आपण सर्वजण लहानपणापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी पुस्तकांमध्ये वाचत व ऐकत आलो आहोत. पुस्तकांव्यतिरिक्त, जर तुम्हाला बाबासाहेबांबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही त्यांच्याशी संबंधित 10 महत्त्वपूर्ण ठिकाणांना एकदातरी भेट द्यायला हवी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केले. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशाच्या प्रजासत्ताकाचे ते महानायक आहेत. आधुनिक आणि प्रजासत्ताक भारताच्या जडणघडणीत तसेच दलित व शोषितांच्या उत्थानात त्यांनी दिलेले योगदान अद्वितीय आणि अविस्मरणीय आहे.
इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झालेल्या देशाला त्याचे संविधान बनवून देण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान आहे.
भारतात व काही प्रमाणात भारताबाहेर बाबासाहेबांशी संबंधित खूप सारे स्मारके उभारण्यात आली आहेत. या लेखात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मभूमीपासून समाधीस्थळापर्यंतच्या 10 सर्वात महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती देण्यात आली आहे.
बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडित ही वारसा स्थळे समस्त भारतीय जनतेसाठी प्रेरणास्थळे असली तरी आंबेडकरी जनतेसाठी त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. चला तर जाणून घेऊया डॉ. आंबेडकरांशी संबंधित महत्त्वाची ठिकाणे…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित महत्त्वाची स्थळे

आंबडवे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव होय. हे गाव महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात आहे. या गावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्वज राहत असे.
या गावात विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलोपार्जित घराचेच स्मारकात रूपांतर करण्यात आले आहे.
स्मारक परिसरात व वास्तूमधे बाबासाहेबांच्या वस्तूंचे जतन करण्यात आले आहे. येथे अशोक स्तंभ आणि शीलालेख उभारला गेला आहे. आंबडवे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव असल्यामुळे त्याला ‘स्फूर्तिभूमी’ म्हटले जाते.
मंडणगडपासून 18 किलोमीटर अंतरावर आंबडवे गावाला पाचरळ फाट्याहून रस्ता आहे. भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या गावाला भेट दिली आहे.
- भारत सोडून ‘या’ ठिकाणी आहेत बाबासाहेबांचे पुतळे
- भारतातील 10 सर्वात उंच पुतळे; जाणून घ्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचा क्रमांक
2. जन्मभूमी, महू

मध्य प्रदेश राज्यातील महू अर्थात ‘डॉ. आंबेडकर नगर’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थळ आहे. येथे ‘भीम जन्मभूमी’ नावाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित एक भव्य स्मारक उभारले गेले आहे. 14 एप्रिल 1891 रोजी लष्करी छावणी असलेल्या महू गावात भीमाबाई व रामजी बाबा यांचे पोटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता. (महू गावात लष्करी छावणी असल्याने त्या स्थानाला Military Headquarters of War – MHOW हे नाव होते. पुढे त्याच ‘महू’ नावाने ते गाव ओळखले जाऊ लागले.)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माचे महत्त्व जाणून तेथील आंबेडकरवादी लोकांनी महू गावात आंबेडकरांचे एक भव्य स्मारक उभे केले आहे. यासाठी मध्य प्रदेश राज्य शासनाकडून देखील काही सहकार्य त्यांना मिळाले. या स्मारकाचे भूमिपूजन 14 एप्रिल 1991 रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांच्या हस्ते झाले. 14 एप्रिल 2008 रोजी स्मारकाचे लालकृष्ण आडवाणी यांचे हस्ते लोकार्पण केले गेले.
प्रत्यक्षात महू या लष्करी छावणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एके काळचे राहते घर ताब्यात घेण्यासाठी 17 वर्षे प्रयत्न करावे लागले, त्यानंतर स्मारक उभारण्यासाठी त्यापुढील 20 वर्षे लागली. एकूण 37 वर्षांच्या प्रयत्नांनंतर 22 हजार चौरस फूट जागेत भीम जन्मभूमीवर दोन मजली हे स्मारक तयार झाले. या स्मारकाची रचना बौद्ध वास्तुकलेतील विहाराप्रमाणे आहे. भीम जन्मभूमी स्मारकाची रचना वास्तुविशारद ई.डी. निमगडे यांची आहे.
