नवबौद्ध म्हणजे काय? व्याख्या आणि तुलनात्मक विश्लेषण!

नवबौद्ध म्हणजे काय? नवबौद्ध म्हणजे ‘नवदीक्षित’ किंवा ‘धर्मांतरित बौद्ध’ असा साधा अर्थ नाही. मग नवबौद्ध नेमके कोण आहेत? बौद्ध आणि नवबौद्ध यांमध्ये काय फरक आहे? आणि महार समाज व नवबौद्ध यांचा परस्परांशी कसा संबंध आहे? केंद्र व राज्य सरकारच्या दृष्टिकोनातून नवबौद्ध म्हणजे नेमके काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या लेखातून मिळतील. – nav buddha in marathi

नवबौद्ध
नवबौद्ध म्हणजे काय?

नवबौद्ध म्हणजे काय, हा केवळ शब्दाचा अर्थ शोधण्याचा विषय नाही, तर त्यामागील सामाजिक, धार्मिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेण्याचा प्रयत्न आहे. नवबौद्ध हा शब्द धर्मांतरित बौद्धांच्या ओळखीशी जोडला गेला असला, तरी त्याचा अर्थ, व्याप्ती आणि महत्त्व याबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतात.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की नवबौद्ध हा बौद्ध धर्मीय लोकांचा एक विशिष्ट समूह आहे. तो बौद्ध धर्मापासून वेगळा असा स्वतंत्र समूह किंवा धर्म नाही.

या लेखाद्वारे, ‘नवबौद्ध’चा अर्थ, त्यांची ओळख, आणि त्यांचे सामाजिक स्थान स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध धर्म स्वीकारलेल्या समुदायाच्या संस्कृती आणि सामाजिक बदलाचे विश्लेषण. 

 

What is Neo-Buddhist? : “नवबौद्ध” हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल. सामान्यतः त्याचा अर्थ ‘नवीन बौद्ध’ किंवा ‘नवदीक्षित’ किंवा ‘धर्मांतरित बौद्ध’ असा घेतला जातो. मात्र, या शब्दाचा अर्थ यापेक्षा अधिक व्यापक आणि विशिष्ट आहे.

‘नवबौद्ध’ या शब्दाचे अनेकांनी आपल्या दृष्टीकोनानुसार वेगवेगळे अर्थ लावले आहेत. परंतु, केंद्र व राज्य सरकारच्या दृष्टिकोनातून नवबौद्ध म्हणजे नेमके काय, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

या शब्दावरूनच हे स्पष्ट होते की नवबौद्ध हा बौद्ध धर्मामधील एक विशिष्ट समूह किंवा गट आहे. पण, हा समूह नेमका काय आहे? तो जात आहे की प्रवर्ग? धर्म आहे की बौद्ध धर्मातील एक पंथ? आणि बौद्ध व नवबौद्ध यांमध्ये काय फरक आहे? महार आणि नवबौद्ध यांचा एकमेकांशी नेमका कसा संबंध आहे?

या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि नवबौद्धांच्या सामाजिक आणि धार्मिक ओळखीचा सखोल अभ्यास या लेखात करण्यात आला आहे.

 

बौद्ध म्हणजे काय?

नवबौद्ध ही संकल्पना समजून घेण्यापूर्वी “बौद्ध” म्हणजे काय, हे समजून घेणे आवश्यक आहे. बौद्ध धर्माचे अनुयायी म्हणजेच बौद्ध. इंग्रजीत त्यासाठी “Buddhist” (बुद्धिस्ट) हा शब्द वापरला जातो. बौद्ध म्हणजे बौद्ध धर्म मानणारी व्यक्ती.

बौद्ध व्यक्तींमध्ये पारंपरिक बौद्ध आणि धर्मांतरित बौद्ध यांचा समावेश होतो. बौद्धांमध्ये नवे-जुने, खरे-खोटे अशा प्रकारचे भेद मानले जात नाहीत. दलाई लामांना मानणारे, बाबासाहेबांना मानणारे, श्रीलंकेतील थेरवादी, जपानमधील महायानी—हे सर्वच बौद्ध धर्माच्या विविध परंपरांचा भाग असून ते “बौद्ध” या श्रेणीत येतात.

बौद्ध धर्म हा भारतीय धर्म असून तो भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. सध्या भारतात बौद्ध धर्म हा पाचवा सर्वात मोठा धर्म असून एक कोटीहून अधिक लोक या धर्माचे अनुयायी आहेत. बौद्ध धर्माला बौद्ध धम्म, बुद्ध धम्म, बुद्ध धर्म, बुद्धिस्ट रिलिजन किंवा बुद्धिझम असेही म्हणतात.

