Last Updated on 4 October 2025 by Sandesh Hiwale
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संस्कृत भाषा अवगत होती का? किंवा बाबासाहेबांनी मनुस्मृती पूर्ण वाचली होती का? असे प्रश्न काही लोकांना पडत आहेत, आणि या दाव्यांत खरेच काही तथ्य आहे का की निव्वळ हा एक भ्रम आहे? याचेेच उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहोत. – ambedkar and sanskrit

Ambedkar and Sanskrit
ज्या लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काही वाचले असेल, त्या लोकांना हे दोन परस्परसंबंधित प्रश्न नक्कीच आश्चर्यचकित करतील. यापुढे ज्यांनी बाबासाहेबांना जरासे चांगले वाचले आहे आणि समजले आहे त्यांना कदाचित हे प्रश्न निरर्थकही वाटतील.
पण तरीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत भाषा अवगत होती की नाही? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण हा प्रश्न काही लोकांनी उपस्थित केला आहे आणि याबद्दल Quora वर देखील प्रश्न विचारले गेले आहेत.
निश्चितच असे प्रश्न विचारण्यामागे काही कारण सुद्धा आहे. बाबासाहेबांना संस्कृतचे ज्ञान नव्हते किंवा त्यांना संस्कृत भाषाच येत नव्हती, अशी माहिती आजकाल पसरवली जात आहे. आणि विशेषत: भक्त टाईप लोक या गोष्टीला बळी सुद्धा पडत आहेत. एक विशेष गोष्ट ही आहे की, अशाप्रकारची माहिती पसरवणारे लोक पुरावा म्हणून चक्क बाबासाहेबांच्याच एका पुस्तकाचा संदर्भ देताहेत. अआता तरह बाबासाहेबांना संस्कृत भाषा अवगत नसल्याचा दावा RSS सरसंघचालक मोहन भागवत आणि रामभद्राचार्य सारख्या उल्लेखनीय व्यक्तींनी देखील केला आहे.
खरे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनेक भाषा अवगत होत्या. मात्र त्यांमध्ये एक संस्कृत भाषा सुद्धा होती का? बाबासाहेबांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी संस्कृत विषयी लिहिले आहे, व स्वतःच्या संस्कृत ज्ञानाबद्दल सुद्धा सांगितले आहे.
बाबासाहेबांना संस्कृत येत होती का? काही लोक बाबासाहेबांनी लिहिलेल्या “हू वर द शूद्रास” ग्रंथामधील एक उतारा दाखवून दावा करतात की त्यांना संस्कृत येत नव्हती. टीकेच्या वैधतेची तपासणी करण्यापूर्वी, प्रथम त्या मुळ इंग्लिश उताऱ्यावर नजर टाकूया, तो असा आहे:
मराठी अनुवाद :
“शूद्रांच्या उत्पत्तीचा अभ्यास स्वागतार्ह असला तरी, काहीजण विषय हाताळण्याच्या माझ्या पात्रतेवर प्रश्न उपस्थित करू शकतात… जर इशारा यासाठी असेल की मी संस्कृत भाषेवर प्रभुत्वाचा दावा करू शकत नाही, मी ही कमतरता मान्य करतो. पण मला वाटत नाही की यामुळे मला या क्षेत्रात काम करण्यास पूर्णपणे अपात्र ठरविण्यात यावे. संस्कृत भाषेतील साहित्य खूप कमी आहे जे इंग्रजीमध्ये उपलब्ध नाही. संस्कृतच्या ज्ञानाची कमतरता म्हणूनच या विषयाला हाताळण्यात अडथळा ठरू नये. कारण मी म्हणतो की संबंधित साहित्याचा अभ्यास, जरी इंग्रजी अनुवादांमध्ये, 15 वर्षांसाठी, माझ्यासारख्या मध्यम बुद्धिमत्तेच्या व्यक्तीला सुद्धा कार्यासाठी पुरेशी पात्रता प्रदान करण्यासाठी पुरेसा असावा. विषयावर बोलण्याच्या माझ्या पात्रतेच्या नेमक्या मापदंडाबाबत, ही पुस्तक सर्वोत्तम साक्ष देईल.”
वरील उताऱ्यात लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे “प्रभुत्व” (mastery) हा शब्द. डॉ. आंबेडकरांनी त्यांना संस्कृत येत नाही असं म्हटलं नाही, तर ते म्हणत होते की ते त्यावर प्रभुत्वाचा दावा करू शकत नाहीत. स्पष्टपणे सांगायचं तर, बाबासाहेब हा दावा करताना विनम्रता दाखवत होते, कारण त्यांना संस्कृतचे गहन ज्ञान होते.
या संदर्भात, आपले पुस्तक Dr. Bhimrao Ambedkar : His Life and Work (1988) मध्ये पद्मश्री डॉ. एम.एल. शहारे [यूपीएससीचे माजी अध्यक्ष] यांचे शब्द उद्धृत करण्यासारखे आहेत. त्यांनी लिहिले:
Even the Elphinston High School was not free from the ever-present shadow of untouchability. Although Bhim was deeply interested in learning Sanskrit, he was not allowed to do so as he was an untouchable. It was because of this reason that he was forced, much against his will, to choose Persian. But later, Bhim’s unconquerable will enabled him to become a scholar of high calibre in Sanskrit, the very language, he was forbidden to learn in his school days.
मराठी अनुवाद :
“एल्फिन्स्टन हायस्कूलदेखील अस्पृश्यतेच्या सततच्या सावलीपासून मुक्त नव्हते. भीमला संस्कृत शिकण्याची खूप इच्छा होती, पण तो अस्पृश्य असल्यामुळे त्याला संस्कृत शिकण्याची परवानगी दिली नाही. यामुळेच त्याला आपल्या इच्छेविरुद्ध फारसी भाषा निवडावी लागली. मात्र नंतर, भीमच्या अडथळ्यांना न झुकणाऱ्या इच्छाशक्तीने त्याला संस्कृत भाषेत उच्च दर्जाचा विद्वान बनवले, त्याच भाषेत जी त्याला शाळेत शिकायला मनाई करण्यात आली होती. [SOURCE]
हे उद्धरण या तथ्यावर अचूक प्रहार करते की डॉ. आंबेडकर संस्कृतचे असाधारण विद्वान होते. याहूनही अधिक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, रामचंद्र बनौधा, जे डॉ. आंबेडकरांच्या सुरुवातीच्या चरित्रकारांपैकी एक होते, आणि ज्यांनी बाबासाहेबांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे चरित्र लिहिले, या विषयावर एक नवीन अंतर्दृष्टी देतात. त्यांच्या “डॉ. आंबेडकर का जीवन संघर्ष” (1946) या हिंदी पुस्तकात रामचंद्र बनौधा यांनी नोंदवले आहे की बाबासाहेबांना केवळ संस्कृत येत नव्हती तर त्यांनी बॉन विद्यापीठात विद्यार्थ्यांना थोड्या काळासाठी जर्मन भाषेत संस्कृत सुद्धा शिकवले!
हे नि:संदिग्धपणे सिद्ध करते की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ संस्कृतवर प्रभुत्व मिळवले नाही तर जर्मन भाषेवर सुद्धा. की त्यांनी कोलंबिया विद्यापीठात फ्रेंच आणि जर्मन दोन्ही शिकल्या.
Ambedkar and Sanskrit – डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संस्कृत भाषा

बाबासाहेब सांगतात की…
“मी संस्कृत शिकावे अशी वडिलांची फार इच्छा होती. पण त्यांची ही इच्छा सफल झाली नाही कारण आमच्या संस्कृतच्या मास्तरांनी मी अस्पृश्यांना शिकवणार नाही असा हट्ट धरला. त्यामुळे मला पर्शियन भाषेकडे निरुपायाने धाव घेणे भाग पडले. मला संस्कृत भाषेचा अत्यंत अभिमान आहे. ती भाषा मला चांगली यावी अशी माझी तीव्र इच्छा आहे. आता स्वतःच्या मेहनतीने मी थोडेसे संस्कृत वाचू-समजू शकतो. पण त्या भाषेत पारंगत व्हावे अशी माझी अंतःकरणात तळमळ आहे.”
थोर विचारवंत दत्तोपंत ठेंगडींच्या ‘सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि बाबासाहेब’ या ग्रंथातील परिशिष्टामध्ये त्यांनी बाबासाहेबांचे संस्कृतचे ज्ञान व तत्कालीन संदर्भ दिलेले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोशात याचा एक महत्त्वाचा उल्लेख आढळतो – आंबेडकर, भीमराव रामजी
डॉ. आंबेडकरांना वाचनाचा अतिशय नाद होता. विद्यार्थीदशेत त्यांना संस्कृतचे अध्ययन करता आले नाही. पुढे ते मुद्दाम चिकाटीने संस्कृत शिकले. ग्रंथांशिवाय आपण जगूच शकणार नाही, असे त्यांना वाटे.
बाबासाहेबांना 12 पेक्षा जास्त भाषा अवगत होत्या (काही लोक अजूनही 9 भाषांवरच अडकले आहेत) आणि त्यापैकी एक संस्कृत भाषा होती!
ambedkar and sanskrit
संस्कृतचे धडे
डॉ. आंबेडकर यांना भारतात संस्कृत हा विषय म्हणून घेण्यास परवानगी नसल्यामुळे ते जर्मनीमध्ये संस्कृत शिकले होते. संस्कृत ही पवित्र भाषा मानली जाते. अस्पृश्य मुलाला शिकवून ही भाषा ब्राह्मणांना अपवित्र करण्याची इच्छा नव्हती.
तथापि, ही भाषा जाणून घेण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर इतके इच्छुक होते की त्यांनी दोन महिन्यांत जर्मन भाषेच्या माध्यमातून ही भाषा शिकली आणि आर्थिक मदतीसाठी ट्यूशन वर्ग देणे सुरू केले.
मुंबई व दिल्ली येथे वास्तव्य करत असताना त्यांनी संस्कृत भाषेत अजून पारंगत होण्यासाठी अनुक्रमे पंडित होसकेरे नागप्पा शास्त्री (Pandit Hoskere Nagappa Sastri) आणि पंडित सोहनलाल शास्त्री (Pandit Sohanlal Shastri) यांच्याकडून संस्कृतचे धडे गिरवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संस्कृत विषयीची ओढ दर्शविणारे ‘संस्कृताभिमानी डॉ. आंबेडकर‘ हे पुस्तक आहे.
पंडित होसकेरे नागप्पा शास्त्री यांचे नातू Beligere Manjunath इंग्लिश quora वर लिहितात की,
मराठी अनुवाद:
डॉ. आंबेडकर यांनी माझ्या आजोबा, पंडित होस्केरे नागप्पा शास्त्री यांच्याकडून १९३० ते १९४२ या काळात मुंबईत संस्कृत भाषा शिकली. पंडित नागप्पा शास्त्री यांनी गांधींच्या आत्मचरित्राचा सत्य शोधनम् हा संस्कृत अनुवाद केला, जो भारतीय विद्या भवन यांच्याकडून प्रकाशित झाला. पंडित नागप्पा शास्त्री यांना डॉ. आंबेडकरांनी १९३७ मध्ये स्थापन केलेल्या मुंबईतील खालसा कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक म्हणून नेमले गेले. मी लहानपणी माझ्या आजोबांच्या घरी डॉ. आंबेडकरांना माझ्या आजोबांसोबत शुद्ध संस्कृतमध्ये चर्चा करताना पाहिले आहे. मी हे नोंदवून ठेवू इच्छितो जेणेकरून कुणीही डॉ. आंबेडकरांना संस्कृत येत नव्हते असा दावा करू नये. त्यांना सर्व शास्त्रे स्वतः प्रथम हाताने वाचायची होती, कारण त्यांनी इंग्रजी अनुवादांना काहीही मूल्य दिले नव्हते.
डॉ. आंबेडकर 1930 ते 1942 या काळात मुंबई येथे पंडित होसकेरे नागप्पा शास्त्री यांच्याकडे संस्कृत शिकले. डॉ. आंबेडकर यांनी 1937 मध्ये स्थापन केलेल्या खालसा कॉलेज मुंबई येथे पंडित नागप्पा शास्त्री हे संस्कृतचे प्राध्यापक होते. नागप्पा शास्त्री यांचे नातू Beligere Manjunath यांनी डॉ. आंबेडकरांना शुद्ध संस्कृतमध्ये त्यांच्या आजोबांशी चर्चा करताना पाहिले आहे.
पंडित सोहनलाल शास्त्री यांच्या सोबत ते दिल्लीमध्ये आपल्या निवासस्थानी संस्कृत भाषेविषयी चर्चा करत, संस्कृत भाषेत संवादही साधत.
अनेक लोक संस्कृत भाषेचा द्वेष करतात. मात्र त्यांना हे माहिती नसते की संस्कृत मध्ये केवळ ब्राह्मणी साहित्य नाही आहे, तर त्यापेक्षा कैक पटींनी अधिक महायानी बौद्ध साहित्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृतचे महत्त्व समजले होते, त्यामध्ये विविध प्रकारचे ज्ञान सामावलेले होते. म्हणून बाबासाहेबांना शालेय जीवनापासून संस्कृत शिकण्याची ओढ होती.
जर बाबासाहेबांना संस्कृतचे ज्ञान नसते तर कदाचित ते त्यांची पुढील तीन पुस्तके लिहू शकले नसते – Philosophy of Hinduism, Riddles in Hinduism, आणि Revolution and Counter-revolution in Ancient India. या पुस्तकांमध्ये संस्कृतचे संदर्भच संदर्भ दिलेले आहेत.
ambedkar and sanskrit
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साधला संस्कृतमध्ये संवाद…
पश्चिम बंगालचे खासदार पं. लक्ष्मीकांत मैत्र यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संस्कृत भाषेच्या ज्ञानाविषयी खात्री वाटत नव्हती. म्हणून पं. मैत्र यांनी आपल्या काही शंका संस्कृतमधूनच डॉ. आंबेडकर यांना विचारल्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संस्कृतमधूनच पं. मैत्र यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. हा संवाद ऐकून घटना समितीच्या बैठकीतील सर्व सदस्य आश्चर्यचकित झाले. ही बातमी तेव्हाच्या काही प्रमुख वृत्तपत्रांतही प्रसिद्ध झाली होती.
बाबासाहेबांना तर संस्कृत अवगत होती, मग काही लोक कशाच्या आधारावर त्यांना संस्कृत समजत नव्हती असे सांगताना दिसतात? याचे कारण त्यांनी आपल्या ‘व्हू वर द शुद्राज‘ या पुस्तकात संस्कृतबद्दल केलेले एक विधान आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत भाषा शिकण्याची इच्छा होती पण त्यांना त्यांच्या जातीमुळे संस्कृत शिकण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यांना शाळेत त्याऐवजी पर्शियन शिकावे लागले. तरिही त्यांनी पुढे गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे, सोहनलाल शास्त्री अशा संस्कृतवर प्रभुत्व असणाऱ्या मान्यवरांच्या खाजगी शिकवण्या लावून संस्कृतवर हुकमत मिळवली.
‘Who were the Shudras’ ग्रंथाच्या पान क्रमांक 9 वर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की –
“I cannot claim mastery over the Sanskrit language, I admit this deficiency.”
मराठीत: “संस्कृत भाषेवर प्रभुत्व असल्याचा दावा मी करु शकत नाही. हा कमीपणा मी मान्य करतो.”
बाबासाहेबांच्या वरील विधानाचा अर्थ लावण्याचा आपण प्रयत्न करू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ‘Who Were the Shudras?‘ या पुस्तकात त्यांना संस्कृत समजत नाही हे मान्य केले नाही, तर संस्कृतवर आपले प्रभुत्व नसल्याचे सांगितले आहे.
संस्कृत भाषा अवगत असणे व संस्कृत भाषेवर प्रभुत्व असणे यात फरक असतो. संस्कृतवर प्रभुत्व नाही यास संस्कृत येत नाही असा अर्थ लावणे म्हणजे केवळ वाक्याचा विपर्यास आहे. ज्याप्रमाणे बाबासाहेबांना इंग्लिश, मराठी व इतर भाषांवर अत्युच्च प्रभुत्व होते, तसे अत्युच्च प्रभुत्व संस्कृतवर नव्हते इतकाच या पुस्तकातील वाक्याचा अर्थ. तथापि बाबासाहेब येथे नम्रपणा दाखवतात, कारण प्रत्यक्ष ते संस्कृतचे गाढे विद्वान होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विसाव्या शतकातील जगातील सर्वात बुद्धिमान राजकारणी होते, त्यांच्यासाठी अनेक देशी-विदेशी भाषा शिकणे काही अवघड नव्हते, मात्र त्यांना यापेक्षा अनेक महत्त्वाची कामे होती.
ambedkar and sanskrit
Ambedkar and Sanskrit – बाबासाहेबांनी मनुस्मृती पूर्ण वाचली होती का?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती (manusmriti) संस्कृत भाषेत वाचली होती की नाही हे सांगणे अवघड आहे. परंतु त्यांनी पूर्ण मनुस्मृती वाचली होती हे निश्चित आहे. मनुस्मृती दहन ही मोठी घटना होती, आणि याच्या खूप आधी म्हणजे विद्यार्थी दशेतच बाबासाहेबांनी मनुस्मृती वाचली होती. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपट‘ बघावा, त्यात सुरुवातीला ते मनुस्मृतीमधील श्लोक वाचत असताना दिसतात.
हेही बघा : मनुस्मृतीमध्ये शुद्रांबद्दल आणि महिलांबद्दल काय लिहिले आहे?
‘मनुस्मृती का जाळली?’ यासंबंधी आपली भूमिका प्रकट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ फेब्रुवारी १९२८ च्या बहिष्कृत भारतात स्फुट लिहिले आहे. ते आपले विचार मांडताना लिहितात-
“आम्ही जे मनुस्मृतीचे वाचन केले आहे, त्यावरून आमची खात्री झाली आहे की, त्या ग्रंथात शूद्र जातीची निंदा करणारी, त्यांचा उपमर्द करणारी, कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढविणारी वचने ओतप्रोत भरलेली आहेत. त्यात धर्माची धारणा नसून असमानतेची मात्र धुळवड घातली आहे. स्वयंनिर्णयाचे तत्त्व प्रस्थापित करावयास निघालेल्या सुधारणावाद्यास असला ग्रंथ कधीच मान्य होणे शक्य नाही; व तो अस्पृश्य वर्गासही मान्य नाही. एवढेच दर्शविण्याकरिता महाड येथे त्याची होळी करण्यात आली.
आमच्या मित्राचा दुसरा एक आक्षेप आहे की, मनुस्मृती ही जुन्या काळी अमलात असलेल्या नियमांची एक जंत्री आहे. त्या जंत्रीतील नियम आज कोणास लागू नाहीत. मग असले जुने बाड जाळण्यात काय अर्थ आहे ? मनुस्मृती हे एक जुने बाड आहे, असे आमच्या मित्राप्रमाणे आम्हासही म्हणता आले असते तर फार बरे झाले असते. आम्हास मोठाच आनंद झाला असता. परंतु दुर्दैवाने आम्हास तसे म्हणता येत नाही.”
बाबासाहेबांनी मनुस्मृतीचा चुकीचा इंग्लिश अनुवाद वाचला होता असाही अपप्रचार लोक करत असतात. “डॉ. आंबेडकरांच्या वेळी मनुस्मृतीचा मराठी भाषेत अनुवाद झाला नव्हता. मनुस्मृतीची इंग्लिशमधे अनेक भाषांतरे झाली होती आणि ती सर्व ब्रिटिशांनीच लिहिलेली होती. ब्रिटीशांनी मनुस्मृतीचा अनुवाद करताना अनेक (??) चुका केल्या होत्या आणि मनुस्मृतीला वाईट दाखवण्याचा प्रयत्न केला होता” असा मनुप्रेमी लोकांचा संदर्भहीन युक्तीवाद असतो.
अनेक लोक मनुच्या चुकीच्या लेखणीचे खापर ब्रिटिश लेखकांवर फोडत आहेत, आणि असे अर्थहीन व तथ्यहीन मुद्दे मांडत आहेत. जर ब्रिटिशांच्या मनुस्मृतीच्या अनुवादामध्ये काही चुकीचा अनुवाद झाला असेल तर तो ह्या लोकांनी स्पष्ट करायला हवा. ते लेखक ब्रिटिश होते, त्यांनी आपल्यावर राज्य केलेय, म्हणून त्यांनी जे लिहिले ते चुकीचेच आहे… (न वाचताच) मनुस्मृती हा खूप चांगला ग्रंथ आहे अशा भाबड्या आशा बाळगून काही उपयोग नाही.
ambedkar and manusmriti
मनुस्मृतीच नाहीतर भगवद्गीता आणि वेद यांचेही वाचन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे.