मध्य प्रदेशातील भोपाळ येथून 216 किमी अंतरावर तर इंदूर पासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर महू आहे. महूची लोकसंख्या सुमारे दीड लाख आहे. दरवर्षी येथे लाखो भीमानुयायी, बौद्धजण व पर्यटक भेट देऊन बाबासाहेबांच्या जन्मस्थळाला वंदन करतात.
1991 साली 100व्या आंबेडकर जयंतीदिनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी तर 2016 साली 125व्या आंबेडकर जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे आले होते. या दोन पंतप्रधानानंतर, 2018 मध्ये 127व्या आंबेडकर जयंतीदिनी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील महूला भेट दिली आणि बाबासाहेबांना अभिवादन केले. ‘पंचतीर्थ’ म्हणून भारत सरकारद्वारे विकसित होत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी निगडित अशा पाच स्थळांपैकी महू एक आहे.
3. शिक्षण भूमी, लंडन

लंडनमधील डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक’ किंवा ‘डॉ. भीमराव रामजी मेमोरियल’ आहे, ज्याला ‘शिक्षण भूमी’ म्हटले जाते. ‘डॉ. आंबेडकर हाऊस’ नावाने देखील ओळखले जाणारे हे स्मारक युनायटेड किंग्डमच्या वायव्य लंडनमधील 10 किंग हेनरी मार्गावर असलेले आंतरराष्ट्रीय स्मारक आहे. या वास्तू स्मारकाचे लोकार्पण 14 नोव्हेंबर 2015 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना बाबासाहेबांनी 1921-22 दरम्यान येथे वास्तव केले होते. या इमारतीत त्यांनी कठोर परिश्रमाणे 21-21 तास अभ्यास करून एम.एस्सी, बार-ॲट-लॉ, डी.एस्सी. अशा तीन अत्युच्च पदव्या संपादन केल्या होत्या.
या स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधीत अनेक दुर्मिळ छायाचित्रे आणि अन्य संस्मरणीय वस्तू आहेत. स्मारकाच्या आतमध्ये बाबासाहेबांचा एक भव्य अर्धाकृती पुतळा देखील आहे. तसेच स्मारकाच्या मागील बाजूस डॉ. आंबेडकरांचा एक पूर्णाकृती पुतळा आहे. महाराष्ट्र सरकारने या स्मारकात एक ग्रंथ संग्रहालय उभारले असून त्यात बाबासाहेबांनी लिहिलेली ग्रंथ-पुस्तके आहेत व त्यांचे दुर्मिळ फोटोही आहेत.
भारताबाहेर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित असलेले हे स्मारक तीन मजली असून त्याचे क्षेत्रफळ 2050 चौरस फुट आहे. या वास्तुवर “डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (1891-1956), सामाजिक न्यायाचे भारतीय शिलेदार, यांनी 1921-22 मध्ये येथे वास्तव्य केले” अशी अक्षरे इंग्लिशमध्ये कोरलेली आहेत.
ही ऐतिहासिक वास्तू महाराष्ट्र शासनाने 35 कोटी रुपयांना खरेदी केली होती. याच वास्तूचे रूपांतर आज जागतिक पातळीवर स्मारकात झाले असून हे स्मारक भारतीयांसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान ठरले आहे. ‘पंचतीर्थ’ म्हणून भारत सरकारद्वारे विकसित होत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी निगडित अशा पाच स्थळांपैकी हे एक आहे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संपूर्ण पुस्तकांची यादी
4. संकल्प भूमी, बडोदा

‘संकल्प भूमी’ ही गुजरातमधील वडोदरा (बडोदा) येथील ऐतिहासिक भूमी आहे, कारण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक ‘ऐतिहासिक संकल्प’ केला होता.
23 सप्टेंबर 1917 रोजी डॉ. भीमराव रामजी आंबेडकरांनी बडोद्यातील सयाजीराव उद्यानामध्ये आपल्या तत्कालीन दबलेल्या-पिचलेल्या अस्पृश्य समाजाला जातीयतेच्या नरकातून बाहेर काढण्यासाठी आपले जीवन समर्पित करण्याचा संकल्प केला होता.