भारतातील बौद्ध लोकसंख्या आरक्षणाच्या दृष्टीने एससी बौद्ध, एसटी बौद्ध, ओबीसी बौद्ध आणि जनरल बौद्ध अशा गटांमध्ये विभागली गेली आहे, ज्यांमध्ये एससी बौद्धांचा वाटा सर्वाधिक (68 टक्के) आहे.

भारतामधील सर्व बौद्ध हे नवबौद्ध नसतात, मात्र सर्व नवबौद्ध हे बौद्ध असतात. आता आपण नवबौद्ध म्हणजे काय हे समजून घेऊ.

Statues of Buddha, Ashoka and Ambedkar in Dhule, Maharashtra
Statues of Buddha, Ashoka and Ambedkar in Dhule, Maharashtra

नवबौद्ध म्हणजे काय?

nav buddha caste : नवबौद्ध म्हणजे “अनुसूचित जातीची बौद्ध धर्मीय व्यक्ती” (SC Buddhist). नवबौद्ध यासाठी ‘एससी बौद्ध’,’ ‘अनुसूचित जातीचा बौद्ध’, ‘दलित बौद्ध’, किंवा ‘बौद्ध दलित’ हे पर्यायी शब्द प्रचलित आहेत. मात्र, ‘नवीन बौद्ध’, ‘नवदीक्षित बौद्ध,’ ‘आंबेडकरवादी बौद्ध,’ किंवा ‘धर्मांतरित बौद्ध’ म्हणजेच नवबौद्ध, असा समज चुकीचा आहे.

‘नवबौद्ध’ हे बौद्ध धर्म स्वीकारलेले अनुसूचित जातीचे (किंवा दलित) लोक आहेत. अनेक बौद्ध किंवा महार समाजातील लोक स्वतःला नवबौद्ध म्हणवतात, तर काहीजण या शब्दाला विरोध करतात. या दोन मतप्रवाहांचे कारण म्हणजे नवबौद्ध या शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे लावला जाणे.

  • नवबौद्ध in English : Scheduled Caste Converts to Buddhism

 

नवबौद्ध शब्दाची उत्पत्ती

nav buddha caste category : 1956 मध्ये अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या अनुसूचित जातीतील लोकांनी जातिविरहित हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला. मात्र, धर्मांतरानंतर लगेच त्यांच्या मागासलेपणात काही बदल झाला नाही. धर्मांतरित बौद्धांमध्ये दारिद्र्य, सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण, वेगवेगळ्या गोष्टींचा अभाव अशा गोष्टी पूर्वीप्रमाणे होत्याच. त्यामुळे त्यांना आरक्षण व सवलतींची गरज भासत होती. बौद्धांनी जातिविरहित जुना धर्म सोडून आरक्षणासाठी पुन्हा जातीवर आधारित सवलती घेणे काहींना योग्य वाटत नव्हते.

त्याकाळी, बौद्ध धर्म स्वीकारलेल्या लोकांना ‘अनुसूचित जाती’ म्हणून सवलती मिळाव्यात की नाही, यावर चर्चा सुरू होती. बौद्धांना स्वतंत्र ओळख देण्यासाठी आणि सवलती देण्याच्या उद्देशाने ‘नवबौद्ध’ हा शब्द तयार करण्यात आला. या शब्दाचा वापर अनुसूचित जातीतील धर्मांतरित बौद्धांना ओळखण्यासाठी करण्यात आला, ज्यामुळे त्यांना अनुसूचित जातीच्या सवलती मिळू लागल्या.

महाराष्ट्रात हे शक्य होण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांचे मोठे योगदान होते. बौद्धांना सवलती देण्याला काहींनी विरोध केला, पण यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे नवबौद्धांना अनुसूचित जातीच्या सवलती मिळाल्या. मात्र, देशभरात बौद्धांना अशा सवलती मिळत नव्हत्या. 1950 पासून अनुसूचित जातीतील सभासद म्हणून फक्त हिंदू आणि 1956 पासून शीख धर्मीयांनाच मान्यता होती. 1990 मध्ये बौद्धांना अनुसूचित जातींचे सभासद म्हणून अधिकृत दर्जा मिळाला.

Navboudha : नवबौद्ध शब्दाच्या निर्मितीचा अर्थ बौद्ध धर्मामध्ये जाती घुसवणे किंवा सवलतींचा लाभ घेण्यासाठी जातिवादाला प्रोत्साहन देणे असा नव्हता, तर अनुसूचित जातीतील धर्मांतरित बौद्धांना त्यांच्या मागास परिस्थितीतून बाहेर काढण्याचा तो प्रयत्न होता. तरीही या संकल्पनेवर अनेक प्रकारचे तर्क-वितर्क मांडले गेले.

