट्रात अनेक जाती किंवा सामाजिक गट आहेत, त्यापैकी मराठा, महार, माळी, कुणबी आणि धनगर हे पाच प्रमुख आहेत. राज्यात महार हा मराठ्यांच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाचा समाज आहे! राज्यात मराठा समाजाची लोकसंख्या 16% ते 27% आहे, तर महार समाज 7% ते 9% आहे.

Mahar Samaj Loksankhya Maharashtra : महार समाजाची लोकसंख्या महाराष्ट्र आणि त्याच्या शेजारील राज्यात मोठ्या प्रमाणात आहे. भारतातील 15 पेक्षा जास्त राज्यांमध्ये महार जातीला ‘अनुसूचित जाती’ दर्जा देण्यात आला आहे. महाराष्ट्र (60%) आणि गोवा (50%) या दोन राज्यांमधील अनुसूचित जातींमध्ये महार हा सर्वात मोठा समुदाय आहे.

हा लेख भारताच्या 2011 च्या जनगणनेतील अधिकृत डेटा वापरून महाराष्ट्रातील महार लोकसंख्येबद्दल तपशीलवार आणि महत्त्वाची माहिती प्रदान करतो. २०२१ मध्ये भारताची जनगणना झालेली नाही, त्यामुळे 2011च्या जनगणनेतील नवीनतम डेटा आपल्याकडे आहे. – Mahar Samaj Loksankhya

 

महारांचे तीन वर्ग

परंपरेने, महार गावाबाहेर राहत आणि संपूर्ण गावासाठी विविध प्रकारची सेवा कार्ये करत. त्यांनी पहारेकरी, संदेशवाहक, भिंती दुरुस्त करणे, सीमा विवाद मिटवणे, रस्ते साफ करणे आणि मृत जनावरे उचलणे यासारखी कामे केली. महारांनी शेतमजूर म्हणूनही काम केले आणि काहींकडे जमिनीची मालकीही होती, जरी ते मूलत: शेतकरी नव्हते.

महार अस्पृश्य असल्याने त्यांना विविध भेदभाव, अन्याय आणि अत्याचारांना सामोरे जावे लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महार समाजाचे आहेत.

महार समाजाची पुढील तीन प्रमुख वर्गांमध्ये विभागणी करता येईल. अनुसूचित जातीचे (SC) महार हा सर्वात मोठा गट आहे.

  1. अनुसूचित जातीचे महार :
    • हिंदू महार : जनगणनेत धर्म म्हणून ‘हिंदू’ आणि जात महार नोंदवणारे
    • बौद्ध महार : जनगणनेत धर्म ‘बौद्ध’ आणि जात महार नोंदवणारे
    • शीख महार : जनगणनेत धर्म ‘शीख’ आणि जात महार नोंदवणारे
  2. गैर-अनुसूचित जातीचे महार : धर्म ‘ख्रिश्चन किंवा इस्लाम’ नोंदवणारे आणि जात महार सांगणारे
  3. माजी/ पूर्वाश्रमीचे महार : जनगणनेत धर्म ‘बौद्ध’ नोंदवणारे परंतु [महार] जात न नोंदवणारे

 

महार समाज लोकसंख्या

2011 च्या जनगणनेनुसार, भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 16.6 टक्के किंवा 20.14 कोटी लोकसंख्या दलित म्हणजेच अनुसूचित जातीची आहे. यामध्ये सुमारे 1 कोटी महार समाजाची लोकसंख्या आहे. महार समाजाची सर्वाधिक लोकसंख्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आहे. ते गोवा, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात येथेही काही संख्येने स्थायिक आहेत. त्यांच्या भाषा मराठी, वराहडी, खान्देशी भाषा, कोकणी आणि हिंदी आहेत. महाराष्ट्रात दलितांची संख्या 12 टक्के असून त्यापैकी 7 टक्के महार आहेत.

1980च्या दशकाच्या सुरुवातीस, महार समाजाची लोकसंख्या ही महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 9 टक्के होती, जी राज्यातील एकूण अनुसूचित जातीच्या लोकसंख्येपैकी सुमारे 70 टक्के आहे.

2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील अनुसूचित जाती (SC) मधील महारांची लोकसंख्या 80.06 लाख होती, जी राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 7.12 टक्के आणि एकूण अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या 60.31 टक्के होती. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की 80.06 लाख हा आकडा ‘सर्व महारांचा’ नसून फक्त ‘SC महारांचा’ आहे. महाराष्ट्रात एससी महार आणि बिगर एससी महार या दोन्ही गटांची लोकसंख्या 1 कोटीपेक्षा जास्त असावी.

