‘बुद्धजयंती वर्ष’ आणि ‘बौद्ध वर्ष’ यात काय फरक आहे? जाणून घ्या बुद्ध जन्मवर्षाचा खरा इतिहास

बरेच लोक ‘बुद्धजयंती वर्ष’ आणि ‘बौद्धवर्ष’ (बुद्धाब्ध) यांना एकच मानतात, प्रत्यक्षात ते भिन्न आहेत. कॅलेंडरवरील बुद्ध जयंतीचा जो आकडा आपण ‘बुद्धजयंती वर्ष’ म्हणून वापरतो त्याचा संबंध ख्रिस्त पूर्व 563 या बुद्ध जन्मवर्षाशी लागत नाही.

तारखांचा झालेला हा गोंधळ समजून घेण्यासाठी ‘बुद्धजयंती वर्ष’ आणि ‘बौद्धवर्ष’ (बुद्धाब्ध) यांच्यातील फरक तुम्हाला माहिती असायला हवा. बुद्ध जयंतीवर्षाच्या खऱ्या इतिहासाची माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा. – Difference Between Buddha Birthday Year and Buddhist Year

 यह लेख हिंदी में पढ़े 

बौद्धवर्ष आणि बुद्धजयंती वर्ष या दोघांमधील फरक
बौद्धवर्ष आणि बुद्धजयंती वर्ष या दोघांमधील फरक

जगभरातील बौद्ध दरवर्षी वैशाख पौर्णिमेला बुद्धजयंती उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. हा दिवस गौतम बुद्ध यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीन महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस आहे.

परंतु, अनेक लोक असेही आहेत जे बौद्धवर्ष (किंवा बुद्धाब्ध) आणि बुद्धजयंतीचे वर्ष या दोघांमध्ये गल्लत करतात, आणि या दोघांना एकच समजतात. प्रत्यक्षात ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, या दोन्हींमध्ये कैक वर्षांचे अंतर आहे.

बुद्धांचा जीवनकाळ इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 443, याचा संबंध बुद्धाब्ध वा बौद्धवर्षाची लागत नाही, तसेच बुद्ध जयंतीशी सुद्धा लागत नाही.

बौद्धवर्ष (बुद्धाब्ध), बुद्ध निर्वाणवर्ष, बुद्ध जयंतीवर्ष, बुद्धांचा जीवनकाळ यासंबंधी गल्लत व गैरसमज लोकांमध्ये रूढ झाले आहेत. याच गोष्टींबद्दल आपण या लेखामध्ये प्रकाश टाकणार आहोत.

 

बुद्ध आणि त्यांचा जीवनकाळ

गौतम बुद्ध यांची माहिती बौद्ध धर्माचे संस्थापक म्हणून मानले जाणारे गौतम बुद्ध हे इसवी सन पूर्व 7व्या आणि 6व्या शतकात प्राचीन भारतात होऊन गेले. जीवनाच्या सुरुवातीच्या काळात त्यांना ‘सिद्धार्थ गौतम’ म्हणून ओळखले जात होते.

परंतु ज्ञान प्राप्तीनंतर ते ‘बुद्ध’ म्हणून ओळखले जाऊ लागले. बुद्ध या शब्दाचा अर्थ ‘ज्ञानी’ किंवा ‘प्रबुद्ध’ व्यक्ती असा होय. भारतीय लोक बुद्धांना प्रामुख्याने ‘गौतम बुद्ध’ आणि ‘भगवान बुद्ध’ नावांनी संबोधतात.

वैशाखी पौर्णिमेला भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म, संबोधी प्राप्ती, विवाह आणि महापरिनिर्वाण या चारही घटना घडल्या होत्या. गौतम बुद्धांचे ‘जयंतीवर्ष’ आणि बौद्धवर्ष अर्थात बुद्धांचे ‘निर्वाणवर्ष’ (बौद्धवर्ष) या दोन गोष्टी वैशाख पौर्णिमेला घडल्या असल्या तरी वेगवेगळ्या काळामधील वैशाख पौर्णिमेला घडल्या आहेत.

परंतु भारतात बहुतांश लोक बुद्धांच्या निर्वाण वर्षालाच त्यांचे जयंतीवर्ष म्हणून लिहिताना आढळतात. ही चूक बौद्ध तसेच अबौद्ध असे दोन्ही प्रकारचे लोक करतात. पण असे का घडते? 

भारतात प्रामुख्याने इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483 हा बुद्धांचा जीवनकाळ मानला जातो. परंतु, बौद्ध परंपरेनुसार (विशेषतः श्रीलंकन), बुद्धांचा जन्म हा इसवी सन पूर्व 623 मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू वा निर्वाण इसवी सन पूर्व 543 मध्ये झाले.