बाबासाहेबांनी जेथे हा संकल्प केला होता उद्यानातील त्या जागेला 14 एप्रिल 2006 रोजी “संकल्प भूमी” असे नाव देण्यात आले. गुजरात सरकारद्वारे तेथे आंबेडकरांचे एक भव्य स्मारक निर्माण करण्यात येणार आहे.
सयाजी महाराजांच्या बडोदा संस्थानाकडून मिळालेल्या शिष्यवृत्तीमुळे 1913 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेऊ शकले. या दोघांमधील करार असा होता की, डॉ. आंबेडकरांना शिष्यवृत्तीच्या बदल्यात बडोदा संस्थानामध्ये काही काळ काम करावे लागणार.
या कराराअंतर्गत, सप्टेंबर 1917 मध्ये बाबासाहेब आंबेडकर आपल्या थोरल्या भावासह बडोदा येथे पोहोचले. त्यांना रेल्वे स्थानकावरून आणण्याचा आदेश सयाजीरावांनी दिला होता, परंतु एका अस्पृश्याला आणण्यासाठी कुणीही तयार झाले नाही, त्यामुळे डॉ आंबेडकरांना स्वतःच व्यवस्था करून पोहोचावे लागले. त्यांना आपल्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था स्वतः करावी लागणार होती, त्यासाठी ते जागा शोधत होते.
परंतु त्यांच्या बडोद्यात पोहोचण्यापूर्वीच बॉम्बेवरून एक महार युवक बडोदा संस्थानात नौकरीसाठी येत असल्याची बातमी पसरली होती. त्यांच्या “अस्पृश्य” जातीची माहिती झाल्यामुळे कोणीही हिंदू आणि अहिंदू लोक त्यांना जेवण व राहण्यासाठी जागा देण्यासाठी तयार झाले नाही. शेवटी, त्यांना नाव बदलून व अधिकचे भाडे देऊन एका पारसी धर्मशाळेत राहण्यासाठी जागा मिळाली.
यानंतर आंबेडकर राहत असलेल्या ठिकाणी एक घटना घडली, पारशांना आणि हिंदूंना कळले की पारशांच्या हाॅटेलमध्ये रहाणारी व्यक्ती ही अस्पृश्य (अनुसूचित जाती) आहे. रात्रीच्या वेळी तेव्हा क्रोधित झालेल्या पारसी व हिंदू लोकांचा समूह लाठ्या-काठ्या घेऊन हॉटेलच्या बाहेर जमला आणि हॉटेलमधून आंबेडकरांना बाहेर काढण्यासाठीची मागणी करू लागला.
त्यांनी डॉ. आंबेडकरांनी विचारले की, तू कोण आहेस? त्यावर आंबेडकर म्हणाले, मी एक हिंदू आहे. त्या लोकांपैकी एक जण म्हणाला की, मला माहिती आहे की तू एक अस्पृश्य आहेस, आणि तू आमचे अथितिगृह बाटवले (अपवित्र केले) आहे! तू येथून आत्ताच चालता हो!
डॉ आंबेडकर म्हणाले की, आत्ता रात्रीची वेळ आहे, त्यामुळे मी सकाळी येथून निघून जाईन. मला केवळ आठ तासांची अधिक सवलत मला द्यावी, अशा प्रकारची विनंती आंबेडकरांनी त्या लोकांना केली. परंतु त्या लोकांनी त्यांचे काहीही न ऐकता त्यांचे सामान बाहेर फेकून दिले.
अखेरीस आंबेडकरांना अपमानित होऊन रात्रीच्या वेळीच ते हॉटेल सोडून जावे लागले. त्यांना राहण्यासाठी इतर कोणी हिंदू किंवा मुसलमान आदींनी सुद्धा जागा दिली नाही. त्यांना रात्री राहण्यासाठी कोणतीही जागा नव्हती. त्यामुळे त्यांनी त्या रात्री जवळच्या एका उद्यानामधील (सध्या सजायी उद्यान) एक वडाच्या झाडाखाली दुःखी मनाने ती रात्र काढली. पण ही रात्र डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यातील एक सर्वात महत्त्वाची रात्र ठरली. त्यांनी असा विचार केला की जेव्हा माझ्यासारख्या परदेशातून शिकून आलेल्या विद्वान व्यक्तीसोबत जर हिंदू अशा प्रकारे अमानुषपणे वागतात, तर ते माझ्या (अस्पृश्य) समाजातील कोट्यवधी अशिक्षित आणि गरीब लोकांशी कसे हाल असतील!?!