एससी महार किंवा अनुसूचित जातीचे महार म्हणजे असे महार ज्यांचा ‘धर्म’ हिंदू, बौद्ध किंवा शीख या तीन धर्मांपैकी एक आहे. राज्यात काही ‘ख्रिश्चन महार’ आणि ‘मुस्लिम महार’ देखील आहेत, परंतु कायदेशीरदृष्ट्या त्यांना ‘अनुसूचित जाती’ म्हणून गणले जात नाही. त्यामुळे त्यांची जनगणनेत ‘SC’ म्हणून नोंद झाली नाही आणि अनुसूचित जातीच्या महार लोकसंख्येमध्ये त्यांची गणना करण्यात आली नाही. याव्यतिरिक्त, जनगणनेमध्ये महार लोकसंख्येमध्ये ‘माजी महार’ किंवा ‘पूर्वाश्रमीचे महार’ देखील मोजले गेले नाहीत, ज्यांनी त्यांचा ‘धर्म’ बौद्ध म्हणून नोंदवला, परंतु त्यांची ‘अनुसूचित जात’ महार म्हणून नोंदवली नाही.

ख्रिश्चन, इस्लाम किंवा इतर धर्मांचे पालन करणारे महार आणि पूर्वाश्रमीचे महार यांची लोकसंख्या 15 ते 20 लाखांपर्यंत असू शकते. अशा प्रकारे या सर्व महारांची लोकसंख्या 9 टक्के आहे, असा अंदाज आहे. तथापि, गैर-अनुसूचित जातीचे महार आणि माजी महार यांची अधिकृत सरकारी आकडेवारी उपलब्ध नसल्याने, आपण फक्त अनुसूचित जातीच्या महारांची लोकसंख्या तपशीलवार समजून घेऊ.

 

2024 मध्ये महाराष्ट्रात महार लोकसंख्या

2024 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या 13,15,90,000 आहे, असा अंदाज आहे. यानुसार, 2024 मध्ये महाराष्ट्रात महार लोकसंख्या सुमारे 93,69,000 ते 1,18,00,000 (किंवा 7% ते 9%) आहे.

 

अनुसूचित जातींमधील महार

2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्राची लोकसंख्या 11.23 कोटी आहे, त्यांपैकी 1.33 कोटी (किंवा 11.8%) अनुसूचित जाती आहेत. महाराष्ट्रात एकूण 59 अनुसूचित जाती आहेत, ज्यात महार ही सर्वात प्रमुख जात आहे.

महार जातीसमूह – ‘महार, मेहरा, तराळ, धेगू-मेगू‘ हा महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या यादीत 37व्या क्रमांकावर आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील महार लोकसंख्या 80,06,060 आहे, जी अनुसूचित जातींमध्ये 60.31% आहे आणि राज्यात 7.12% आहे.

महार समाजात 40,70,230 (किंवा 50.84%) पुरुष आणि 39,35,830 स्त्रिया (किंवा 49.16%) आहेत. बहुतांश महार ग्रामीण भागात राहतात. एकूण महारांपैकी 47,64,174 (किंवा 59.51%) ग्रामीण भागातील आणि 32,41,886 (किंवा 40.49%) शहरी भागातील होते.

 

सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या 5 अनुसूचित जाती खालीलप्रमाणे आहेत (2011च्या जनगणनेनुसार) :

  1. महार जातीसमूह – 80,06,060 (60.31%)
  2. मांग जातीसमूह – 24,88,531 (18.74%)
  3. चांभार जातीसमूह – 14,11,072 (10.63%)
  4. भंगी जातीसमूह – 2,17,166 (1.64%)
  5. ढोर जातीसमूह – 1,16,287 (0.88%)
  • उर्वरित 54 जातीसमूह10,36,782 (7.81%)
  • एकूण अनुसूचित जाती – 1,32,75,898 (100%)

 

महारांची धर्मनिहाय लोकसंख्या

परंपरेने महार समाज हा हिंदू मानला जातो. पण त्याही आधी, प्राचीन काळी महार हे बौद्ध धर्माचे अनुयायी असलेल्या नागा वंशाचे होते, असे मानले जाते. सध्या, जवळजवळ सर्व महार बौद्ध आहेत, आणि नवयान बौद्ध धर्माचे पालन करतात. तथापि, भारताच्या राष्ट्रीय जनगणनेत अनेक ‘बौद्ध’ महारांची धार्मिकदृष्ट्या ‘हिंदू’ म्हणून नोंद आहे!

