भारतातील बौद्ध लोकसंख्या 1 कोटी की 7 कोटी?

इसवी सन पूर्व सहाव्या शतकात भारतभूमीत बौद्ध धर्माचा उदय झाला. मौर्यकाळी बौद्ध धम्म हा संपूर्ण भारताचा ‘राजधर्म’ होता. इसवी सन पूर्व सहावे शतक ते इसवी सन तेरावे शतक या 1 हजार 900 वर्षांच्या कालावधीमध्ये बौद्ध धर्म प्रचंड प्रमाणात भारत भूमीत टिकून राहिला. परंतू तेराव्या शतकाच्या नंतर बौद्ध धर्म उतरती कळायला लागली आणि पुढे तो अल्पमतात आला. आजघडीला याच भारतातील बौद्ध लोकसंख्या ( Buddhist population in India ) किती आहे? आज रोजी भारतात बुद्ध धम्माचे अस्तित्व काय आहे? याची प्राथमिक माहिती आपण या लेखात जाणून घेऊयात. 

  यह लेख हिंदी में पढ़े  

Buddhist Population in India - भारतातील बौद्ध लोकसंख्या
भारतातील बौद्ध लोकसंख्या 1 कोटी नसून 7 कोटी आहे 

भारतातील बौद्ध लोकसंख्या Buddhist Population in India

तथागत बुद्ध हे एक भारतीय होते आणि बौद्ध धर्माचा उदय देखील भारतातच झाला. नंतरच्या काळात बौद्ध धम्म हा भारताचा सर्वात मोठा धर्म बनला. त्यामुळे आजघडीला भारतात अल्पसंख्यांक असलेल्या बौद्धांची लोकसंख्या नेमकी किती आहे या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

सरकारी आकडेवारीमध्ये तर भारतात 1 कोटी किंवा ~1% बौद्ध असल्याचे दिसते (2021 च्या लोकसंख्येचा विचार करता); मात्र अन्य काही दाव्यांनुसार देशात 5 ते 7 कोटी बौद्ध आहेत, यापुढेही अन्य एका दाव्यामध्ये 10 कोटी बौद्ध असल्याचेही सांगण्यात आले आहे. 7 कोटी ही भारतातील बौद्धांची लोकसंख्या मानली तर चीन व जपान नंतर भारत तिसरा सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेला देश ठरेल. 

प्राचीन भारतात अनेक राजांनी बौद्ध धम्माला राजाश्रय दिला होता. त्यामुळे बराच काळ बौद्ध धर्म हा देशात प्रमुख धर्म म्हणून टिकून राहिला. मात्र ब्राह्मणी धर्माचा विरोध, इस्लामी शासकांची आक्रमणे, संघातील मतभेद यासारख्या अनेक कारणांमुळे बाराव्या-तेराव्या शतकानंतर बौद्ध धम्माला भारतात उतरती कळा लागली. परंतु बाराव्या-तेराव्या शतकानंतर सुद्धा बौद्ध धर्म हा केवळ हिमालयीन प्रदेशांत व ईशान्य भारतामध्ये भक्कम प्रमाणात आजपर्यंत टिकून राहिला आहे.

बौद्ध लोक हे केवळ पूर्व व ईशान्य भारतीय प्रदेशांपुरतेच मर्यादित राहिले होते का? तर नाही. भारताच्या इतर जवळपास सर्व राज्यांमध्ये बौद्ध धर्माचे अनुयायी होते, पण अगदी अत्यल्प प्रमाणात. 1951 मध्ये बौद्ध धर्माची स्थिती बघितल्यानंतर ह्या गोष्टी स्पष्ट होतील (ज्यावेळी बाबासाहेबांनी त्यांचे सामुहिक धर्मांतर केले नव्हते).