तथापि, इतर बौद्ध परंपरेनुसार, बुद्धांचा जीवनकाळ ख्रिस्त पूर्व 624 ते ख्रिस्त पूर्व 544 असा ठरवला गेला आणि सध्याच्या जागतिक बौद्ध दिनदर्शिकेत स्वीकारलेल्या या तारखा आहेत.

बौद्ध दिनदर्शिकेतील बुद्धाच्या आयुर्मानात (624 BC ते 544 BC) आणि आधुनिक काळातील प्रचलित बुद्धाच्या आयुर्मानात (563 BC ते 483 BC) 61 वर्षांचा फरक आहे. म्हणजे बुद्धाचा जन्म 61 वर्षांपूर्वी झाला होता.

ख्रिस्त पूर्व 624 येथून बुद्धजयंती वर्ष सुरू झाले तर त्यांच्या ख्रिस्त पूर्व 544 या निर्वाण वर्षापासून बौद्धयुगाची वा बौद्धवर्षाची (बुद्धाब्धाची) सुरुवात झाली आहे. याच बौद्ध वर्षाशी व बुद्धाच्या जीवनकाळाशी संबंधित आकडे (बौद्धवर्ष/ बुद्धाब्ध) भारतीय बौद्ध कॅलेंडरवर बघायला मिळतात.

 

बुद्धजयंती वर्ष आणि बौद्ध वर्ष (बुद्धाब्ध) यांमधील फरक

बुद्धांचा जीवनकाळ विविध स्रोतांमध्ये वेगवेगळा आढळतो. बौद्ध परंपरेनुसार आणि युनेस्कोच्या संकेतस्थळानुसार गौतम बुद्धांचा जीवनकाळ हा इसवी सन पूर्व 623 ते 543 असल्याचे कळते.

तर काही यूरोपीय विद्वान बुद्धांचा काळ साठ वर्षे अलीकडे — इ.स.पू. 563 — 483— ओढतात. बौद्ध परंपरेनुसार जीवन काळानुसार बुद्ध हे जैन तीर्थंकर वर्धमान महावीर (इ.स.पू. 599–527) यांच्यापेक्षा आधी जन्मले आहे. 

मराठी विश्वकोशात स्पष्टपणे लिहिलेले आहे – गौतम बुद्धाचा जन्म इ.स.पू. सु. ६२३ मध्ये झाला. (यूरोपीय विद्वान गौतम बुद्धाचा काल साठ वर्षे अलीकडे इ. स. पू. सु.५६३ ४८३ ओढतात).

गौतम बुद्ध यांचे ज्यावेळी ‘महापरिनिर्वाण’ (इ.स.पूर्व 544) झाले, तेव्हा पासून बुद्धाब्द अर्थात बौद्ध वर्षास प्रारंभ झाला. बौद्धवर्ष म्हणजे बुद्धांचे जन्मवर्ष किंवा बुद्धजयंती वर्ष नव्हे.

एखाद्या बौद्धवर्षामध्ये बुद्धांचे 80 वर्ष वय जोडले तर येणारा आकडा हा बुद्ध जयंतीचे वर्ष दर्शवतो. उदाहरणार्थ, इ.स. 2024 च्या वैशाख पौर्णिमेच्या [23 मे] रोजी 2568वे बौद्धवर्ष होते (544 + 2024 = 2568); आणि याच दिवशी 2648वी बुद्धजयंती होती (2568 + 80 = 2648).

बौद्ध कॅलेंडरनुसार, 23 मे 2024 रोजी आपण 2568व्या बौद्ध वर्षात प्रवेश केला आहे. म्हणजेच या दिवशी बुद्धांचे निर्वाण होऊन 2568 वर्षे झालीत. यामध्ये 80 जोडले की बुद्धांचे जयंतीवर्ष कळते – 2648.

म्हणजेच 23 मे 2024 रोजी गौतम बुद्धांची 2648वी जयंती आणि बुद्धाब्ध 2568वा आहे. ‘बौद्धवर्ष’ याचीच इतर नावे म्हणजे ‘बौद्ध युग, बुद्धिस्ट इरा, बुद्धाब्ध, बुद्धिस्ट इयर आणि बुद्ध निर्वाणवर्ष’ ही होत.

इ.स. पूर्व 623 ते इ.स. पूर्व 543 हा बुद्धांचा जीवनकाळ बहुतांश बौद्ध परंपरा मानतात, विशेषतः श्रीलंकन बौद्ध परंपरा मानते. काही बौद्ध परंपरा बुद्धाचे निर्वाणवर्ष इ.स. पूर्व 544 (बर्मी बौद्ध परंपरेत) तर काही इ.स. पूर्व 545 (थाई बौद्ध परंपरेत) मानते.