कायदेशीररीत्या, अनुसूचित जातीची व्यक्ती ही धर्माने केवळ हिंदू, बौद्ध किंवा शीख असू शकते, या तिघांव्यतिरिक्त अन्य धर्मीय नाही. म्हणून, अनुसूचित जातीची लोकसंख्या या तीन धर्मांमध्ये विभागली गेली आहे. 2011च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील 59 अनुसूचित जातींपैकी 53 मध्ये बौद्ध आढळतात, परंतु त्यांमध्ये महार ही एकमेव अशी जात आहे ज्यात बौद्धांची संख्या हिंदूंपेक्षा जास्त आहे.

महार समाज धर्मनिहाय लोकसंख्या
महार समाज धर्मनिहाय लोकसंख्या

महार समाज लोकसंख्या महाराष्ट्र – महार समाजातील 99% लोक बौद्ध असले तरी, 2011 च्या जनगणनेत या समाजाचा एक मोठा वर्ग (38%) धर्माने ‘हिंदू’ म्हणून नोंदवण्यात गेला होता. परिणामी राज्यातील बौद्धांची संख्या बरीच कमी झाल्याचे दिसून येत आहे. जनगणनेच्या आकडेवारीनुसार, 2001 मध्ये, 56 टक्के महार बौद्ध होते, जे 2011 मध्ये वाढून 62 टक्के झाले. म्हणजेच या दहा वर्षांत 7 टक्के महारांनी त्यांचा धर्म ‘बौद्ध’ म्हणून नोंदविला.

दुसरीकडे, 2001 ते 2011 दरम्यान, हिंदू धर्माची नोंद करणारे महार 43.7% वरून 38.15% पर्यंत कमी झाले. 2021 मध्ये जनगणना झाली असती, तर बौद्ध धर्माची नोंद करणारे महार नक्कीच 70% पेक्षा जास्त दिसले असते. असा अंदाज आहे की, पुढील 2-3 दशकांत 90% पर्यंत महार ‘बौद्ध’ धर्माची अधिकृतपणे नोंदणी करतील.

 

2001 च्या जनगणनेनुसार, महार समाजाची धार्मिक लोकसंख्या खालीलप्रमाणे होती.[संदर्भ  –  1, 2]

  • बौद्ध महार – 31,93,622 (56.24%)
  • हिंदू महार – 24,81,971 (43.71%)
  • शीख महार – 3,319 (0.06%)
  • एकूण महार – 56,78,912 (100%)

 

2011 च्या जनगणनेनुसार, महारांची धार्मिक वर्गवारी खालीलप्रमाणे होती.

  • बौद्ध महार – 49,43,821 (61.75%)
  • हिंदू महार – 30,54,158 (38.15%)
  • शीख महार – 8,081 (0.10%)
  • एकूण महार – 80,06,060 (100%)

 

  • 2001 ते 2011 दरम्यान एससी महारांची एकूण लोकसंख्या 23,27,148 ने वाढली
  • 2001 ते 2011 दरम्यान बौद्ध महारांची एकूण लोकसंख्या 17,50,199 ने वाढली.
  • 2001 ते 2011 दरम्यान महाराष्ट्रीयन बौद्धांची एकूण लोकसंख्या 6,92,490 ने वाढली.

2001 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील एकूण बौद्ध लोकसंख्येच्या 54.70% महार होते. 2011 च्या जनगणनेत, हे प्रमाण 75.70% पर्यंत वाढले. 2001 ते 2010 या दशकात बौद्ध महारांची लोकसंख्या 17.50 लाखांनी वाढली, परंतु एकूण बौद्ध लोकसंख्येमध्ये फक्त 6.92 लाखांनी वाढ झाली.

 

  • 2001 मध्ये महाराष्ट्रातील बौद्ध लोकसंख्या – 58,38,710
  • 2011 मध्ये महाराष्ट्रातील बौद्ध लोकसंख्या – 65,31,200

2011 च्या जनगणनेतील अधिकृत आकडेवारी दर्शवते की 2011 मध्ये महाराष्ट्रात एकूण 65,31,200 बौद्ध होते, त्यापैकी 75.70 टक्के (49,43,821) थेट महार समाजाचे होते, तर उर्वरित 24.30% (15,87,379) गैर-महार बौद्ध होते.