Dr Babasaheb Ambedkar installing the statue of Lord Buddha at new Buddha Vihar, Dehu Road, District Pune, the then State of Bombay; accompanying his wife Dr Savita Ambedkar (25th December 1954)
डॉ बाबासाहेब आंबेडकर नवीन बुद्ध विहार, देहू रोड, जिल्हा पुणे, तत्कालीन मुंबई राज्य येथे भगवान बुद्धाच्या मूर्तीची स्थापना करताना; त्यांच्या पत्नी डॉ. सविता आंबेडकर यांच्यासोबत (२५ डिसेंबर १९५४)

नवबौद्धची व्याख्या आणि ओळख

nav buddha in marathi : ‘नवबौद्ध’ ही एक सरकारी संज्ञा आहे. महाराष्ट्र शासनाच्या योजनांमध्ये “अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गासाठी” असा उल्लेख आढळतो. मात्र, नवबौद्ध ही ना जात आहे, ना प्रवर्ग, ना 59 अनुसूचित जातींपैकी एखादी जात, आणि ना स्वतंत्र धर्म. नवबौद्ध हे बौद्ध धर्मीय असून, त्यांची ओळख अनुसूचित जातीशीही जोडलेली आहे.

 

नवबौद्धांची सामाजिक स्थिती

नवबौद्ध हे बौद्ध धर्माचे अनुयायी असून, ते अनुसूचित जाती आणि बौद्ध धर्म या दोन्ही श्रेणींमध्ये येतात. म्हणजेच, बौद्ध धर्म मानणाऱ्या अनुसूचित जातींच्या लोकांना नवबौद्ध म्हणतात. 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील 59 अनुसूचित जातींमधील 52,04,284 लोक ‘बौद्ध’ म्हणून नोंदवले गेले आहेत, जे नवबौद्ध आहेत.

देशभरात नवबौद्धांची लोकसंख्या 57.57 लाख इतकी आहे. म्हणजेच देशातील एकूण नवबौद्धांपैकी 90 टक्के महाराष्ट्रात वास्तव्यास आहेत, तर उर्वरित 10 टक्के इतर राज्यांमध्ये राहतात.

 

नवबौद्ध आणि महार यांचा संबंध

नवबौद्धांपैकी बहुतांश (95%) लोक महार समाजातील आहेत, मात्र सर्व नवबौद्ध हे महार नाहीत आणि सर्व महार हे नवबौद्ध नाहीत.

हिंदी माध्यमांमध्ये नवबौद्धांसाठी अनेकदा ‘दलित बौद्ध’ ही संज्ञा वापरली जाते, जशी अनुसूचित जातीच्या हिंदूंसाठी आणि शिखांसाठी अनुक्रमे ‘दलित हिंदू’ आणि ‘दलित शीख’ संज्ञा वापरली जाते.

मात्र, महाराष्ट्रातील अनेक बौद्ध धर्मीय अनुसूचित जातीच्या लोकांनी ‘दलित’ किंवा ‘दलित बौद्ध’ ही संज्ञा नाकारली आहे, तर इतर राज्यांतील अनुसूचित जातींच्या बौद्ध लोकांनी ती स्वीकारली आहे.

नवबौद्ध ही एक सामाजिक आणि धार्मिक ओळख असून, ती भारतीय बौद्ध धर्मीयांमध्ये महत्त्वपूर्ण स्थान राखते.

हेही पाहा : महार समाजाची लोकसंख्या किती? विश्लेषण

 

बौद्ध आणि नवबौद्ध यांत फरक काय?

nav buddha meaning : बौद्ध आणि नवबौद्ध यांतील मुख्य फरक समजून घेताना हे लक्षात घेणे आवश्यक आहे की नवबौद्ध हा बौद्ध धर्मीय लोकांचा एक विशिष्ट समूह आहे, आणि तो बौद्ध धर्मापासून वेगळा, स्वतंत्र समूह किंवा धर्म नाही.

What is the difference between Buddhist and neo-Buddhist? बौद्ध म्हणजे बौद्ध धर्माचा स्वीकार करणारी व्यक्ती, आणि नवबौद्ध म्हणजे अनुसूचित जातीतील बौद्ध धर्मीय व्यक्ती. नवबौद्ध हे बौद्धांहून वेगळे नसून ते देखील बौद्धच असतात. बौद्ध या शब्दातून त्या व्यक्तीच्या धर्माची ओळख होते, तर नवबौद्ध या शब्दामुळे त्या व्यक्तीच्या आरक्षणाच्या प्रवर्गाची आणि धर्माची ओळख समजते.

