महाबोधी मुक्ती आंदोलन: बौद्ध धर्मीयांचा धार्मिक स्वातंत्र्यासाठी संघर्ष!

बिहारमधील बोधगया येथे स्थित महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्ध धर्मीयांसाठी सर्वात पवित्र स्थळ आहे, कारण येथेच भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती. मात्र, दुर्दैवाने या ठिकाणच्या व्यवस्थापनावर बौद्ध धर्मीयांना पूर्ण नियंत्रण नाही तर ते हिंदूंच्या ताब्यात आहे, आणि याच प्रमुख कारणामुळे महाबोधी मुक्ती आंदोलन सुरु आहे.

mahabodhi temple protest
mahabodhi temple protest

महाबोधी मंदिराचा इतिहास

बिहार मधील बोधगया येथील महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्धांसाठी “सर्वात पवित्र” तीर्थस्थान आहे. महाबोधी महाविहार अर्थात महाबोधी मंदिर हे प्राचीन बौद्ध वास्तुशिल्पातील एक अनमोल रत्न आहे. या स्थळीच इ.स.पू. 6व्या शतकात भगवान बुद्धांना बोधी किंवा ज्ञानप्राप्ती झाली होती. सम्राट अशोकाने या जागेचे महत्त्व ओळखून इ.स.पू. 3ऱ्या शतकात येथे बौद्ध विहार आणि स्तूप बांधले.

यानंतर अनेक शतकांमध्ये या स्थळाचा विकास झाला, परंतु मध्ययुगात भारतात बौद्ध धर्माचा र्‍हास झाल्यानंतर हे बौद्ध मंदिर दुर्लक्षित राहिले. नंतर 19व्या शतकात ब्रिटिश अधिकारी सर अलेक्झांडर कन्निंगहॅम यांच्या प्रयत्नांमुळे या महत्त्वपूर्ण बौद्ध स्थळाची पुनर्स्थापना झाली. आज, महाबोधी महाविहार युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे.

सुरुवातीला महाबोधी महाविहाराचे नियंत्रण बौद्ध धर्मीयांकडे होते. साधारणतः 13व्या शतकानंतर भारतातील बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला, आणि पुढे 13व्या ते 16व्या शतकादरम्यान हे स्थळ हिंदू महंतांच्या ताब्यात गेले. त्यानंतर शतकानुशतके ते हिंदू संप्रदायाच्या देखरेखीखाली होते. 19व्या शतकात ब्रह्मदेश (आताचा म्यानमार) व श्रीलंकेतून बौद्ध संघटनांनी या स्थळावरील बौद्ध धर्मीयांचे स्वामित्व पुनर्स्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

हिंदू महंतांच्या नियंत्रणाखाली असलेल्या महाबोधी मंदिराच्या व्यवस्थापनात बौद्धांना कोणताही अधिकार नव्हता. ब्रिटिश काळातही या मुद्द्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. तथापि, अनागारिक धर्मपाल यांच्या नेतृत्वाखाली 1891 मध्ये सुरू झालेल्या महाबोधी चळवळीने हे प्रश्न जागतिक स्तरावर मांडले. याच चळवळीमुळे अखेरीस भारतीय स्वातंत्र्यानंतर बिहार सरकारने महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा, 1949 लागू केला.

हा कायदा मंदिर व्यवस्थापनासाठी समिती स्थापन करण्यासंबंधी होता, पण यात हिंदूंचे वर्चस्व कायम ठेवले गेले, आणि अल्पमतात का होईना पण बौद्धांना सुद्धा यात स्थान देण्यात आले.


महाबोधी टेंपल ॲक्ट 1949 – हिंदूंचे वर्चस्व

बिहार सरकारने 1949 मध्ये “महाबोधी मंदिर कायदा 1949” (बीटी ॲक्ट 1949) लागू केला, ज्याद्वारे महाबोधी महाविहाराच्या देखरेखीचे आणि व्यवस्थापनाचे काम महाबोधी मंदिर व्यवस्थापन समिती (BodhGaya Temple Management Committee – BTMC) कडे सोपवण्यात आले. या समितीत हिंदूंचे स्पष्ट वर्चस्व आहे.

BT ॲक्टच्या सेक्शन 3 नुसार –

  1. या अधिनियमाच्या अंमलबजावणी नंतर, राज्य सरकार एक समिती तयार करेल. या समितीला मंदिराच्या भूमी आणि त्यासंबंधीच्या संपत्त्यांचे व्यवस्थापन आणि नियंत्रण दिले जाईल.

  2. समितीत एक अध्यक्ष आणि आठ सदस्य असतील, ज्यांना राज्य सरकार द्वारे नेमले जाईल. सर्व सदस्य भारतीय नागरिक असतील. यामध्ये चार सदस्य बौद्ध धर्माचे असतील आणि चार हिंदू धर्माचे असतील, ज्यामध्ये महंत (मुख्य पुजारी) देखील असतील. जर महंत अल्पवयीन, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असतील किंवा समितीमध्ये समाविष्ट होऊ इच्छित नसतील, तर त्यांच्याऐवजी अन्य कोणत्याही हिंदू सदस्याला नेमले जाईल.

  3. गया जिल्ह्याचा जिल्हा मजिस्ट्रेट (DM) समितीचा स्वयंचलित अध्यक्ष (ex-officio Chairman) असेल. जर जिल्हा मजिस्ट्रेट हिंदू नसतील, तर त्या कालावधीसाठी राज्य सरकार कोणत्याही हिंदू व्यक्तीला अध्यक्ष म्हणून नेमेल. (मात्र, 2013 मध्ये या कायद्यात दुरुस्ती करून जिल्हाधिकारी हिंदूच असावा, ही अट काढण्यात आली.)

  4. राज्य सरकार समितीच्या सदस्यांपैकी एका सदस्याला सचिव म्हणून नेमेल.


समितीतील धर्मीयांचे प्रमाण:

एकूण सदस्यसंख्या – 9

अध्यक्ष – 1 (बहुदा हिंदू)

हिंदू सदस्य – 4 

बौद्ध सदस्य4 

महाबोधी टेंपल ॲक्ट 1949, यानुसार महाबोधी विहाराच्या व्यवस्थापन समितीमध्ये 4 हिंदू (ब्राह्मण) आणि 4 बौद्ध (भिक्खू) सभासद असावे.

या समितीचा अध्यक्ष “हिंदू”च असावा असाही नियम आधी होता, मात्र 2013 मध्ये या कायद्यात दुरुस्ती करून जिल्हाधिकारी हिंदूच असावा, ही अट काढण्यात आली.

असे असले तरीही जिल्हाधिकारी बहुदा हिंदूच असतो. आणि अशाप्रकारे महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापन समितीमध्ये 5 हिंदू आणि 4 बौद्धांचा समावेश असतो, असे म्हणता येते. 


हे प्रकरण इथेच अडकलं आहे की BMTC मध्ये हिंदू सदस्य का आहेत. सध्या महाबोधी मंदिराच्या मुक्तीसाठी जे आंदोलन सुरू आहे त्याचे नेतृत्व ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम करत आहे.

महाबोधी महाविहाराच्या हिंदूंपासून मुक्तीची ही मागणी यापूर्वीही अनेक वेळा केली गेली आहे. हा वाद 19व्या शतकातच सुरू झाला होता. त्यावेळी BMTC ॲक्ट देखील पारित झालेला नव्हता. मात्र, महाबोधी मंदिरात त्या काळीही बौद्ध धर्माच्या लोकांना पूर्ण अधिकार नव्हता.

श्रीलंकेतील अनागरिक धर्मपाल नावाचे एक बौद्ध भिक्खू होते. दक्षिण आशियामध्ये बौद्ध धर्माच्या पुनरुत्थानात त्यांचे विशेष योगदान मानले जाते. 1891 मध्ये भारत दौऱ्यादरम्यान त्यांनी पहिल्यांदा महाबोधी मंदिरावर बौद्ध धर्मियांचे अधिकार असावेत अशी मागणी केली.

त्या वेळेला बोधगया मठाचा या मंदिरावर हक्क होता. बोधगया मठ, बिहारच्या गया जिल्ह्यात स्थित आहे. हा मठ शंकराचे पूजा स्थळ म्हणून ओळखला जातो. अनागरिक धर्मपाल यांनी जोरदार मागणी केली, पण हिंदू महंतांनी महाबोधी मंदिरावरील आपला अधिकार सोडला नाही. त्यानंतरही बौद्ध धर्मीयांनी अनेक दशके महाबोधी मंदिराचा मुद्दा उपस्थित केला.

1992 मध्ये पुन्हा एकदा आंदोलन उभे राहिले. यावेळी अखिल भारतीय महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीने निदर्शने केली आणि मंदिराचे व्यवस्थापन बौद्धांकडे सोपवण्याची मागणी केली. या आंदोलनात अखिल भारतीय भिक्षू महासंघ आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांचाही सहभाग होता.

या चळवळीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘धम्म मुक्ती यात्रा’, जी मुंबई ते महाबोधी मंदिरापर्यंत रथयात्रेच्या स्वरूपात काढण्यात आली. ही यात्रा मंदिराच्या मुक्तीच्या आवाहनाचे प्रतीक होती. या यात्रेचे नेतृत्व भंते नागार्जुन आर्य सुरई ससाई यांनी केले होते, जे मूळचे जपानचे भिक्षू होते आणि नंतर त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारले. नागपूरच्या आंबेडकरी बौद्ध समुदायाचे ते एक प्रमुख नेते मानले जाते.