Buddhist Population in india

 

बौद्ध धर्मीयांची आकडेवारी

भारतातील बौद्ध धर्मीयांची जनगणनेनुसार आकडेवारी खालीलप्रमाणे आहे :

वर्ष

बौद्ध

प्रमाण

वृद्धी

1951

1,80,823

0.05%

-

1961

32,50,227

0.74%

1,697.5%

1971

38,12,325

0.70%

17.3%

1981

47,20,000

0.71%

23.8%

1991

63,88,000

0.76%

35.3%

2001

79,55,207

0.77%

24.5%

2011

84,42,972

0.70%

6.1%

2021

-

-

-

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामूहिक धम्म दीक्षा घेण्याआधी, 1951च्या जनगणनेनुसार सबंध भारतात अवघे 1,80,823 बौद्ध होते. त्यापैकी उत्तर प्रदेशात 3,221; मध्य प्रदेशात 2,291; कर्नाटकात 1,710; महाराष्ट्रात फक्त 2,489; पंजाबात 1,550; दिल्ली 500 आणि बाकीचे बहुतेक सर्व बौद्ध ईशान्य भारतातील रहिवासी होते.

1956 च्या 14 ऑक्टोबर पासून नागपूरात 5 लाख, 15 ऑक्टोबर रोजी 3 लाख तर चंद्रपूर येथे दिनांक 16 ऑक्टोबर रोजी 3 लाख, तसेच अकोला येथे 500 लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या तीन दिवसांतच 10 लाख+ लोकांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. 1961च्या जनगणनेनुसार भारतातील बौद्धांची संख्या ही 32,50,227 होती (1951 सालच्या संख्येच्या 1,671% वाढलेली), त्यापैकी केवळ एकट्या महाराष्ट्रात 27,89,581 बौद्ध होते हे आढळून आले. पुढे 1961 मध्ये भारताची एकूण लोकसंख्या ही 43.12 कोटी एवढी होती.

सर्वात जास्त बौद्ध लोक कोणत्या राज्यात आढळतात ? 1951 ते 1961 या दशकात महाराष्ट्रातील बौद्धांची संख्या उर्वरित भारतातील बौद्धांच्या लोकसंख्येपेक्षा बेसुमार वाढलेली होती, म्हणजेच 2,487 वरून ती तब्बल 27,89,501 पर्यंत पोहोचली होती.

1951 मध्ये महाराष्ट्रात अवघे 2,489 बौद्ध होते, ज्यांचे प्रमाण 0.01% इतके अत्यल्प होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान सामूदायिक धर्मांतरानंतर 1961 मध्ये ही संख्या तब्बल 1,15,991% ने वाढून 27,89,501 इतकी महाप्रचंड झाली होती. त्याचे मुख्य कारण बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 साली केलेले “धम्मचक्रप्रवर्तन” हे होते. महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या एकूण लोकसंख्येत महार समाजाचे प्रमाण सुमारे 70% इतके होते. धर्मांतरामुळे त्यांची विभागणी 35% बौद्ध व 35% हिंदू महार अशी झाली.

आजही (2011 ची जनगणना) महाराष्ट्रातील अनुसूचितीत जातींच्या 1.32 कोटी लोकसंख्येत 60% महार होते, ज्यापैकी काहींची धार्मिक नोंद ‘बौद्ध’ तर काहींची ‘हिंदू’ अशी झाली. तर अन्य 12% पूर्वाश्रमीच्या महारांनी स्वतःची ‘महार’ ही [हिंदू] ओळख मागे सोडत स्वतः ला केवळ ‘बौद्ध’ म्हणवून नोंदवले.