 

2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील बौद्ध लोकसंख्या:

महाराष्ट्रातील 65,31,200 बौद्ध धर्मीय लोकांची विभागणी खालीलप्रमाणे होती:

  • 52,04,284 एससी बौद्ध (नवबौद्ध)
  • 20,798 एसटी बौद्ध (आदिवासी बौद्ध)
  • 13,06,118 इतर बौद्ध (ओबीसी व खुल्या प्रवर्गातील)

महाराष्ट्रातील एकूण बौद्ध धर्मीयांपैकी 79.68% अनुसूचित जातीचे बौद्ध (नवबौद्ध/ एससी बुद्धिस्ट), 0.32% अनुसूचित जमातीचे बौद्ध (आदिवासी बौद्ध/ एसटी बुद्धिस्ट), आणि 20% इतर बौद्ध होते.

जनगणनेमध्ये “अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर” असे तीनच सामाजिक गट असल्याने, ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी, ईडब्ल्यूएस आणि अनारक्षित/ खुल्या प्रवर्गांतील बौद्ध लोक हे “इतर” मध्ये गणले गेले होते.

जर भविष्यात जातनिहाय जनगणना केली गेली, तर एससी-एसटी यांच्यासोबत ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी, ई डब्ल्यू एस आणि जनरल प्रवर्गातील बौद्धांची लोकसंख्या देखील समजून घेता येईल.

 

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील बौद्ध:

महाराष्ट्रातील 59 अनुसूचित जातींपैकी 53 जातींमध्ये बौद्ध धर्मीय लोक आढळून आले, ज्यांना नवबौद्ध म्हणून ओळखले जाते. एकमेव “महार” जातीत नवबौद्ध समाविष्ट नाहीत. महारेतर 52 अनुसूचित जातींमधील लोक बौद्ध (नवबौद्ध) होते, पण त्यांची संख्या कमी आहे. 

 

नवबौद्ध कोण आहे आणि कोण नाही?

प्रा. सुकुमार कांबळे आणि एकनाथ आवाड हे मातंग समाजातील व्यक्ती आहेत, ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून बौद्ध धर्म स्वीकारला. मांग/ मातंग ही एक अनुसूचित जात असल्यामुळे हे दोघे “नवबौद्ध” ठरतात.

पण, कविवर्य सुरेश भट हे ब्राह्मण समाजाचे होते आणि त्यांनी बाबासाहेबांच्या प्रेरणेतून बौद्ध धर्म अंगीकारला. ब्राह्मण ही खुल्या गटात (जनरल) मोडणारी जात असल्यामुळे त्यांना “नवबौद्ध” म्हणता येणार नाही.

तसेच एक उदाहरण आहे सुषमा अंधारे यांचे, ज्या भटक्या विमुक्त (VJ-NT) समाजातील आहेत आणि त्यांनी देखील बौद्ध धर्म स्वीकारला. तथापि, त्या अनुसूचित जातीच्या नसल्यामुळे त्या देखील “नवबौद्ध” ठरत नाहीत.

त्याचप्रमाणे, डॉ. नरेंद्र जाधव हे महार समाजाचे आहेत आणि बौद्ध धर्मीय आहेत. त्यांना “नवबौद्ध” म्हणता येते कारण महार ही अनुसूचित जात आहे.

 

‘धर्मांतरित बौद्ध’ म्हणजेच ‘नवबौद्ध’ असा समज चुकीचा आहे, हे तुम्हाला वरील उदाहरणांवरून लक्षात आले असेल. “नवबौद्ध” असलेल्या व्यक्तींचा धर्म बौद्ध असतो, पण त्यांचा जातीय संबंध देखील महत्त्वाचा आहे.

Statues of Dr Ambedkar and the Buddha in Wolverhampton Buddha Vihara, UK
Statues of Dr Ambedkar and the Buddha in Wolverhampton Buddha Vihara, UK

नवबौद्ध: जात, धर्म की प्रवर्ग?

नवबौद्ध जात प्रवर्ग? नवबौद्ध हा बौद्ध धर्म मानणाऱ्या लोकांचा एक समूह आहे, परंतु तो ना जात आहे, ना धर्म. नवबौद्ध यास एक विशिष्ट जातीसमूह म्हणता येईल, कारण तो बौद्ध धर्म स्वीकारलेल्या विविध अनुसूचित जातींच्या लोकांचा समूह आहे.

nav buddha caste category in marathi : नवबौद्ध हा बौद्ध धर्माचा एक पंथ किंवा संप्रदाय नाही, तसेच तो बौद्ध धर्मापासून वेगळा धर्मही नाही. अनेकांना नवबौद्ध हा “अनुसूचित जाती प्रवर्ग” असल्यासारखा वाटतो, परंतु प्रत्यक्षात नवबौद्ध हा अनुसूचित जातींमधील एक उपगट किंवा वर्ग आहे.

महाराष्ट्रातील काही शाळांमध्ये बौद्ध विद्यार्थ्यांच्या शाळेच्या दाखल्यावर “जात” म्हणून नवबौद्ध असा उल्लेख आढळतो, तर काही ठिकाणी “धर्म” म्हणून नवबौद्ध लिहिलेले असते. वास्तविक पाहता, नवबौद्ध ही ना जात आहे, ना धर्म; ती एका सामाजिक आणि धार्मिक ओळखीचे प्रतीक आहे.

हेही पाहा : महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी आणि प्रत्येक SC जातीची लोकसंख्या 

 

नवबौद्ध आरक्षण

नवबौद्ध समाजाला आरक्षण किती आहे? नवबौद्ध समाजाला अनुसूचित जातींप्रमाणेच आरक्षणाचा लाभ मिळतो.

भारतात अनुसूचित जातींसाठी 15 टक्के आरक्षण आहे, आणि हेच आरक्षण नवबौद्धांसाठीही लागू होते. मात्र, हे 15 टक्के आरक्षण फक्त नवबौद्धांसाठी नसून सर्व अनुसूचित जातींसाठी आहे.

महाराष्ट्रात अनुसूचित जातींसाठी 13 टक्के आरक्षण आहे, आणि नवबौद्ध देखील याच आरक्षणाच्या श्रेणीत समाविष्ट आहेत.

films based on dr ambedkar
जोशी की कांबळे चित्रपटात नायक हा नवबौद्ध दाखवला आहे ; स्रोत : YouTube

नवबौद्ध आणि महार

nav buddha religion : नवबौद्ध आणि महार हे शब्द सहसा एकमेकांसाठी पर्यायी मानले जातात कारण बहुसंख्य नवबौद्ध हे महार समाजातील आहेत, आणि बहुसंख्य महार हे नवबौद्ध आहेत. मात्र, प्रत्येक महार नवबौद्ध नसतो आणि प्रत्येक नवबौद्ध महार नसतो. त्यामुळे हे दोन्ही शब्द एकाच व्यक्तीसाठी लागू होऊ शकतात किंवा दोन वेगळ्या व्यक्तींसाठी लागू होऊ शकतात.

2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीवर आधारित:

  • महार जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात 80,06,060 होती, यांमध्ये 49,43,821 बौद्ध (नवबौद्ध), 30,54,158 हिंदू (हिंदू दलित), आणि 8,081 शीख (हिंदू शीख) होते.
  • महाराष्ट्रातील नवबौद्धांची एकूण लोकसंख्या 52,04,284 होती. त्यांपैकी 49,43,821 (95%) महार जातीतील होते, तर 2,60,463 (5%) नवबौद्ध अन्य 58 अनुसूचित जातींमधील होते.
  • जर जनगणनेत 30.54 लाख ‘हिंदू’ महारांची धार्मिक नोंद ‘बौद्ध’ महार म्हणून झाली असती, तर महाराष्ट्रातील नवबौद्धांची लोकसंख्या 82,58,442 (62.21%) आणि हिंदू दलितांची लोकसंख्या 50,05,972 (37.71%) झाली असती.
  • महाराष्ट्रातील एकूण 65,31,200 बौद्ध धर्मीयांपैकी 49,43,821 (75.70%) महार होते.

 

हेही पाहा : महाराष्ट्रातील विद्यमान बौद्ध खासदारांची यादी (2024-29)

महार समाज धर्मनिहाय लोकसंख्या
महार समाज धर्मनिहाय लोकसंख्या

नवबौद्ध लोकसंख्या

navboudha in marathi : 2016 मध्ये महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी नवबौद्धांना जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात सांगितले होते की, किमान आठ राज्यांमध्ये बौद्ध धर्म स्वीकारलेल्या अनुसूचित जातींची लोकसंख्या सुमारे पाच कोटी आहे. (संदर्भ बातमी)

तथापि, या पाच कोटी नवबौद्धांची नोंद शासकीय जनगणनेत झालेली नाही. सध्या, सुमारे एक दशकानंतर पाच कोटी नवबौद्ध लोकसंख्या वाढून साडेसहा ते सात कोटींपर्यंत पोहोचलेली असण्याची शक्यता आहे.

 

2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील बौद्धांची लोकसंख्या 84.43 लाख होती, ज्यापैकी 57.57 लाख (68%) बौद्ध अनुसूचित जातींचे (नवबौद्ध) होते.

महाराष्ट्रात अनुसूचित जातींची लोकसंख्या 52,04,284 होती. त्यापैकी प्रमुख बौद्ध अनुसूचित जाती, त्यांची बौद्ध लोकसंख्या आणि एकूण बौद्ध अनुसूचित जातींमध्ये त्यांचे टक्केवारी असे आहे:

[37] महार जात: 49,43,821 (94.98%)

[46] मांग जात: 35,831 (0.69%)

[11] चांभार जात: 17,412 (0.33%)

[35] मादगी जात: 2,902 (0.06%)

[12] भंगी जात: 1,732 (0.03%)

 

(महाराष्ट्रातील 59 अनुसूचित जातींची धर्मनिहाय लोकसंख्या पाहा)

 

नवयान बौद्ध धर्म आणि नवबौद्ध यांचा परस्पर संबंध

neo buddhism meaning : ‘नवयान बौद्ध धर्म’ म्हणजे ‘नवबौद्ध धर्म’, परंतु याचा संबंध ‘नवबौद्ध’ व्यक्तिशी थेट जोडला जात नाही. नवयान धर्माला अनुसरलेली व्यक्ती कोणत्याही प्रवर्गातील असू शकते. जसे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी व अनारक्षित प्रवर्ग.

त्यामुळे नवयान धर्म मानणाऱ्याला ‘नवयानी बौद्ध’ किंवा ‘आंबेडकरवादी बौद्ध’ म्हणता येईल, परंतु त्याला फक्त ‘नवबौद्ध’ म्हणणे योग्य ठरणार नाही. नवबौद्ध फक्त एकाच प्रवर्गातील असतात (अनुसूचित जाती).

तथापि, नवबौद्ध हा शब्द प्रामुख्याने सर्व आंबेडकरी बौद्धांसाठी वापरला जातो, जे नवयान बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना दिलेला बौद्ध धम्म हा महायान किंवा हीनयान नसून, ‘नवयान’ (नवबौद्ध धम्म) होता. नवयान ही डॉक्टर आंबेडकरांनी विकसित केलेली स्वतंत्र बौद्ध विचारधारा आहे. बाबासाहेबांनी हा धम्म बुद्धाच्या मूळ शिकवणींवर आधारित असल्याचे सांगितले होते.

भारतीय बौद्धांपैकी अनेक जण नवयानला वेगळा बौद्ध संप्रदाय मानत नाहीत, कारण बाबासाहेबांनी तो बुद्धाचा मूळ बौद्ध धम्म – नवयान असल्याचे सांगितले आहे.

 

बौद्ध लोकसंख्येचा अभ्यास:

2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्या 84 लाख होती. भारतातील बौद्धांपैकी 87% (73 लाख) जण हे नवयानी/ आंबेडकरवादी बौद्ध असून, ते धर्मांतरित होते. उर्वरित 13% (11 लाख) हे हिमालयीन व ईशान्य भागातील पारंपरिक बौद्ध होते. 

भारतातील एकूण बौद्धांपैकी 77% (65 लाख) अनुयायी महाराष्ट्रात होते. तर भारतातील एकूण नवयानी बौद्धांपैकी सुमारे 90% (65 लाख) नवबौद्ध महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रातील बौद्ध लोकसंख्येच्या 99.98% लोकांना नवयानी बौद्ध मानले जाते.

 

नवबौद्ध जात प्रमाणपत्र

nav buddha caste certificate : जात प्रमाणपत्र म्हणजे जातीचा अधिकृत दाखला, ज्याला इंग्रजीत “Caste Certificate” म्हणतात. बौद्ध धर्म मानणाऱ्या अनुसूचित जातीतील लोक दोन प्रकारचे जात प्रमाणपत्र काढतात:

1. Scheduled Caste

2. Scheduled Caste Converts to Buddhism

 

जात प्रमाणपत्रांचे प्रकार:

1. Form No. 6 (Scheduled Caste):

या प्रमाणपत्रावर विशिष्ट अनुसूचित जातीचे नाव व तिचा अनुक्रमांक असतो. उदाहरणार्थ:

  • 11 – Chambhar
  • 37 – Mahar
  • 46 – Mang

 

2. Form No. 7 (Scheduled Caste Converts to Buddhism):

या प्रकारच्या प्रमाणपत्रावर “अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्ध” असा उल्लेख असतो. त्यासोबत जातीचा अनुक्रमांक असतो, पण जातीचे नाव लिहिलेले नसते. उदाहरणार्थ:

  • Scheduled Caste Converts to Buddhism – Sr. No. 11
  • Scheduled Caste Converts to Buddhism – Sr. No. 37
  • Scheduled Caste Converts to Buddhism – Sr. No. 46

 

Form No. 7 (Scheduled Caste Converts to Buddhism) वर आधारित प्रमाणपत्राला “नवबौद्ध जात प्रमाणपत्र” म्हटले जाते. मात्र, हे प्रमाणपत्र फक्त महाराष्ट्रात वैध आहे; महाराष्ट्राबाहेर ते मान्य होत नाही.