यांमध्ये समतोल राखण्यासाठी बौद्ध दिनदर्शिकेत इ.स. पूर्व 544 ला 0 बौद्धवर्ष आणि त्यानंतर येणाऱ्या इ.स. पूर्व 543 वर्षाला 1 बौद्धवर्ष मानले गेले.  बौद्ध कॅलेंडरमध्ये बौद्ध युगाची मांडणी करताना बुद्धांचा जीवनकाळ हा इ.स. पूर्व 624 ते इ.स. पूर्व 544 मानला गेला आहे.

 

बाबासाहेबांची धम्मदीक्षा : 1956 मध्ये खरंच 2500वी बुद्धजयंती होती का?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ आणि ‘बुद्ध आणि कार्ल मार्क्स’ या आपल्या दोन्ही ग्रंथांमध्ये बुद्धांचा जन्म हा इ.स. पूर्व 563 मध्ये झाला असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.

याशिवाय इ.स. 1956 मध्ये भगवान बुद्धांच्या 2500व्या जयंती वर्षानिमित्त आपण बौद्धधम्माचा स्वीकार करणार आहोत असेही बाबासाहेबांनी पत्रकाद्वारे स्पष्टपणे जाहीर केले होते.

परंतु येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की बाबासाहेबांनी सांगितलेल्या बुद्धांच्या जीवनकाळाचा संबंध 1956 मधील बुद्धांच्या 2500व्या जयंतीवर्षाशी (तसेच निर्वाण वर्षाशी) लागत नाही.

बाबासाहेबांनी 2500व्या बुद्ध जयंतीवर्षाला बौद्ध धर्म स्वीकारला नाही आहे. 1956 मध्ये बुद्धाचे जन्मवर्ष इ.स. पूर्व 563 हे गृहीत धरले तर 1956 मध्ये 2519वे बुद्ध जयंतीवर्ष असले असते (563 + 1956 = 2519). येथे 19 वर्षे शिल्लक भरत आहेत.

याशिवाय येथे बुद्धाचे निर्वाणवर्ष इ.स. पूर्व 443 हे गृहीत धरले तरी त्यावर्षी बुद्धाचे 2399वे निर्वाणवर्ष [बुद्धाब्ध] असले असते (443 + 1956 = 2399). येथेही 2500 वर्ष होण्यास 101 वर्षे कमी भरत आहेत.

यावरून हे लक्षात येते की, इ.स. 1956 मधील बुद्धांच्या 2500व्या वर्षाशी प्रचलित बुद्ध जीवनकाळाचा (इ.स. पूर्व 563 ते इ.स. पूर्व 443) कुठलाही संबंध लागत नाही.

1956 मधील 2500व्या बौद्धवर्षाचा संबंध लागतो तो बुद्धांच्या दुसऱ्या जीवनकाळाशी, जो इसवी सन पूर्व 624 ते इसवी सन पूर्व 544 असा आहे. 1956 ला बुद्धांच्या निर्वाणाचे 25वे शताब्दी वर्ष होते, म्हणजेच यावर्षी वैशाख पौर्णिमेला भगवान बुद्धांचे निर्वाण होऊन 2500 वर्षे झाली होती.

त्यामुळे, 2500व्या बौद्धवर्षाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीरपणे बौद्ध धम्माचा स्वीकार केला. बौद्धवर्षाची सुरुवात इ.स.पू. 544 पासून झाली असल्याने 1956 मध्ये अडीच हजारावे बौद्धवर्ष असल्याचे आपल्या लक्षात येते : 544 + 1956 = 2500.

 

बौद्ध कॅलेंडर आणि बौद्ध वर्ष (बौद्ध युग)

सर्व थेरवादी बौद्ध परंपरेत, बौद्ध कॅलेंडरची युगानुयुग वर्ष 0 ही तारीख होती, ज्या दिवशी बुद्धांनी परिनिर्वाण (मृत्यू) प्राप्त केले. तथापि, बुद्धाचे महापरिनिर्वाण प्रत्यक्षात केव्हा घडले यावर सर्व बौद्ध परंपरा एकमत नाहीत.

बर्मी बौद्ध परंपरेत, तो दिवस 13 मे 544 ईसापूर्व होता. परंतु थायलंडमध्ये, ती तारीख 11 मार्च 545 ईसापूर्व होती, ही तारीख सध्याची थाई चंद्र आणि सौर कॅलेंडर युगाची वा सुरुवातीचे तारीख म्हणून वापरतात.