मनुस्मृतीचे दहन हे बाबासाहेबांच्या ब्राह्मण अनुयायांनी केलेले आहे, हे ब्राह्मण अनुयायी संस्कृतवर प्रभुत्व असणारे होते. त्यामुळे मनुस्मृतीचे चुकीचे अनुवाद वाचल्यामुळे तीवर टीका करण्यात येते हा युक्तिवाद फोल ठरतो. प्राध्यापक हरी नरके लिहितात की, मनुस्मृतीचे समर्थन करणे म्हणजे बलात्कारी, स्मगलर, राष्ट्रद्रोही इसमांचे समर्थन करणे होय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भाषातज्ज्ञ होते, आणि त्यांना संस्कृत भाषा सुद्धा अवगत होती. न वाचता, न समजून घेता, न संस्कृत येता कसे काय एक थोर पुस्तकप्रेमी एका पुस्तकाचे दहन करू शकेल!! समतेच्या एका थोर पुरस्कर्त्याने विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या ग्रंथाची होळी केली.
ambedkar and manusmriti
हेही वाचलतं का?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर निघालेत 15+ चित्रपट; या अभिनेत्यांनी साकारल्या बाबासाहेबांच्या भूमिका
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 130 प्रेरणादायी सुविचार
- राजरत्न आंबेडकरांचा जीवन परिचय
- अन्य लेख
संदर्भ :
- महाराष्ट्र बोर्ड 10वी संस्कृत पुस्तक
- संस्कृत उत्थानातील डॉ. आंबेडकरांचे योगदान!
- Master of Languages: The Polyglot in Dr. Ambedkar
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्कृत अभ्यासाचे मिळणारे संदर्भ — ‘हिंदुस्थान’ वृत्तपत्राच्या 12 सप्टेंबर 1949 रोजीच्या अंकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संसदेमध्ये संस्कृतमध्ये संवाद साधत असत, याचा संदर्भ मिळतो. दि. स्टेट्समन, दि. 11 सप्टेंबर, 1949 या वृत्तपत्रामध्येही डॉ. आंबेडकर यांच्या संस्कृत ठरावाचा संदर्भ आहे. दै. ‘आज’ (हिंदी), 15 सप्टेंबर, 1949 दि. लीडर (इंग्रजी) अलाहाबाद, 13 सप्टेंबर, 1949 दि. ‘हिंदू’, 11 सप्टेंबर, 1949
- बाबासाहेब को संस्कृत क्यों सीखनी पड़ी? Why Dr Ambedkar had to learn Sanskrit?
- संस्कृताभिमानी डॉ. आंबेडकर : लेखक – डॉ. सुरेंद्र अज्ञात
- आंबेडकरवाद और संस्कृत अर्थात व्याकरण बनाम ब्राह्मणवाद : लेखक – डॉ. सुरेंद्र अज्ञात
- Did Ambedkar know Sanskrit | string exposed by Rajat mourya
- Who did B R Ambedkar learn Vedas from? Did he know Vedic Sanskrit to begin with? (Mayur Patel यांचे उत्तर वाचावे ज्यावर नागप्पा शास्त्री यांचे नातू Beligere Manjunath यांचाही reply आहे, यांचे इंग्लिश लेखन हिंदीमध्ये बघण्यासाठी हे पहा.)
मराठी quora वरील प्रश्न : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘संस्कृत भाषा’ अवगत होती का? त्यांनी ‘मनुस्मृती’ पूर्ण वाचली होती का? त्याचा संदर्भ मिळेल का?
अतिशय महत्वपूर्ण असा लेख!!
कशाला आटापिटा करतात राव बाबासाहेब यांनी संस्कृत भाषेतील मनुस्मृती वाचली असती तर ती जाळलीच नसती …..हा पण आयुष्याच्या उत्तरार्धात मात्र मनुस्मृती उमगली त्यांना व म्हणुनच हिंदु कोड बिल बनवताना बाबासाहेब आंबेडकर यांनी शतप्रतिशत मनुस्मृती चाच आधार घेतलेला आहे
तुमचे तर्क हे निव्वळ चुकीचे व तथ्यहीन आहेत साहेब. मी लेखामध्ये विविध संदर्भ जोडले आहेत, त्यानुसार सदर लेखातील पुराव्यांसह केलेले लिखाण विश्वसनीय ठरते. मनुस्मृती का जाळली जाते हे समजून घेण्यासाठी तुम्हाला आधी मनुस्मृतीमध्ये शुद्रांबद्दल काय काय लिहिले आहे हे जाणून घ्यावे लागेल ( त्यासाठी येथे बघा)