डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस ही भारतीय इतिहासातील दोन दिग्गज व्यक्ती आहेत. केवळ एकदाच या दोन नेत्यांची भेट झाली आहे. जेव्हा सुभाष बाबू बाबासाहेबांशी भेटले ते स्थळ होते मुंबई आणि ती तारीख होती 22 जुलै 1940. या लेखामध्ये नेताजी व बाबासाहेब यांच्या भेटीविषयी तसेच या दोघांच्या लोकप्रियतेविषयी तुलनात्मक माहिती आपण बघणार आहोत.
आंबेडकर आणि बोस यांचा वारसा व महत्त्व
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नेताजी सुभाष चंद्र बोस ही विसाव्या शतकातील दोन समकालीन व्यक्तिमत्व होते. भारतीय राजकारणात या दोघांचाही मोठा प्रभाव आजही आपल्याला बघायला मिळतो. दोघांनाही भारत देशाचे National Hero मानले जाते. आंबेडकर आणि बोस हे दोन सार्वभौमिक आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व होते ज्यांनी आपापल्या क्षेत्रांतील संपूर्ण माणसांसाठी महत्त्वपूर्ण काम केले. त्यांचे कार्य, त्यांचे विचार, त्यांचे जीवन आणि त्यांचे चरित्र हे देशाच्या इतिहासात अविस्मरणीय ठरलेले आहे.
आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि संघर्षाच्या बळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय समाज जीवनातील एक आदर्श व्यक्तिमत्व बनले. भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचा गौरव केला जातो. आपल्या तर्कांनी आणि विचारांनी त्यांनी मोठ्यात मोठ्या लोकांना प्रभावित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस हे जवळपास एकाच काळातील नेते होते. दोघेही त्यांच्या काळात वेगवेगळ्या वर्गात आणि लोकांमध्ये खूप लोकप्रिय होते.
नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे नेते होते. त्यांनी आपल्या जीवनातील बरीच वर्षे देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी खर्ची घातली. त्यांचा “जय हिन्द” नारा आजही लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. त्यांनी दिलेल्या लढ्यामुळे आझाद हिंद सेना साहसी बनली व तीने भारताला स्वातंत्र मिळवून देण्यामध्ये अप्रत्यक्षपणे महत्त्वाची भूमिका बजावली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे झाला. सहा वर्षांनी 23 जानेवारी 1897 रोजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म झाला. बाबासाहेब हे मराठी तर बोस हे बंगाली होते. बाबासाहेबांचा जन्म अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महार कुटुंबात झाला तर नेताजी हे उच्चवर्णीय कायस्थ गृहस्थांच्या घरी जन्माला आले.
सुभाषचंद्र बोस यांनी घेतली होती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट
जेव्हा नेताजी सुभाष चंद्र बोस युरोपहून मायदेशी परतले होते तेव्हा त्यांनी मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली. 22 जुलै 1940 रोजी या दोन मोठ्या नेत्यांची भेट झाली, आणि ही दोघांची एकमेव भेट होती.
फेडरेशनबाबत अनेक मुद्द्यांवर दोघांमध्ये चर्चा झाली. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुभाषचंद्र बोस यांना अस्पृश्यता अर्थात अनुसूचित जातींबाबत एक प्रश्न विचारला, ज्याचे उत्तर त्यांना समाधानकारक वाटले नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सुभाषचंद्र बोस यांचे जातीव्यवस्थेवरील किंवा अस्पृश्यतेवरील विचार का समाधानकारक वाटले नसतील किंवा ते का पटले नसतील? हे समजून घेण्यासाठी आपल्याला सुभाषचंद्र बोस यांचे जाती व्यवस्थेविषयी नेमके काय विचार होते हे जाणून घ्यावे लागेल.
सुभाषचंद्र बोस यांचे जातीव्यवस्थेवरील विचार
सुभाष चंद्र बोस यांनी आपल्या एका भाषणामध्ये जातींबाबत विचार प्रकट केलेले आहेत. त्यांनी नोव्हेंबर 1944 मध्ये जपानच्या टोकियो विद्यापीठातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोर एक भाषण केले होते, आणि ‘भारताच्या मूलभूत समस्या’ हा भाषणाचा विषय होता.
आपल्या भाषणामध्ये सुभाष चंद्र बोस असे म्हणतात की, “जो जातीचा प्रश्न आहे, ती आज आपल्यासाठी समस्या नाही, कारण प्राचीन काळी ज्या स्वरूपाची जात होती ती आज नाही. आता जातिव्यवस्थेचा अर्थ काय आहे? जातिव्यवस्था म्हणजे समाज व्यवसायाच्या आधारावर काही गटांमध्ये विभागला आहे आणि त्या गटांमध्येच विवाह होतात.”
“आधुनिक काळात भारतात जातीच्या आधारावर कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. कोणत्याही जातीची व्यक्ती कोणताही व्यवसाय स्वीकारण्यास स्वतंत्र आहे. तर या अर्थाने आज आमच्याकडे जातिव्यवस्था नाही. मग प्रश्न उरतो लग्नाचा. प्राचीन काळी ही प्रथा होती ज्यात लोक आपापल्या जातीत लग्न करायचे. आज आंतरजातीय विवाह सामान्य आहे. जात झपाट्याने लोप पावत आहे. सत्य तर हे आहे की राष्ट्रीय चळवळीत आपण कधीही कुणाची जात विचारत नाही आणि आपल्या काही जवळच्या सहकाऱ्यांची जातही आपल्याला माहिती नसते.”
“या संदर्भात मी तुम्हाला सांगू इच्छितो की, ते ब्रिटीशच होते ज्यांनी असा प्रचार जगभर केला की आपण (भारतीय) एकमेकांशी लढणारे लोक आहोत, विशेषत: धर्माच्या नावाखाली लढणारे लोक. पण भारताचे हे चित्रण पूर्णपणे चुकीचे आहे. कदाचित भारतात काही मतभेद असतील, पण असे मतभेद आज इतर कोणत्याही देशात आढळतील.”
(संदर्भ: नेताजी संपूर्ण वांग्मय, खंड 12, पेज 284)
जातीव्यवस्थेवरील बोस यांचे विचार अवास्तविक!
चिकित्सक दृष्टीने विचार केल्यास सुभाषचंद्र बोस यांचे जात आणि जातीव्यवस्थेविषयी विचार वास्तववादी नसल्याचे दिसून येते. बोस यांच्या काळात जात आणि जातीयवाद हा समाजात ठासून भरलेला होताच शिवाय आजच्या 21 व्या शतकात सुद्धा जात आणि जातीव्यवस्था भारतीय समाजात खोलवर रूजली आहे.
केवळ जातीमुळे असंख्य ठिकाणी अन्याय, अपराध वा हत्याकांड झाल्याच्या बातम्या बघायला मिळतात. कदाचित सुभाषचंद्र बोस हे उच्चवर्णीय जातीत जन्माला आले असल्यामुळे त्यांना जातीवाद किंवा अस्पृश्यतेच्या कटू अनुभवाची कल्पना नसावी. जात, जातीवाद, जातीव्यवस्था अस्पृश्यता या यासारख्या ज्वलंत सामाजिक विषयावरील सुभाषचंद्र बोस यांचे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नक्कीच समाधानकारक वाटले नसावे.
बाबासाहेब म्हणाले – गांधींमुळे नव्हे तर बोस यांच्यामुळे मिळाले भारताला स्वातंत्र्य
जरी सुभाषचंद्र बोस यांना जातीव्यवस्थेच्या अन्यायकारक स्वरूपाची कल्पना नसेल तरी त्यांचा देशासाठीचा स्वातंत्र्यलढा फार महत्त्वपूर्ण आहे. खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बोस यांच्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी घेतलेल्या योगदानाची दखल घेतली आहे. एका अर्थी बाबासाहेब हे स्वतः सुभाष यांचे चाहते होते असे दिसते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फेब्रुवारी 1955 मध्ये ‘बीबीसी’च्या फ्रान्सिस वॉटसनला मुलाखत दिली होती, ज्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितले की भारताला बहुधा स्वातंत्र्य मिळाले ते सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेमुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या व्यापक प्रभावामुळे. येथील बाबासाहेबांनी असेही स्पष्टपणे सांगितले की भारताला स्वातंत्र्य हे [महात्मा] गांधीमुळे नव्हे तर [सुभाषचंद्र] बोस यांच्यामुळे मिळाले.
या मुलाखतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, “ब्रिटिश सैन्यात सामील असलेले भारतीय त्यांच्याप्रती असलेली निष्ठा कधीही बदलणार नाहीत, असे ब्रिटिश गृहीत धरत होते. ही वेगळी गोष्ट आहे की दुसर्या महायुद्धात आयएनएच्या पराक्रमाच्या कहाण्या ऐकून ब्रिटीश सैन्यात सामील असलेल्या भारतीय सैनिकांच्या मनात बंडाचे स्वर उमटू लागले होते. याशिवाय आयएनएचे 40 हजार सैनिक भारतात आल्याच्या बातमीनेही इंग्रजांना असे वाटू लागले की, या देशात राज्य करणे आता आपल्यासाठी कठीण आहे. हा देश बदलू लागला आहे.”
लोकप्रियता : आंबेडकर Vs बोस
आता आपण विविध प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची लोकप्रियता जाणून घेऊ. या लोकप्रियतेच्या माध्यमातून त्यांचा लोकांवर किती प्रभाव आहे याची आपल्याला माहिती होईल.
गूगल ट्रेंड
Google Trends हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन google कंपनीने तयार केलेले साधन किंवा प्रोडक्ट आहे. त्याच्या मदतीने, ट्रेडिंग टॉपिक्सचा अंदाज लावणे, वापरकर्त्याबद्दल माहिती गोळा करणे यासारखी कामे सहजपणे केली जातात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सुभाषचंद्र बोस यांना गुगलवर किती शोधले जाते (Google searches) याची माहिती Google Trends द्वारे समजते.
गुगल ट्रेंड वर, 2004 ते आजपर्यंतची माहिती बघितली तर असे दिसते की भारतातील पश्चिम बंगाल, ओडीसा, आसाम मणिपूर आणि त्रिपुरा या पाच राज्यांमध्ये सुभाषचंद्र बोस यांना बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा जास्त गुगल सर्च केले जाते. तर अन्य 23 राज्ये व 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना सुभाष चंद्र बोस यांच्यापेक्षा अधिक सर्च केले जाते. भारतात एकूण 28 राज्ये व 8 केंद्रशासित प्रदेश आहेत.
ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक (HPI)
पॅन्थिऑनच्या 2022 च्या ‘हिस्टॉरिकल पॉप्युलरिटी इंडेक्स’ अर्थात ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांकानुसार, भारतीय इतिहासातील आजवरच्या टॉप 30 सर्वात लोकप्रिय व्यक्तींच्या यादीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 14 व्या तर सुभाषचंद्र बोस हे 28 व्या क्रमांकावर आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक (HPI) 75.72 आहे, आणि सुभाष चंद्र बोस यांचा 71.66 आहे.
‘लोकप्रिय मराठी व्यक्तीं’मध्ये बाबासाहेब अव्वल; तर ‘प्रसिद्ध बंगालीं’मध्ये बोस चौथे
ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांकानुसार, 30 सर्वात प्रसिद्ध भारतीयांच्या या यादीमध्ये केवळ 3 मराठी व्यक्तींचा समावेश असून, त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत; त्यांच्यानंतर शिवाजी महाराज व राणी लक्ष्मीबाई यांचा क्रमशः दुसरा व तिसरा क्रमांक आहे.