Form No. 6(Scheduled Caste) हे केंद्र सरकारच्या स्वरूपातले प्रमाणपत्र आहे, जे संपूर्ण भारतात मान्य होते. त्यामुळे बौद्धांनी हे प्रमाणपत्र काढणे अधिक फायदेशीर ठरते.

 

महत्त्वाचे मुद्दे:

  • जात प्रमाणपत्रावर केवळ जातीचा उल्लेख असतो, धर्माचा उल्लेख नसतो. त्यामुळे जात प्रमाणपत्रावर बौद्ध धर्माचा उल्लेख करण्याचा हट्ट धरणे योग्य नाही, कारण बौद्ध ही जात नसून धर्म आहे.
  • जात प्रमाणपत्रावर “हिंदू महार”, “हिंदू मांग” किंवा “हिंदू चांभार” असे उल्लेख आढळत नाहीत. त्यावर फक्त “महार”, “मांग” किंवा “चांभार” असेच लिहिलेले असते.
  • “महार” जात प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तीला कागदोपत्री हिंदू मानले जात नाही. महार ही जात असून धर्म स्वतंत्र बाब आहे. अशा व्यक्ती आपला धर्म “बौद्ध” नोंदवू शकतात.

 

गैरसमज दूर करणे:

  • “बौद्ध” म्हणून स्वतंत्र जात प्रमाणपत्र नसते, कारण बौद्ध ही जात नाही. “अनुसूचित जातीची धर्मांतरित बौद्ध व्यक्ती” (Scheduled Caste Converts to Buddhism) या स्वरूपाचे प्रमाणपत्र मिळते, ज्याला “नवबौद्ध जात प्रमाणपत्र” म्हटले जाते.
  • जात प्रमाणपत्रावर सर्वांत महत्त्वाचा उल्लेख “अनुसूचित जात” (Scheduled Caste) असतो, कारण तोच सवलतींसाठी पात्रता निश्चित करतो.

जात प्रमाणपत्राच्या स्वरूपाची योग्य माहिती असणे आणि त्याचा योग्य उपयोग करणे हे अत्यावश्यक आहे.

 

‘नवबौद्ध’ संज्ञा वापरावी की नाही?

‘नवबौद्ध’ या संज्ञेचा वापर करावा की नाही यावर चर्चा विविध दृष्टिकोनातून केली जाऊ शकते. या शब्दाचा वापर करतांना त्याचा संदर्भ आणि उद्देश महत्त्वाचा आहे.

 

1. नवबौद्ध शब्दाचा वापर का करावा?

‘नवबौद्ध’ हा शब्द अनुसूचित जातीतील त्या व्यक्तींची ओळख दर्शवतो, ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे. हा शब्द एक सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ प्रदान करतो आणि सरकारच्या दस्तऐवज तसेच योजनांमध्येही अधिकृतपणे वापरला जातो. त्यामुळे या शब्दाचा वापर करणे योग्य ठरते.

काही लोकांना ‘नवबौद्ध’ शब्द अपरिहार्य वाटतो कारण तो एकाच वेळी जात आणि धर्म यांचा संदर्भ स्पष्ट करतो. ‘नवबौद्ध’ ही सरकारी मान्यता असलेली एक विशिष्ट संज्ञा आहे. हा शब्द जात, धर्म, पंथ किंवा प्रवर्ग यात कुठेही थेट बसत नाही.

अनुसूचित जातीतील दोन प्रमुख धार्मिक गट म्हणजे “हिंदू दलित” आणि “नवबौद्ध”. “हिंदू दलित” म्हणजे अनुसूचित जातीतील हिंदू धर्मीय व्यक्ती, तर “बौद्ध दलित” म्हणजे अनुसूचित जातीतील बौद्ध धर्मीय व्यक्ती. बौद्ध दलितांसाठीच ‘नवबौद्ध’ हा शब्द वापरला जातो.

अनुसूचित जातीतील हिंदू धर्मीय व्यक्तींसाठी ‘हिंदू दलित’ किंवा ‘दलित हिंदू’ हे शब्द सर्रास वापरले जातात, आणि ते स्वीकार्य देखील आहेत. परंतु अनुसूचित जातीतील बौद्ध धर्मीय व्यक्तींसाठी ‘बौद्ध दलित’ किंवा ‘दलित बौद्ध’ हे स्वीकार्य शब्द नाहीत, त्यापेक्षा ‘नवबौद्ध’ हा शब्द अधिक योग्य आणि प्रभावी मानला जातो. हिंदू दलितांपासून वेगळी धार्मिक ओळख प्रस्थापित करण्यासाठी ‘नवबौद्ध’ हा शब्द उपयुक्त ठरतो.