तेव्हा त्यांनी त्या झाडाखाली संकल्प केला की “मी माझे संपूर्ण आयुष्य या वंचित आणि उपेक्षित समाजाच्या लोकांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी व्यतीत करेन; त्यांना त्यांचे मानवी हक्क मिळवून देईन.” डॉक्टर आंबेडकर आठ तास या उद्यानात होते व दुसऱ्या दिवशी सकाळी परत मुंबईला निघून गेले. बाबासाहेबांनी जो संकल्प केला होता तो बव्हंशी यशस्वी झाला.
5. क्रांतिभूमी, महाड

क्रांतिभूमी म्हणजेच महाराष्ट्रातील महाड होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली महाडमध्ये चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि मनुस्मृतीचे दहन केले होते. या दोन ऐतिहासिक घटनांच्या स्मृती कायम राहाव्यात म्हणून महाराष्ट्र शासनाने चवदार तळे सौंदर्यीकरण केले आणि 2004 साली या राष्ट्रीय स्मारकाची उभारणी केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक किंवा क्रांतिभूमी हे महाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित एक राष्ट्रीय स्मारक आहे. सध्या हे स्मारक समाज कल्याण विभागाच्या अखत्यारीत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) त्याची देखरेख करते. या स्मारकाची वास्तू व इतर घटक सध्या बिकट अवस्थेत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी महाडमध्ये चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता, त्यांनी तळ्याचे पाणी प्राशन करून केले होते. त्यानंतर 25 डिसेंबर 1927 रोजी महाडमध्ये त्यांनी मनुस्मृतीचे दहन देखील केले. या दोन घटना समाजपरिवर्तनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरल्या आणि त्यामुळे समाज जागृत झाला होता.
युती सरकारच्या काळात 14 एप्रिल 1998 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते महाडमधील आंबेडकर स्मारकाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर 10 ऑगस्ट 2004 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.
सुमारे 10,000 चौरस फुटांपेक्षा अधिक जागेवर इमारतीच्या बांधकाम झाले आहे. स्मारकामध्ये भव्य असे वातानुकूलित प्रेक्षागृह, संग्रहालय व वाचनालय, तरणतलाव व ड्रेसिंग रूम, बहुउद्देशीय सभागृह (1046 आसन व्यवस्था) व उपाहारगृह इत्यादी विविध दालने आहेत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती ब्रॉंझचा पुतळा व अंतर्गत रस्ते डांबरीकरण, प्रेक्षागृहांतील फर्निचर, पाणीपुरवठा व जलनिःसारण, विद्युतीकरण, पथदिवे, ट्रान्सफॉर्मर, सबस्टेशन यांचे काम करण्यात आले. या कामाला सुमारे 22 कोटी रुपये खर्च आला.
6. राजगृह, मुंबई

राजगृह हे मुंबई मधील दादरच्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. ही पवित्र ऐतिहासिक वास्तू तीन मजली असून आंबेडकरी – बौद्ध व दलित जनतेचे एक प्रमुख श्रद्धास्थान व प्रेरणास्थळ आहे. दररोज अनेक लोक राजगृहाला भेटी देतात, तथापि विशेषतः डॉ. आंबेडकर जयंती आणि महापरिनिर्वाण दिनी लक्षावधी आंबेडकर अनुयायी येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी येत असतात.
1930 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यालय परळ येथे होते, व ते मुंबईतील पोयबावाडी परिसरात राहत असत. त्यांचे सदर घरी त्याच्या पुस्तकांची अपुऱ्या जागेअभावी नीट व्यवस्था होत नसे, म्हणून त्यांनी पुस्तकांसाठी खास घर बांधण्याचे मनावर घेतले.
दादरच्या हिंदू कॉलनीत त्यांनी दोन प्लॉट खरेदी केले. बांधकामासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेऊन बांधकाम सुरू केले. बांधकामावर देखरेखीसाठी आईसकर यांना नेमले. व 1931 ते 1933 या दोन वर्षांत बांधकाम पूर्ण झाले. दोन प्लॉट्सवरील बांधकामांपैकी प्लॉट क्रमांक 99 वरील ‘चार मिनार’ नावाची इमारत त्यांनी ग्रंथ खरेदी व कर्जाची फेड करण्यासाठी 9 मे 1941 रोजी विकली. प्लॉट क्रमांक 129 वरील 55 चौरस यार्ड जागेवर बांधलेले राजगृह त्यांनी पुस्तकांसाठी ठेवले. तेथेच ते कुटुंबीयांसह राहत असत.
शिवाजी पार्क येथील चैत्यभूमी होण्यापूर्वीपासून दरवर्षी 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनी अनुयायी या राजगृहाचे दर्शन घेण्यासाठी येत आले आहेत. याला राष्ट्रीय स्मारक करण्याची योजना होती पण, काही कायदेशीर व तांत्रिक बाबीमुळे हे शक्य झाले नाही. राजगृह येथे बाबासाहेबांनी 50,000 हून अधिक ग्रंथांचा संग्रह केला होता. ते त्यावेळी जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय होते. 2013 मध्ये राजगृहाचा समावेश वारसा वास्तूमध्ये (हेरिटेज) झाला.
राजगृहाच्या तीन मजल्यांपैकी पहिला मजला हा स्मारक म्हणून विकसित केला गेला आहे. त्यामध्ये बाबासाहेबांच्या अनेक दुर्मिळ वस्तुंचा संग्रह आहे. दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यात आंबेडकर कुटुंबीय राहतात.
बाबासाहेबांनी मुंबईमध्ये स्थायिक व्हायचे ठरवल्यानंतर दादरमधली राजगृह ही वास्तू बांधून घेतली होती. बाबासाहेबांकडे पुस्तकांचा मोठा संग्रह होता आणि त्यांनी या पुस्तकांसाठी हे घर खास बांधून घेतले होते. राजगृहाच्या तळमजल्यावर बाबासाहेबांचं वास्तव्य होते. आज राजगृहाच्या तळमजल्यावरच्या दोन खोल्यांमध्ये वस्तुसंग्रहालय आहे.
डॉ. आंबेडकरांनी आणि रमाबाईंनी वापरलेल्या विविध वस्तू येथे ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये त्यांच्या वापरातले फर्निचर, पितळेची भांडी, बाथटब या गोष्टी आहेत. या सगळ्यासोबतच बाबासाहेब ज्या खोलीत बसून काम करत तिथे त्यांचे टेबल, त्यांच्या संग्रहातली काही पुस्तके ठेवण्यात आली आहेत. डॉ. आंबेडकरांना विविध प्रकारच्या छड्या (वाकिंग स्टीक्स) जमवण्याचाही छंद होता.
वेगवेगळ्या मुठींच्या आणि वेगवेगळ्या ठिकाणांहून त्यांनी आणलेल्या या छड्याही राजगृहातल्या या संग्रहात ठेवण्यात आल्या आहेत. सोबतच या खोलीतल्या टेबलावर बाबासाहेबांनी लिहीलेल्या भारतीय संविधानाची प्रत आणि त्यावर त्यांचा चष्माही ठेवण्यात आलाय. शेजारच्या खोलीत बाबासाहेबांच्या आयुष्यातले विविध क्षण दाखवणारी छायाचित्रे आहेत. राजगृहातल्या याच संग्रहालयात बाबासाहेबांचा अस्थिकलशही आहे.
दिल्लीला बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर याच राजगृहावर त्यांचे पार्थिव आणण्यात आले होते. राजगृहाच्या पोर्चमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आणि नंतर इथूनच 7 डिसेंबर 1956 च्या दुपारी बाबासाहेबांचा अखेरचा प्रवास सुरू झाला. दादर चौपाटीला ज्या जागी बाबासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले तिथे नंतर एक स्तूप उभारण्यात आला. स्तूप म्हणजेच चैत्य. म्हणूनच आता या जागेला ‘चैत्यभूमी’ म्हणून ओळखले जाते.
अंत्यसंस्कारांनंतर बाबासाहेबांचा एक अस्थिकलश राजगृहात आणण्यात आला. हा अस्थिकलश आजही राजगृहात आहे. राजगृहाच्या वास्तूतले तळमजल्यावरचे हे संग्रहालय सर्वसामान्यांना पाहण्यासाठी खुले असते तर वरच्या मजल्यावर आंबेडकर कुटुंबीय राहतात. 6 डिसेंबरला दादरमधल्या चैत्यभूमीवर बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी येणारे अनेकजण राजगृहावरही येऊन जातात.
7. मुक्तिभूमी, येवला

नाशिक जिल्ह्यातील येवला ही ‘मुक्तिभूमी’ आहे, जेथे बाबासाहेबांनी मुक्तीचा संदेश दिला होता अर्थात धर्मांतराची घोषणा केली होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक हे येवला येथील एक स्मारक-संग्रहालय आहे. 2 एप्रिल 2014 रोजी या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.
येवला या ठिकाणी 13 ऑक्टोबर 1935 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा धर्मांतराची जाहीर घोषणा केली होती. येथे हिंदू धर्माचा त्याग करण्याचे बाबासाहेबांनी घोषित केले मात्र पुढे आपण कोणता धर्म स्वीकारायचा याबद्दल निर्णय झालेला नव्हता. ‘हिंदू धर्माचा त्याग’ म्हणजेच अस्पृश्यांसाठी गुलामगिरीतून मुक्ती होती. त्यामुळे या स्थळाला ‘मुक्तिभूमी’ म्हटले गेले.
मुक्तीभूमी ही आंबेडकरवादी लोक व पर्यटकांसाठी एक महत्त्वपूर्ण स्थळ म्हणून विकसित झाली आहे. या ठिकाणी विविध उत्सव तसेच सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
6 डिसेंबर 2021 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 65व्या महापरिनिर्वाणदिनी, मुक्तीभूमी या स्थळाला महाराष्ट्र राज्य सरकारने ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे.
मुक्तिभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक सुंदर पूर्णाकृती पुतळा उभारला असून त्याचे अनावरण भदन्त आर्यनागार्जून सुरई ससाई यांचे हस्ते 4 मार्च 2014 रोजी करण्यात आले. विपश्यना हॉल, विश्वभूषण स्तूप, बुद्धविहार, वाचनालय, भिक्खू निवास, भिक्षू प्रशिक्षण केंद्र, आंबेडकरांचे शिल्प, ऑर्ट गॅलरी, संग्रहालय, विश्रामगृह, अनाथाश्रम, वसतीगृहाची निर्मिती आता प्रस्तावित आहे.
8. दीक्षाभूमी, नागपुर

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातील दीक्षाभूमी हे भारतीय बौद्धांचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती आणि सोबतच आपल्या 5 लाख अनुयायांनाही बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. त्यामुळे या भूमीला ‘दीक्षाभूमी’ म्हटले गेले. धर्मांतराच्या सोहळ्याच्या काही कालावधीनंतर येथे एक भव्य स्तूप उभारला गेला. आपल्या भव्य आकारामुळे याला ‘धम्मचक्र स्तूप’ असेही म्हटले जाते.
दीक्षाभूमी हा एक मोठा स्तूप आहे. दीक्षाभूमीचा विस्तार मोठा आहे, कलेचा एक उत्तम नमुना आपल्याला इथे पहायला मिळतो. दीक्षाभूमीच्या बांधकामासाठी 5000 लोकांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. दीक्षाभूमीच्या बांधकामासाठी धौलपूर इथून आणलेल्या मार्बल आणि ग्रेनाईटचा वापर केलेला आहे. दीक्षाभूमीचा डोम हा 120 फूट उंचीचा आहे.
येथे बावीस प्रतिज्ञांचा स्तंभही अभारला गेला आहे. सोबतच बोधिवृक्ष लावला गेला व बौद्ध भिक्खू भिक्खूणींच्या निवासासाठी बाजूला एक विहार बांधला गेला आहे. दीक्षाभूमी हे बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडित सर्वात लोकप्रिय स्थळ आहे.
दीक्षाभूमीला वर्षभर बौद्ध अनुयायी व पर्यटक भेट देत असतात. मात्र अशोक विजयादशमी आणि 14 ऑक्टोबर रोजी यांच्या संखेत लक्षणिय वाढ होऊन लक्षावधी लोक येथे आलेले असतात. भारतातील व विदेशातील, मुख्यत्वेकरून जपान, थायलंड आणि श्रीलंका येथील अनेक अनुयायी व प्रसिद्ध व्यक्ती या स्थळास भेट असतात. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे.
9. महापरिनिर्वाण भूमी, दिल्ली

नवी दिल्ली येथे महापरिनिर्वाण भूमी आहे, जेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले होते. अधिकृतपणे ‘डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक’ (Dr. Ambedkar National Memorial) म्हणून ओळखले जाणारे हे स्मारक 26 अलीपूर रोड, नवी दिल्ली येथे आहे. हे बाबासाहेबांचे निवासस्थान होते व येथेच त्यांचे 1956 मध्ये महापरिनिर्वाण/ निधन झाले होते, त्यामुळे याला ‘महापरिनिर्वाण भूमी’ किंवा ‘महापरिनिर्वाण स्थळ’ म्हणूनही ओळखले जाते.
13 एप्रिल 2018 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. स्मारकातील इमारतीची रचना उघडलेल्या भारतीय संविधानाच्या पुस्तकाप्रमाणे असून हा आकार “ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक” आहे. स्मारकाला सुमारे 200 कोटी रूपये एवढा खर्च लागला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधीत पंचतीर्थ म्हणजेच पाच स्थळांचा विकास करण्याचे केंद्र ठरवले आहे, त्यापैकी हे स्मारक एक आहे.
1951 मध्ये केंद्रीय कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्लीतील 1, हार्डिंग ॲव्हेन्यू हे सरकारी निवासस्थान सोडले आणि 26 अलीपूर रोड इथल्या सिरोहीच्या महाराजांच्या निवासस्थानी राहायला आले. 1951 ते 1956 या काळात बाबासाहेबांचे वास्तव्य या घरात होते. तिथेच त्याचे 6 डिसेंबर, 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे ही वास्तू ‘परिनिर्वाण स्थळ’ किंवा ‘परिनिर्वाण भूमी’ म्हणून ओळखली जाते.
या स्मारक स्थळी कार्यरत असलेले डॉ. आंबेडकर राष्ट्रीय सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक विजय बौद्ध यांनी स्मारक लोकार्पणाच्या 12 वर्षांपूर्वीपासून या स्मारकासाठी संघर्ष सुरू केला होता. या घराचे स्मारकात रूपांतर करावे या मागणीसाठी बराच काळ आंदोलन झाले. त्यानंतर, अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार केंद्रात आल्यावर ही वास्तू मूळ मालकाकडून ताब्यात घेण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी सोहळा समितीने 2 डिसेंबर 2003 रोजी या घराचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला व वास्तुचे स्मारकात रूपांतर केले. या ठिकाणी भव्य स्मारकाची निर्मिती व्हावी म्हणून नवीन स्मारकाचा आराखडा तयार केला गेला, 21 मार्च 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन केले. दोन वर्षानंतर 127व्या आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला, 13 एप्रिल 2018 रोजी नरेंद्र मोदींनी या स्मारकाचे उद्घाटन केले.
स्मारकाचे एकूण क्षेत्र 7,374 चौरस मीटर असून 4561.62 चौरस मीटर जागेत बांधकाम झालेले आहे. सुमारे 200 कोटी रुपये खर्च या स्मारकास झाला. येथील इमारतीस संपूर्ण हिरवा रंग आहे.
स्मारकाच्या प्रवेशद्वारावर 11 मीटर उंचीचे अशोक स्तंभ उभारण्यात आला आहे आणि यांच्या मागे ध्यान केंद्र आहे. या स्मारकाच्या इमारतीची रचना उघडलेल्या पुस्तकासारखी आहे, आणि हे पुस्तक भारताचे संविधान आहे. ही रचना ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक आहे.
स्मारक परिसरात प्रदर्शन व आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज वस्तुसंग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे. बाबासाहेबांच्या कार्याची माहिती देणे, प्रदर्शनाचे आयोजन इत्यादी कार्यक्रम होणार आहे.
या ठिकाणी बाबासाहेबांचा 12 फुट उंचीचा कांस्य धातूचा एक भव्य पुतळा, डिजीटल प्रदर्शनी, गौतम बुद्धांची ध्यानस्थ मुर्ती आहे. थ्री डी इफेक्ट द्वारे बाबासाहेब प्रत्यक्ष आपले विचार मांडताना दिसतात. येथे ध्यान केंद्र, बोधिवृक्ष आणि संगीतमय कारंजे देखील आहेत.