पण 1995 मध्ये या आंदोलनाने एक महत्त्वाचे वळण घेतले. बौद्ध संघटना आवाज उठवत होत्याच, पण 1995 मध्ये बोधगयामध्ये प्रदीर्घ आंदोलन करण्यात आले. त्यावेळी बिहारमध्ये लालू यादव यांचे सरकार सत्तेत होते. 86 दिवसांच्या निदर्शनांनंतर, त्यांनी आपल्या हुशार मुत्सद्देगिरीने आंदोलन शांत केले आणि निदर्शने करणाऱ्या लोकांना बीएमटीसीचे सदस्य बनवले आणि त्यांना ‘व्यवस्थेत’ राहून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास सांगितले.


बौद्ध धर्मीयांवर अन्याय – अन्य धर्मांच्या स्थळांसाठी वेगळे नियम?

एखाद्या धर्मीयांच्या धार्मिक स्थळावर त्याच धर्म बांधवांचा अधिकार असतो आणि असावा, ही गोष्ट सर्वश्रुत आहे.

* हिंदू मंदिराच्या व्यवस्थापन समितीत फक्त हिंदूच असतात.

* चर्चच्या व्यवस्थापन समितीत फक्त ख्रिश्चन व्यक्तीच असतात.

* गुरुद्वाऱ्याच्या व्यवस्थापन समितीत फक्त शीख लोकच असतात.

* मशिदीच्या व्यवस्थापन समितीत फक्त मुस्लिमच असतात.

* याप्रमाणेच, महाबोधी मंदिर या बौद्ध विहाराच्या व्यवस्थापन समितीत फक्त बौद्धच असावेत!

मात्र, महाबोधी महाविहार बौद्ध धर्माचे असूनही तेथील व्यवस्थापन समितीत बौद्धांहून जास्त हिंदू सभासद आहेत! हा बौद्ध धर्मीयांवरील मोठा अन्याय आहे.

 

बौद्ध धर्मावर होणारे अतिक्रमण

या व्यवस्थेमुळे महाबोधी महाविहारात हिंदू धर्माचे कर्मकांड आणि विधी कायदेशीरपणे केले जातात, जे बौद्ध धर्मात निषेधार्ह आहेत. या पवित्र बौद्ध स्थळावर बौद्ध धर्माचे आचरण व्हायला पाहिजे, पण येथे हिंदू धर्माचरण घडते.

काही हिंदू लोक महाबोधी मंदिराला “शिव मंदिर” म्हणून चुकीची ओळख देत आहेत, पण इतिहास पाहिला तर स्पष्ट होते की हे शिव मंदिर किंवा हिंदू मंदिर नसून, सम्राट अशोकाने बांधलेले भगवान बुद्धांचे महाविहार आहे.

 

महाबोधी मुक्ती आंदोलन – बौद्ध धर्मीयांची मागणी

12 फेब्रुवारी 2025 पासून बिहारमध्ये नव्याने ‘महाबोधी मुक्ती आंदोलन’ सुरू आहे. या आंदोलनात बौद्ध भिक्खू आणि उपासक महाबोधी महाविहाराच्या संपूर्ण नियंत्रणासाठी उपोषणाला बसले आहेत. त्यांची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे, परंतु त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

 

बौद्ध धर्मीयांच्या प्रमुख मागण्या:

1. महाबोधी महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण बौद्ध धर्मीयांकडे द्यावे.

2. महाबोधी टेंपल ॲक्ट 1949 रद्द करावा आणि व्यवस्थापन समितीत फक्त बौद्ध धर्मीय असावेत.

3. समितीचा अध्यक्ष होण्याचा अधिकार फक्त बौद्ध धर्मीय व्यक्तीला द्यावा. अ-बौद्ध व्यक्ती अध्यक्ष असू नये.

4. महाविहाराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक बाबींमध्ये कोणत्याही बाह्य धर्मीयांचा हस्तक्षेप थांबवावा.

 

बौद्ध धर्मीयांसाठी एक महत्त्वाची लढाई!

महाबोधी महाविहार केवळ एक पर्यटन स्थळ किंवा धार्मिक स्थळ नाही, तर ते संपूर्ण बौद्ध समुदायासाठी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र आहे. त्याच्या संरक्षणासाठी आणि धार्मिक स्वायत्ततेसाठी लढा देणे प्रत्येक बौद्ध अनुयायाचे कर्तव्य आहे.

महाबोधी मुक्ती आंदोलनाला पाठिंबा द्या, या आंदोलनाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि बौद्ध धर्माच्या हक्कांसाठी आवाज उठवा!


वाचकांसाठी :

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तसेच तुमच्या काही सूचना किंवा प्रश्न असतील तर कृपया कॉमेंट बॉक्समध्ये किंवा ई-मेलद्वारे लिहून आवर्जून कळवा. धन्यवाद.


हे ही वाचलंत का?


धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.


मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!