डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हिंदू धर्मावरील विचार या लेखात उद्धृत केलेली आहेत. – Thoughts of Dr Babasaheb Ambedkar on Hinduism
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि धर्माबाबत त्यांचे तत्त्वज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांचा धर्माकडे पाहण्याचा दृष्टीकोनही तार्किक आणि विचारशील आहे. हिंदू धर्मासह विविध धर्मांवर त्यांनी केलेल्या धारदार टीकेमुळे काही लोक त्यांना धर्माच्या विरुद्ध मानत होते पण अध्यात्मिक आणि सार्वजनिक जीवनातील धर्माचे महत्त्व याविषयी ते सचेत होते.
इतर धर्मांच्या तुलनेत हिंदू, इस्लाम आणि बौद्ध धर्माबद्दल त्यांचे विचार सर्वज्ञात आहेत. त्यांनी जगातील सर्व प्रमुख धर्मांपेक्षा तसेच सर्व धर्मांना नाकारणारे तत्त्वज्ञान अर्थात मार्क्सवाद यापेक्षा बुद्धाचा मार्ग (बौद्धधर्म) श्रेष्ठ मानला.
हिंदू धर्मातील वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था आणि त्यामुळे निर्माण झालेली सामाजिक विषमता याच्या विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बंड पुकारले होते. त्यांनी वेळोवेळी हिंदू धर्मावर जोरदार टीकास्त्र सोडले आणि सनातनी हिंदुंना त्यांची अमानवीय विचारसरणी सोडायला भाग पाडले. मृत्यूपूर्वी त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला होता.
हिंदू समाजाने – हिंदू लोकांनी हिंदूधर्म ग्रंथांच्या नावाखाली आपल्या कोट्यवधी अस्पृश्य बांधवांवर हजारो वर्षे अन्याय केलाय. याविरुद्ध शक्तिशाली विद्रोह केला तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यांचा संघर्ष थेट हिंदू भारताशी होता, याचवेळी त्यांचा संघर्ष काँग्रेस गांधी यांच्याशी सुद्धा चालू होता.
तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी संसदेत बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहताना म्हटले होते की हिंदू समाजातील सर्व अत्याचारी प्रवृत्तींविरुद्ध बंडाचे प्रतीक म्हणून त्यांचे स्मरण केले जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची हिंदू धर्माविषयीची काही मते या लेखात दिली आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हिंदू धर्मावरील विचार
“कोणतेही औषध घेण्यापूर्वी रोग्याचा कोठा साफ करावा लागतो. त्यातील मळ काढावा लागतो. त्याशिवाय औषधाचा गुण येत नाही. आमच्या हिंदुमात्राचा कोठा शुद्ध नाही. त्यात ब्राह्मणी धर्माचा आज कैक दिवसांचा मळ घर करून बसला आहे. जो वैद्य हा मळ धुऊन काढील, तोच या देशाला लोकशाहीच्या प्रस्थापनेस सहाय्यभूत होऊ शकेल. तो वैद्य म्हणजे गौतम बुद्ध हाच एक आहे.”
(जनता, ७ मे १९४१, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे, संपा, गांजरे, खंड १, पृष्ठ ७४)
“साऱ्या हिंदुस्थान देशाने बौद्ध धर्म स्वीकारावा. बुद्धधर्म व हिंदुधर्म एकच आहे. ही गोष्ट खोटी आहे. त्यात जमीन अस्मानाचे अंतर आहे.”
(जनता १० मे १९५५, डॉ. आंबेडकरांची गाजलेली भाषणे. प्रका. सूर्यवंशी, पृ. १७)
“ह्या देशाची संस्कृती एकस्वरूप आहे, असा विद्वानांचा दावा आहे पण त्यांचा इतिहास खोटा आहे. येथे संस्कृतीचे दोन प्रवाह सुरू आहेत. एक ब्राह्मणी धर्म व दुसरा बौद्धधर्म. ब्राह्मणी धर्माचे घाण पाणी बुद्ध धर्माच्या स्वच्छ पाण्यात एक झाले. हिंदू धर्माच्या घाण पाण्याला नाली काढून स्वच्छ पाणी बाजूला काढू या.”
