डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 32 पदव्या मिळवल्या होत्या का? या दाव्याची सत्यता, त्याचा प्रसार कसा झाला आणि बाबासाहेबांनी प्रत्यक्षात किती पदव्या मिळवल्या याची सविस्तर माहिती जाणून घ्या. 32 degrees of Ambedkar in Marathi

32 Degrees of Ambedkar in Marathi : 32 पदव्यांचा दावा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय इतिहासातील एकमेव असे व्यक्तिमत्त्व होते, जे कायदा, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि शिक्षण या विविध क्षेत्रांमध्ये पारंगत होते. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाबद्दल अनेक दावे केले जातात. त्यापैकी एक प्रसिद्ध दावा म्हणजे – “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 32 पदव्या मिळवल्या होत्या.”
हा दावा कितपत सत्य आहे? या दाव्याची पार्श्वभूमी काय? आणि हा दावा सर्वप्रथम कोणी मांडला? या लेखात या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली आहेत. त्यामुळे हा लेख काळजीपूर्वक वाचावा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 32 पदव्या मिळवल्या होत्या का?
थोडक्यात उत्तर द्यायचे झाले तर – नाही!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 32 पदव्या मिळवल्या नव्हत्या. अर्थात, आपण “32 पदव्यां”चा अर्थ शैक्षणिक पदव्या असा घेतला आहे. बाबासाहेबांना अनेक मानद उपाध्या आणि सन्मान मिळाले होते, पण त्यांनी 32 शैक्षणिक पदव्या घेतल्या होत्या, हा दावा पूर्णपणे असत्य आहे.
32 पदव्यांचा दावा प्रथम कोणी केला?
हा दावा मी स्वतः, संदेश हिवाळे, सर्वप्रथम 2016 मध्ये प्रसारित केला होता.
मी DhammaBharat.com या वेबसाईटचा लेखक, तसेच मराठी विकिपीडियाचा संपादक आणि प्रचालक आहे. 2016 पूर्वी इंटरनेटवर किंवा इतरत्र कोठेही “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 32 पदव्या मिळवल्या होत्या” असा उल्लेख आढळत नाही.
या दाव्याची पार्श्वभूमी
2013-14 मध्ये मी अंबड (जिल्हा जालना, महाराष्ट्र) येथे एका व्याख्यानाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्या वेळी माझे वय अवघे 18-19 वर्षे होते.
त्या कार्यक्रमातील प्रमुख वक्त्याने एक प्रश्न विचारला –
“कोणी सांगू शकेल का, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण किती पदव्या मिळवल्या होत्या?”
प्रेक्षकांकडून योग्य उत्तर न मिळाल्यामुळे त्यांनीच सांगितले –
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण 32 पदव्या मिळवल्या होत्या!”
परंतु, या वक्त्याने बाबासाहेबांच्या त्या 32 पदव्यांची नावे सांगितली नाहीत. ते शैक्षणिक पदव्यांच्या संदर्भात बोलले होते, सन्मान किंवा उपाध्यांबद्दल नव्हे. त्या वेळी मी हा दावा खरा मानला आणि त्याचा प्रचार केला.
मी 32 पदव्यांचा प्रचार कुठे केला?
मी हा दावा चार प्रमुख ठिकाणी प्रसारित केला –
- फेसबुक – “बाबासाहेबांबद्दल 55/ 100 रंजक तथ्ये” या पोस्टमध्ये. (पाहा + पाहा)
- व्हॉट्सअप – विविध ग्रुप्समध्ये ही माहिती शेअर केली.
- मराठी विकिपीडिया – 23 जुलै 2016 रोजी 32 पदव्यांचा उल्लेख केला. (पाहा)
- हिंदी विकिपीडिया – 30 जुलै 2016 रोजी तोच उल्लेख केला. (पाहा)
या माध्यमांद्वारे 32 पदव्यांचा दावा मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचला. यासंदर्भात, कृपया 29 मे 2016 रोजीच्या माझ्या फेसबुक पोस्टमधील “आंबेडकरांच्या 55 रोचक तथ्यां“ विषयीची हिंदी पोस्ट पाहावी. त्यामधील फॅक्ट क्रमांक 38 तपासावा → क्लीक करा.
तसेच, 19 सप्टेंबर 2016 रोजीच्या माझ्या फेसबुक पोस्टमधील “आंबेडकरांच्या 100 रोचक तथ्यां“ विषयीची हिंदी पोस्ट पाहावी. त्यामधील फॅक्ट क्रमांक 38 तपासावा → क्लीक करा.
“डॉक्टर ऑल सायन्स“ ही चुकीची संकल्पना!
बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘55 फॅक्ट्स’ या पोस्टमध्ये माझ्याकडून टायपिंगच्या चुकीमुळे “Doctor of Science” ऐवजी “Doctor All Science” असे लिहिले गेले होते. प्रत्यक्षात “Doctor All Science” (किंवा “Doctor of All Science”) अशी कोणतीही पदवी अस्तित्वात नाही.
मात्र, अनेकांनी या चुकीला प्रमाण मानून तिचा उल्लेख वारंवार केलेला दिसतो. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांनी “Doctor [of] All Science” ही पदवी मिळवली आहे, असा चुकीचा समज पसरला आहे.
यासंदर्भात, कृपया 29 मे 2016 रोजीच्या माझ्या फेसबुक पोस्टमधील “आंबेडकरांच्या 55 रोचक तथ्यां“ विषयीची हिंदी पोस्ट पाहावी. त्यामधील फॅक्ट क्रमांक 26 तपासावा → क्लीक करा.

32 पदव्यांचा दावा असत्य का आहे?
नंतर अधिक संशोधन केल्यानंतर मला समजले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 32 पदव्या मिळवल्या नव्हत्या.
या दाव्याचा खोटेपणा सिद्ध करणारी तथ्ये:
- बाबासाहेबांच्या शिक्षणाविषयी कोणतेही अधिकृत किंवा विश्वसनीय स्रोत 32 पदव्यांचा उल्लेख करत नाहीत.
- बाबासाहेबांच्या जीवनचरित्रात (खैरमोडे, कीर, बीसी कांबळे) देखील 32 पदव्यांचा उल्लेख नाही.
- त्या वक्त्याने देखील कोणताही पुरावा दिला नव्हता.
यामुळे मला लक्षात आले की हा दावा पूर्णपणे निराधार आहे.
मी स्वतः माझी चूक दुरुस्त केली!
- मी फेसबुक आणि व्हॉट्सअपवर हा दावा पुन्हा शेअर केला नाही.
- मराठी विकिपीडिया आणि हिंदी विकिपीडियावरून 32 पदव्यांचा उल्लेख काढून टाकला.
मग बाबासाहेबांनी प्रत्यक्षात किती आणि कोणत्या पदव्या मिळवल्या?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 8 किंवा 9 शैक्षणिक पदव्या मिळवल्या होत्या.
बाबासाहेबांच्या पदव्या:
क्र. | पदवी | विद्यापीठ | वर्ष |
---|---|---|---|
1 | बी.ए. (अर्थशास्त्र व राज्यशास्त्र) | मुंबई विद्यापीठ | 1912 |
2 | एम.ए. (अर्थशास्त्र) | कोलंबिया विद्यापीठ | 1915 |
3 | एम.ए. (दुसरी वेळ) | कोलंबिया विद्यापीठ | 1916 |
4 | पीएच.डी. (अर्थशास्त्र) | कोलंबिया विद्यापीठ | 1917 |
5 | एम.एससी. (अर्थशास्त्र) | लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स | 1921 |
6 | डी.एससी. (अर्थशास्त्र) | लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स | 1923 |
7 | बार-ॲट-लॉ (कायदा) | ग्रेज-इन, लंडन | 1923 |
8 | एलएल.डी. (मानद) | कोलंबिया विद्यापीठ | 1952 |
9 | डी.लिट. (मानद) | उस्मानिया विद्यापीठ | 1953 |
डबल एम.ए. चा प्रश्न:
- जब्बार पटेल दिग्दर्शित “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” चित्रपटातील एका दृश्यात बाबासाहेबांनी दोन वेळा एम.ए. केल्याचा उल्लेख आहे. (दृश्य बघा: 13:50 – 14:10)
- काही विद्वानांच्या मते त्यांनी एकच एम.ए. केले होते.