1971च्या जनगणना अहवालानुसार भारतात बौद्धांची लोकसंख्या 38,12,325 एवढीच नोंदली गेली. 1961 ते 1971 मध्ये बौद्धांच्या संख्येत फारच अल्पशी वाढ झाली. भारतातील 85% पेक्षा थोडेसे अधिक बौद्ध महाराष्ट्रात होते. यावरून असे स्पष्टपणे दिसते की जरी धर्मांतराची चळवळ सुरू झाल्यानंतर महाराष्ट्राबाहेरसुद्धा अनेक धर्मांतराचे कार्यक्रम घडून आलेले असले तरी महार समाजाप्रमाणे धर्मांतराच्या चळवळीत तेवढ्या मोठ्या प्रमाणात अन्य अस्पृश्य जाती-जमातींनी भाग घेतला नाही. Buddhist Population in India 

आता ही सरकारी जनगणनेतील आकडेवारी अगदी अचूक होती असे नाही. नव्याने धर्मांतरीत झालेल्या बौद्धांची ही आकडेवारी चुकिची आहे, याबद्दल खात्री होती. प्रत्यक्षात भारतातील बौद्धांची लोकसंख्या शिरगणतीच्या आकडेवारीपेक्षा कितीतरी पटीने अधिक होती.

एका संदर्भानुसार मार्च 1959 पर्यंत जवळ जवळ 1.50 ते 2 कोटी अस्पृश्यांनी धर्मांतर केले होते आणि ही संख्या भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 4.5% होती. 1961 मध्ये भारताची एकूण लोकसंख्या ही 44.90 कोटी एवढी होती.

 

सरकारी आकडेवारी आणि बौद्धांच्या प्रत्यक्ष वस्तुस्थितींची आकडेवारी यामध्ये तफावत असण्याची दोन मुख्य कारणे :

पहिले कारण असे की, शिरगणतीचे काम करणारे बहुतांश कर्मचारी स्वत: हिंदू असल्यामुळे धर्मांतराच्या चळवळीची मर्यादा आणि महत्त्व कमी लेखण्यासाठी मुद्दाम त्यांनी अनेक बौद्धांचीही हिंदू म्हणूनच खोटी नोंद केली. (1951 सालच्या स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्याच शिरगणतीचे वेळी ब्रिटिश बौद्ध भिक्खू महास्थवीर संघरक्षित हे विरोध करीत असतानासुद्धा त्यांची स्वत:ची नोंद ‘धर्माने हिंदू आणि जातीने बौद्ध’ अशी केली गेली होती.)

दुसरे कारण धर्मांतर केलेल्या अनेक बौद्धांनी शिरगणतीच्या वेळी मात्र आपण ‘बौद्ध’ असल्याचे सांगितले नसल्याने सरकारी दफ्तरात तशी नोंद होऊ शकली नाही. काहीजण आपण बौद्ध आहोत असे उघडपणे जाहिर करण्यास भीत होते. कारण तसे केल्यास हिंसक हिंदूंकडून छळ होण्याची भीती त्यांना होती. तेव्हा हिंदूंनी धर्मांतरीत बौद्धांवर हल्ले करून काहींना ठार ही मारलेले होते. काहिजण स्वत: बौद्ध म्हणून जाहिर करण्यास नाखूश होते. कारण शिष्यवृत्या, प्रशिक्षणवेतन आणि अन्य सवलतींवर पाणी सोडावे लागले असते.

 

1959 साली भारताच्या लोकसंख्येत 4.5% बौद्ध होते असे तेव्हाचे एक सर्वेक्षण सांगते. 1961 ते 2011 या 50 वर्षांच्या दीर्घ कालखंडामध्ये दरवर्षी लाखो लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. यामुळे देशातील बौद्धांची लोकसंख्या कमीत कमी 0.5% ते 1% ने वाढून ती 5% ते 5.5% झाली असल्याचा अंदाज येतो.

2011 मध्ये भारताची लोकसंख्या 121 कोटी होती व त्यातील कमीत कमी 5.5% लोकसंख्या (6 कोटी ते 6.50 कोटी) ही बौद्ध धर्मीय होती. ही संख्या भारतातील हिंदू व इस्लाम धर्मानंतर तिसऱ्या क्रमांकावर येते. भारतात एकूण बौद्धांची संख्या ही ख्रिश्चन, शिख व जैन धर्मिंयाहून अधिक आहे.