2001 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची धर्मनिहाय लोकसंख्या खालीलप्रमाणे आहे. [संदर्भ  –  1, 2]

  • SC हिंदू : 66,21,529 (67%)
  • SC बौद्ध : 32,54,144 (32.9%)
  • SC शीख : 5,983 (0.1%)
  • SC एकूण : 9,881,656 (100%)

 

2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची धर्मनिहाय लोकसंख्याखालीलप्रमाणे आहे. [संदर्भ]

  • SC हिंदू : 80,60,130 (60.71%)
  • SC बौद्ध : 52,04,284 (39.20%)
  • SC शीख : 11,484 (0.09%)
  • SC एकूण : 1,32,75,898 (100%)

 

  • 2001 ते 2011 दरम्यान अनुसूचित जातींची एकूण लोकसंख्या 33,94,242 ने वाढली.

 

2011 मध्ये, राज्यातील एकूण अनुसूचित जातीच्या बौद्ध धर्मीयांची लोकसंख्या 52,04,284 असून त्यापैकी 49,43,821 (किंवा 95%) एकट्या महार जातसमूहातील होते. उर्वरित 2,60,463 (किंवा 5%) अनुसूचित जातीचे बौद्ध इतर 58 अनुसूचित जातींमधील होते.

राज्यातील अनुसूचित जातींच्या तीन धार्मिक गटांमध्ये, म्हणजे हिंदू, बौद्ध आणि शीख, सर्वात जास्त लोकसंख्या महारांचीच आहे. महार हे एससी हिंदूंमध्ये सर्वाधिक 38%, एससी बौद्धांमध्ये 95% आणि एससी शीखांमध्ये 70% होते.

 

जर ‘हिंदू’ महारांची ‘बौद्ध’ म्हणून नोंद झाली असती तर…

जर राज्यातील 30.54 लाख ‘हिंदू’ महारांची नोंदणी ‘बौद्ध’ महार म्हणून झाली असती तर खालीलप्रमाणे अनुसूचित जातीतील बौद्धांची संख्या वाढली असती आणि हिंदूंची संख्या कमी झाली असती.

  • एससी बौद्ध : 82,58,442 (62.21%)
  • एससी हिंदू : 50,05,972 (37.71%)
  • एससी शीख : 11,484 (0.09%)
  • एकूण एससी : 1,32,75,898 (100%)

 

2011 च्या जनगणनेत हिंदू म्हणून नोंदवलेले 38% किंवा 30.54 लाख महार हे बौद्ध म्हणून नोंदवले गेले असते तर खालीलप्रमाणे मोठे बदल झाले असते.

1) महाराष्ट्र राज्यात ‘बौद्ध महार’ यांची लोकसंख्या ’80 लाख झाली असती. जवळजवळ सर्व महार बौद्ध झाले असते.

2) महाराष्ट्रात, अनुसूचित जातींमधील 80.60 लाख (किंवा 61%) दलित हिंदू आणि 52.04 लाख दलित बौद्ध (किंवा 39%) हे प्रमाण 82.58 लाख (किंवा 62%) दलित बौद्ध आणि 50.06 लाख (किंवा 38%) दलित हिंदू असे बदलले असते. म्हणजेच अनुसूचित जातींमधील हिंदू आणि बौद्ध समाजाची लोकसंख्या उलट झाली असती.

3) राज्यात एकूण बौद्ध लोकसंख्या 65,31,200 वरून 95,85,358 झाली असती. बौद्धांचे प्रमाण 5.8 टक्क्यांवरून 8.53 टक्क्यांवर पोहोचले असते. यावेळी राज्यातील 79.80% हिंदू देखील 77.30% झाले असते.

4) भारतातील बौद्ध लोकसंख्या 84 लाख (किंवा 0.70%) वरून 1 कोटी 15 लाख (किंवा 0.95%) पर्यंत वाढली असती. पण तरीही, देशाच्या लोकसंख्येपैकी 1% लोक बौद्ध होण्यासाठी आणखी 7 लाख लोक कमी पडले असते.