10. चैत्यभूमी, मुंबई

चैत्यभूमी हे मुंबईच्या दादर भागात असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधीस्थळ किंवा स्मृतिस्थळ आहे. “परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी” असे या चैत्यस्मारकाचे अधिकृत नाव असून हे चैत्य आंबेडकरवादी जनतेचे आणि बौद्ध अनुयायांचे एक प्रमुख श्रद्धास्थान आहे. दरवर्षी सहा डिसेंबर, महापरिनिर्वाण दिनी लक्षावधी आंबेडकरानुयायी चैत्यभूमीस भेट देतात आणि आपल्या महान नेत्यास नमन करतात.
चैत्यभूमीचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सून मीरा आंबेडकर यांनी 5 डिसेंबर 1971 रोजी केले. येथे, डॉ. आंबेडकरांचे अवशेष समाविष्ट केले आहेत. 2 डिसेंबर 2016 रोजी रोजी महाराष्ट्र शासनाद्वारे चैत्यभूमी स्मारक स्थळाला ‘अ’ वर्ग पर्यटन व तीर्थ स्थळाचा दर्जा देण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मृती अव्याहतपणे जपण्यासाठी चैत्यभूमीवर अखंडपणे तेवणारी ‘भीम ज्योत’ देखील उभारण्यात आली. 11 सप्टेंबर 2019 रोजी या भीमज्योतीचे अनावरण करण्यात आले.
एका चौरस दालनावर एक लहान घुमट असे चैत्यभूमीचे रूप आहे. हे दालन जमिनीवर आणि तळमजल्यात विभागले आहे. चौरस आकाराच्या संरचनेत एक दीड मीटर उंचीची वर्तुळाकार भिंत आहे. वर्तुळामध्ये संगमरवरी फरशीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा आणि गौतम बुद्धाची मूर्ती आहे. वर्तुळाकार भिंतीत दोन दरवाजे आहेत. तळमजल्यावर एक स्तूप आहे आणि तेथे भिक्खूंसाठी विश्रांतीची जागा आहे. चैत्यभूमीचे मुख्य प्रवेशद्वार ही सांचीच्या स्तूपाच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती असून आतमध्ये अशोक स्तंभाची प्रतिकृती बनविली आहे.
सारांश
या लेखामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी निगडित 10 सर्वात प्रमुख स्थळांबद्दल माहिती जाणून घेतली. हे सर्व स्थळे भारतीयांसाठी प्रेरणास्थळे आणि श्रद्धास्थळे आहेत.
या दहा स्थळांपैकी सहा महाराष्ट्रात आहेत; तर गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली आणि भारताबाहेरील लंडन येथे प्रत्येकी एक स्थळ आहे. भारत सरकारने ‘पंचतीर्थ’ म्हणून घोषित केलेल्या पाचही स्थळांचा समावेश या लेखामध्ये आपल्याला बघायला मिळतो.
हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला ईमेलद्वारे किंवा कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. बाबासाहेबांच्या जीवनातील या 10 स्थळांपैकी तुम्ही कोणकोणत्या स्थळाला भेटी दिल्या आहेत हे सुद्धा आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा.
याशिवाय बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडित अन्य कोणती स्थळे व स्मारके आहेत याविषयी सुद्धा तुम्ही आम्हाला सांगू शकता, ज्यावर आपण एक स्वतंत्र लेख बनवू शकतो. तुमच्या काही सूचना असतील तर त्या सुद्धा आम्हाला कळवा, धन्यवाद.
हे ही वाचलंत का?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वात उंच तीन पुतळे
- डॉ. आंबेडकर यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती
- 2022 मध्ये ‘मराठी विकिपीडिया’वर सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती कोण? जाणून घ्या…
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- ‘धम्म भारत’चे अन्य लेख वाचा
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह जीवनचरित्र पुस्तके पुतळे सुविचार / Quotes दृष्टिकोन/ विचार कार्य आणि योगदान विकिपीडिया रंजक तथ्ये धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.