जगात ख्रिश्चन व इस्लाम धर्मानंतर लोकसंख्येत बौद्ध धर्माचा क्रमांक लागतो. जगभरातील बौद्धांची संख्या ही 175 कोटींपेक्षा अधिक असतांना त्यापुढे भारतातील 7 कोटी बौद्धांची संख्या फारच अल्पशी आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीन मध्येही 50% ते 80% (75 – 115 कोटी) बौद्ध लोकसंख्या आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 1956 मध्ये एका भाषणात म्हणाले होते की, “2 वर्षांत मी देशात 5 कोटी बौद्ध लोक निर्माण करून दाखवीन.” 2 वर्षांत म्हणजे 1959 या वर्षापर्यंत, आणि तेव्हा 5 कोटी ही संख्या देशाच्या लोकसंख्येच्या 15% होती. मात्र आज 60 वर्षांनंतरही देशात 15% बौद्ध लोक झालेले नाही!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना, शोषितांना ‘मुक्तिचा मार्ग’ म्हणून बौद्ध धर्म दिला. पण आज किती दलित व इतर मागासवर्गीय बौद्ध बनलेले आहेत? आज (2011 नुसार) देशात अनुसूचित जाती व जमाती यांचीच संख्या 31 कोटी असतांना बौद्धांची संख्या तुलनेत फार कमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या बुद्ध धम्माच्या मार्गावर प्रत्येक आंबेडकरवाद्यांनी चालावे स्वत: कर्माने व अधिकृत बौद्ध बनावे.

महाराष्ट्र शासन व महाराष्ट्राचे तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री (2014 ते 2019) राजकुमार बडोले यांनी केंद्र सरकारच्या अनुसूचित जातींच्या (SC च्या) सवलतींचा लाभ देशभरातील ‘अनुसूचित जातींच्या बौद्धांना’ व्हावा यासाठी पाठपुरावा केला होता. तेव्हा त्यांनी जनगणनेच्या अतिरिक्त सर्व भारतात सुमारे पाच कोटी बौद्ध असल्याचे सांगितले होते. 2023 चा विचार करता हा आकडा साडेसहा कोटींपर्यंत जातो. आणि अशा प्रकारे भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्या ही 7 कोटी ते 7.50 कोटी असल्याचे आपल्या निदर्शनास येते. 

बौद्धांनी जनगणनेत, शाळेच्या दाखल्यावर किंवा जात प्रमाणपत्रावर स्वतःचा धर्म ‘बौद्ध’ नोंदवला तर त्यांना अनुसूचित जातींच्या सवलती मिळणार नाही, असा ‘गैरसमज’ बऱ्याच बौद्ध लोकांमध्ये रुजला असल्याने ते जनगणनेत स्वतःची खरी धार्मिक ओळख लपवतात. परिणामी शासकीय जनगणनेत देशातील बौद्धांचा आकडा हा वास्तविक बौद्ध संख्येच्या चार-पाच पट इतका प्रचंड कमी झालेला दिसतो.

नागार्जुन सुरई ससाई यांनी भारत देशामध्ये तब्बल 10 कोटी बौद्ध अनुयायी असल्याचा दावा केला आहे. भदंत सुरई ससाई हे जपान मधून भारतात आलेले भारतातील एक प्रसिद्ध आणि थोर भिक्खू आहेत. त्यांनी बाबासाहेबांची धार्मिक चळवळ गतिमान केली, महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी संघर्ष केला, आणि ते सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक दीक्षाभूमी समितीचे अध्यक्ष आहेत. 

 

बौद्ध लोकसंख्या – 2011 ची जनगणना

File:District wise Buddhist population percentage, India census 2011.png
2011च्या राष्ट्रीय जनगणनेनुसार, भारतातील बौद्ध लोकसंख्या – जिल्हानिहाय प्रमाण (%)

2001-11 दरम्यान, बौद्ध हे शीख आणि जैनाप्रमाणेच, हिंदूंपेक्षा खूप कमी दराने वाढले होते.