2011 च्या जनगणनेत, 80 लाख लोकांची नोंदणी ‘महार’ म्हणून झाली आहे. याच्या व्यतिरिक्त सुमारे 15-20 लाख (पूर्वाश्रमीचे) महार असेही आहेत, ज्यांनी स्वतःला ‘महार’ म्हणून नोंदणीकृत केले नाही, त्यांनी फक्त धर्माच्या रकान्यात म्हणून ‘बौद्ध’ नोंदवले, आणि [अनुसूचित] जातीचा रकाना रिकामा ठेवला. अशा व्यक्तींची गणना बौद्धांमध्ये तर झाली परंतु अनुसूचित जातींमध्ये (तसेच महार लोकसंख्येमध्ये) ते समाविष्ट झाले नाही. यामुळे बौद्धांची लोकसंख्या थोडी वाढली परंतु अनुसूचित जातींची आणि महारांची लोकसंख्या घटली.

वरील माहिती बघता महार समाजाची विभागणी खालील तीन गटांमध्ये करता येईल.

  1. हिंदू महार : धर्म ‘हिंदू’ आणि जात ‘महार’ नोंदवणारे,
  2. बौद्ध महार : धर्म ‘बौद्ध’ आणि जात ‘महार’ नोंदवणारे,
  3. पूर्वाश्रमीचे महार : धर्म ‘बौद्ध’ नोंदवणारे पण कोणतीही ‘जात न नोंदवणारे’

 

महार समाज लोकसंख्या महाराष्ट्र – जवळजवळ 99% महार समाज बौद्ध धर्मीय असला तरी जनगणनेमध्ये 30 लाख 53 हजार (किंवा 38%) महारांची धार्मिक नोंद ‘हिंदू’ म्हणून झाली आहे. खाली काही प्रमुख कारणे दिली आहेत ज्यांमुळे बौद्ध महारांची हिंदू महार म्हणून नोंद झाली असावी.

१) बौद्धांना अशी भीती असते की महार जाती सोबतच धर्म हिंदू नोंदवला नाही तर त्यांचे अनुसूचित जातीचे आरक्षण रद्द होईल व त्यांना आरक्षणाचे फायदे व सवलती घेता येणार नाही. म्हणून बौद्ध धर्मीय महार जनगणनेत हिंदू धर्म नोंदवतात.

२) बौद्धांना असेही वाटते की महार जात नोंदवायची असेल तर धर्म फक्त हिंदूच येतो. काही बुद्धांचा असाही गैरसमज आहे की महार जात नोंदवायची असेल तर धर्म फक्त हिंदूच लिहावा लागतो. कारण महार ही जात आहे आणि जाती या हिंदू धर्मात आहेत. प्रत्यक्षात महार हा जातसमूह जवळजवळ सर्व धर्मांमध्ये आहे.

 

महार म्हणजेच हिंदू का?

अनुसूचित जातीची व्यक्ती किंवा दलित व्यक्ती ही सामान्यतः ‘हिंदू’ मानली जाते, परंतु प्रत्यक्षात हे एक मिथक आहे. अनुसूचित जातींमध्ये हिंदूंसोबत बौद्ध आणि शीख यांचा देखील समावेश होतो. त्यामुळे ‘महार जात’ लिहिल्याने ‘धर्म’ आपोआप ‘हिंदू’ होतो, असा विचार करणे पूर्णपणे चुकीचे आहे.

अनेक लोक महार लोकांना हिंदू मानतात. त्यांच्या मते, महार ही एक ‘हिंदू जात’ आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या शाळेच्या कागदपत्रावर (टीसी वगैरे) किंवा जनगणनेत जातीच्या रकान्यात ‘महार’ नोंद केली गेली असेल तर त्या व्यक्तीचा ‘धर्म’ हा आपोआप ‘हिंदू’ होतो. परंतु हे सुद्धा खरे नाही.

व्यक्ती कोणत्याही जातीची असली तरी तिला स्वतःचा धर्म निवडण्याचा अधिकार असतो. जर एखादी व्यक्ती महार असेल तर ती हिंदू, बौद्ध, शीख, जैन, मुस्लिम किंवा ख्रिश्चन यांपैकी कोणताही धर्म नोंदवू शकते. तेव्हा फरक इतकाच राहील की हिंदू, बौद्ध किंवा शीख हे तीन धर्म नोंदवणारे महार लोक हे अनुसूचित जातीचे असतील; तर जैन, ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्म नोंदवणारे महार हे अनुसूचित जातीमध्ये मोडणार नाहीत. त्यामुळे महार व्यक्तीने धर्माच्या रकान्यात ‘बौद्ध धर्म’ नोंदवला तर तिच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणावर देखील गदा येत नाही. त्यामुळे महारांनी धर्माची नोंद ‘बौद्ध’ करणे काहीही गैर नाही. हेच मांग, चांभार यांच्यासह सर्वच अनुसूचित जातींसाठी लागू आहे.