हेही पाहा : महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची धर्मनिहाय लोकसंख्या

 

2. नवबौद्ध शब्दाचा वापर का करू नये?

बौद्ध धर्म स्वीकारणारे अनुसूचित जातीचे लोक यांची नवबौद्ध म्हणून वेगळी ओळख निर्माण करण्याची गरज नाही. धर्म आणि जात या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या स्वतंत्रपणे नमूद करता येतात. जिथे धर्म विचारला जाईल, तिथे “बौद्ध” असे सांगता येते, आणि जिथे प्रवर्ग विचारला जाईल, तिथे “अनुसूचित जाती” असा उल्लेख करता येतो. त्यामुळे धर्म आणि जातीचा प्रवर्ग एकत्रितपणे सांगण्याची आवश्यकता नसते.

1956 नंतर अनुसूचित जातीतील अनेकांनी हिंदू धर्माचा त्याग करून जातीविरहित बौद्ध धर्म स्वीकारला. अशा लोकांनी स्वतःची धार्मिक ओळख “बौद्ध” आणि प्रवर्गाची ओळख “अनुसूचित जाती” म्हणून स्पष्ट करावी. भारतीय कायद्यानुसार, अनुसूचित जातीतील व्यक्ती हिंदू, बौद्ध किंवा शीख धर्माची अनुयायी असू शकते. त्यामुळे “[महार, मांग, चांभार ही] अनुसूचित जात म्हणजे हिंदू व्यक्ती” हा गैरसमज दूर केला पाहिजे.

जात आणि धर्म या दोन गोष्टी स्वतंत्रपणे ओळखण्यासाठी पुरेशा आहेत, त्यामुळे ‘नवबौद्ध’चे अतिरिक्त लेबल लावण्याची आवश्यकता नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून बौद्ध धर्म स्वीकारलेल्या लोकांनी आपली धार्मिक ओळख “बौद्ध” किंवा “बुद्धिस्ट” म्हणूनच मांडावी आणि जिथे गरज असेल तिथे [पूर्वाश्रमीची] जात व प्रवर्ग स्पष्ट करावा.

 

पर्यायी शब्द वापरणे:

नवबौद्ध या शब्दासाठी ‘अनुसूचित जातीचे बौद्ध’, ‘एससी बौद्ध’ किंवा ‘एससी बुद्धिस्ट’ हे पर्यायी शब्द अधिक समर्पक आहेत, कारण त्यातून त्या व्यक्तींच्या धार्मिक व जातीय ओळखीला स्पष्टपणे दर्शवले जाते.

‘दलित बौद्ध’ हा शब्ददेखील वापरला जातो, पण काही समाजात तो व्यापकपणे स्वीकारला जात नाही.


टीप: काही मुद्द्यांची पुनरावृत्ती झालेली आढळू शकते, कारण प्रत्येक विभागात विषय अधिक स्पष्ट करण्यासाठी आणि सखोल माहिती देण्याच्या उद्देशाने तीच माहिती पुन्हा नमूद करण्यात आली आहे.

वाचकांचा अभिप्राय :

तुम्हाला हा लेख कसा वाटला? तुमचे विचार, सूचना किंवा अनुभव आमच्याशी शेअर करा, जेणेकरून आम्ही आणखी सुधारणा करू शकू.

प्रिय वाचक, जर तुम्हाला धम्म भारत वेबसाइटवरील लेख तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये शेअर करायचे असतील, तर कृपया आमचा 9834075925 हा व्हॉट्सॲप नंबर तुमच्या ग्रुपमध्ये जोडावा.


धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.


मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

2 thoughts on “नवबौद्ध म्हणजे काय? व्याख्या आणि तुलनात्मक विश्लेषण!

  1. आज मला नवबौद्ध घटकाबद्दल अतिशय महत्त्वाची व उपयुक्त माहिती मिळाली आहे. हे आर्टिकल वाचल्यानंतर माझे अनेक गैरसमज दूर झाले. नवबौद्ध म्हणजे नवदीक्षित बौद्ध असाच माझा आतापर्यंत समज होता, पण आता मुद्दा क्लिअर झाला. धन्यवाद धम्म भारत.

  2. ही पोस्ट नवबौद्ध संकल्पनेचा सारगर्भित परिचय देते. लेखातील माहिती सुबोध आणि अभ्यासपूर्ण वाटली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!