 

भारतात बौद्धांचे दोन वर्ग किंवा गट आहेत

1. आंंबेडकरी बौद्ध किंवा नवयानी बौद्ध (87%) आणि

2. परंपरागत बौद्ध (महायानी, हीनयान, वज्रयानी बौद्ध) (13%)

 

पहिला वर्ग – अरुणाचल प्रदेश, मिझोराम आणि काही इतर पूर्वोत्तर राज्यांमधील अनुसूचित जमाती; लडाख आणि उत्तर हिमाचल प्रदेशात; आणि, दार्जिलिंग आणि सिक्कीमचे लोक हा परंपरागत बौद्ध समुदायांचा लहान वर्ग आहे. 2011 मध्ये भारतात 84 लाख बौद्धांची गणना झाली, त्यापैकी 11 लाख या वर्गात समाविष्ट केली जाऊ शकतात.

दुसरा वर्ग म्हणजे, 1951 नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रभावाखाली बौद्ध धर्मीयांचे धर्मपरिवर्तन झालेला नवयानी बौद्ध (नवबौद्ध) या नावाचा सर्वात मोठा वर्ग आहे. या वर्गात सुमारे 73 लाख बौद्ध समाविष्ट होतात, त्यापैकी अवघे 65 लाख (90% नवबौद्ध) महाराष्ट्रातील आहेत. तथापि महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येत केवळ 6% बौद्ध आहेत. उर्वरित सुमारे 9 लाख नव-बौद्ध मध्यप्रदेश, छत्तीसगढ, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि पंजाब, तसेच छोटे उत्तर राज्ये हरियाणा आणि दिल्ली येथे आहेत.

2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या विश्लेषणानुसार, भारतात 84 लाखांहून अधिक बौद्ध आहेत आणि त्यापैकी 87% आंबेडकरवादी बौद्ध (नवबौद्ध किंवा नवयानी बौद्ध) आहेत. ते इतर धर्मांमधून धर्मांतरित झाले आहेत, मुख्यतः दलित (अनुसूचित जाती) ज्यांनी हिंदू धर्माच्या जातिव्यवस्थेपासून वाचण्यासाठी धर्म बदलला. उर्वरित 13% बौद्ध हे ईशान्य आणि उत्तर हिमालयीन क्षेत्रातील पारंपारिक बौद्ध समुदाय – थेरवाद, महायान आणि वज्रयान या संप्रदायांचे अनुयायी आहेत.

हिमालयाच्या परिसरातील सिक्कीम, लडाख, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग पर्वतरांग आणि उच्च हिमाचल प्रदेशमधील लाहौल आणि स्पीति भागात बौद्ध धर्म हा मुख्य धर्म आहे. याव्यतिरिक्त बौद्ध अवशेष आंध्रप्रदेशात सुद्धा आढळतात, जे महायान बौद्ध धर्माचे मूळ आहे. गेल्या शंभर वर्षांपासून बौद्ध धर्माची भारतामध्ये पुनरुज्जीवन होत आहे, कारण बऱ्याच भारतीय बुद्धिमतांनी बौद्ध, तिबेटी निर्वासित लोकांचे स्थलांतर केले आणि लक्षावधी हिंदू दलितांनी बौद्ध धर्मात धर्मांतर केले.

 

2011 च्या जनगणनेनुसार, भारताच्या केवळ सिक्कीम (27.39%), अरूणाचल प्रदेश (11.77%), मिझोरम (8.51%), महाराष्ट्र (5.81%), त्रिपुरा (3.41%) व हिमाचल प्रदेश (1.10%) या सहा राज्यांत बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण 1% पेक्षा अधिक आहे. 2019 नंतर या यादीत लदाख हा केंद्रशासित प्रदेश समाविष्ट होतो, ज्यामध्ये 40 टक्के बौद्ध लोकसंख्या आहे. जनगणनेनुसार, 2001 ते 2011 दरम्यान भारतातील बौद्ध लोकसंख्या 79.55 लाखांहून 84.43 लाखांपर्यंत पोहचली.