 

बौद्ध धर्मात जर जाती नाहीत मग जातीच्या रकान्यात महार जात का नोंदवायची?

याचे उत्तर सोपे आणि सरळ आहे. अनुसूचित जातीच्या प्रवर्गात येण्यासाठी आपणास 59 अनुसूचित जातींपैकी कोणतीतरी एक जात/ समूह नोंदवणे गरजेचे वा अनिवार्य असते. अशावेळी दुसरा प्रश्न निर्माण होऊ शकतो की बौद्ध धर्मात जाती नाही तर मग आपण अनुसूचित जाती प्रवर्गात का यायचे? याचे उत्तर आहे आपण ‘मागास‘ (backward) आहोत म्हणून. बौद्ध धर्म स्वीकारला म्हणजे आपण पुढारलेलो (forward) झालो नाहीत. आपल्या समाजात प्रचंड गरिबी आणि मागासलेपण आहे हे विसरून चालणार नाही.

त्यामुळे, बौद्ध धर्मात जाती नाहीत यामुळे आपण अनुसूचित जातीची नोंद लिहिणे टाळण्याऐवजी, आपण ‘मागासलेले’ आहोत म्हणून [अनुसूचित] जातीची नोंद लिहिणे अत्यंत गरजेचे आहे. बौद्ध धर्मासाठी अनुसूचित जातीचे आरक्षण नाकारण्या इतपत बौद्ध समाज बांधव सक्षम झालेले नाहीत, हे सत्य आपण विसरायला नको. बौद्धांमधील एक फार लहान गट हा श्रीमंत आणि सधन झालेला आहे, या गटाला एससीचे आरक्षण नाही मिळाले तरी तो स्वबळावर कर्तुत्व गाजवू शकतो.

परंतु बहुंशी बौद्ध समाज हा आरक्षणाशिवाय आपल्या पाल्यांची शैक्षणिक फी भरण्यास सक्षम नाही. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी सवर्ण किंवा पुढारलेल्या जातींमधील विद्यार्थ्यांएवढ्या उपलब्ध बाबी अनुसूचित जातीच्या किंवा मागासवर्गीय विद्यार्थ्यांजवळ उपलब्ध नसतात. अशावेळी बौद्ध समाजाला आरक्षणाची गरज असल्याची जाणवते. आजच्या बौद्ध आणि अनुसूचित जातींच्या समाजाने ‘अस्पृश्यता’ भोगली आहे, त्यामुळे त्यांना आरक्षणाच्या मदतीने पुढे येण्याची संधी मिळत आहे.

महत्त्वाचे हे की, आपला उद्देश हा जातीच्या रकान्यात ‘जात’ नोंदवणे नसून आपली नोंद ही ‘अनुसूचित जाती’ (Scheduled Caste) म्हणून व्हावी यासाठी आहे. अनुसूचित जातीची नोंद व्हावी म्हणून आपल्याला 59 पैकी कोणती तरी एक जात नोंदवणे अनिवार्य असते. धर्माच्या रकान्यात आवर्जून ‘बौद्ध धर्म’ नोंदवावा.

  • धर्म : बौद्ध
  • जात : महार / 59 SC पैकी एक
  • प्रवर्ग : अनुसूचित जाती (SC)

 

‘सर्व बौद्ध’ हे महार आहेत?

‘सर्व बौद्ध’ हे ‘महार’ आहेत – हा सुद्धा एक गैरसमज आहे. महार हा अनुसूचित जातींमधील सर्वात मोठा समाज आहे आणि बहुसंख्य महार हे बौद्ध धर्मीय आहेत. महारांखेरीज 59 अनुसूचित जातींपैकी एकाही मध्ये बौद्ध धर्म बहुसंख्यक नाही. असे असले तरी सर्वच महार हे बौद्ध नाहीत हेही तितकेच खरे.