(मुंबई, १४ जानेवारी १९५५, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे, खंड संपा, गांजरे, पृ. २१९)
“मानवतेचे संरक्षण होण्यासाठी हिंदुस्थानलाच काय पण साऱ्या जगाला बौद्ध धर्माची कास धरावी लागेल.”
(डॉ. आंबेडकरांची भाषणे, खंड १, संपा. गांजरे, पृ. १९२)
“काही हिंदूंचे म्हणणे असे आहे की बौद्ध धर्माचा स्वीकार करावयाचा असेल तर करावा, पण तसे करताना ब्राह्मणशाहीला शिव्या का द्यावयाच्या? उत्तर सोपे आहे. वर्णाश्रमावर आधारभूत असलेल्या ब्राह्मणशाहीवर, हिंदु धर्मावर प्रहार केला नाही, त्याचे खरे स्वरूप उघड केले नाही तर बौद्ध धर्माच्या प्रगतीच्या मार्गात ती एक मोठी धोंड होऊन बसेल. स्वच्छ पाणी आणि घाण पाणी या दोन प्रवाहाला एकत्र वाहू दिले तर स्वच्छ पाणी घाण होऊन जाईल. म्हणून बौद्ध धर्माच्या शुद्ध तत्त्वांबरोबर हिंदू धर्माची घाण वाहू देता कामा नये.”
(२७ मे १९५३, डॉ. आंबेडकरांची भाषणे, संपा. गांजरे, पृ. १९१)
“मला व्यक्तिशः हिंदूंचा मग्रूरपणा व विषमता मुळीच मान्य नाही. बौद्धधर्म जातीविरहीत एकजिनसी समाजरचनेचा पुरस्कार करतो. तर हिंदू धर्म जातीवरच मुख्य अधिष्ठान ठेवतो. हिंदूंच्या हरेक जातीमध्ये चिरेबंदी भिंत घालून विभागणी करण्यात आली आहे.”
(डॉ. आंबेडकरांची भाषणे, खंड १, संपा. गांजरे, पृ. १९९)
“बौद्धवाद व ब्राह्मणवाद यांमधील फरक व भेद नीट लक्षात ठेवण्यास मी तुम्हास सांगत आहे. यापैकी एकाची तुम्हास निवड करावयाची आहे. बुद्ध हा मानव होता. बुद्धाची तत्त्वे जातीय वर्गाविरुद्ध होती. बुद्धाने सामान्य जनतेत वास्तव्य केले आणि मानवी दृष्टीकोनातून जनतेची दुःखे दूर करण्याचा प्रयत्न केला.”
(दिल्ली, १९५०, डॉ. आंबेडकरांची भाषणे, खंड १, पृ. १९८)
“या देशाचा पूर्वीचा इतिहास ध्यानात घेतला म्हणजे जवळजवळ दोन हजार वर्षे ब्राह्मण धर्म व बुद्धधर्म यांचा वाद चालू होती. या वादात जे वाङ्मय निर्माण झाले ते धार्मिक स्वरूपाचे नसून राजकीय स्वरूपाचे आहे. देशातील सत्ता केंद्रावर आपली हुकमत चालावी म्हणून गीताग्रंथाचा जन्म झाला.”
(पुणे, २९ नोव्हेंबर १९४४, डॉ. आंबेडकरांची भाषणे, खंड १, संपा. गांजरे पृ. १२१)
चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा उदय हा ब्राह्मणांनीच केला. भगवान बुद्धाने चातुर्वर्ण्याला घोर विरोध केला. त्यांनी चातुर्वर्ण्य नष्ट करून समतेचा प्रचार केला, व याच आधारावर बौद्ध धर्माची स्थापना केली.