- त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक पदव्यांची संख्या 8 किंवा 9 मानली जाते.
निष्कर्ष – सत्य समजून घ्या!
✅ सत्य:
- बाबासाहेबांनी 8 किंवा 9 पदव्या मिळवल्या.
- त्यांच्याकडे एम.ए., पीएच.डी., एम.एससी., डी.एससी., बार-ॲट-लॉ, एलएल.डी., डी.लिट. अशा उच्च पदव्या होत्या.
- त्यांची विद्वत्ता आणि ज्ञान अफाट होते.
❌ अफवा:
- “बाबासाहेबांनी 32 पदव्या मिळवल्या” हा दावा असत्य आहे.
- हा दावा माझ्याकडील चुकीच्या माहितीमुळे माझ्याद्वारे प्रसारित झाला होता.
- आता हे सत्य स्पष्ट झाले आहे.
अंतिम विचार – आंबेडकर म्हणजे ज्ञानाचा समानार्थी शब्द!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 32 पदव्या मिळवल्या नसल्या तरी, त्यांची विद्वत्ता आणि बौद्धिक क्षमता जगात अद्वितीय होती.
त्यांच्या काळातील सर्वात शिक्षित भारतीय व्यक्ती म्हणून ओळखले जात असतानाच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ त्या काळापुरते मर्यादित नव्हते, तर ते सर्वकालीन सर्वात बुद्धिमान भारतीय व्यक्ती होते. त्यांना “ज्ञानाचे प्रतीक” म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.
बीबीसीच्या एका बातमीनुसार –
“डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या काळातील जगातील सर्वात शिक्षित राजकारणी होते!”
आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञान आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक आहेत. त्यांच्या विचारांचा खरा प्रचार करणे, हीच त्यांना खरी आदरांजली आहे!
वाचकांसाठी :
हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तसेच तुमच्या काही सूचना किंवा प्रश्न असतील तर कृपया कॉमेंट बॉक्समध्ये किंवा ई-मेलद्वारे लिहून आवर्जून कळवा. धन्यवाद.
हे ही वाचलंत का?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण शैक्षणिक प्रवास
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांची यादी
- ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सर्वेक्षणात बुद्ध पहिल्या आणि बाबासाहेब चौथ्या क्रमांकावर होते का?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आद्यचरित्रे
- ‘या’ 12 भाषा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अवगत होत्या!
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जगातील सर्वात हुशार व्यक्ती ठरवणाऱ्या काही खास गोष्टी!
धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.
मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
जयभीम,
माननीय संदेश जी हिवाळे सर तुमच्याकडून तुम्ही स्वतःची चूक मान्य करून स्वतः दुरुस्ती केल्याबद्दल आपले आभार आणि आम्हाला सुद्धा हे ज्ञान मिळाल्याबद्दल पुन्हा अशा तुमच्या आभार व्यक्त करतो आणखी काही अशाच प्रकारे सत्यज्ञान वाचायला मिळेल आशा करतो
जयभीम दीपक वाघ सर,
तुम्हाला नक्कीच धम्म भारतवर विविध प्रकारे सत्यज्ञान वाचायला मिळेल. तुमच्या अनमोल अभिप्रायासाठी मनस्वी धन्यवाद.
Khup imp mahiti dili tumhi. अनेक लोकांनी तर 32 पदव्या यावर फेक पोस्ट बनवल्या आहेत.
तुमच्या अनमोल अभिप्रायासाठी धन्यवाद.
तुमच्यामुळे tv9 मराठी अँड सकाळ सारख्या प्रसारमाध्यम मध्ये देखील 32 पदव्यांचा उल्लेख करत आहेत.