आता आपण दुसरा मुद्दा विचारात घ्यायला हवा. महाराष्ट्रातील 59 SC जातींपैकी जवळजवळ सर्वच (53) जातींमध्ये बौद्ध धर्मीय आढळतात. ज्या 6 जातींमध्ये बौद्ध नाहीत त्या जातींची एकूण लोकसंख्या ही 50-100 च्या आत आहे. जर या जातींची लोकसंख्या 200-400 जरी असली असती तरी सर्वच 59 जातींमध्ये बौद्ध धर्मीय आढळले असते.

महाराष्ट्रातील बौद्ध बांधव हे केवळ महार जातीशी संबंधित नसून ते जवळजवळ सर्वच अनुसूचित जातींमधून आहेत. त्यामुळे ‘सर्व बौद्ध हे महार आहेत’ किंवा ‘महार या एकाच जातीमध्ये बौद्ध धर्म आहेत’ हा एक गैरसमज आहे. बौद्धांनी महार या समाजाला ‘जात’ (caste) समजण्याऐवजी ‘समूह’ (community) समजणे जास्त उपयुक्त ठरेल.

अनुसूचित जातींमध्ये जेवढे बौद्ध धर्मीय आहेत, त्यापैकी 95 टक्के हे एकट्या महार जातीतून येतात, उर्वरित 58 अनुसूचित जातींमध्ये 5 टक्के बौद्ध आहेत.

2011 च्या जनगणनेतील अधिकृत आकडेवारी पाहिली असता आढळते की, 2011 मध्ये महाराष्ट्रात एकूण 65,31,200 बौद्ध धर्मीय होते, त्यापैकी 75.70 टक्के (49,43,821) हे थेट महार समाजातील होते, तर उर्वरित 24.30% (15,87,379) बौद्ध धर्मीय हे महार नाहीत. या 24% बौद्धांमध्ये पूर्वाश्रमीच्या महारांची मोठी लोकसंख्या असू शकते, ज्यांनी स्वतः जात ‘महार’ किंवा इतर नोंदवली नाही.

 

नवबौद्ध

‘नवबौद्ध’ ही एक सरकारी संज्ञा आहे. महाराष्ट्र शासन वेळोवेळी अनुसूचित जातींसाठी योजना काढते तेव्हा त्यावर लिहिलेले असते – ‘अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गासाठी’ योजना. प्रत्यक्षात नवबौद्ध हा ‘प्रवर्ग’ नाही, नवबौद्ध ही ‘जात’ नाही, किंवा 59 पैकी एखादी ‘अनुसूचित जाती’ नाही, तसेच नवबौद्ध हा ‘धर्म’ देखील नाही. नवबौद्ध हे निश्चितच बौद्ध धर्मीय असले तरी त्यांची ओळख थोडी वेगळी आहे. नवबौद्ध म्हणजेच ‘अनुसूचित जातीमधील बौद्ध धर्मीय व्यक्ती‘.

नवबौद्ध हे अनुसूचित जातींच्या अंतर्गत येतात, बौद्ध धर्माच्या अंतर्गत येतात. ‘बौद्ध धर्म स्वीकारलेले’ किंवा ‘बौद्ध धर्म अंगीकारणारे’ पूर्वाश्रमीचे अस्पृश्य (किंवा दलित) लोक म्हणजे नवबौद्ध होत. महाराष्ट्रातील 53 अनुसूचित जातींमध्ये जे 52,04,284 बौद्ध आहेत, ते सर्व नवबौद्ध आहेत. देशात नवबौद्ध यांची लोकसंख्या 57.57 लाख आहे.

नवबौद्ध हे बहुसंख्य (95%) महार असले तरी सर्वच नवबौद्ध हे महार समाजाचे नाहीत, आणि सर्वच महार देखील नवबौद्ध नाहीत. नवबौद्ध यास पर्यायी शब्द ‘अनुसूचित जातीचे बौद्ध’ (एससी बुद्धिस्ट) आणि ‘दलित बौद्ध’. ‘दलित हिंदू’ व ‘दलित शीख’ प्रमाणे ‘दलित बौद्ध’ ही संज्ञा हिंदी मिडीयामध्ये वापरली जाते. महाराष्ट्रातील बौद्ध धर्मीय अनुसूचित जातीचे लोक हे स्वतः साठी ‘दलित’ संज्ञा नाकारतात, पण इतर राज्यांच्या बौद्ध एससी मध्ये ‘दलित’ संज्ञा स्वीकार्य असल्याचे आढळते.



धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.


मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!