(डॉ. आंबेडकरांचे अखेरचे भाषण, सारनाथ, १९५६)
“ज्याप्रमाणे अनेक नद्या समुद्राला येऊन मिळतात व आपले अस्तित्व विसरतात, त्याचप्रमाणे बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर सर्व लोक समान होतात. कोणत्याही प्रकारची विषमता त्यांच्यात राहात नाही. बौद्ध धर्म अस्पृश्यांनाच नव्हे तर अखिल मानवांना देखील कल्याणकारक आहे. सवर्ण हिंदूंनी ह्या धर्माचा अवश्य स्वीकार करावा.”
(डॉ. आंबेडकरांचे भाषण, सारनाथ, १९५६)
“जुन्या सनातनी धर्माने आपली उन्नती होणार नाही, अशी जनतेची खात्री झाल्याबरोबर तिने नव्या ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला, हे रोमन इतिहासावरून स्पष्ट होते. रोममध्ये झाले ते हिंदुस्थानात का होणार नाही व हिंदू जनता जागृत झाल्याबरोबर ती बुद्धधर्माचा स्वीकार करीलच करील असे निश्चित वाटते.”
(दिल्ली, १९९०, डॉ. आंबेडकरांची भाषणे, खंड १, संपा, गांजरे, पृ. १८०)
“हिंदू धर्माच्या मुळात रोग झालेला आहे. याच कारणामुळे आम्हाला वेगळा धर्म ग्रहण केला पाहिजे. माझ्या समजुतीप्रमाणे बौद्ध धर्म हाच योग्य धर्म आहे. यात उच्च-नीच, श्रीमंत-गरीब, जाती-पाती आदी भावना नाहीत.”
(डॉ. आंबेडकरांचे अखेरचे भाषण, सारनाथ, १९५६)
“[वि.दा.] सावरकरांना मला असा प्रश्न विचारायचा आहे की, पेशवे कोण होते? ते [बौद्ध] भिक्षू होते काय? मग त्यांच्या हातून इंग्रजांनी राज्य कसे हिसकावून घेतले? तेव्हा अशा नादान व बेजबाबदार लोकांच्या आपण नादी लागू नये. काही लोक म्हणतात सावरकर विष ओकले, पण मी म्हणतो, सावरकर आपल्या पोटातील नरक ओकले! कुणी कितीही खोडसाळ टीका केली तरी माझा मार्ग निश्चित आहे. मी बुद्धधर्म स्वीकारणार!”
(मुंबई, २४ मे १९५५, डॉ. आंबेडकरांची भाषणे, खंड १, संपा. गांजरे, पृ. २२८)
“भारत देशाच्या हिताला धोका येईल अश्या प्रकारचे धर्मांतर मी करणार नाही, याबद्दल तुम्ही निश्चिंत असा, एवढेच काय पण, “देशहितासाठी” माझ्या समाजाच्या प्रगतिवर मला जळजळीत कोळसे ठेवण्याची वेळ आली तर मी तसे करण्यास का-कु करणार नाही.”…!
(25 ऑक्टोबर 1935)
“धर्मांतर हा मौजेचा विषय नव्हे, हा प्रश्न माणसाच्या जीविताच्या साफल्याचा प्रश्न आहे, जहाज एका बंदरातुन दुसर्या बंदराला नेन्याकरीता नावाडयाला जेवढी पुर्वतयारी लागते तेवढीच पुर्वतयारी धर्मांतराकरिता करावी लागणार आहे.”
(जनता, २० जून १९३६)
“धर्मांतरानंतर तुमची जबाबदारी वाढली आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल अशी कृती करावयास आता तुम्ही शिकले पाहिजे आणि हे आपणास साधले तर आपल्याबरोबर देशाचा… इतकेच नव्हे जगाचाही उध्दार होणार आहे.
(१५ ऑक्टोबर १९५६)
“खरे तर बुद्धधम्माच्या पुनरुत्थानाचे कार्य भारतात उशिरा सुरु केल्याबद्दल मला अपराध्यासारखे वाटत आहे…परंतु तरीही मला आशा आहे की, जी माझी माणसे आपल्या ऐशोआरामाला तिलांजली देतील आणि प्रामाणिकपणे माझे अनुसरण करतील ती माणसे भारतात बुद्धधम्म प्रसारित करण्यास मनःपुर्वक संघर्ष सुरु ठेवतील, मला तसा विश्वास आहे.”
(प्रबुद्ध भारत, १७ नोव्हेंबर १९५६)
“हिंदू धर्मातील या बौद्धिक गुलामगिरीतून सुटका करून घेण्याची तुम्हाला जितकी जरूरी आहे, तितकी हिंदूंना नाही. अशा रीतीने विचार केला असता, हा हिंदू धर्म तुम्हाला दोन्ही तऱ्हांनी मारक झाला आहे…या धर्माने तुमचे मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेऊन तुम्हाला गुलाम केले आहे व याच धर्माने तुम्हाला व्यवहारात गुलामगिरीच्या दशेत आणून टाकले आहे. तुम्हाला जर स्वातंत्र्य हवे असेल तर तुम्हाला धर्मांतरच केले पाहिजे.”
(“मुक्ती कोन पथे”, मुंबई परिषद, ३०, ३१ मे, १ व २ जून)
“धर्माच्या प्रत्येक पैलूचा आदर होऊ शकत नाही. म्हणजे धर्माचा आदर होऊ शकतो पण टीकेसह. त्याचपद्धतीने धर्म आणि देश वेगवेगळे असायला हवं. मात्र धर्मामुळे जातीय सलोखा बिघडला तर हस्तक्षेप करायला हवा.”
“तुम्ही पंढरी, आळंदी किंवा जेजुरीला किंवा दुसऱ्या कोणा देवाच्या नादी लागलात तर तुम्हाला वाळीत टाकण्याचा मला हुकूम द्यावा लागेल. त्याच्याशिवाय तुमचा देवभोळेपणा जाणार नाही आणि तुमची सुधारणाही होणार नाही. आजचे हे युग विचारांचे युग आहे. कोणीही कसलेही थोतांड रचले तरी ते थोतांड आहे हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे. कारण यापुढे तुम्हाला जगात वागताना विचार करूनच वागले पाहिजे.”
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे, खंड 18, भाग 3, पृष्ठ क्रमांक 364)
डॉ. आंबेडकरांनी 1940 मध्ये पाकिस्तान या धर्मावर आधारित राष्ट्राच्या मागणीविरोधात सावध केले होते आणि ते म्हणाले होते,
“जर हिंदू राष्ट्र निर्माण झाले तर या देशाला निःसंशयपणे मोठा धोका निर्माण होईल. हिंदू काहीही म्हणोत, हिंदुत्व स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाला धोका आहे. या आधारावर ते लोकशाहीसाठी अनुपयुक्त आहे. हिंदू राज कोणत्याही परिस्थितीत थांबवला पाहिजे.”
टीप : या लेखाचा उद्देश हिंदू धर्मावर टीका करणे नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू धर्मावरील मतांना संकलित करणे आहे.
वाचकांसाठी : हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तसेच तुमच्या काही सूचना किंवा प्रश्न असतील तर कृपया कॉमेंट बॉक्समध्ये किंवा ई-मेलद्वारे लिहून आवर्जून कळवावे. धन्यवाद.
हे ही वाचलंत का?
- महाराष्ट्रातील 48 खासदारांची सामाजिक पार्श्वभूमी अर्थात त्यांच्या जाती
- जगातील 10 बौद्ध महिला राष्ट्रपती आणि पंतप्रधान
- भारतातील 30 सर्वात प्रसिद्ध बौद्ध व्यक्ती
- ‘या’ 14 विद्यापीठांना आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव
- महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी आणि प्रत्येक अनु. जातीची लोकसंख्या
- सर्व आरक्षण रद्द केले तर काय होईल?
धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.
मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.