तरीही, थाई कॅलेंडरने काही कारणास्तव त्यांच्या बौद्ध युग (Buddhist Era/ BE) क्रमांकामध्ये आणि ख्रिश्चन/सामान्य युग (Christian/ Common Era/ CE) क्रमांकामध्ये 543 मध्ये फरक निश्चित केला आहे, जो 545 ईसापूर्व नव्हे तर 544 ईसापूर्व च्या युगानुयुगे दर्शवितो.

बर्मा अर्थात म्यानमारमध्ये, BE आणि CE मधला फरक CE तारखांसाठी 543 किंवा 544, आणि BCE (Before Common Era) तारखांसाठी 544 किंवा 543 असू शकतो, जो बौद्ध युगाच्या महिन्यावर अवलंबून असतो.

 

हा तक्ता बौद्ध वर्ष, बुद्ध जयंतीचे वर्ष, आणि ख्रिस्ती वर्ष या तिघांची तुलनात्मक माहिती देतो…

बौद्ध वर्ष

बुद्धजयंती वर्ष

समतुल्य - ख्रिश्चन वर्ष

0

इ.स.पू. 624 - 623

1

इ.स.पू. 623 - 622

50

इ.स.पू. 574 - 573

0

80

इ.स.पू. 544 - 543

1

81

इ.स.पू. 543 - 542

20

100

इ.स.पू. 524 - 523

100

180

इ.स.पू. 444 - 443

420

500

इ.स.पू. 424 - 423

500

580

इ.स.पू. 344 - 343

520

600

इ.स.पू. 24 - 23

543

623

इ.स.पू. 1 - इ.स. 1

544

624

इ.स. 1 - 2

644

724

इ.स. 100 - 101

920

1000

इ.स. 376 - 377

1000

1080

इ.स. 456 - 457

580

1124

इ.स. 500 - 501

956

1500

इ.स. 876 - 877

1500

1580

इ.स. 956 - 957

1544

1624

इ.स. 1000 - 1001

1920

2000

इ.स. 1376 - 1377

2000

2080

इ.स. 1456 - 1457

2420

2500

इ.स. 1876 - 1877

2500

2580

इ.स. 1956 - 1957

2520

2600

इ.स. 1976 - 1977

2544

2624

इ.स. 2000 - 2001

2554

2634

इ.स. 2010 - 2011

2564

2644

इ.स. 2020 - 2021

2567

2647

इ.स. 2023 - 2024

2568

2648

इ.स. 2024 - 2025

2570

2650

इ.स. 2026 - 2027

2600

2680

इ.स. 2056 - 2057

2920

3000

इ.स. 2376 - 2377

3000

3080

इ.स. 2456 - 2457

23 मे 2024 रोजी बुद्धांची 2648वी जयंती होती. हे 2648वे बुद्ध जयंतीवर्ष मे 2024 पासून ते मे 2025 पर्यंत असणार आहे. यासाठी बुद्ध जयंतीवर्ष 2648च्या पुढे ख्रिस्ती वर्ष 2024-2025 दिले आहे (वरील तक्ता पाहा). 3 मे 2023 पासून ते 22 मे 2024 पर्यंत 2567वे बौद्धवर्ष किंवा बुद्धाब्ध होते, तर 23 मे 2024 पासून 2568वे बौद्धवर्ष सुरू झाले.

 

बुद्धांच्या जन्माची वेगवेगळी वर्षे

बुद्धाचे जन्म आणि मृत्यूचे वर्ष अनिश्चित आहेत. चीन, व्हिएतनाम, कोरिया आणि जपानच्या पूर्व बौद्ध परंपरेत, बुद्धाच्या मृत्यूचे पारंपारिक वर्ष इ.स. पूर्व 949 होते, परंतु कालचक्र परंपरेच्या का-तान पद्धतीनुसार, बुद्धांचा मृत्यू सुमारे ईसापूर्व 833 मध्ये झाला होता.

बौद्ध ग्रंथ दोन कालगणना सादर करतात ज्याचा वापर बुद्धांच्या जीवनकाळासाठी केला गेला आहे. श्रीलंकेच्या इतिहासातील “दीर्घ कालगणना”, असे सांगते की बुद्धाचा जन्म अशोकाच्या राज्याभिषेकाच्या 298 वर्षांपूर्वी झाला होता आणि राज्याभिषेकाच्या 218 वर्षांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता, अशा प्रकारे त्यांचे आयुष्य सुमारे 80 वर्षे होते.