दुसरीकडे या यादीमध्ये चार बंगाली व्यक्ती देखील समाविष्ट झाले आहेत आणि चौथ्या क्रमांकावर सुभाषचंद्र बोस आहेत. रविंद्रनाथ टागोर, रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद हे अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसरे सर्वात लोकप्रिय बंगाली व्यक्ती आहेत.
Wikipedia वरील लोकप्रियता
विकिपीडिया हा एक बहुभाषी ज्ञानकोश आहे, जो 300 पेक्षा जास्त वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र लेख 131 वेगवेगळ्या भाषेच्या विकिपीडियांवर उपलब्ध आहेत तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अवघ्या 62 विकिपीडियांवर चरित्रलेख उपलब्ध आहेत. विकिपीडियांवर सर्वाधिक चरित्रलेख असणाऱ्या प्रसिद्ध भारतीयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर नवव्या क्रमांकावर येतात तर सुभाष चंद्र बोस यांचा समावेश टॉप 50 मध्ये सुद्धा होत नाही.
हिंदी विकिपीडिया हा भारतातील सर्वात मोठा विकिपीडिया आहे. 2022 या वर्षातील हिंदी विकिपीडियावर सर्वाधिक वाचल्या गेलेल्या चरित्रलेखांमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा लेख दुसऱ्या क्रमांकावर होता तर सुभाषचंद्र बोस यांचा लेख दहाव्या क्रमांकावर होता. 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या एका वर्षाच्या काळात बाबासाहेबांच्या लेखाला 12,63,282 वेळा वाचले गेले तर नेताजींचा लेख 6,17,128 वेळा वाचला गेला. येथे बाबासाहेबांची लोकप्रियता नेताजींपेक्षा दुप्पट आहे.
जर आपण जून 2015 ते डिसेंबर 2022 या साडे 7 वर्षांमधील हिंदी विकिपीडिया वरील सर्वाधिक वाचल्या गेलेल्या व्यक्तींच्या वाचकसंख्येची आकडेवारी बघितली तर त्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांच्या लेखाला 66,63,000 तर बोसांच्या लेखाला 39,19,661 पेजव्हूज मिळाले आहे.
English Wikipedia – जून 2022 ते मे 2023 या एका वर्षामध्ये इंग्लिश विकिपीडियावरील या दोघांच्या वाचकसंख्येची माहिती बघितली असता पुढील गोष्टी लक्षात येतात. या काळात बी आर आंबेडकर लेख 37 लाख 95 हजार 333 वेळा वाचला गेला तर बोस यांचा लेख 21 लाख 61 हजार 848 वेळा बसला गेला.
जून 2022 ते मे 2023 या वर्षभरात सुभाष चंद्र बोस आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व विकिपीडियांवरील लेखांना किती वेळा वाचले गेले आहे?
आंबेडकर – 68,75,645 (मासिक सरासरी 18,837)
बोस – 37,90,297 (मासिक सरासरी 10,384)
इंग्लिश विकी पेज – पहा
आंबेडकर सर्व विकी
सारांश
या लेखामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सुभाषचंद्र बोस यांच्या एकमेव भेटीविषयी जाणून घेतले. या सोबतच आपण या दोघांचे तुलनात्मकदृष्ट्या लोकप्रियता पाहिली.
तुमचे काही प्रश्न किंवा सूचना असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहून किंवा ई-मेल द्वारे सुद्धा मला कळवू शकता.
हे ही वाचलंत का?
- डॉ. आंबेडकरांवर प्रभाव टाकणाऱ्या थोर व्यक्ती
- Wikipedia : 2021 मध्ये ‘मराठी विकिपीडिया’वर सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती कोण? जाणून घ्या…
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- ‘धम्म भारत’चे अन्य लेख वाचा
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)