 

2011 मध्ये राज्यांमधील बौद्धांची घट : भारत देशात 1961 मध्ये बौद्ध टक्केवारी 0.74% होती आणि 2011 मध्ये ती 0.70% झाली, म्हणजे या 50 वर्षांत बौद्ध लोकसंख्या 0.04% ने कमी झाली आहे. 2001 ते 2011 दरम्यान पुढील राज्यांमध्ये बौद्ध लोकसंख्या कमी झाली आहे – उत्तर प्रदेश (3,14,400 वरून 2,21,200), कर्नाटक (3,93,300 वरून 95,710), जम्मू आणि काश्मीर (1,13,800 वरून 1,12,600), पंजाबमध्ये (41,490 वरून 33,240), आणि दिल्ली (23,700 वरून 18,450). 

भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार, भारतात 84 लाख बौद्ध आहेत. महाराष्ट्रात बौद्धांची सर्वाधिक संख्या आहे, एकूण लोकसंख्येच्या 5.81%. जवळजवळ 90 टक्के नवयानी किंवा नव-बौद्ध लोक महाराष्ट्रात राज्यात राहतात. महाराष्ट्रात राहणारा मराठी बौद्ध हा भारतातील सर्वात मोठा बौद्ध समुदाय आहे. बहुतेक बौद्ध मराठी लोक पूर्वीच्या महार समाजाचे आहेत. जनगणनेनुसार, 2001 ते 2011 दरम्यान महाराष्ट्रातील बौद्ध लोकसंख्या 58.39 लाखांहून 65.31 लाखांपर्यंत पोहचली.

Buddhist Population in india

 

बौद्ध धम्मदीक्षेचे आयोजन

‘मिशन जय भीम’ हा ग्रुप 2025 पर्यंत 100 दशलक्ष लोकांना “त्यांच्या मूळ संस्कृतीकडे परत” आणण्याच्या आपल्या योजनेवर पुढे जात आहे. या समूहाच्या वेबसाइटनुसार, 14 सप्टेंबर 2025 रोजी अखिल भारतीय “मेगा इव्हेंट” सह मिशनचे नेतृत्व करण्यासाठी देशभरातील बौद्ध भिक्खूंची एक टीम तयार केली जात आहे. (संदर्भ बातमी)

भारतात जर 10 कोटी लोक बौद्ध बनले तर जगात चीन आणि जपान नंतर भारत ही तिसरी सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असेल. दिल्ली सरकारमधील माजी मंत्री व आमदार राजेंद्र पाल गौतम यांच्या नेतृत्वाखालील ‘मिशन जय भीम’ समूहाने 2025 पर्यंत भारतामध्ये 10 कोटी बौद्ध बनवण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी राष्ट्रीय जनगणनेत सुद्धा ‘धर्माच्या रकान्यात’ ‘हिंदू’ ऐवजी ‘बौद्ध’ लिहिणे आवश्यक आहे. (संदर्भ)

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष एम. वेंकटस्वामी हे 18 जानेवारी 2021 रोजी विश्व बुद्ध धम्म संघाच्या हसन जिल्हा युनिटद्वारे आयोजित कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी पाच लाख लोकांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. या धम्मदीक्षा कार्यक्रमाच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही त्या दिवशी (ऑक्टोबर 2021) बेंगळुरूमध्ये (कर्नाटक) मेगा इव्हेंट आयोजित करत आहेत, जिथे 10 लाख लोक बौद्ध धर्म स्वीकारतील.”  (संदर्भ)

बाबासाहेबांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी देखील कोट्यवधी मागासवर्गीय लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्याचा संकल्प केला आहे.

 

Buddhist Population in India 

 

संदर्भ

 

हे ही वाचलंत का?


(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

3 thoughts on “भारतातील बौद्ध लोकसंख्या 1 कोटी की 7 कोटी?

    1. I think Indian Buddhist population today means yr. 2022, is 10 cr but Indian counting population officer is Hindu so that’s a lot more issues with buddhist people. I surely Gov officer afraid buddha Religion.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!