या इतिहासानुसार, अशोकाचा राज्याभिषेक इ.स. पूर्व 326 मध्ये झाला होता, त्यामुळे बुद्धाचा जीवनकाळ हा इ.स. पूर्व 624 – इ.स. पूर्व 544 होता, आणि या श्रीलंका आणि दक्षिण-पूर्व आशियामध्ये स्वीकारल्या गेलेल्या तारखा आहेत. 

वैकल्पिकरित्या, बहुसंख्य विद्वान जे दीर्घ कालगणना देखील स्वीकारतात परंतु अशोकाच्या राज्याभिषेकाची तारीख इ.स.पू. 268 (ग्रीक पुराव्यावर आधारित) सांगतात, आणि त्यानंतर त्यानंतर बुद्धाचा जीवनकाळ इ.स. पूर्व 566 – इ.स. पूर्व 486 ठरवतात.

तथापि, भारतीय स्त्रोतांकडून त्यांच्या चिनी आणि तिबेटी भाषांतरांनुसार मिळालेल्या “संक्षिप्त कालगणने”नुसार, बुद्धाचा जन्म अशोकाच्या राज्याभिषेकाच्या 180 वर्षांपूर्वी झाला होता आणि मृत्यु राज्याभिषेकाच्या 100 वर्षांपूर्वी झाला होता, म्हणजे येथेही बुद्धाचे आयुष्य सुमारे 80 वर्षे आहे. 268 ईसापूर्व मध्ये झालेल्या अशोकाच्या राज्याभिषेकाच्या ग्रीक स्त्रोतांनुसार, बुद्धांचा जीवनकाळ इ.स. पूर्व 448 – इ.स. पूर्व 368 आहे.

20व्या शतकाच्या सुरुवातीतील बहुतेक इतिहासकार इ.स. पूर्व 563 – इ.स. पूर्व 483 च्या आधीच्या तारखा वापरत, ज्या ग्रीक पुराव्यावर आधारित दीर्घ कालगणनेपेक्षा फक्त तीन वर्षे भिन्न आहेत.

20व्या शतकातील बहुतेक इतिहासकार इ.स. पूर्व 563 – इ.स. पूर्व 483 हा बुद्धाचा जीवनकाळ म्हणून वापरत. अगदी अलीकडे, बुद्धांच्या मृत्यूला दीर्घ कालगणनेच्या इ.स.पू. 480च्या दशकात आणि लहान कालगणनेच्या इ.स.पू. 360च्या दशकाच्या दरम्यान मध्यभागी ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, म्हणजे सुमारे इ.स. पूर्व 410.

1988 मध्ये झालेल्या या प्रश्नावरील एका परिसंवादात, बहुतेकांनी बुद्धाच्या मृत्यूची तारीख इ.स.पूर्व 400 च्या 20 वर्षांच्या आत दिली होती. या पर्यायी कालगणना मात्र सर्वच इतिहासकारांनी स्वीकारल्या नाहीत. लघु कालगणनाचे प्रवर्तक, इतिहासकार के.टी.एस. सारव यांच्या मते, गौतम बुद्धांचा जीवनकाळ हा इ.स.पू. सु. 477-इ.स.पू. सु. 397 होता.

 

12 मे 2025 रोजी 2569वे बौद्ध वर्ष आणि 2649वी बुद्ध जयंती

शेवटी आपण कोणता ‘बुद्धाचा जीवनकाळ’ स्वीकारायचा? आधुनिक काळातला प्रचलित जीवनकाळ (563 ते 483 ईसापूर्व) की बौद्ध परंपरेतील जीवनकाळ? माझ्या मते आपण बौद्ध परंपरातील जीवनकाळ (624 ते 544 ईसापूर्व) स्वीकाराला पाहिजे, कारण आपण बुद्धाचे जयंती वर्ष आणि बौद्ध वर्ष त्याच्याच आधारावर ठरवतो.

आता 12 मे 2025 रोजी येणाऱ्या आगामी वैशाखी पौर्णिमेला 2569वे बौद्ध वर्ष असेल, आणि या दिवशी तुम्ही 2569वी बुद्ध जयंती सांगून शुभेच्छा संदेश लोकांना पाठवू नका. कारण यादिवशी गौतम बुद्धांची 2649वी जयंती असेल.

प्रिय भारतीयांनो, विशेषतः बौद्ध बांधवांना, तुम्हाला आगामी वैशाखी पौर्णिमेच्या (12 मे 2025) म्हणजेच 2569व्या बौद्ध वर्षाच्या आणि 2649व्या बुद्ध जयंतीच्या हार्दिक व मंगलमय शुभेच्छा.



‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी ई-मेल करु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *